टोमॅटोच्या सालीची फुले
टोमॅटोच्या सालीची फुले, ऐकून आश्चर्य वाटले ना? “अहो ! टोमॅटो तर खायचे असतात ना” असेही म्हटले असणार हेही ठाऊक आहे मला. पण हे अगदी खरे आहे.
टोमॅटोची प्युरी तयार करतांना वरील साल निरुपयोगी म्हणून आपण फेकून देतो. पण त्यापासूनच आज आपण सुंदर फुले तयार करणार आहोत.
त्यासाठी छान लाल टोमॅटो घेऊन फ्रिजरमध्ये एकदिवस ठेवायचे. त्यामुळे ती एकदम कडक होतील. नंतर बाहेर काढून साधारणपणे पाच मिनिटांनी टोमॅटोवरची साल पाकळ्यांच्या आकाराप्रमाणे अगदी सहज तर निघेलच पण लाल रंगही तसाच कायम राहील. नंतर एका ताटात ती साल छान सुकवून घ्यायची.
फुले तयार करण्यासाठी टूथपिक हिरव्या रंगाने रंगवून त्यावर फुलाप्रमाणे आकार देत एकेक पाकळी दोऱ्याने बांधत जायची. अशाप्रकारे सहा ते सात फुले तयार करायची.
साधारण लांबट आकाराची वेलव्हेट पेपरची किंवा जाड कागदाला हिरवा रंग देऊन पाने तयार करून घ्यायची. फांदीसाठी एक जाड तार घेऊन त्यावर हिरवा कागद चिकटवून घ्यायचा. त्यावर फुले आणि पाने आकर्षक दिसतील अशी त्यांची मांडणी करून पुष्पगुच्छ तयार करायचा.
लालचुटुक फुले आणि हिरवीगार पाने फारच सुंदर दिसतात. अगदी खऱ्याखुऱ्या फुलांचा आभास निर्माण करणारी फुले आपल्या फ्लॉवरपॉट मध्ये नक्कीच शोभून दिसतील आणि खराब न होता टिकून राहतील. पाहणारे संभ्रमात पडतील आणि अगदी सहज म्हणतील – “वाह! क्या बात है |”
— लेखन : अरुणा गर्जे. नांदेड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
Very creative idea… 😁
टाकाऊतून टिकाऊ करण्याची कला सुरेख.
टोमॅटो च्या सालीची फुले.फारच सुंदर.