लक्ष्मीपूजन
दीपावली अमावस्या हा दिवस कुबेर व पत्नी इरिती लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे. कुबेर हा भगवान शिवाचा खजिनदार व धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. दीप प्रज्वलन करून या दिवशी यक्षांना व त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित केले जाते. कुबेर व त्याची पत्नी इरिती यांना पुजणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे. अर्थात प्राचीन काळापासून या रात्री कुबेरपूजन करण्याची रीत आहे.
संस्कृती, सामाजिक घडामोडी काही बाबीत एकमेकात मिसळून जातात. कुबेर हा भगवान शिवशंकरांनी नेमणूक केलेला खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. (त्याला धनसंपत्ती संबंधी गर्व झाला शिवपुत्र गणेशाने कुबेराची परीक्षा घेण्याची दंतकथा प्रसिद्ध आहेच.) काळाच्या ओघात काही अभिसरण होऊन किंवा बदल होऊन गेलेले असतात. गुप्तकाळात वैष्णवपंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली.
भारतात, विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. काही मूर्तींमध्ये कुबेर त्याची पत्नी इरितीसह दाखविला आहे.तर काहींमध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहेत. यावरून असे दिसते की प्राचीन काळी कुबेर आणि त्यांची पत्नी इरिती यांची पूजा केली जात असावी. कालांतराने इरितीचे स्थान लक्ष्मीने घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला प्रतिस्थापित केले गेले.
संपत्तीचा अधिपती परमेश्वर भगवान महादेव हे आहेत. त्यासंबंधी आणखीन एक दंतकथा कुबेराने भगवान शिवाची उपासना केली होती, त्याला भगवान शिवाने उत्तरेकडील आठ दिशांच्या रक्षकांपैकी एक स्थान म्हणून बक्षीस दिले होते. देवाने त्याला संपत्ती आणि भौतिक गोष्टींचा स्वामी बनवले. भगवान शिवाने कुबेराला संपत्तीचा देव म्हणून जबाबदारी दिली आणि संपत्तीचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी त्यांनी देवी लक्ष्मीला देखील संपत्ती वाटली.यातूनही कुबेराचे धनसंपत्ती विषयी आद्यकाम दिसून येते.
दक्षिण भारतामध्ये कुबेराचा स्वामी महादेव यांची पूजा विविध रूपाने केले दिसून येते .आपल्या परंपरेतील चंद्रशेखर रूपाप्रमाणे शिवाचे कुबेरा बरोबरील रूप अत्यंत मनोहारी अल्हाददायक आहे .
आणखी एक दंतकथा हेच दर्शवते. एके दिवशी महादेव पार्वती भ्रमंती करीत असताना पार्वतीने महादेवांजवळ मागणी केली. ‘या भूतलावरील सर्वात सुंदर ठिकाण मला भेटस्वरुप हवे आहे.’ तेव्हा महादेवांनी माता पार्वतीच्या इच्छेखातर सर्वात सुंदर अश्या अशोक वाटिका आणि लंकेची निर्मिती केली. कालांतराने ही लंका त्यांनी कुबेराला दिली. सोन्याने मढवलेली ही लंका नंतर कुबेराकडून शिवभक्त असलेल्या रावणाने हिसकावून घेतली. दंतकथा ध्वनीत करते की शिवांनी संपत्तीची जबाबदारी कुबेराकडे दिली होती.
दीपावली अमावस्या दिवशी कुबेराबरोबर होणारी लक्ष्मीची पूजा ही केरसुणीची पूजा मानली जाते. आपल्या प्रत्येक सणांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व आहे. स्वच्छता राखण्याचे काम करणारी केरसुणी हीच लक्ष्मी मानून तिची पूजा केली जाते चंचल असलेली लक्ष्मी स्थिर राहावी म्हणूनही घराघरात लक्ष्मीची पूजा परंपरेने होते. आरोग्य, धान्य अशा विविध रूपात लक्ष्मीची पूजा होते. ही पूजा संपत्तीरुपी लक्ष्मीसाठी नव्हे तर आरोग्य, मोक्ष, वैचारिक प्रगती, आत्मकल्याण लक्ष्मी मिळावी यासाठी देवीची पूजा होते.
आश्विन अमावास्येला कुबेरलक्ष्मीपूजन येतं. या दिवशी प्रात:काळी मंगलस्नान करून देवपूजा करावी. प्रदोषकाळी फुलांनी सुशोभित केलेल्या मंडपात शिव, कुबेर, लक्ष्मी यांची पूजा करावी. यादिवशी घर-गोठा स्वच्छ करून घरात गोमुत्र शिपंडून घर पवित्र करतात.
या दिवसानंतर परंपरागत एक आर्थिक वर्ष संपून दुसरे आर्थिक वर्ष सुरू होते.म्हणून व्यापारी लोक त्यांच्या वह्या – चोपड्यांची पूजा करतात.
— लेखन : राजेंद्र गुरव. औंध
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800