बालपण : भाग ३
प्रकरण ११ ते १३
‘बालपण’ हे माक्सिम गोर्की यांच्या आत्मचरित्रात्मक त्रयीमधील (बालपण – १९१४, दाही दिशा १९१५, माझी विद्यापीठे १९२३) पहिले पुस्तक.
बालपणचा नायक स्वतः लेखक आहे. छोटा अल्योशा पेश्कोव (माक्सिम गोर्की) समजून घ्यायचा आटोकाट प्रयत्न करतो की, जगाची दोन भागांमध्ये विभागणी का झालीय? एक जग आहे त्याच्या आजीचे. ह्या तेजस्वी जगात तिला लोकांविषयी अपार प्रेम आणि करुणा वाटते ; आनंदी स्वभावाचा रंगारी त्सिगानोक व झकास हेसुद्धा याच जगातील! दुसरे जग संकुचित आणि लोभी वृत्तीच्या माणसांचे. भावी लेखकाला अगदी लहानपणापासूनच दुष्ट जीवनाविषयी तिटकारा होता. जीवनाची पुनर्घडण करण्याची लहानपणापासूनच त्याला आस होती. बालपण या आत्मचरित्रात्मक कादंबरीचा नायक पेश्कोव कुटुंबातील लहानगा लेखक असून वयाच्या ८ व्या वर्षांपर्यंतच्या आठवणी १३ प्रकरणांतून कथन केल्या आहेत.
अकराव्या प्रकरणात त्याची आई ताठ व भक्कम बनते, घराची सर्व सूत्रे ती आपल्या हातात घेते. आजोबा एकदम शांत होतात. पोटमाळ्यावर ”माझ्या वडिलांनी केलेली टिपणे” नावाचे गूढ पुस्तक वाचत. आईशी क्वचित व जास्त प्रेमाने बोलत.त्यावेळी अलेक्सेयसमोर आयुष्याचे दुसरे ध्येय होते – मोठ्या सोनेरी दाढीचा लष्करी अंमलदार बनायचे. आजी त्याला चतुर संन्यासी इयोनची गोष्ट सांगते. दुसर्या दिवशी अलेक्सेयला देवीची लागण होते. त्याला अंधार्या पोटमाळ्यावर ठेवण्यात येते. त्याला भेटायला फक्त आजी यायची व चमच्याने खाऊ घालायची. अनेक गोष्टी व दंतकथा सांगायची. एक दिवस ती येत नाही. पोटमाळ्याच्या जिन्यावर ती पालथी पडल्याचा भास होतो. अलेक्सेय बिछान्यातून उडी मारुन पायांनी व खांद्याने तावदानाची खिडकी फोडतो व बर्फावर उडी घेतो. त्याचा खांदा निखळतो. काचेमुळे कापले होते. तीन महिने त्याला चालता येत नाही. आजी चोरुन वोदका प्यायची. ती त्याला त्याचे वडील माक्सिम साव्वातेयेविच बद्दल सांगते. त्याच्या वडीलांचे वडील एक सैनिक होते. पुढे बढती मिळून ते अंमलदार बनले, पण हाताखालच्या लोकांना क्रूरपणे वागविल्याबद्दल त्यांना सैबेरियात हद्दपार करण्यात आले. तेथेच सैबेरियात कुठेतरी त्यांच्या वडिलांचा जन्म झाला. त्यांचे आयुष्य खूप खडतर होते. त्यांचे वडील लहान असतानाच त्यांची आई वारते व ते ९ वर्षाचे असताना वडीलही वारले. एका सुताराने त्यांना दत्तक घेतले. तेथून ते पळाले. १६ व्या वर्षी नीझ्नी – नोवगदरला आले. आजी अकुलीना इवानोव्ना आणि वार्या बागेत रासबेरी वेचित असताना ते वार्याला मागणी घालायला येतात.आजोबा वसीली वसील्येवीच आपखुशीने वार्या देणार नसतील तर तिला पळवून नेण्यासाठी आजीची मदत मागतात. नंतर त्यांचे रीतसर लगीन होते. आजोबा मात्र वार्वारावर नाराज होतात. घरी येऊन आजीला झोडून काढतात. माक्सिम व वार्या सूयेतिन्स्की रस्त्यावर एका घरात राहतात. आजी त्यांना चोरुन भेटत. आजोबांना ते माहित होते पण तसे ते दाखवत नसत. त्यांचं कसं चाललंय असे ते एकदा आजीला विचारतात. बरं चाललंय असे आजी सांगते. त्यांच्याकडे जाणार नाही. हवं तर त्यांनी यावं असे आजोबा म्हणतात. ते दोघे एका रविवारी घरी येतात. बागेसमोरच्या खोल्यांमधून रहायला येतात. तिथेच अलेक्सेयचा जन्म होतो. कडक हिवाळ्यात माक्सिम लांडग्यांची शिकार करायचा. त्यांचे बुजगावणे करायचा. एकदा मिखाईलमामाने माक्सिमला बर्फातल्या एका भोकात पाण्यात ढकललं. काय घडलं त्यातलं एका अवाक्षरानं त्याने पोलिसांना सांगितले नाही. लवकरच त्याला अस्राखानला पाठवलं. तिथं झार यायचा होता म्हणून विजयकमान उभारायला पाठवले होते.
