शिंपल्यांची फुले….
समुद्र किनारी वाळूवर पडलेले आकर्षक असे शंख शिंपले आपण नेहमीच बघतो. पण लाटेबरोबर तरंगत येणारे हलके आणि पांढरेशुभ्र असे शिंपले घेऊन फ्लॉवरपॉट मध्ये ठेवण्यासाठी सुंदर असा पुष्पगुच्छ आपण बनवू शकतो.
तर असे जोडशिंपले घेऊन ते एकात एक फुलाप्रमाणे दिसतील असे ठेऊन फेव्हीकॉलने चिकटवावे. नंतर खालच्या बाजूला पाकळ्या प्रमाणे तीन शिंपले ठेवून एकात एक ठेवलेले फुलाप्रमाणे दिसणारे शिंपले चिकटवावे. आता त्याचा आकार उमललेल्या फुलाप्रमाणे दिसेल.
आता त्याच्या मागच्या बाजूने आगपेटीची काडी देठाप्रमाणे चिकटवावी. परागकण करण्यासाठी भगर पिवळा रंग देऊन वापरावी. त्यामुळे फुलांमध्ये नैसर्गिकपणा येईल. साधारणपणे अशी दहा ते बारा फुले तयार करावीत.
पाने करण्यासाठी हिरवा वेलव्हेट पेपर घेऊन दोन्ही बाजूने सारखा दिसेल असा चिकटवावा. कन्हेरीच्या पानाच्या आकाराची पाने तयार कापून तयार करून घ्यावीत.
नंतर एक जाड तार किंवा स्वेटर विणण्याची सुई घेऊन फ्लॉवरपॉटमध्ये शोभून दिसेल अशी आकर्षक पुष्पगुच्छाप्रमाणे रचना करून बांधून घ्यावीत.
खऱ्याखुऱ्या फुलांचा आभास निर्माण करणारी आणि थोडी मेहनत घेतल्यास करायला अगदी सोपी अशी ही कधीही न सुकणारी फुले तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुमच्या घराची कायमस्वरूपी शोभा वाढवतील.
— लेखन : अरुणा गर्जे. नांदेड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800