हे अपर्णे, अंबे, मृडानी
चंड, मुंड, विनाशिनी
घे धाव पृथ्वीवर, सत्वर
इथे माजला हाहा:कार
धरणीस सोसेना भार
पाप्यांचा मुक्त संचार
दिवस असो वा रात्र
बलात्कार हाच पुरुषार्थ
अष्टभुजे स्वरूप मोहिनी
ये सोळा शस्त्रे परजोनी
पाजळून तुझे ते खड्ग
परशूही करी सज्ज
मति जयाची आज होय नष्ट
जन्मस्थलाची पवित्र वेदी
उन्मत्त, अंध, दुराचारी
होऊनी केली भ्रष्ट
ये घेऊनी रूप कालीचे
दो हाती तलवारी घेई
कापून टाक लिंगच दुष्टांचे
संहारास समिधा होई
का तयास स्मरेना जन्मदाती माता
भगिनी, कन्या कोणी नाही जगती ?
स्त्रीत्व जिचे पूजावे
चरणी ठेऊन माथा ?
का तिलाच मानून अबला
ठायी ठायी ठेचावे ?
हे चामुंडे माते
नरकासुर पायी तुडवून टाकावे
“माते तू होऊन दुर्गा
अबलांस दाव गे मार्गा”
कुणी होऊ नका द्रौपदी अबला
करू नका आर्त तो धावा
केशवा, मुरारि, माधवा
व्हा स्वयेच नव दुर्गा आता
मी ठेवत इथेच शस्त्रे सारी
अबलानो घ्या भरारी
सीमोल्लंघन दुर्बळतेचे
नरकासुर निर्दलनाचे I l
— रचना : सुलभा गुप्ते. कैरो, ईजिप्त
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800