Wednesday, June 19, 2024
Homeलेखत्यागमुर्ती रमाबाई आंबेडकर

त्यागमुर्ती रमाबाई आंबेडकर

जन्म : ७ फेब्रुवारी १८९८.
निधन : २७ मे १९३५.

ज्या व्यक्तीच्या सावलीखाली अनेकांना आधार मिळालेला असतो त्या व्यक्तीला आपण अत्यंत आजाराने आधारवड असे म्हणतो. ज्याला आधारवड असे म्हणतो तो एका अर्थाने वटवृक्ष असतो. त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व इतके विशाल आणि विस्तृत असते की त्या व्यक्तीच्या नुसत्या अस्तित्वामुळे कित्येकांचे कल्याण होत असते.
त्या व्यक्तीच्या मागणीतही इतरांच्या कल्याणाचा विचार समाविष्ट असतो म्हणूनच तो खरा आधारवड असतो.
भारताच्या इतिहासातील असे ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार त्यांच्याविषयीच्या अभ्यासाच्या प्रेरणा त्यांच्यापासून घ्यावयाच्या प्रेरणा घटनेच्या शिल्पकार जलतज्ञ इत्यादी अनेक विषयांनी युक्त असलेल्या या ज्येष्ठ व्यक्तिमत्त्वाला सर्वजण अभ्यासतात.

पण ज्या  व्यक्तिमत्वामुळे बाबासाहेबांचे कौटुंबिक जीवन घडले असे व्यक्तिमत्व म्हणजे त्यांच्या अर्धांगिनी असलेल्या रमाबाई आंबेडकर. एका बाजूला बाबासाहेब शिकत असताना संसाराची जबाबदारी एकट्याच्या खांद्यावर घेऊन अत्यंत बिकट परिस्थितीतून मार्ग काढला. बाबासाहेबांच्या अभ्यासामध्ये त्यांच्या कौटुंबिक अडचणींचा पाढा या माऊलीने कधीच वाचला नाही.
त्यांच्या मुलांचे निधन घरची गरीबी आलेले दुःख हे सगळे काही तिने आपल्या पोटात जिरवले. एका आईसाठी ही गोष्ट सोपी नसते. महात्मा फुले यांच्या मदतीने सावित्रीबाई लेखन वाचन शिकल्या त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी फुलेंचा हा आदर्श पुढे घेऊन पुढे चालवून रमाबाईंना लिहायला वाचायला शिकवले. बाबासाहेब युरोपला असताना त्या स्वतः त्यांना पत्र लिहीत.
रमाबाईंच्या वडिलांचे नाव भिकू. आईचे नाव रखमा. यांना चार भावंडे होती. अक्का, रमा, गौरा आणि शंकर. तसे कुटुंब मोठे होते. या कुटुंबाचा कोकणातील दाभोळ बंदराजवळ व नंदनामाच्या गावी माशाची टोपली वाहून नेण्याचा व्यवसाय होता.
तसे ते वारकरी संप्रदायाशी निगडित. वर्षातून एकदा तरी पंढरीची वारी होत असे.
लहानपणीच आपल्या वडिलांच्या संसाराला मदत करण्यासाठी रमाबाई पहाटे उठून शेण गोळा करत गौऱ्या थापत बाजारात विकत.

बाबासाहेब आणि रमाबाई यांचा विवाह 4 एप्रिल 1908 रोजी झाला. त्यावेळी बाबासाहेब 17 आणि रमाबाई दहा वर्षांच्या होत्या. हा विवाह सत्यशोधक पद्धतीने संपन्न झाला.
बाबासाहेब रमाबाईंना रामू या नावाने हाक मारीत तर रमाबाई बाबासाहेबांना साहेब या नावाने संबोधित. दोघांनाही पुढे पाच मुले झाली. यशवंत, गंगाधर, रमेश, राजरत्न हे चार पुत्र आणि इंदू नावाची मुलगी.

