Saturday, April 20, 2024
Homeसाहित्यदुर्मीळ पुस्तके : १८

दुर्मीळ पुस्तके : १८

मनाची मुशाफिरी

मनाची मुशाफिरी हा म. ना. अदवंत यांचा चित्रशाळा प्रकाशन, पुणे यांनी १९५६ मध्ये प्रकाशित केलेला दुसरा लघुनिबंधसंग्रह. मनाचे संकल्प हा त्यांचा पहिला लघुनिबंधसंग्रह. मुखपृष्ठावरील चित्र शि. द. फडणीस यांचे आहे. १३४ पृष्ठांच्या या पुस्तकात १४ लघुनिबंध असून किंमत अडीच रुपये एवढी होती. या संग्रहाला वि. स. खांडेकर यांचे दोन शब्द म्हणून प्रस्तावना लाभली आहे.

महादेव नामदेव अदवंत (६/६/१९१४-१६/५/१९९९)हे जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयात संस्कृत व मराठीचे प्राध्यापक होते. त्यांचे पैंजण हे ६ प्रमुख मराठी शाहिरांच्या लावणी वाङमयाची समीक्षेचे पुस्तक भारत सरकारने यु पी एस सीच्या अभ्यासासाठी नेमले होते. त्यांनी नसते उपद्व्याप हा विनोदी कथासंग्रह, निर्वासित ही कादंबरी, मनाचे संकल्प, मनाली हे लघुनिबंध संग्रह, संजीवन हा लघुकथा संग्रह इ. विपुल लेखन केलेले आहेत.

मनाची मुशाफिरी या पहिल्या लघुनिबंधात कंटाळा आला की संध्याकाळी स्टेशनवर जाऊन आगगाडीची मजा पाहत बसणे लेखकाला आवडते. एका कोपऱ्यात त्यांची आवडती जागा आहे. एंजिनच्या सर्व क्रिया ते तेथून न्याहाळतात. उतारुंची धांदल, गार्ड हमालांची धावपळ, फायरमन, एंजिन ड्रायव्हर यांच्या हालचाली इ. पाहण्यात ते रमून जातात. आगगाडीविषयी त्यांना आकर्षण आहे. अद्भुताच्या आवडीत या आकर्षणाचे मूळ आहे. दैनंदिन रुक्षतेतून चाकोरीतून मन बाहेर पडावे म्हणून .. मनाचा कोंडमारा झाला की लेखक स्टेशनवर येतो. तेथे हरपलेले श्रेय गवसते. आगगाडीच्या रुळावरुन मन अज्ञात प्रदेशात जाते. चेहर्‍यावरील भाव निरखणे, कानावर पडणार्‍या संभाषणातून कल्पनेचे इमले रचणे, उतारुंबरोबर मनाने स्वैर संचार करुन येणे, अज्ञात माणसांच्या दु:खात सहभागी होणं,मनानेच अनेक ठिकाणी प्रवास करुन येणे अशा अनेक मनाच्या मुशाफिरी यात वर्णन केल्या आहेत.

खोटी नाणी या दुसऱ्या लघुनिबंधात घरात तरी कशालाहि कडीकुलुपे लावण्याच्या विरुद्ध लेखक आहे. मात्र टेबलाच्या खणाला नेहमी कुलूप असते. एक रुपयापासून तो एक आण्यापर्यंत जवळजवळ २०-२५ खोटी नाण्याची डबी त्यात आहे. ती नाणी त्यांच्या भिडस्तपणाची व व्यवहारशून्य स्वभावाची साक्षीदार आहेत. फार भोळा ही कीर्ति अधिक पसरु नये अशी त्यांची इच्छा आहे. व्यवहारी जगात शठाला महाशठ झाले पाहिजे असे ती नाणी सांगतात. ती लेखकाच्या गळ्यात मारली गेली. मोड घेताना ते मोजून घेत नाही.आलेली खोटी नाणी परत करत नाही आणि पुन्हा ती बाजारात चालवायचा प्रयत्न करत नाही. त्यासाठी लागणारे बेडर धैर्य नसल्याचे ते कबूल करतात. अस्सल म्हणून नक्कल खपवण्याची प्रवृत्ती यानिमित्ताने लेखकाने नमूद केली आहे.

