‘गोचर ‘ या सृष्टीमध्ये
दिसे अनर्थ, उत्पात
पलीकडे ‘अगोचर’
तेही कुठले निवांत ?
डोळा- देखल्या द्वंद्वाने
काटा फुटे अंगावर
दृष्टीआडचा सागर
प्रलयाच्या काठावर
बकध्यान लावूनिया
बसलेले उभे जग
भडकते अंतरात
रिक्त खळग्याची आग
इथे दुःख, तिथे सुख
ऐसे फुका म्हणू नये
आवाक्याच्या बाहेरचे
अज्ञानात कल्पू नये
स्वप्नभंग होता कसे
बावचळायाला होते
आणि अशक्तशा देही
फक्त पेंग रेंगाळते
कंगालांच्या मेळाव्यात
कशासाठी सामीलता
पिचलेल्या बासुरीचे
सूर कशाला लावता ?
पाप पुण्य कल्पनेचा
उगा बाऊ करू नये
आहे तवर इथेच
कसे टिच्चून रहावे
— रचना : सूर्यकान्त द. वैद्य. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
👌👌👌👌 खूप छान रचना