Saturday, July 27, 2024
Homeसाहित्यदुर्मीळ पुस्तके : समारोप

दुर्मीळ पुस्तके : समारोप

“दुर्मीळ पुस्तके” या लेखमालेचा आज समारोप होत आहे. कुठलीही लेख माला ही कधी तरी संपणार असते, हे खरे असले तरी लेख मालेचा समारोप ही व्यक्तिशः माझ्यासाठी अतिशय कठीण, दुःखदायक गोष्ट असते. कारण या लेख मालेच्या
निमित्ताने संबधित लेखक/लेखिका आणि त्यांच्या लेखनाचे विषय यांच्याशी एक नाते निर्माण झालेले असते. सतत संवाद होत असतो.विचारांची, कल्पनांची देवाणघेवाण होत असते आणि लेख माला संपुष्टात आली की हे नाते ही संपुष्टात येते. याचे खुप वाईट वाटते. असो…

दुर्मीळ पुस्तके ही लेख माला श्री विलास कुडके यांनी अत्यंत निष्ठेने, अभ्यासपूर्ण आणि अतिशय सातत्याने लिहिली. विशेष म्हणजे, कुठल्याही कारणाने त्यांनी एक ही लेख, त्या लेखाची डेड लाईन कधी चुकू दिली नाही याबद्दल त्यांचे खुप कौतुक वाटते.

खरं म्हणजे, श्री कुडके यांची सर्व सेवा माहिती खात्यातील आस्थापना शाखेत गेली. एरवी रुक्ष समजल्या जाणाऱ्या आस्थापना शाखेत सर्व आयुष्यभर सेवा बजावलेले श्री कुडके हे इतके चांगले वाचक, समीक्षक आहेत हे, हा ही लेख माला वाचणाऱ्या आमच्या सहकार्यांसाठी एक सुखद अनुभव ठरला असेल, यात काही शंका नाही.

या लेख मालेतील निवडक परिक्षणांचे पुस्तक काढण्याबाबत श्री कुडके यांनी अवश्य विचार करावा, असे सुचवावेसे वाटते. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
– संपादक

साधारण एक वर्षांपूर्वी एक सदर “दुर्मीळ पुस्तके” असे परिचयात्मक असावे अशी कल्पना सुचली होती. त्या कल्पनेचे Newsstorytoday.com या पोर्टलचे संपादक श्री देवेंद्र भुजबळ साहेबांनी स्वागत केले. या मालिकेत मागे वळून पाहिले तर नाही नाही म्हणता ३९ भाग लिहून झाले व ते प्रसिद्ध झाले याबद्दल अतिशय समाधान वाटते.

या पोर्टलवर पहिला लेख “हवेतील मनोरे” या श्री ग. खं पवार यांच्या लघुनिबंध संग्रहाबद्दल दिनांक २८/४/२०२३ रोजी प्रसिद्ध झाला. त्यानंतर दर शुक्रवारी एक याप्रमाणे सलग ३९ भाग आतापर्यंत प्रसिद्ध झाले आहेत. दुधाची घागर, एकले बीज, आलोक, खुणेची पाने, गजरा मोतियाचा, वेचलेले क्षण, स्वाधीन की दैवाधीन, पारिजात, गारगोट्या, गुलाबी आयाळीचा घोडा, तृणपुष्पे, कागदी होड्या, पाण्यातले दिवस, आनंद सोपान, मृगाजिन, बालपण, मनाची मुशाफिरी, दाही दिशा, माझी विद्यापीठे, घुमटावरले पारवे, कथाशिल्प, रातराणी, खिरापत, काकांचे स्वप्न, वेळी-अवेळी, मन्वन्तर वाचनमाला, दीपकळी, मोळी, शर्यत, उघडे लिफाफे, श्वेतरात्री, पानदान, निबंध सुगंध, सुरंगीची वेणी व इतर कथा, महाश्वेता, भांगतुरा, चोरलेल्या चवल्या व पूर्वस्मृति ! ही मालिका न संपणारी आहे.

