मृगाजिन
बलवंत ग. कुळकर्णी यांचे “मृगाजिन” हे पुस्तक साने गुरुजी यांचे शिष्य दयार्णव कोपर्डेकर यांनी १९४५ मध्ये प्रसिद्ध केले होते. नंतर त्याची दुसरी, तिसरी आवृत्ती साधना प्रकाशनाने प्रसिद्ध केलेली होती. लेखक ब. ग. कुळकर्णी यांची कन्या व जामात यांनी सुभाव प्रकाशन, सांगली या प्रकाशनामार्फत २४/१२/२००७ रोजी या पुस्तकाचे पुनर्मुद्रण केले आहे. या पुस्तकाचे मुखपृष्ठ नागेशराव पिंगळे यांनी रंगविले आहे.
स्व. बळवंत गबाजी कुळकर्णी हे १९२४ ते १९२६ या काळात साने गुरुजींचे विद्यार्थी होते. नंतर ते १९२८ ते १९३० या काळात त्यांचे सहशिक्षक होते. त्यांनी साने गुरुजींची एक आठवण ‘मृगाजिन’ झंकार दिवाळी अंकात १९४४ मध्ये प्रथम प्रसिध्द केली. अनेकांना ती अतिशय आवडल्याने त्यांनी आणखी १० आठवणी लिहून त्या पुस्तकरुपाने प्रसिध्द केल्या.
एम. ए झाल्यावर साने गुरुजी अंमळनेरच्या तत्वज्ञान मंदिरात तत्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी १९२३ मध्ये’ फेलो ‘म्हणून आले. जून, १९२४ मध्ये तेथील प्रताप हायस्कूलमध्ये ते शिक्षक म्हणून काम करु लागले. दुसऱ्या वर्षी त्यांच्याकडे तेथील छात्रालयाची जबाबदारी आली.
१९३० मध्ये महात्मा गांधींनी स्वातंत्र्य संग्रामाचे शिंग फुंकले. साने गुरुजींनी या चळवळीत समर्पण भावनेने सामील व्हायचे ठरवले व शाळेचा निरोप घेतला. या पुस्तकातील ११ आठवणी साने गुरुजी यांच्या अमळनेर येथील वास्तव्यातील आहेत.
पहिले पाऊल या आठवणीत साने गुरुजी अमळनेर येथील प्रताप हायस्कूलमध्ये पाचवीला इंग्रजी, संस्कृत व सहावीला मराठी हे विषय शिकवू लागले ते नमूद केले आहे. शेक्सपियरचे व्हेनिसचा व्यापारी हा दोन मित्रांच्या शुध्द प्रेमाचे दर्शन घडवणारा नाट्यमय धडा कथारुपाने शिकवतांना साने गुरुजींचे डोळे भरुन आले. या व्हेनिसच्या व्यापार्याचे खरे चित्र गुरुजींनी मुलांना भावनांनी रंगवून दिले. मैत्रीची दिव्यता दाखवली. विद्यार्थ्यांना तेव्हा त्या शिकवण्याचे मोठेपण कळले नाही पण ते विद्यार्थी आजन्म हा पाठ विसरले नाहीत.
छात्रालय या आठवणीत साने गुरुजींच्या सहवासाने त्या वेळच्या छात्रालयास नितांत सुंदर ऋषिकुलाची किंवा गुरुकुलाची सुखद शोभा कशी आली त्याचे सुंदर वर्णन केले आहे. मोठ्या पहाटे उठून प्रातर्विधी आटोपून गुरुजी घंटा देत. त्या वेळी विद्यार्थी उठत. लहान विद्यार्थी उठत नसत त्यांना गुरुजी हळुच उठवत.
निज नीज माझ्या बाळा या आठवणीत पहिल्या वर्षातील दुसर्या अधिवेशनात गुरुजींनी ६वीला कवी दत्तांची कविता आईची महती तिचा त्याग तिचे प्रेम वात्सल्य याचे समरसून वर्णन करीत अशी शिकविली की शेवटी त्यांनी आपले अश्रु पुसले. त्यांच्याबरोबर सर्व वर्गाने आपले डोळे पुसले.
विद्यार्थी या आठवणीत गुरुजींची बोलण्यापेक्षा लिहिण्याची हौस, ते कोठेही भेटले तरी त्यांच्या हातात असणारे कोणते ना कोणते पुस्तक , नेहमी लायब्ररीत एखाद्या कपाटाआड एका पायावर त्यांचे उभे राहून कपाटाच्या आधाराने तास न तास पुस्तकात रमणे, लिहिण्यातून विद्यार्थी दैनिकाचा जन्म, ५२ पृष्ठे ठरलेली असताना स्वतःच्या पगारातून २० पृष्ठे वाढवून अंक काढणे अशा आठवणी कथन केल्या आहेत.
अतुल सेवाधर्म या आठवणीत छात्रालयातील गडी गोपाळ टाईफाईडने आजारी पडतो. साने गुरुजी त्याला आपल्या खोलीवर आणून त्याची सुश्रुषा करतात. २१ दिवस होतात. गोपाळ त्यात जातो. गुरुजींच्या सेवाधर्मामुळे त्याची स्मृती अमळनेरमध्ये अमर झाली याबद्दल आठवण कथन केली आहे.
