Sunday, April 21, 2024
Homeबातम्यादिव्यांग आणि प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह

दिव्यांग आणि प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह

शुक्रवार, दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी मुंबईतील बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्य मंदिरात मुंबई वासीय वंजारी सेवा संघाने समाजाच्या आर्थिक हातभारासाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता .

संघटनेतील धडपड्या कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यामुळे मी स्वतः व्हीलचेअर असूनही कार्यक्रमाला जाण्याचा निर्णय घेतला. माझे अपंगत्व 90% पेक्षा अधिक आहे .
मी यापूर्वी याच नाट्यगृहामध्ये मी स्वतः लिहिलेल्या दिव्यांगांचा दीपस्तंभ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी दि.१० डिसेंबर 2022 रोजी नाट्यगृह आरक्षित केले होते, त्यावेळेस या नाट्यगृहात दिव्यांगाना जाण्यासाठी अजिबात व्यवस्था नव्हती म्हणून पाठपुरावा करून तिथे रॅम बांधून घेतला होता.

या कार्यक्रमाला जास्तीत जास्त दिव्यांगांनी यावे म्हणून मी आवाहन केले होते त्यानुसार काही दिव्यांग जाणीवपूर्वक कार्यक्रमाला उपस्थित राहिले. परंतु कित्येकांना आत मध्ये प्रवेश करणे फार कठीण गेले. काही ना तर परत जावे लागले. मित्रांच्या व नातेवाईकांच्या साह्याने मी तो कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडला. परंतु त्यातील त्रुटी नजरेला आणून देऊन त्यात सुधारणा होण्याची प्रतीक्षा करत होतो.

योगायोगाने ३ नोव्हेंबर रोजी पुन्हा कार्यक्रमासाठी जाण्याचा योग आला. प्रत्यक्षात आयोजकांनी मला स्पष्ट केले होते की, नाट्यगृहात व्हीलचेअर आणि स्ट्रेचर जाण्याची खास व्यवस्था केलेली आहे, त्याची पडताळणी करावी आणि आपल्या समाजाच्या संघटनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून समाज बांधवांना भेटावे म्हणून मी मोठ्या आशेने कार्यक्रमाला गेलो. मात्र तिथे गेल्यावर फार मोठी फसगत झाली.

गेट क्रमांक एक जवळ व्यवस्था असल्याचे आधी जाहीर करण्यात आले होते. मात्र तिथे भले मोठे कुलूप लावून ठेवले होते. बरेच प्रयत्न केल्यावर तिथे एका कर्मचाऱ्याला पाठवण्यात आले. त्यांनी सर्व किल्या तपासून पाहिल्या मात्र त्याचा काही उपयोग होत नव्हता. बऱ्याच धडपडीनंतर दुसऱ्या किल्ल्या मागवण्यात आल्या. त्याचाही उपयोग झाला नाही. संघटनेतील कार्यकर्त्यांनी सुद्धा यावर उपाय म्हणजे कुलूप तोडणे प्रस्तावित केला परंतु त्यासाठीही बराच वेळ गेला असता व थोडीफार तोडफोड होऊन नुकसानच झाले असते म्हणून मी नाईलाजाने घरी परत आलो.

महत्त्वाचा मुद्दा असा आहे की, प्रबोधनकार ठाकरे सारखे नाट्यमंदिर हे अलीकडे बांधलेले नाट्यमंदिर असूनही तिथे दिव्यांगांचा अजिबात विचार केलेला नाही. तिथे व्हीलचेअर नेणे एकट्या अपंगाला तर शक्यच नाही. तीव्र स्वरूपाच्या दिव्यांगाना येथे प्रवेश जवळजवळ निषेधच आहे. शासन दिव्यांगांसाठी वेगवेगळ्या योजना करत आहेत असे घोषणा करत राहते, महानगरपालिकेकडे आर्थिक कमतरता नसतानाही अशा महत्त्वाच्या विषयावर पूर्णपणे दुर्लक्ष होते याचे मनस्वी दुःख होते.

मी स्वतः 90% हून अधिक अपंग असलेला एक सेवानिवृत्त शासकीय अधिकारी आहे. शासनाच्या उपसचिव पदावरून मी महाराष्ट्र राज्य दिव्यांग विकास महामंडळाचा पहिला व्यवस्थापक म्हणूनही नियुक्त झालो होतो. या क्षेत्रातील भरीव कामगिरीमुळे मला तीन वेळा राष्ट्रपती महोदयांकडून पुरस्कारही मिळालेला आहे. मात्र प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहातील असुविधा /गोंधळ बघून मनस्वी दुःख झाले.

कृपया महानगरपालिकेने, शासनाने व संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी अशी मी त्यांना विनंती करू इच्छितो.

— लेखन : वसंत संखे.
निवृत्त उपसचिव, महाराष्ट्र शासन. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. In this case every organisation, working places, entertainment places, transport places etc should be made compulsory to make easy excess to the handicap person. There should be legal and compulsory/ mandatory provision for handicapped. Govt. or concerned organisation should not issue permit/ licence to run their activities/businesses unless and until they provide facilities to handicapped person.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments