Saturday, April 20, 2024
Homeसाहित्यदुर्मीळ पुस्तके : १७

दुर्मीळ पुस्तके : १७

बालपण : भाग १

प्रकरण १ ते ५

‘बालपण’ हे माक्सिम गोर्की यांच्या आत्मचरित्रात्मक त्रयीमधील(बालपण – १९१४, दाही दिशा १९१५, माझी विद्यापीठे १९२३)पहिले पुस्तक.

बालपणचा नायक स्वतः लेखक आहे. छोटा अल्योशा पेश्कोव (माक्सिम गोर्की) समजून घ्यायचा आटोकाट प्रयत्न करतो की, जगाची दोन भागांमध्ये विभागणी का झालीय? एक जग आहे त्याच्या आजीचे. ह्या तेजस्वी जगात तिला लोकांविषयी अपार प्रेम आणि करुणा वाटते ;आनंदी स्वभावाचा रंगारी त्सिगानोक व झकास हेसुद्धा याच जगातील! दुसरे जग संकुचित आणि लोभी वृत्तीच्या माणसांचे. भावी लेखकाला अगदी लहानपणापासूनच दुष्ट जीवनाविषयी तिटकारा होता. जीवनाची पुनर्घडण करण्याची लहानपणापासूनच त्याला आस होती. बालपण या आत्मचरित्रात्मक कादंबरीचा नायक पेश्कोव कुटुंबातील लहानगा लेखक असून वयाच्या ८ व्या वर्षांपर्यंतच्या आठवणी १३ प्रकरणांतून कथन केल्या आहेत.
       
बालपण या पुस्तकातील *पहिल्या* प्रकरणाची सुरुवात होते ती छोट्या अलेक्सेयचे वडील माक्सिम साव्वातेयेविच त्याच्या लहानपणीच अकाली वारतात तेव्हाच्या आठवणींनी त्यांची लाल घागरा घातलेली आई त्याच्या बापाशेजारी ओणवी बसलेली. त्याच्या आजीने छोट्या अलेक्सेयचा हात धरलेला. मोठी माणसे रडत होती तेव्हाचे चित्रण बाल नजरेतून केलेले आहे लहानग्या अलेक्सेयला तो नुकताच मोठ्या आजारातून बरा होतो तेव्हा त्याचा बाप गंमत करीत खेळल्याचे आठवते. दुसरी आठवण त्याला वडील शिडाच्या बोटीतून फिरायला घेऊन जातात तेव्हा वीज कडाडते तेव्हाची आहे.
     नंतरची आठवण अलेक्सेयच्या आईला बाळंतपणाच्या वेणा येतात तेव्हाची आहे. मुलगा होतो. अलेक्सेय तेव्हा अंधार्‍या कोपर्‍यात ट्रंकेमागे लपून ते सर्व बालनजरेने पहात असतो. त्याला झोप लागते त्यामुळे आणखी काही आठवत नाही.
     नंतरची ठळक आठवण त्याच्या बापाची शवपेटी ज्या खड्यात ठेवीत होते त्या खेड्याकडे टक लावून पहाण्याची आहे. त्या खड्याच्या तळाशी पाणी साचलेले असते आणि बेडक्या उड्या मारत असतात. थडग्यावर माती लोटल्यावर लहानग्या अल्योशाला आजीने तो रडत का नाही म्हणून विचारले. त्याला रडावंसं वाटत नव्हते. तिने रडायला सांगावे याचे त्याला आश्चर्य वाटले. थडग्याच्या तळाशी मातीखाली गेलेल्या बेडकांची त्याला फिकीर वाटते.
     नंतरची आठवण अलेक्सेय, त्याची आई, कशीरिन कुटुंबातील आजी बोटीच्या एका छोट्या केबिनमधून प्रवास करतात. त्याचा लहानगा भाऊ माक्सिम वारला होता. बोटीच्या केबीनमध्ये त्याला गाठोड्यावर बसवून जो तो बाहेर डेकवर गेलेला असतो. रिकाम्या बोटीवर ते त्याला एकट्याला सोडून गेले तर अशी त्याला धास्ती वाटते. आजीचे गाण्यासारख्या सुरात शब्द उच्चारायची लकब त्याला आठवते. चांदीच्या डबीतील तिची तपकीर आठवते. ती जन्माची मैत्रीण बनली, आयुष्याविषयीच्या तिच्या नि:स्वार्थ प्रेमाने आपल्याला संपन्न बनवले आणि त्याच्या खडतर भविष्यकाळाला टक्कर देण्याचे सामर्थ्य दिले असे अलेक्सेयने नमूद केले आहे.आजी संतांच्या, प्राण्यांच्या, दयाळू दरोडेखोरांच्या, काळ्या शक्तींच्या अद्भुत गोष्टी सांगायची. तिची गोष्ट सांगून संपली की अलेक्सेय ओरडायचा ” पुढे सांग!”ते बोटीने नीझ्नीला पोहचतात. आई खिन्न असते. आजी मिखायलोमामा, याकोवमामा, नताल्या मामी, मामेभावंड साशा, कतेरिना यांची लहानग्या अलेक्सेयला ओळख करुन देते. गतिमान, घडामोडींनी भरलेल्या आणि कमालीच्या विचित्र आयुष्याची ती सुरवात होती असे लेखकाने नमूद केले आहे. आपण स्वतःविषयी लिहित नसून सर्वसामान्य रशियन ज्या घुसमटल्या आणि भयानक वातावरणात जगत होता व अद्याप जगत आहे, त्यासंबंधी लिहित असल्याचेही नमूद केले आहे.