रमाबाई संसारात आणि बाबासाहेब पुस्तकात रमलेली ही दोन ज्येष्ठ व्यक्तिमत्व. बाबासाहेब सदैव पुस्तकात दंग असत. एकदा रमाबाईंनी त्यांना जेवणाचे ताट वाढले आणि त्या अन्य कामांमध्ये व्यस्त झाल्या. बाबासाहेब वाचनात तसेच व्यस्त होते. बाबासाहेबांचे जेवण झाले असेल म्हणून त्या ताट आणण्यासाठी गेल्या तर ताट तसेच होते. न राहून त्यांनी तेथील एका पुस्तकाचे पान उघडले आणि म्हणाल्या…. या पुस्तकात नवऱ्याने आपल्या बायकोशी कसे वागावे कुटुंबाशी कसे वागावे हे लिहिले असेल तेवढेच मला दाखवा.

बाबासाहेब वाचत असले की जेवण टाळत असत. परिणामी रमाबाई सुद्धा जेवण घेत नसत. आपला नवरा भुकेला असताना आपण जेवणे योग्य त्यांना वाटत नसे. एकदा जेवता जेवता बाबासाहेब रमाबाईंना म्हणाले मी संसाराकडे लक्ष देत नाही असे तू म्हणते मी काय करावे असे तुझे म्हणणे आहे? त्यावर रमाबाई म्हणाल्या, अहो घरात भाजीपाला, तेल, मीठ लागते याकडे नवऱ्याने लक्ष द्यावे. मुलांना गोंजारावे. बायकोशी दोन शब्द प्रेमाने बोलावे .परंतु येऊन जाऊन तुमची ती पुस्तके. तुम्ही पुस्तकांसाठी पाचशे रुपये खर्च करण्याची काही जरूर होती काय?

दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांनी थोडे रागानेच का होईना बाजारातून भाजीच्या पाच-सहा जुड्या आणि बोंबिलाच्या से सव्वाशे काड्या आणल्या. साहेबांच्या हातातील हा बाजार पाहून त्यांची भावजय लक्ष्मीबाई आणि  रमाबाई यांना हसू फुटले.
रमाबाईंनी आपल्या संसारात एक साधी काडेपेटीतील काडी सुद्धा वाया जाऊ दिली नाही. त्या आर्थिक शिस्तीमध्ये मोठ्या दक्ष होत्या.

रमाबाईंनी बाबासाहेबांना 27 वर्षे साथ दिली बाबासाहेबांवर कोणतेही संकट येऊ नये म्हणून त्या देवाकडे प्रार्थना करीत. बाबासाहेब केव्हातरी त्यांच्याबरोबर चित्रपट पाहण्यासाठी जात. दोघांनी मिळून अछ्यूत कन्या आणि अंकल टॉम हे दोन चित्रपट पाहिले होते.

1918 मध्ये बाबासाहेब प्राध्यापक झाले आणि पहिला साडेचारशे रुपये पगार मिळाला. पतीचा पहिला पगार मिळाला म्हणून रमाबाईंनी बाबासाहेबांच्या बहिणी तुळजा, मंजुळा, गंगा आणि लक्ष्मीबाई या जाऊ बाई या सर्वांना साडी चोळी मुलांना कपडे नव्याने घेतले. पगाराचे सर्व पैसे दोन दिवसात संपले.
असा खर्च करू नये आणि पुन्हा इतकी खर्चिक वस्तू घेऊ नये असे बाबासाहेबांनी त्यांना विनंती वजा सांगितले. तेथून पुढे बाबासाहेबांच्या या सौभाग्यवतीने महिन्याला 45 रुपये एवढाच खर्च केला. त्यातच संसार भागवला.

बाबासाहेब युरोपला शिक्षणासाठी गेल्यानंतर त्यांनी काटकसरीने सर्वकाही निभावून नेले. प्रसंगी शेणाच्या गोवऱ्या विकून, लाकडाची मुळी विकूनही त्यांनी संसार भागवला.
अडचणीच्या काळात कोणाकडूनही म्हणजे समाजसेवकांकडून फुकटचा पैसा घेतला नाही.

