“थर्माकोलची फुले”
फुलापानांनी बहरलेली वेल पाहिली की अगदी मनात येतं – काय सुंदर दिसतात ही फुलं!पण थर्माकोलची अशीच फुले तयार करून फ्लॉवरपॉट मध्ये किंवा भिंतीवर खिळ्याला अडकवून ठेवल्यास फारच सुंदर दिसतात.
ही फुलं तयार करण्यासाठी प्रथम थर्माकोलवर पाकळीप्रमाणे बदामी आकार काढून घ्यावा. थर्माकोल फार जाड घेऊ नये. नंतर त्या आकारानुसार ब्लेडने त्या पाकळ्या कापाव्यात. अशा तीन पाकळ्या तयार करून त्या पाकळ्यांची खालची बाजू फेव्हीकॉलने एकत्र चिकटवावी. आता बारीक काळी वायर घेऊन त्याचे पराग शोभतील असे तुकडे कापून घ्यावेत. नंतर एका साधारण लांब तारेला तीन तुकडे दोऱ्याने बांधून घ्यावेत. आता ते परागाप्रमाणे दिसतील. नंतर फुलांच्या आत तार देठाप्रमाणे टोचून बसवावी म्हणजे पराग सुंदर दिसतील व खाली तारेचा उपयोग गुच्छ बांधण्यासाठी होईल.
याप्रकारे लहान मोठ्या आकाराची नऊ ते दहा फुले तयार करावी. हिरव्या वेलव्हेट पेपरची पाने तयार करावी मागच्या बाजूने बारीक तार चिकटवून घ्यावा म्हणजे पानांना हवा तसा बाक देता येईल. तार दिसू नये म्हणून हिरवा क्रेप कागद तारेवर लावावा.
हे सर्व तयार केल्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे पुष्पगुच्छ तयार करावा. भिंतीवर लावायचे असल्यास वेलीप्रमाणे रचना करावी.
ही फुले फ्लॉवरपॉट मध्ये तर आकर्षक दिसतातच पण बोगनवेलीप्रमाणे त्यांची रचना केल्यास भिंतीवर पण फारच शोभून दिसतील.
— लेखन : अरुणा गर्जे. नांदेड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
छान लेख.
सुंदर.