*दुसर्‍या* प्रकरणाची सुरुवात करताना अलेक्सेय सांगतो की त्यांच्या आजोबांचे घर वैराच्या भावनांनी उकळत होते. त्याची आई वार्वारा नेमकी अशा वेळी तिथे आली होती जेव्हा तिचे भाऊ वडिलांपाशी इस्टेटीची वाटणी करावी म्हणून आग्रह धरुन बसली होती. अलेक्सेयचे आजोबा त्याच्यावर तिखट घार्‍या नजरेने पाळत ठेवून होते. आजोबा अत्यंत दुष्ट आहे असे त्याला वाटायचे. थोड्याच दिवसात त्यांनी अलेक्सेयला प्रार्थना शिकायच्या कामगिरीला लावले.नताल्यामामी त्याला प्रार्थना शिकवायची. अर्धअंधाळ्या ग्रिगोरीची थट्टा करण्यासाठी मिखाईलमामाने पुतण्याला साशाला शिवणकामाचे टोपण मेणबत्तीवर गरम करायला सांगितले. त्याने ते ग्रिगोरीजवळ ठेवले व चुलाण्यामागे लपला. तेवढ्यात तिथे आजोबा येतात आणि टोपण उचलतात तेव्हा त्यांचे हात पोळतात. मोठी माणसे कपडे रंगवत. लहानग्या अलेक्सेयची मनीषा पण कपडे रंगवण्याची होती. तो टेबलक्लॉथ रंगवतो पण सर्व रागावतात. त्याबद्दल त्याला आजोबा बेशुद्ध होईपर्यंत मार देतात. तो आजारी पडतो. आजोबा त्याला खाऊ आणतात.ते स्वतःविषयी त्याला सांगतात की ते एक अनाथ, एका भिकारणीचा मुलगा! पण आख्ख्या वर्कशॉपचे मालक आहे. ते त्यांच्या बालपणाविषयी सांगतात. पाणी उपशाची बढती कशी मिळाली ते सांगतात. शेवटी अलेक्सेयला जाणवते की आजोबा दुष्ट वा भयंकर नव्हते. ते गेल्यावर बाकी सर्वांनी त्याचे मनोरंजन केले. अलेक्सेयला आजोबा चाबकाने मारत असताना त्सिगानोक हात आडवा करुन मार कसा कमी बसवला ते सांगतो. पुढे मारायला लागले तर काय काळजी घ्यायची ते सांगतो. आजोबा मारायला काही ना काही कारण शोधून काढतील असेही सांगतो.
     
*तिसऱ्या* प्रकरणात ग्रिगोरीला निटसे दिसत नसल्याने त्यांची थट्टामस्करी कशी होत, त्याची खोडी कशी काढली जात याच्या आठवणींचे वर्णन केले आहे. अलेक्सेय आजीबरोबर रहायला लागतो. तिच्याकडून त्याला समजते की त्सिगानोक म्हणजे रस्त्यावर सापडलेले मूल. माणसं आपल्या बाळाला का टाकून देतात असा प्रश्न त्याला बालवयात पडतो. चुलाण्यामागून त्सिगानोक काळी झुरळे पकडून दोर्‍याला बांधून त्यांना घसरगाडीला जुंपायचा. त्याने उंदीर पाळून त्यांना शिकवले होते. तो पत्त्यांच्या व पैशांच्या जादू करुन दाखवित. तो १९ वर्षांचा होता. सणांच्या संध्याकाळी लहानग्या अलेक्सेयला आठवतात. याकोवमामा गिटार घेऊन यायचा. आजी अकुलीना इवानोव्ना फराळ मांडून ठेवायची. गाणी संगीत व्हायचे. आजी नाचायची. नाचता नाचता गाण्यातून गोष्ट सांगायची. ग्रिगोरी अलेक्सेयला सांगतो की त्याच्या मामाने त्याच्या बायकोला मरेपर्यंत मारले म्हणून त्याच्या मनाला शांतता लाभत नाही. कदाचित ती त्याच्यापेक्षा जास्त चांगली होती व त्याला मत्सर वाटत. आजी अलेक्सेयला सांगते की त्सिगानोक बाजारात जातो तेव्हा वस्तू विकत घेण्यापेक्षा चोर्‍या जास्त करतो. पुढे तो क्रूसखाली चिरडला जातो.
     