1923 मध्ये बाबासाहेबांनी त्यांना मुंबईला आल्यावर साडी घेण्यासाठी रक्कम दिली. त्यांनी स्वतःला साडी घेण्याऐवजी बाबासाहेबांसाठी धोतर जोडी गादी, उशी आणि जेवणाचे पाट खरेदी केले.

बाबासाहेब युरोपला असताना त्यांनी बाबासाहेबांना आपल्या मुलाच्या निधनाविषयी चे पत्र लिहिले. ते पत्र पुढे देत आहे.

“परम आदरणीय पती भीमराव आंबेडकर
यांच्या सेवेसी
शिरसाष्टांग नमस्कार.
अत्यंत दुःखाची बातमी आहे. रमेश आपल्याला सोडून गेला.
त्याच्या आजाराचे मुद्दाम तुम्हाला कळवल नव्हतं. तुमच्या अभ्यासात गुंतलेल्या मनाला झळ पोहोचू नये एवढ्यासाठी तुम्हाला कळवल नाही.
क्षमा मागते. इतकं सगळं सोशते आहे त्यात हा आघात.
कुठून शक्ती आणावी ?
पण तुम्हाला एवढेच विनंती आहे की हे दुःख माझ्यावर सोपवून द्या.
तुम्ही तुमच्या अभ्यासात अडथळा येऊ देऊ नका. जेवणाची आबाळ होऊ देऊ नका. तब्येतीची काळजी घ्या मी इकडे सांभाळते……”

बाबासाहेबांनी मुंबईत पुस्तकांसाठी स्वतःचे घर बांधले .त्याचे नाव राजगृह.
राजगृह वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी किंवा गृहप्रवेशाच्या प्रसंगी रमाबाईंनी त्यांना ओवाळले. बाबासाहेब म्हणाले..
रामू गावात घर नाही रानात शेत नाही अशा स्थितीतून आपण आज राजगृहात प्रवेश करीत आहोत.
रमाबाई केवळ लेखन वाचन शिकल्या नव्हत्या तर त्या उत्तम भाषण आता करू लागल्या होत्या. मुंबईमध्ये महिलांच्या सभेत त्यांनी प्रभावीपणे भाषण दिले.
त्यातील एक ओळ आपल्यासमोर ठेवतो. त्या म्हणाल्या,
शहाणे करून सोडावे
सकळ जन.
जगातल्या क्रांतिकारी चळवळी कशावर चालतात ? त्यागावर, पडेल त्या त्यागावर अशा चळवळींना ही अग्निदिव्यातून जावे लागते त्याशिवाय इच्छित श्रेयांचे फळ त्यांच्या हाती लागत नाही. म्हणून त्याग महत्त्वाचा.

22 मे 1935 रोजी रमाबाई ची तब्येत अचानक बिघडली. त्यादिवशी बाबासाहेब पनवेल मध्ये होते. ते तातडीने घरी आले. मात्र 27 मे 1935 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला “थॉट्स ऑन पाकिस्तान” हा इंग्रजी भाषेतील ग्रंथ 1940 मध्ये प्रकाशित झाला. या ग्रंथाच्या अर्पण पत्रिकेत हा ग्रंथ कृतज्ञपूर्ण शब्दात रमाबाईंना अर्पण केला आहे.
रमाबाईंच्या विषयी एका मुलाखतीमध्ये बाबासाहेबांनी म्हटले, मी लंडनला जाण्यापूर्वी सिडेनेहम कॉलेजमध्ये नोकरी करत असे. पुढील अभ्यास पूर्ण करण्यासाठी मला पैसे साठवणे गरजेचे होते. त्यामुळे माझी पत्नी रमाबाई हिला फार काटकसरीने संसार करावा लागला.
माझे लग्न झाल्यापासून मी तिला सुशिक्षित करण्याचा प्रयत्न केला. पण ती म्हणे शिकून काय करायचं ?
पण माझ्या विद्या अभ्यासाला तिने कधी विरोध केला नाही. मुख्य म्हणजे आम्हा उभयतांचे एकमेकांवर प्रेम होते. सगळ्या घराप्रमाणे आमच्या घरातही नवरा बायकोचे भांडणे होत पण ती लगेच मिटत.

