१. गवळणी
उसने काजळ
सूर्य उगवता सख्या गौळणी
मज बोलवती
“चल जाऊ राधिके मथुरेला !”
खट्याळ गौळणी मलाच पुसती,
“कसे ओघळे काजळ,
तुझ्या गं गालांवरती ?
तेच ठसे ओष्ठद्वयावरती,
इथे, तिथे अन वक्षावरती ?”
“काय सांगू अन् कसे मी सांगू ?
काय तयांना असे माहिती !
रात्रीच्या नीरव वेळी
खट्याळ कान्हा येऊनी
मम नेत्रींचे गेला काजळ चुंबूनी
उसने घेऊन काजळ मम नेत्रांचे
तो कृष्ण सावळा झाला
तेच ठसे मग गालांवरती, वक्षावरती
कुलुप लागले मम ओठाना
गुलाब गालीचे भेद खोलती
लज्जेने मम नेत्र झुकती ॥”
“आम्हीही खेळतो रास वृंदावनी
मुरारि वाजवी बासरी सप्तसुरांनी
रासक्रीडेच्या सप्तरंगी
आम्हीही खेळतो चिंब भिजूनी
वस्त्रे आमुची ठार कोरडी
राधिके तुझीच ओली कशी काचोळी ???”
“कसे सांगू विशद करूनी ?
मायावी तो लबाड कान्हा
धूळ फेकतो नयनी तुमच्या
मलाच घेऊन कवेत खेळे
रास वृंदावनी, मायाजाल तुम्हावरी पसरुनी
कुलुप माझ्या ओठां लागुनि ॥
ओठांवर त्याच्या ओठ टेकुनी
मी सांगितले निक्षूनी
उसने काजळ ठेव तू जपूनी
पुढील जन्मी मीरा होऊन
कृष्ण सावळी मी होईन रे
तव नामाचा प्याला पिऊनी
उसने घेईन हासत फेडुनी
उसने काजळ आज देऊनी
पुढील जन्मी घेईन फेडुनी ॥”
— रचना : सुलभा गुप्ते. ईजिप्त
२. कोंदणात कृष्ण-राधा
स्पर्श तुझा नजर तुझी
साथ तुझी नादही तुझाच
असोशीही तुझीच आग्रहही तुझाच
आवाज तुझा, प्रतिसाद ही तुझाच
स्पर्शातील आसुसलेपणही तुझाच,
नजरेतला आग्रही तुझाच,
आवेग तुझा, बरसणेही तुझेच
सगळे काही तुझेच
मी तुझी आणि तुही तुझाच
माझा म्हणून आसही तुझीच
फक्त वाट पाहण्याची व्याकुळता माझी
कान्हा म्हणून तुला छेडता
राधा म्हणून मलाही धरता
आस्थेने कान्हा-राधा म्हणता
सर्वत्र वासनेने घेरता
कान्हा व्हावे वाटे सर्वांना
राधा व्हावे वाटे सर्वांना
नजर पाहता आवरे मनाला
साद ऐकता नको वाटे पावा
आस्थाही नसे प्रेमात
राधा ही नसे सादात
आता केवळ कृष्ण-राधा
राहिले बांधून कोंदणात
— रचना : प्रसाद मोकाशी. मुंबई
३. महायोगी विश्वंभर
जरी विश्वंभर पालक विश्वाचा |
जन्म असे त्याचा कारागृही ||
पिता वसुदेव देवकीचा सुत |
दोघांचीही प्रीत नच मिळे ||
नंदाच्या घरी वृंदावनी कान्हा |
यशोदेचा तान्हा वाढतसे ||
वध पुतना राक्षसीचा केला |
कपट तिचे जाणोनिया ||
गोपांना लोणी चोरण्याची |
चपळाई त्याची दावितसे ||
बासरीने गवळणी वेड्या |
काम हातातले टाकोनिया ||
यमुने ठाई कालिया मर्दन |
रक्षण सर्वांचे करितसे ||
रक्षियले जन तसेच गोधन |
करांगुली गोवर्धन उचलोनी ||
कंसास धाडी यम सदनास |
भ्यालेल्या मनास करी शांत ||
जरासंध क्रूर वध त्याचा करी |
सोडवी कैदेतून नारी हजार ||
द्वारकेचा राणा, राण्या प्रिय |
जनतेला न्याय ब्रीद असे ||
सख्य त्याचे बहु पांडवांशी |
मैत्री द्रौपदीशी अटूट ती ||
गीता उपदेश कर्म थोर |
कौरव संहार कुरुक्षेत्री ||
होरपळे बहु विश्व कलियुगी |
तूच महायोगी जाणतसे||
येऊनी सत्वर आम्हा उद्धरुन |
दावावे चरण झडकरी ||
— रचना : सौ. अनुपमा पाटील. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती ☎️9869484800