Monday, November 11, 2024
Homeलेख'डोली' कडून 'अरथी' कडे

‘डोली’ कडून ‘अरथी’ कडे

आज एका वेगळ्या विषयावर लिहीत असतांना ‘डोली आणि अरथी’ यांच्यातील संवाद आणि त्यांना समोरून येणाऱ्या पालखीतून मिळालेला सद्गुरूंचा संदेश देण्याचा माझा या लेखातून प्रयत्न आहे.

मनुष्य जन्म हा एकदाच आहे. खरं तर जन्म कुठे घ्यायचा ? विवाह कोणाबरोबर होणार ? आणि जीवनाचा अंतिम क्षण कोणता असेल ? हे आपल्या हातात नसतं. परमेश्वराने ते आपल्या हातात ठेवलेले आहे. संपूर्ण जगावर नियंत्रण ठेवणारा माझा पांडुरंग सर्वांचा नियंत्रक आहे.

तोच कर्ता, तोच करविता, तोच स्थिती लय कर्ता !

आपण जन्म नक्की कुठे घ्यायचा ? हे आपल्या हातात नसते. विवाह कोणाबरोबर करायचा ? कोणाला डोलीत बसून यायला मिळेल ? काहीच माहिती नसतं. परंतु अनेकांच्या नशिबात योग्य ठिकाणी आपल्या विवाहानंतर डोली गेली असेल तर ती स्त्री खरोखर पुण्यवान, भाग्यवान आणि नशीबवान असणार हे निश्चितच. आपल्या जीवनाचा अंतिम काळ केव्हा असेल ? मृत्यू कधी येईल ? अरथी कधी निघेल ? हे माहीत नसतं, अशा परिस्थितीत एक पालखी आनंदाची- सुखाची असेल तर दुसरी अरथी ही दुःखाची असू शकते. पूर्वकर्म, पूर्वजन्म आणि पूर्व संचितावर या गोष्टी आधारित असतात, तसेच त्याला सद्गुरूंची साथ असावी लागते हे निश्चित.

आजचा विषय थोडा निराळा आहे. स्त्री जीवनाशी संबंधित ‘डोली’ आणि ‘अरथी’ या दोन पालखींच्या वाटेवरून स्त्रीच्या जीवनातील सुखदुःखांची दोन रुपे आपण पाहणार आहोत. डोली म्हणजे विवाह क्षणी आणि अरथी म्हणजे जीवन प्रवास संपल्यानंतर वापरण्यात येणारी वस्तू.

अशी ही एक गोष्ट त्या वेळची आहे की, ज्यावेळी एका घरातून डोली म्हणजेच मेणा-पालखी जी मुलीच्या विवाहाच्या वेळी बाहेर पडली होती, त्याच वेळी समोरून दुसरी पालखी म्हणजेच अरथी, म्हणजेच जीवनाच्या प्रवासातली शेवटची यात्रा समोरून जात होती. त्यावेळी ती डोली अरथी ला म्हणते की, “ताई तू हे चांगलं केलं नाहीस ? माझ्या शुभ कार्यात अशुभ अस विघ्न तू आणलसं ? असं कार्य तू कां केलंस ?

आता माझं हे शुभकार्य अशुभ ठरलंय.”

त्यावेळी अरथी डोलीला म्हणाली, “सखे असं बोलू नकोस, तू जिथे संसारात जात आहेस तिथे मी ही आत्तापर्यंत होते आणि आता मी जिथे जात आहे तिथे भविष्यात तुलाही जावंच लागणार आहे. अगं तुलाही चार जणांचा खांदा लागलाय आणि मलाही चार जणांचा खांदा लागलाय. आज तुझ्यावर फुलांचा वर्षाव होत आहे, त्याचप्रमाणे माझ्यावर सुद्धा फुलांचा वर्षाव होत आहे. आपल्या दोघींचाही प्रवास सुरू झालेला आहे. तुझा प्रवास संसाराकडे आहे तर माझा प्रवास मुक्तीकडे-मोक्षाकडे सुरू झालेला आहे.”

“तुझ्यासारखाच सोळा शृंगार माझाही झालेला आहे, पहा तुझ्या हातात हिरवा चूडा आहे. त्याचप्रमाणे मी सुद्धा हिरव्या बांगड्या घातलेल्या आहेत. तुझ्या भाळावर भांग-सिंदूर भरलेला आहे त्याचप्रमाणे माझ्याही कपाळावर भांग भरलेला आहे. तुझ्यात आणि माझ्यात एवढाच फरक आहे की, तू जिथे संसारात चालली आहेस, त्या संसारातून मी निघालेली आहे. सखे, तू तुझ्या प्रियकराला खुशी-आनंद-सुख द्यायला चाललेली आहेस आणि मी मात्र माझ्या पतीपासून दूर, त्याला दुःख देत, त्याचे सुख हिरावून घेऊन, त्याची सर्व खुशी घेऊन चाललेली आहे. तू तुझ्या प्रियाच्या जवळ चालली आहेस. तुझा प्रियकर-जोडीदार जो तुझ्याकडे बघून हसत आहे, हसतमुखाने तुझं स्वागत करीत आहे, तुला स्विकारत आहे. त्याच्या चेहऱ्यावर आनंद-खुशी दिसत आहे. याउलट माझा पती मला बघून खूप रडतोय, त्याला अतिव दुःख झालेलं आहे, त्यामुळे तो खूप हताश झालेला आहे. तेव्हा सखे, घमेंड करू नकोस. आपल्या दोघींमध्ये एवढाच फरक आहे की, तू घर बसविण्यासाठी म्हणजेच संसार थाटण्यासाठी निघाली आहेस आणि मी थाटलेला संसार सोडून, घरातील सर्वांना दुःख देत निघून चाललेली आहे.”