मृगाजिन ही आठवण असलेला धडा पूर्वी बालभारतीमध्ये होता. पश्चिम खानदेशातील सातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या जमीनदाराचा मुलगा तडवी हा सानेगुरुजी यांचा विद्यार्थी. गुरुजींकडील मृगाजिन आकाराने लहान होते. त्याच्यावरील केस उडालेले होते. त्याला बारीक बारीक भोकेही पडलेली होती. या गोष्टीला काही दिवस लोटतात. दिवाळीच्या सुट्टीत तो गुरुजींसाठी नवे मृगाजिन घेऊन येतो. त्यासाठी तो काळवीटाची शिकार करतो. त्याचे कातडे काढतो व कमावतो.गुरुजींचे डोळे भरुन येतात. ‘तडवी, माझ्याकरिता का एका स्वच्छंदी – आनंदी प्राण्याला तू ठार केलंस?’असे गुरुजींनी विचारल्यावर तडवीचेही डोळ्यात अश्रू गरगरले. यापुढे नाही मारणार मी हरिण म्हणत त्याने डोळ्याला रुमाल लावला. ही गुरुजींची अहिंसक शिकवण होती.
निवडणूक एकाची, आनंद अनेकांचा या आठवणीत संस्थाचालक गोखले जिल्हा स्कूलबोर्डाच्या निवडणुकीला उभे राहतात. निवडून येतात. गुरुजी मुलांना सांगतात की त्यांच्या स्वागताला सुताचा हार घालू. मुले व्हरांड्यात जातात. तिथे सुताच्या गुंड्या वर टांगलेल्या पाहतात. तेव्हा त्यांना उमगते की ते झोपतात तेव्हा गुरुजी नियमितपणे दररोज सूत काढीत असत. सर्व स्वागताला सज्ज होतात पण गोखले येत नाही. सर्व हिरमुसले होतात. पण गोखले आधीच छात्रालयात गेलेले असतात. त्यांच्या संयमी मनाचे गुरुजींना दर्शन होते व आदरभाव वाढतो.
“नको मला तें श्रीमंती जेवण” या आठवणीत छात्रालयातील कोजागिरी पौर्णिमाच्या उत्सवात मुले कार्यक्रमात गुरुजणांच्या नकला सादर करतात. त्यात एक विद्यार्थी साने गुरुजींही नक्कल करतो. त्यातून त्यांच्या त्यागी स्वभावाचे अनेक पैलू गोखले यांच्या निदर्शनास येतात. छात्रालयातील अनेक विद्यार्थ्यांना ते आर्थिक मदत करत.गोखल्यांच्या लक्षात येते की गुरुजींचे छात्रालयातील खाणावळीतही अनेक खाडे आहेत. त्यांच्या जेवणाकडील दुर्लक्षाने आबळीने गोखले व्यथित होतात व गुरुजींनी आपल्याकडे दोन वेळा जेवण घ्यावे यासाठी गुरुजींना आग्रह करतात. गुरुजींना ते श्रीमंती जेवण वाटते. मुले साधे जेवण घेत असताना आपण श्रीमंती जेवण कसे घ्यावे याकरता ते गोखलेंना जेवायला येऊ शकणार नाही असे लिहून कळवतात. गोखले त्यांना भेटायला येतात. हवे तर शिळ्या भाताला फोडणी देऊन ती घालीन पण जेवायला या म्हणून गुरुजींना आग्रह करतात.
अंदमान, नव्हे आनंदभुवन या आठवणीत छात्रालयातील एकांतातील दूरच्या सरपटणारे प्राणी निघत तिथल्या इमारतीला मुलांनी गमतीने ‘अंदमान’ असे नाव दिले होते.गुरुजींची खोली तिथेच होती. ते तिथे कुदळ फावडे मागवतात. स्वच्छता करतात. झाडे लावतात. निरनिराळी कलमे आणून लावतात. त्या अंदमानाचे ते आनंदभुवन करतात.
संमेलन या आठवणीत गॅदरींगची नोटीस फिरते. एक रुपया वर्गणी जमा करायची असते. श्रीमंत मुलांना ते अवघड नव्हते पण गरीब मुलांपुढे प्रश्न उभा राहतो. संमेलनासाठी गावातील शाळेतील प्रत्येक वर्गाने दोन दोन प्रतिनिधी निवडून दिले. त्यातून मुख्य प्रतिनिधी निवडला गेला. मुख्याध्यापक त्याला मदतीला छात्रालयातील जोड चिटणीस घ्यायला सुचवतात. त्याने त्याचे मन गढुळते. किल्मिष निर्माण होते. शाळेतील मुले आणि छात्रालयातील मुले असे तट पडतात. गुरुजी त्यांच्यात समेट घडवून आणतात.
प्रयाण या आठवणीत १९३० मधील चळवळीची लाट, महात्माजींनी हाती घेतलेला दिवा, छात्रालयातील हरिभाऊ मोहनी आधीच साबरमतीला गेलेले व ‘दांडी मार्च’ मध्ये सामील झालेले. या स्थितीत गुरुजींची मनस्थिती वर्णन केली आहे. ते छात्रालयाचा निरोप घेऊन ते स्वातंत्र्य चळवळीत जातात.
या ११ आठवणींतून साने गुरुजी यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचे स्वभावचित्र लेखकाने आपल्यापुढे उभे केलेले आहे.
— परीक्षण : विलास कुडके.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800