*चौथ्या* प्रकरणात आजीचे क्रूसचे चिन्ह करत प्रार्थना करणे, ती अलेक्सेयच्या बिछान्याजवळ आली की त्याने गाढ झोपल्याचे सोंग करणे, तिने दुलई खेचल्यावर त्याचे हवेत उंच उडणे, देव, स्वर्ग व देवदूत यांच्याबद्दल सांगणे,मिखाईलमामाचे नताल्यामामीला मारणे, आजोबा कसे दिवसभर बडवायचे ते आजीने सांगणे, मामेबहीण कातेरीनाचे बाहुल्यांशी खेळणे, तिला सैतान दिसणे, आजीचे मेरीमातेचे कवणे म्हणणे, तिचे झुरळाला घाबरणे,त्यांच्या रंगांच्या कारखान्यातील वर्कशॉपला आग लागणे, त्यातून आजी गंधकाम्ल वाचवते, आगीत तुरेदार शिरस्त्राण घातलेला घोडेस्वार व घोडा झेपावणे, घरातला गोंधळ, त्यात नताल्यामामी बाळांत होणे त्यात ती मरणे या आठवणींचे कथन केले आहे.

*पाचव्या* प्रकरणात इस्टेटीची वाटणी, त्यात याकोव शहरात, मिखाईल नदीपलिकडे तर आजोबांनी पोलेवाया रस्त्यावर नवे घर घेणे, मुळाक्षर शिकवायला सुरुवात करणार! इथे भरपूर छड्या आहेत असे आजोबांचे अलेक्सेयला सांगणे, ते घर भाडेकरूंनी गजबजलेले असणे या आठवणींचे कथन केले आहे. आजी सुईण म्हणून काम करायची. घरगुती भांडणांमध्ये मध्यस्थाचे काम करायची, आजारी मुलांवर उपचार करायची, शुभ शकुन मिळावा म्हणून बायका तिच्याकडून मेरी मातेचे स्वप्न तोंडपाठ म्हणायला शिकायच्या. घरगुती बाबतीत ती सल्ला द्यायची. लहानगा अलेक्सेय तिच्या मागे असे. आजी अनाथ म्हणून लहानाची मोठी झालेली. तिच्या आईला नवरा नव्हता आणि ती अपंग होती. आजीची आई भिकारीण बनते.आजी विणकाम शिकते. बावीस वर्षाचे बुलार्कचे मुकादम म्हणून असलेले आजोबा कसे भेटतात ते आजी अलेक्सेयला सांगते. आजोबा एका नव्या कोर्‍या पुस्तकातून अलेक्सेयला अ अननसातला, क कमळातला ल लसणीतला शिकवतात.मूळाक्षरे घोकून घेतात. त्याला ते शब्द स्लाव लिपीशी जुळत नव्हते. अलेक्सेयला पोरे ‘चपट्या’ म्हणायची म्हणजे चपट्या नाकाचा कुत्रा. अलेक्सेय जसजसा अधिक धीट आणि वयाने मोठा होत गेला तसतसा आजोबांच्या नियमांना व आज्ञांना धाब्यावर बसवू लागला. लौकरच तो ‘स्तोत्रांचे पुस्तक’ वाचू लागला.आजोबांना जुन्या काळातील १८१२ पासूनच्या ते १२ वर्षांचे असतानाच्या बालाखनातील आठवणी आठवतात. क्रूर नेपोलियनने फ्रेंचांची केलेली दूर्दशा आठवते.किती सोसलय ते अलेक्सेयला सांगतात. त्यांनी परिकथा सांगितल्या नाही. घडलेल्या गोष्टी सांगितल्या. त्यांना प्रश्न विचारलेले आवडत नसे पण अलेक्सेय हटकून प्रश्न विचारी. त्याच्या वडीलांबद्दल आणि आईबद्दल मात्र ते त्याच्याशी कधीच बोलले नाही.काहीवेळा त्यांच्या संभाषणात आजी सामील होई. एकदा आजी प्रेमळपणे बोलत आजोबाजवळ गेली असताना त्यांनी मागे फिरुन तिच्या तोंडावर गुद्दा मारला होता. त्या किळसवाण्या प्रकाराने लहानग्या अलेक्सेयच्या मनाचा पुरता चोळामोळा झाला. आजी सांगते सहनशीलता सुटली त्यांची, त्यांना दुर्दैव पचवणं जड जातय. आता वय झालय त्यांचं.

हे प्रकाशन आता बंद झाल्याने हे पुस्तक दुर्मीळ झालेले आहे. प्रकरण ६ ते १०, भाग २ मध्ये….

विलास कुडके.

— परीक्षण : विलास कुडके.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Vilas Baburao Sarode,Chh.sambhajinagar, Aurangabad on प्रेरणेचा झरा : अलका भुजबळ
विजय पवार, नासिक on प्रेरणेचा झरा : अलका भुजबळ