अशी कितीतरी पुस्तके आहेत जी काळाच्या ओघात आज दुर्मीळ झालेली आहेत. मी फक्त एक सुरुवात केली आहे. यातील काही पुस्तकांचा मी स्वतः शोध घेतला. उदाहरणार्थ ‘स्वाधीन की दैवाधीन’ हे मेजर साळवी यांचे पुस्तक. या पुस्तकातील एक उतारा शालेय जीवनात अभ्यासाला होता. हे पुस्तक मला पणजी येथील महाराष्ट्र परिचय केंद्रात कार्यालयीन कामासाठी गेलो होतो तेव्हा तिथे उपलब्ध झाले. लेखमालिकेच्या निमित्ताने कळले की हे पुस्तक एकेकाळी पदवी अभ्यासक्रमात होते. एका आयएएस अधिकार्‍याने त्याची प्रत माझ्याकडून मागून घेतली. तसेच दुसरे पुस्तक प्रा. भगवंत देशमुख यांचे “आलोक” या पुस्तकासाठी मी फेसबुकवर सहज आवाहन केले तर त्याला प्रतिसाद म्हणून त्यांचा मुलगा श्री अजय देशमुख यांनी त्या पुस्तकाची डीजिटल प्रत तसेच त्यांची अन्य पुस्तके मला स्वखर्चाने आवर्जून पाठविली. शालेय जीवनात त्यांचा गोदाकाठ हा सुंदर धडा होता म्हणून मी या पुस्तकाकडे आकर्षिलो गेलो होतो.

गो. रा. दोडके यांचा “मी श्रीमंत आहे” हा धडा बालभारतीच्या पुस्तकात होता. तो त्यांच्या पूर्वस्मृति या पुस्तकातून घेतलेला होता. त्यासाठी मी त्या पुस्तकाचा शोध घेतला. असेच एक पुस्तक ना मा सन्त यांचे “उघडे लिफाफे” हे जुने पुस्तक सोशल मीडियावर विक्रीसाठी आलेले होते आणि पाहता पाहता ते दुसर्‍यानेच बुक केले होते. त्या पुस्तकासाठी मी सर्वत्र शोध घेतला पण ते कुठेच मिळेना. एके दिवशी सहज मी माझ्या गोव्यातील एक मित्र श्री विठ्ठल ठाकूर यांच्याकडे या पुस्तकाचा विषय काढला. त्यांनी माझ्यासाठी गोवा विद्यापीठाच्या ग्रंथालयात त्या पुस्तकाचा शोध घेतला व मला ते उपलब्ध करुन दिले.

‘खुणेची पाने’ हे डॉ सरोजिनी बाबर यांचे पुस्तक मला माझे मित्र श्री प्रमोद ताले यांनी उपलब्ध करुन दिले.

रघुवीर जादूगार यांचे ‘प्रवासी जादूगार’, जादूतील गमती जमती ही पुस्तके मला चांद बुक स्टॉल, कोल्हापूर यांनी उपलब्ध करुन दिली तर त्यांचे मी पाहिलेला रशिया या पुस्तकाची एक आवृत्ती दुर्मिळ पुस्तकं या समुहात तर एक आवृत्ती (दोन्हीची मुखपृष्ठे वेगवेगळी) अभिजात साहित्य समुहात श्री बालाजी काकडे यांनी उपलब्ध करुन दिली होती.

लघुकथा : ‘तंत्र आणि मंत्र’ हे ना. सी. फडके यांचे पुस्तक मला मुंबईत सेवेत लागण्यापूर्वी नाशिक येथील सार्वजनिक वाचनालयातून मिळाले होते. ते मला अतिशय आवडले होते. मुंबईत सेवेत लागल्यावर त्या वाचनालयाशी संपर्क तुटला. ते पुस्तक पुन्हा मिळवावे म्हणून मी शोध घेतला तेव्हा ते पुस्तक मला तेव्हाच्या मंत्रालय केंद्रीय ग्रंथालयात मिळाले.

लघुनिबंध माझा आवडता साहित्य प्रकार त्यामुळे हवेतील मनोरे हा ग. खं पवार यांचा दुर्मीळ लघुनिबंधसंग्रह मला ‘inspire book space’ या आॅनलाईन स्टोअरवर उपलब्ध झाला.

एक आठवण आणखी आहे. १९८९ मध्ये मी मुंबईत सेवेत लागलो तेव्हा तेव्हाच्या व्हिक्टोरिया टर्मिनस स्टेशनबाहेर रशियन पुस्तकांचे प्रदर्शन भरले होते. त्यात मी टाॅलस्टाॅय यांची पुनरुत्थान, अॅना करिनाना, तुर्गेनेंव यांचे तीन प्रेमकथा, विविध लेखकांचे His nameless love, अ‍ॅन्टेन चेखवच्या निवडक ५ भागांपैकी ४ भाग कथांचे इंग्रजी खंड घेतले होते. त्यातील ५ वा भाग नाटकांचा तेव्हा घेतला नव्हता पण नंतर कळले की त्याच्या जगभरात फक्त ५००० प्रती छापण्यात आलेल्या होत्या व तो खंड मिळणे अगदी दुरापास्त झाले आहे. तेव्हाच मिळत असताना तो खंड घेतला असता तर अशी आज चुटपुट लागून राहिली आहे. आजही तो खंड मला मिळालेला नाही आणि मी त्या खंडाच्या आजही शोधात आहे.

त्यावेळी अनिल हवालदार यांनी रशियन साहित्यिकांची मराठीत अनुवादित केलेली पुस्तके अतिशय अल्प दरात होती. त्यातील गुलाबी आयाळीचा घोडा, माक्सिम गोर्की यांची आत्मचरित्रात्मक त्रयीतील बालपण, दाही दिशा व माझी विद्यापीठे यासारखी अनेक पुस्तके आठवली आणि ती इतक्या वर्षाने शोधायला गेलो तर ते प्रकाशन बंद झालेले आढळले. पुस्तके मिळणे अगदीच दुरापास्त. सोशल मीडियावर दुर्मिळ पुस्तकं नावाच्या समुहात ती मला मिळाली.

रशियन पुस्तकांबाबत एक आठवण आणखी आहे. माझ्या महाविद्यालयीन मित्र विजय सातपुते याला देखील रशियन पुस्तकांची आवड होती. त्यानेच प्रथम मला नाशिक मध्ये भरलेल्या रशियन पुस्तकांच्या प्रदर्शनात नेले होते. काही पुस्तके रशियन पुस्तके जमा करणारा माझा मित्र निखिल राणे याने मिळवून दिली. अभिजात साहित्य, चांद बुक स्टोअर या सोशल मीडियातील ग्रुपमधूनही मला अनेक दुर्मीळ पुस्तके उपलब्ध झाली.

अलीकडेच राहूल जोश व साक्षी मोरे यांच्याकडून अतिशय दुर्मीळ असलेली “पूर्वस्मृति” “निबंध- सुगंध” “मंगल वाचन” या सारखी दुर्मीळ पुस्तके मिळाली.दुर्मीळ पुस्तके मिळविण्यासाठी एक नाव आवर्जून घ्यावेसे वाटते ते म्हणजे शशिकांत सावंत यांचे. त्यांचे पुस्तकांविषयी लेख सुध्दा आवर्जून वाचावे असे असतात.

मला मराठी पाठ्यपुस्तकांची बालपणापासून आवड होती. १९६८ पासून बालभारतीची मालिका सुरु झाली. त्यातील पाठ्यपुस्तके बदलत गेली. ती सर्व आज बालभारतीच्या संकेतस्थळावर डीजिटल स्वरुपात उपलब्ध आहेत. त्या आधीची मराठी वाचनमाला, खासगी प्रकाशकांनी प्रसिद्ध केलेल्या “मंगल वाचन”, “नवे वाचन” “नवयुग वाचनमाला” इ. कित्येक पुस्तके आज दुर्मीळ आहेत. अशी दुर्मीळ पुस्तके नजरेस पडली तर नकळत मन त्या काळात जाते. त्यामुळे अशी पुस्तके नाॅस्टलजिक ठरतात. “मंगल वाचन” यावर वि. स. खांडेकर यांची स्वाक्षरी असलेली प्रत मला माझा मित्र प्रशांत पंडित याने दाखवली होती. मंगलवाचनचे मुखपृष्ठ व आतील चित्रे दीनानाथ दलाल यांची असल्याने ती दुर्मीळ झालेली पुस्तके त्यांच्या कुटुंबीयांनी प्रशांत पंडितकडून मागवून घेतली होती.

मध्यंतरी मा. शिक्षण मंत्री महोदयांनी राज्यात पाठ्यपुस्तकाचे संग्रहालय उभारण्याची घोषणा केली होती. तिला मूर्त स्वरुप आले तर त्या संग्रहालयात जुन्या काळातील तसेच विविध राज्यातील, देशाबाहेरील पाठ्यपुस्तके पहावयास मिळतील अशी आशा आहे.

दुर्मीळ पुस्तकांचा हा छंद अतिशय आनंददायी आहे. दुर्मीळ पुस्तकांचे असे असते की त्याची किंमत दिवसेंदिवस वाढतच जाते. ‘दुर्मीळ अक्षरधन’ या पुस्तकात मी वाचले की पाश्चात्य देशात दुर्मीळ पुस्तकांच्या ग्रंथालयातून अक्षरशः चोर्‍या होतात. कडेकोट बंदोबस्तात अशी पुस्तके ठेवली जातात. अशा पुस्तकांच्या बोल्या लावल्या जातात. ज्याच्याकडे अशी पुस्तके तो श्रीमंत गणला जातो.
दुर्मीळ पुस्तकांची ही न संपणारी मालिका आहे. या मालिकेतील लेख दै जनादेश, ठाणे व दै. आपला महाराष्ट्र, अहमदनगर या वृत्तपत्रातून दर रविवारी प्रसिद्ध होत आहेत. या मालिकेत कितीही लिहिले तरी ते कमी आहे. जेवढे लिहिले तितकीच पुस्तके दुर्मीळ आहेत असे नाही. अशी कितीतरी पुस्तके आहेत जी आपल्याला माहितही नाही पण दुर्मीळ आहेत. सहज आठवले मालू कवीने नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ ज्या ग्रंथाच्या आधारे लिहिला तो गोरक्ष किमयागार हा ग्रंथ आज लुप्तप्राय झालेला आहे. निळावंती ग्रंथाच्या आख्यायिका सर्वत्र चर्चिल्या जातात त्याही ग्रंथाचा लोक शोध घेत असतात. चांदोबा मासिक बंद पडले, त्याचे अंकही लोक शोधतात. जुन्या काळातील उजळणी, सचित्र बालमित्र यांचाही अनेकजण शोध घेतात.

डॉ वि भी कोलते यांनी संपादित केलेल्या लीळाचरित्र या ग्रंथावर न्यायालयीन प्रकरणी बंदी घातली गेली आहे . त्यामुळे तो ग्रंथ दुर्मीळ आहे.मी स्वत: प्रा. पुरुषोत्तम नागपूरे (ज्यांचे अलिकडेच निधन झाले आहे) संपादित लीळाचरित्र मागवून घेतले आहे. महानुभाव साहित्यात संतोषमुनी विरचित रुक्मिणी स्वयंवर सारखे ग्रंथ दुर्मीळ आहेत. १९५६ साली वि. भी. कोलते यांच्या हस्ते प्रकाशित झालेले कवी यल्हणसुत विद्वांस महानुभाव यांचा “श्रीकृष्ण बाळक्रीड़ा ग्रंथ.”मूल ग्रंथ शके १५८० मध्ये लिहिला गेला. त्याच्या प्रतीवरुन शुद्ध बालबोध प्रत तयार करण्यात आली त्याचा परिचय संध्या सोमन यांच्यामुळे झाला. त्यावेळी त्याची किंमत साड़ेचार रुपये होती. स्थानपोथी दुर्मीळ आहे. आपल्याला साधारणतः ५१ अध्यायाचे गुरुचरित्र माहित आहे पण मराठवाड्यात ५५ अध्यायी गुरुचरित्राची पोथी मिळाली आहे. अनेक ग्रंथालयात दुर्मीळ पुस्तके व हस्तलिखित जतन केले जात आहे.

या मालिकेच्या निमित्ताने जाता जाता मी इतकेच म्हणेन की अशा दुर्मीळ पुस्तकांचे धन काळाच्या ओघात नष्ट होण्यापूर्वी त्याचे डिजिटलाईजेशन व्हावे व पुढील पिढ्यांसाठी त्याचे ऐतिहासिक मुल्य ओळखून त्या ठेव्याचे जतन व्हावे आणि असे धन कोणालाही मुक्तपणे उपलब्ध व्हावे!

शेवटी, ज्या रसिक वाचकांनी या लेखमालेला चांगला प्रतिसाद दिला, माझा लेखनाचा हुरूप वाढविला त्यांचे आणि टीम न्युज स्टोरी टुडे चे मनःपुर्वक आभार मानून आपली रजा घेतो.

विलास कुडके.

— लेखन : विलास कुडके.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८