“सखे लक्षात ठेव, या लाकडांनी तुला-मला आयुष्याच्या सुरुवाती पासूनच साथ दिलेली आहे. तुझी लाकडाची डोली सजवलेली आहे त्याचप्रमाणे माझी तिरडी-अरथी सुद्धा लाकडांनीच सजवलेली आहे.”

“हे सखे, इथे कोणीच अमर नाही, आपल्या जीवनात प्रत्येकाला ही दुनिया सोडून जावेच लागते. या लाकडाने जन्म झाल्यापासून, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जीवनात सर्वांना साथ दिलेलीआहे. ज्या वेळेला जन्म झाला त्या वेळेला तो पाळणा लाकडाचा होता. जेव्हा आपण चालायला शिकलो तेव्हा खेळणी सुद्धा लाकडीच होती. विवाहाच्या वेळी जी डोली-मेणा तयार केला आहे, तो सुद्धा लाकडाचाच आहे. आज माझा अंतिम प्रवास सुरू झाला आहे. ती तिरडी-अरथी सुद्धा लाकडाचीच आहे. हे लाकूड तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा उपयोगी पडलेलं आहे. या अरथी वरून लाकडाने जळायला मी चाललेली आहे. तू विदा होत आहेस आणि मी अलविदा होत आहे. जिथे तू चालली आहेस तिथून मी निघालेली आहे.”

हा वरील संवाद डोली मध्ये बसलेल्या नवविवाहित तरुणी आणि अंतिम प्रवासाला निघालेल्या तिरडी वरील स्त्रीचा आहे. या डोली आणि अरथी चा प्रवास एकत्रित या चौकात समोरासमोर झाला. त्याच्या समोरील तिसऱ्या दिशेने महाराजांची-संताची-परमेश्वराची ‘पालखी’ येत होती. या पालखीतून महाराज खाली उतरले आणि नवविवाहित तरुणीला, जी डोलीत बसलेली होती तिला संसारासाठी शुभेच्छा देत यशस्वी संसारासाठीची सूत्र सांगितलीत. त्याचप्रमाणे तिरडीवर असलेल्या अरथी ला महाराजांनी मोक्ष प्राप्तीचे रहस्य सांगितले. तिने आपल्या संपूर्ण आयुष्यात अत्यंत प्रामाणिक राहुन, संसारात परमेश्वराचा नामजप चालू ठेवला होता, म्हणून महाराजांनी तिचे बोट धरुन समोर असलेल्या चौकातल्या मंदिरात म्हणजेच मोक्षाच्या ठिकाणी तिला पोहोचविले.

अशाप्रकारे स्त्री जीवनाच्या सुखदुःखाची पालखी-डोली-अरथी यांना एकमेकांसमोर आणून, कुठल्याही प्रकारचा मनभेद, एकमेकांबद्दल गैरसमज किंवा दुःख होईल अशा रीतीने वागू नये, असा संदेश या तीन दिशांनी चौकात येऊन दिल्याचे, या लेख – कहाणी च्या माध्यमाच्या स्वरूपातून आपणाला कळते.

एक दिशा होती संसाराकडे येणाऱ्या डोलीची, दुसरी दिशा होती तिरडी वरून निघालेल्या मोक्षाकडे जाणाऱ्या अरथीची, तिसरी दिशा होती महाराजांच्या पालखीची आणि चौथी दिशा होती मंदिराची. ज्या मंदिराने या तिरडीला मोक्ष प्राप्त करून दिला.

पांडुरंग शास्त्री कुलकर्णी

— लेखन : पांडुरंग शास्त्री कुलकर्णी. चिंचवड, पुणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. स्त्री जीवनाच्या सुखदुःखाची पालखी डोली अरथी
    यांच्या संवादातून मान.पांडुरंग शास्त्री यांनी वाचकांना
    छान संदेश दिलाय कोणाही बद्दल गैरसमज करून घेऊ
    नये.लाकूड माणसाला जन्मापासून मरेपर्यंत साथ देतं
    तसं माणसानेही माणसाला कायम साथ द्यावी.कोणालाही
    वाईट बोलून दुःख देऊ नये असा छान विचार देणारा हा लेख
    मनाला खूपच भावला.
    राजेंद्र वाणी
    दहिसर मुंबई 🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments