१. आनंद सोहळा
बाई दिवाळी द्या, तिने हाक दिली,
मी घरातील फराळ व मिठाई दिली,
तिने व तिच्या मुलीने, बसून खाल्ले,
मी पाणी दिले, दोघी प्रसन्न हसल्या,
दादा दिवाळी द्या, कचरेवाला म्हणाला,
मी थोडी मिठाई व १०० रुपये दिले,
त्याने मिठाई खाल्ली, पाणी प्यायले,
इथे थांबावे बरे वाटते, हसून म्हणाला,
ताई दिवाळी द्या, अमावस्या मागणारी म्हणाली,
तिला फराळाचे ताट, मुलांना खाऊ दिला,
तिने फराळ खाल्ला, पाणी व चहा घेतला,
माय लक्षुमी तुम्हाला भरून देवो, म्हणाली,
सगळ्या सोबतच नातं, दृढ करते दीपावली,
सारं विश्व शेवटी त्या परमेश्वराचे हे कळते,
प्रेरणा आतून येते, काही करवून घेते,
पणती बाहेर, प्रकाश आत पडतो, ती दीपावली..!!!
— रचना : हेमंत भिडे. जळगाव
२. दीपावली
दीपावलीच्या शुभ क्षणी,
स्वप्न सर्वांची साकार व्हावी
सुखाच्या सागरात,
बोट होऊन तरंगत रहावी
शब्दसुमनाने आज,
ओवाळते औक्षणाचे ताट
मिळो सर्वांना सुखाची,
प्रकाशमय वाट
आयुष्यातील प्रत्येक क्षण,
आनंद देऊन जावो
नेहमी राहावे सुखी,
दुःख कधी वाटायला न येवो
सुखाची करून उधळण,
स्वप्न सर्वांची पूर्ण व्हावी
आजची दीपावली,
आनंदाची गोडी घेऊन यावी
तुमच्या आमच्या प्रेमाची ज्योत,
अखंड तेजत राहावी
हीच आमची इच्छा
–– रचना : सौ भारती वाघमारे. मंचर, पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800