१. लक्ष्मीपुजन
आली आली आज दिवाळी
लक्ष लक्ष दिप उजळती
करु चला लक्ष्मी पुजन
कुबेर लक्ष्मी प्रसन्न होती ॥१॥
शंख, चक्र, गदा, पदम
यांची करु पुजा
लक्ष्मी प्रसन्न होई
कुबेरासंगे करिता पुजा ॥२॥
वहीपुजन ही करु आज
लक्ष्मी नांदे सरस्वती संगे
विद्या, वाचा यांची पुजा करता
ज्ञान आणि लक्ष्मी नांदे संगे ॥३॥
घंटा, समई, शंख, चक्र
यासमवे आधी पुजावा श्रीगणेश
लक्ष्मी कुबेरासंगे पुजावी
प्रत्येक कार्याचा आरंभ श्रीगणेश ॥४॥
लक्ष्मी पुजन करता प्रसन्न होई लक्ष्मी
लक्ष्मी पुजन करावे घरी
फटाके फोडुन द्यावा फराळ
आप्तांना बोलवावे हो घरी ॥५॥
वर्ष मग जाईल हो सुखाचे
लक्ष्मी पुजनाने येईल समृध्दी
ज्ञान, धन येईल अपार
होईल मग व्यापारात वृध्दी ॥६॥
अशी ही दिवाळी समृध्द होवो
लक्ष लक्ष दिप लावता
लक्ष्मी ही प्रसन्न होवो
आत्मिय दिवाळी समृध्द होवो ॥७॥
–– रचना : पंकज काटकर. काटी, जि.धाराशिव
२. माझी दिवाळी
आनंदाचे भांडार घेऊन
आली दिवाळी आली
आप्तेष्टांना भेटण्याची
ओढ मनाला लागली
शब्दांचा आकाशकंदील
सुरांची रंगीत रांगोळी…
नात्यांच्या रुपात प्रकाशतात
पणत्यांच्या सुरेख ओळी…
गुण विषेशांच्या फराळात
लाडू, चकली, करंजी
तिखट, गोड, खमंगपणा
कायम घालतात रुंजी…
एक एक पणती उजळते
सजते माझी दिवाळी
आपल्या एकीची चमक
कायम दिसते माझ्या भाळी
— रचना : स्मिता धारूरकर. पुणे
३. दीप उजळू दे दिशा दिशांना
चैतन्याचे दीप उजळू दे दिशा दिशांना
आनंदाचा धूप जळू दे दिशा दिशांना
करू नका हो तमा तमाची आता कधीही
उजेड म्हणतो मला भिडू दे दिशा दिशांना
पुन्हा ऐकूया मराठमोळी पहाट गाणी
सुरात याही जरा भिजू दे दिशा दिशांना
प्रेमाने प्रेमास म्हणावे खुशाल आता
प्रेमाचा या अर्थ कळू दे दिशा दिशांना
लाडू, चकली, शेव, करंजी, चिवडा घ्या हो..
खमंग उत्सव असा पसरू दे दिशा दिशांना
एक तरी हो झोपडीत या पणती लावा
माणुसकीचा धर्म स्मरू दे दिशा दिशांना
— रचना : माधव डोळे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800