रमाबाईंच्या पुण्यदिनाच्या निमित्ताने बळवंत हनुमंत वराळे यांनी केलेली एक काव्यपंक्ती आपल्यासमोर ठेवतो.
मायेची माऊली l
कृपेची सावली l
धन्य जगी झाली l
रमादेवी l

रमाबाईंच्या विषयी अनेक लेखकांनी चरित्र, कादंबरी, कविता प्रकाशित केले आहेत.
कवी अनिल यशवंत भालेराव यांनी घोषणा नावाच्या काव्यसंग्रहामध्ये रमाई नावाची कविता लिहिली.
माणिकराव यस रखराव यांनी भिकू वलंगकराची लेक रमाई आंबेडकर अशी छोटी पुस्तिका लिहिली आहे.

सोनाली सहारे यांनी त्याग मूर्ती रमाई ही कविता खूप छान आहे.

मिलिंद उमरे यांनी निळ्या पाखरांची आई ही खूप अर्थपूर्ण अशी कविता लिहिली आहे.

राजेंद्र डांगे या प्राध्यापकाने रमाबाईंना अनेक उपमा देणारी रमा नावाची कविता लिहिली.

सौ प्रतिभा भारत धोटे यांनी माय माऊली रमाई ही कविता लिहिली.

प्राध्यापक प्रभाकर लोंढे यांनी लिहिलेली ‘मी तुमची रमा’ या कवितेतून बाबासाहेबांचे रमाई यांना वाटणारे मोठेपण आणि त्यांच्या कार्याची महती अशी अप्रतिम कविता आणि अर्थबोध त्यातून सादर केला. रमाईंना त्रिवार वंदन करूया असा या कवितेचा आशय आहे.
त्याचप्रमाणे त्यागमूर्ती रमाई ही रेखा पाटील यांची कविता आणि आबा बोलके यांची आई रमाई ही कविता अवश्य वाचण्यासारखी आहे.
त्यांच्याविषयी लिहिलेल्या साहित्यामधून त्यांच्या विविध गुणांचा विशेषता त्यागाचा गुण पहावयास मिळतो.

एखादी व्यक्ती यशस्वी होत असताना त्या व्यक्तीच्या पाठीमागे काम करणाऱ्या थोर व्यक्तीचे नाव देखील सहसा कुणाला आठवत नाही. त्या काय होत्या तर..,
राजेंद्र डांगे नावाचे कवी लिहितात
विशाल वृक्षांवर बहरणारी
लतिका तू l
त्यांच्या फुलण्यातच
फुलणारी तू l
चंदनालाही हेवा वाटावा
असे तुझे समर्पण

श्री मोगल जाधव लिखित त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर या पुस्तकाच्या आधारे मी हा लेख लिहिला आहे. आपण सर्वांनी हा ग्रंथ वाचणे आवश्यक आहे अशी विनंती मी आपणास करेल.

या लेखासाठी पुढील ग्रंथांचा वापर केला आहे त्या सर्व लेखकांचे मनापासून आभार.
1. मोगल जाधव : त्याग मूर्ती रमाबाई भिमराव आंबेडकर सनय प्रकाशन नारायणगाव. 2023
2. ग. प्र. प्रधान.: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात शब्दात. सुगावा प्रकाशन पुणे 2009.
3. सुहास सोनवणे : संपादक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि समकालीन शब्द फुलांची संजीवनी ग्रंथकार भीमराव आणि बहुआयामी आंबेडकर

या सर्व ग्रंथांचा वापर केला आहे.
माझे  स्वतःचे श्रेय फक्त मजकूर शब्दबद्ध करणे एवढेच आहे.

— लेखन : प्रा डॉ लहू गायकवाड. नारायणगाव
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती :  अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. माता रमाईंना सादर नमस्कार .सुरेख लेख.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments