Saturday, July 27, 2024
Homeलेख…तर मराठी पत्रकारितेचा इतिहास बदलला असता

…तर मराठी पत्रकारितेचा इतिहास बदलला असता

आम्हा त्या वेळच्या तरुण पत्रकारांचे लाडके सर, दैनिक सकाळचे संपादक श्री ग मुणगेकर यांचे अचानक हृदयविकाराने निधन झाले, तो दिवस शनिवार होता.दिनांक होता ९ फेब्रू. १९८५.

आमच्या संज्ञापन आणि वृत्तपत्र विद्या व विभागात (रानडे बिल्डिंग मध्ये) १९६९-७० मध्ये मी विद्यार्थी असताना सरांचा रोजचा संबंध येत असे. त्यानंतर सकाळ दैनिकात त्यांच्या हाताखाली उप संपादक -बातमीदार म्हणून काम केले तेव्हा संस्थापक संपादक ना. भि. परुळेकर यांच्या हाताखाली मुणगेकर सर वृत्तसंपादक होते. त्या काळात सुद्धा यांच्याशी आमचा संबंध रोजचा येत असे. त्यानंतर मी यु एन आय वृत्तसंस्थेत पत्रकारिता केली.

पुण्यात यु एन आय मध्ये असतानाच मुणगेकर सर गेल्याची बातमी आली. पुण्याच्या वृत्तपत्र क्षेत्रात सगळ्यांनाच धक्का बसला. कित्येक दिवस आम्ही त्या धक्क्यात होतो. हळूहळू आम्ही सर्वांनीच तो धक्का रिचवला. काळाच्या ओघात मी देखील ही बातमी विसरून गेलो. नानासाहेब परुळेकर यांच्यानंतर अत्यंत समर्थ कार्यक्षम सज्जन पत्रकार असा लौकिक त्यांनी प्राप्त केला. एक दर्जेदार मराठी दैनिक म्हणून सकाळचे नाव सर्वत्र वाखाणले गेले. हे सगळे आता इतक्या वर्षानंतर आठवले ते सरांच्या जन्म शताब्दी सांगता समारंभाच्या निमित्ताने.

सरांच्या मुलींनी जन्मशताब्दी वर्षाची सांगता दिनांक ३०.१२.२०२३ रोजी आयोजित केली. आठवणींना उजाळा मिळाला. अनिल टाकळकर, डॉ अरविंद नेरकर, राजीव साबडे, आणि मी (किरण ठाकूर) यांनी हृद्य आठवणी सांगितल्या. सुरेशचंद्र पाध्यांनी मनोगत पाठवले. सरांच्या आप्तांनी देखील भरभरून आठवणी सांगितल्या. आता पर्यंत जन्म शताब्दी वर्षात आम्ही सांगितल्या, ऐकल्या त्या सरांच्या संपादकीय क्षेत्रातील कर्तबदारीच्या आठवणी.
त्यांच्या एका सहकाऱ्याने सांगितली ती मात्र आम्हा कुणाला माहीत माहित नसलेली एक महत्त्वाची आठवण. अगदी सहजगत्या कोणताही अभिनिवेश न ठेवता या कार्यक्रमात त्यांनी सांगितली.

From left to right: राजीव साबडे, डॉअरविंद नेरकर, किरण ठाकूर, अनिल टाकळकर, अनुराधा फडके

श्री गोविंदराव क्षीरसागर हे त्यांचे नाव. सकाळच्या व्यवस्थापनात आणि नंतर कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांचे मुणगेकर सरांशी खूप जवळचे संबंध होते. अखिल भारतीय वृत्तपत्र आणि वृत्तसंस्था पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचारी संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी चे ज्येष्ठ कार्यकर्ते होते.
आम्ही सर्व मुणगेकर सर म्हणत असू पण गोविंदराव आणि त्यांचे अन्य सहकारी त्यांना “साहेब” असे संबोधित असत. सकाळच्या व्यवस्थापनाचे प्रतिनिधी म्हणून गोविंद राव यांच्याशी संघर्षाचे क्षण सुद्धा क्वचित केव्हातरी आले होते. परंतु सरांनी कुठलीही कटुता येऊ न देता सकाळ मधील औद्योगिक शांतता कशी राखली याचे नमुने त्यांनी सांगितले. संपाची वेळ आली तेव्हा तर त्यांनी आपले नेतृत्व गुण दाखवले. संपादक आणि पत्रकारितेतील सहकारी, पत्रकारितेतर कर्मचारी या दोघांमध्ये सरांच्या कार्यक्षमते विषयी आदर होता. त्यांच्या सद्सद्विवेक बुद्धी विषयी विश्वास होता.

श्री गोविंदराव क्षीरसागर

एक वेळ अशी आली की सकाळ कंपनीने आपली मालमत्ता विक्रीला काढली अशी चर्चा होऊ लागली होती. सकाळ चे हस्तांतर म्हणजे कुठल्यातरी एका धंद्याची विक्री नव्हती तर वृत्तपत्र मूल्यांमध्ये बदल होण्याची शक्यता असणारा तो व्यवहार होणार होता. त्यामुळे स्वभाविकच पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचारी यांच्यात अस्वस्थता होती.
अशा तणावाच्या वातावरणात एक महत्त्वाची मीटिंग सरांच्या अनुपस्थितीत झाली. कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन सहकार क्षेत्रात निधी उभारावा आणि कर्मचाऱ्यांचे दैनिक अशी आपली प्रतिमा निर्माण करावी करावी असे निश्चित झाले. पत्रकार पत्रकारेतर आणि हितचिंतक अशा सर्वांनी शेअर्स घ्यावे, गुंतवणूक करावी असे एकमताने ठरले. संपादकीय नेतृत्व मुणगेकर सरांनीच करावे असेही त्यांच्या अनुपस्थितीत ठरले. त्यांच्याशी आपण औपचारिक चर्चा करावी असा निर्णय कर्मचारी आणि पत्रकार यांनी केला. तो सरांना सांगण्यासाठी गोविंदराव त्यांना भेटले. तेव्हा त्यांनी आपण उद्या शनिवारी भोजनोत्तर भेटू या आणि चर्चा करू या असे निश्चित झाले. बैठकीच्या अजेंडाचे स्वरुप निश्चित झाले होते. पत्रकारितेच्या क्षेत्रात एक महत्त्वाचा निर्णय होऊ घातला होता.

नानासाहेबांच्या पश्चात हा मोठा निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू करायची होती. मुणगेकर सरांवर या सर्व घडामोडींचे मानसिक आणि शारीरिक असे परिणाम होत असावे. त्यांच्या अगदी जवळच्या सहकाऱ्यांना ते जाणवतही होते. प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक होते. पण सरांनी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले असावे.
सर्वसाधारणपणे सर शनिवारी घरीच असत. त्या दिवशी सकाळमध्ये सुट्टी पूर्णपणे घेत. त्या शनिवारी सरांनी घरीच फराळ आटोपला आणि त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. त्यातून ते सावरलेच नाहीत.
हृदयविकाराचा तो धक्का आला नसता तर ? सरांची प्रकृती ठीक असती तर काय घडले असते ? ते त्या महत्त्वाच्या मिटींगला गेले असते का ? तिथे काय घडले असते ?
या जर तर ला आता इतक्या वर्षांनी त्यांच्या मृत्यूनंतर चर्चा करण्यात काही अर्थ नाही हे तर खरेच.

सरांच्या कुटुंबीयांना खूपच मोठा धक्का होता. गेल्या जन्मशताब्दी समाप्तीच्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित मध्ये किमान दोघे आप्तेष्ट वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित होते.
डाॅ. विठ्ठल मनगोळी आणि डाॅ सौ विजया मनगोळी हे ते दोघे ज्येष्ठ मेडिकल प्रॅक्टिशनर.
एवढा मोठा विद्वान संपादक, त्याला कुठलेही व्यसन नव्हते पण त्याने प्रकृतीची हेळसांड कशी आणि का केली हे आम्हाला अनाकलनीय आहे अशीच भावना त्यांनी आपल्या निवेदनात व्यक्त केली.