बाराव्या प्रकरणात येवगेनी वसील्येवीच माक्सिमोव या विशीतल्या भावी वडीलांची तिशीतली आई अलेक्सेयला ओळख करुन देते. आई आपला वाङनिश्चय जाहिर करते. अलेक्सेयला लष्करी अधिकारी असलेल्या सावत्रबापाचा व त्यांच्या आईचा तिटकारा येतो. तो त्यांच्या खुर्च्यांना चेरीची पेस्ट माखून ठेवतो. आईचा विवाह होतो. ते माॅस्कोला निघून जातात.लहानगा अलेक्सेय बागेत रमतो. आपल्या सबंध आयुष्यात तो कालखंड सर्वात जास्त शांततेचा आणि चिंतनाचा होता असे लेखक नमूद करतो. एका शरदात आजोबा घर विकतात. नंतर ते सोर्मोवो येथील नवीन घरात जातात. आई गरोदर असते.प्रेम नावाची सजग, कंपायमान इंद्रधनुष्यी भावना अलेक्सेयच्या अंतःकरणातून हळूहळू विझत गेली. तिच्या जागी आत्यंतिक तिरस्काराची भावना घर करु लागली. असमाधानाने तो धुमसू लागला. नीरस, मूर्ख जगात एकटे असल्याचा विषाद बळावू लागला. नव्या घरात अलेक्सेय आजोबांसोबत रुळतो ना रुळतो तोच आई व आजी नव्या बाळाला घेऊन येते. कामगारांना फसवल्याबद्दल सावत्रवडीलांची कारखान्यातील नोकरी जाते. रेल्वेस्टेशनवर ते कॅशियर म्हणून काम करु लागतात. आईने अलेक्सेयला शाळेत घातले. तिथेही तो खोड्या करतो.एकदा त्यांच्या शाळेला बिशप ख्रिसान्फ भेट द्यायला येतात. त्यांना शाळा कंटाळवाणी वाटते असे अलेक्सेय सांगतो. घरात तो आईचा एक रुबल चोरतो. त्यातून तो पवित्र इतिहास , राॅबिन्सन क्रूसो, अँडरसनच्या परीकथा विकत घेतो. आई त्याला बदडते. त्याने रुबल चोरला हे शाळेत पसरते. पोरं त्याला चोर म्हणतात. पुन्हा कधी शाळेत जाणार नाही असे तो आईला सांगतो. एकदा सावत्रबापाचा आईला मारत असताना अलेक्सेय पाहतो. तो तिकडे सूरी फेकून मारतो.
तेराव्या प्रकरणात अलेक्सेय पुन्हा आजोबांबरोबर राहू लागतो.पैसे मिळवू लागतो. रस्त्यावर भटकून जुनी हाडे, चिंध्या, खिळे, कागद इ. गोळा करुन विकायचा. नंतर ओका नदीच्या किनाऱ्यावर लाकडाच्या वखारीतून फळ्या चोरायचा. शाळेमध्ये मुले त्याला भटक्या आणि भंगारवाला म्हणू लागली. तो तिसरीची परीक्षा पास होतो. चांगले गुण मिळतात.
.’फता-माॅर्गना’ हे पुस्तक बक्षीस म्हणून मिळते. ते पाहून आजोबा हेलवतात. त्यांना आनंद होतो. पुढे अलेक्सेय ती पुस्तके दुकानदाराला विकतो. प्रशस्तीपत्र खराब करतो. ते आजोबा पेटीत ठेवतात. आई व छोटा भाऊ निकोलाय आजोबांकडे रहायला येतात. आजी एका श्रीमंत व्यापार्याच्या घरी रहायला जाते. आई आॅगस्ट महिन्यात एका रविवारी मेली. सावत्रबाप नुकताच परतलेला. त्याच्याबरोबर आजी आणि निकोलाय जातात. आईच्या दफनानंतर काही दिवसांनी आजोबा अलेक्सेयला म्हणाले की यापुढे तुला इथं निवारा नाही. उघड्या जगात जायची तुझी वेळ झालीय.. आणि अलेक्सेयने उघड्या जगात पाऊल ठेवले. इथे बालपण ही आत्मचरित्रात्मक ३०० पृष्ठांची कादंबरी संपते. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर तसेच आतील रेखाटने लक्षणीय आहेत. हे प्रकाशन आता बंद झाल्याने हे पुस्तक दुर्मीळ झालेले आहे.
— परीक्षण : विलास कुडके.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800