दैनिक सकाळ परिवारामध्ये माझे तीन समकालीन सहकारी असेच अकाली आमच्यातून निघून गेले. स्वतःच्या प्रकृतीकडे त्यांनी दुर्लक्ष केले असे सारखे नंतर वाटत राहिले. वरुणराज भिडे, अनंत पाटणकर आणि प्रमोद जोग या आमच्या समवयस्क सहकाऱ्यांचे अचानक जाणे आम्हा सर्वांना चटका लावून गेले.
मुणगेकर सर गेले तेव्हा केवढी मोठी पोकळी निर्माण झाली याची जाणीव आता पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या गप्पांच्या माध्यमातून समोर आली.
मात्र सरांनी वृत्तपत्र क्षेत्रात आपला ठसा नक्की उमटवून ठेवलेला आहे. परुळेकरांच्या पत्रकारितेचा वारसा जतन केला आणि पुढच्या पिढीला तो दिला. संपादक वृत्तसंपादक सहसंपादक उपसंपादक वार्ताहर अशी मोठी लिंकच सरांनी निर्माण करून ठेवली. याबाबत आम्ही सर्व आमच्या या सरांचे ऋणी आहोत ही ग्वाही सरांच्या कुटुंबीयांना देणे आमचे कर्तव्य आहे.

प्रा. डॉ. किरण ठाकूर

— लेखन : प्रा डॉ किरण ठाकूर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. प्रा. डॅा. सुधीर गव्हाणे माजी कुलगुरू व माध्यम संशोधक प्रा. डॅा. सुधीर गव्हाणे माजी कुलगुरू व माध्यम संशोधक

    आदरणीय मुणगेकर यांच्या स्मरणीय कारकिर्दीबद्दल अतिशय मनोज्ञ वर्णन डॅा. किरण ठाकूर सरांनी केलंय. वैचारिक पारदर्शकता, संपादकीय गुणवत्ता, मानवतापूर्ण नेतृत्वक्षमता, अफाट व्यासंग , अहंकाराचा अभाव अशा अनेक गुणांनी परिपूर्ण असं मुणगेकर सरांचं व्यक्तित्व होतं. त्यांचे जनमशताब्दी वर्ष साजरं केलं गेले हे वाचून आनंद झाला. त्यांच्या नावानं देशातील उत्तम अशा संपादकास राष्ट्रीय पुरस्कार देता येईल का पहावे व त्यानिमित्तानं पत्रकारितेवर एक प्रबोधक व्याख्यान दरवर्षी ठेवता येईल पुण्यात.

  2. किरणसर , खूप मोजक्या शब्दात ति बाबांचे म्हणजेच श्रीधर मुणगेकर (कै लावावेसे वाटत नाही) यांचे जाणकार पत्रकार, सर्वप्रिय, सर्वसमावेशक, तज्ञ वरिष्ठ असे चित्र उभे केले आहे. स्वतःच्या आप्तांत, सासरच्या गणगोतात आणि विद्यार्थ्यांमधे, सहका-यांमधे अतिशय प्रिय व्यक्ति. आम्हा मुलींचे तर ते खूप ह्रदयाजवळचे होते. खूप आदर होता त्यांचेबद्दल आणि त्यांना पण त्यांच्या चारहि मुली त्यांच्या गुणदोषासकट जीव कि प्राण होते. आयुष्यभर संघर्षातून जरा सुखाचे दिवस, मुलींकडून सेवा घेण्याच्या आधीच नियतीने त्यांना उचलून नेले. हा आम्हावर तसेच पत्रकार विश्वाचा पण मोठाच आघात होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८