मुखवटे या तिसऱ्या लघुनिबंधात आपल्याला अनेकदा अभिनयकुशल नटाची भूमिका करावी लागते. मुखवटे चढवावे लागतात. अभिनय करावा लागतो. स्वतः हास्यास्पद बनण्याचे प्रकार जेव्हा माणसावर येतात तेव्हा त्याला मुखवटे चढवावे लागतात. अनेक उदाहरणे व प्रसंग लेखकाने यात वर्णन केले आहेत. संकटाच्या किंवा आत्यंतिक दु:खाच्या प्रसंगी मात्र खोटे मुखवटे चढवणे कठीण जाते. धूर्त व लबाड माणसाच्या चेहर्‍यावरील निष्पाप, सौजन्याचे मुखवटे धोकादायक ठरतात. असे अनेक उदाहरणे यात दिलेली आहे.

महिनाअखेर या चौथ्या लघुनिबंधात महिनाअखेरची तारीख लेखकाला आवडते. कारण त्यानंतर महिन्याच्या पगाराने आपण श्रीमंत होतो. एक तारखेला मात्र आपल्याकडून पैसे वाटप सुरु होते. महिना अखेरची तारीख म्हणजे अत्यंत ओढाताणीचा दिवस. पण हा दिवस आशा निर्माण करतो. या दिवशी आपण स्वप्नसृष्टी उभारतो. आपल्या जीवनात अत्यावश्यक काय आहे व अनावश्यक काय आहे याची शिकवण हा दिवस देत असतो. महिना अखेरीस सर्व कुटुंब नि:स्वार्थी भावनेने परस्परांजवळ येतात.

विघ्नसंतोषी माणसे या पाचव्या लघुनिबंधात एखाद्या माणसाला दुर्दैवाचे तडाखे सारखे सहन करावे लागले तर साहजिक तो जगावर चिडतो आणि दुसर्‍याचा उत्कर्ष त्याला पाहवत नाही. अशा विघ्नसंतोषी लोकांना कारण नसतांना व आपला बिलकूल फायदा नसताना दुसर्‍याच्या कार्यात विघ्ने आणण्यांत मोठा विलक्षण आनंद वाटत असतो. निनावी पत्रे, कान भरविणे, खोडसाळ प्रचार करणे, निंदा करणे अशा कितीतरी मार्गाने ते आपले विघ्नसंतोषी कार्य साधतात. याची अनेक उदाहरणे यात दिली आहेत.

अज्ञाताची ओढ या सहाव्या लघुनिबंधात भविष्याचे, राशिभविष्याचे वेड सर्वत्र पसरले आहे. भविष्यकाळ हा निसर्गाने टाकलेला अज्ञाताचा पडदा आहे. माणूस आशेवर जगतो. शब्दकोड्याकडे आकर्षिला जातो. आपल्या जीवनातील घटना आपल्याला आधीच माहिती झाल्या तर आनंद वाटणार नाही. पण माणसाची अज्ञाताची ओढ मात्र कमी होत नाही.

प्रामाणिक मते या सातव्या लघुनिबंधात एखादी गोष्ट आपल्या हातून चुकली तर त्याचं आपण समर्थन करतो. त्याचं भोवतालच्या परिचितांनीही समर्थन केलं तर आपल्याला बरे वाटते. आपल्या विरुद्ध मत व्यक्त करणारा व आपल्याला विरोध करणारा आपल्या मते मूर्ख असतो. प्रामाणिक मत म्हणजे आपल्याला हवं असलेलं मत अशी आपली समजूत असते. प्रामाणिक मत देण्याच्या भानगडीत फारसं कुणी पडत नाही. प्रामाणिक मताच्या नावाखाली आपली खुशामत हवी असते.

घड्याळाचे दास या आठव्या लघुनिबंधात ठराविक कार्यक्रम ठराविक वेळी किल्ली दिलेल्या घड्याळाप्रमाणे ठराविक वर्तुळात पार पाडायचा. काही नावीन्य नाही. अशा नीरस आणि रुक्ष जीवनाचा वीट येईल. झापड लावून ठेवायचे. आजूबाजूला दिसणारे सृष्टीसौंदर्य, गमती दृष्टीआड करायच्या हे किती कंटाळवाणे ते नमूद केले आहे.नियमितपणा असावा पण त्याच्या जोडीला अनियमितपणाही असावा.

सुख पर्वताएवढे या नवव्या लघुनिबंधात सुख पाहतां जवापाडे |दु:ख पर्वताएवढे |ही संत तुकाराम यांची ओळ लेखकाला खटकते. दु:ख अनुभविल्यानंतर आलेल्या सुखाचा आनंद एरवी येणाऱ्या सुखापेक्षा किती तरी पटीने अधिक असतो. दु:खाचा पर्वत चढल्याचा आनंद व अभिमान काय कमी सौख्य देतो. दु:खाच्या पर्वतशिखरावर जगाचा व्यापक अनुभव येतो ते सुख जवापाडे कसे म्हणाल. पर्वताएवढे दु:ख अंगावर कोसळले तरी मी ते जवाप्रमाणे मानीन असा विलक्षण आशावाद असणारा मनुष्य स्वतःच्या व इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करतो. दु:ख पर्वताएवढे असेल तर सुख आकाशाएवढे आहे असे चिंतन यात मांडले आहे.

निसर्ग आणि आम्ही या दहाव्या लघुनिबंधात निसर्गाच्या भव्य व प्रचंड आंदोलनात समरस होण्याचा, त्याच्याशी एकरुप होण्याचा आनंद मोठा आहे हे नमूद केले आहे. माणसाच्या मनावर असलेल्या प्रतिष्ठेच्या व व्यावहारिक गोष्टींच्या दडपणामुळे तो निसर्गातील आनंदाला मुकत असतो. आपण पावसात भिजत नाही. सूर्यास्त पहात नाही. कोमल कलिकेचे सौंदर्य आपल्याला उलगडत नाही. निर्झराचे गोड गीत ऐकू येत नाही. निसर्गाच्या भव्यतेचा आणि सौंदर्याचा आपल्याला अगदी अपघाताने प्रत्यय येतो.

अहंकाराची प्रेरणा या अकराव्या लघुनिबंधात माझ्या ठिकाणी अहंकार नाही अशी मनाची समजूत करुन घेताना आपण स्वतःची फसवणूक करुन घेत असतो. लेटरहेडपासून भिंतीवर लावलेल्या फोटोपर्यंत वस्तूवस्तूतून आपल्या अहंकाराचा आविष्कार झालेला असतो. जीवनात प्रत्येक व्यक्ति अहंकाराने नटलेली असते व त्याचा आविष्कार त्याच्या कृतीत वा बोलण्यात सतत होत असतो. दुसऱ्याची निंदा वा कुचेष्टा करुन स्वतःचा मोठेपणा लोकांच्या मनावर बिंबवायचा असे छुपे तंत्रही असते. अहंकार ही महान प्रेरक शक्ति आहे. त्यातूनच मानवाची विलक्षण प्रगती झाली आहे.

माझा छंद दिवाणा या बाराव्या लघुनिबंधात पुस्तकावरील लेखकाचे प्रेम जगावेगळे असल्याचे नमूद केले आहे. पुस्तकांचा कुणी अपमान केला, वेडीवाकडी पुस्तके वापरली, त्यावर डाग पाडून आणली वा त्यांची पाने फाडून आणली तर लेखकाला राग येतो. केवळ स्वतःच्याच नव्हे तर वाचनालयाच्या पुस्तकांच्या बाबतीतही असेच असते.पुस्तकांच्या विश्वांत असले म्हणजे त्यांच्या मनाला विलक्षण दिलासा वाटतो. आपल्या पुस्तकाच्या वेडाबाबत यात अनेक पैलू उलगडून दाखविले आहेत.

स्वत:ची ओळख या लघुनिबंधात परिचय नसताना, पूर्ण माहिती नसताना परिचय करुन देणारे अनेक नमुने यात मांडले आहेत. मनोरंजक परिचय ओळख करुन देणार्‍याच्या अज्ञानावर आधारलेले असले की त्यामुळे करमणूक होते. यथार्थ परिचय करुन देण्याइतकी आपली कुणाची ओळख पटलेली नसते. याबाबत मोठे मजेदार अनुभव यात व्यक्त केले आहेत.

स्वप्नाची दुनिया या चौदाव्या लघुनिबंधात स्वप्नसृष्टीबद्दल विस्तृतपणे वर्णन केले आहे. मनी वसे ते स्वप्नी दिसे ही म्हण त्यांच्या पुष्कळशा स्वप्नांच्या बाबतीत कशी खरी ठरली याची गंमतीदार उदाहरणे दिली आहेत. काही मनी नसते तेही कसे स्वप्नात दिसते त्याचीही उदाहरणे दिली आहेत. स्वप्नसृष्टीतील विविधता, संगती व विसंगती यात मांडली आहे. थोर विभूतींनी ध्येयाची स्वप्ने पाहिलेली असतात व त्यातून ती साकार झालेली असतात. अशी स्वप्ने मानवजातीला उपकारक ठरली. स्वप्नाकरिता स्वप्न पाहण्यातही आनंद आहे. मनुष्य हा स्वप्नांवरच जगतो. त्यातील काही स्वप्ने झोपेत तर काही जागेपणी पडलेली असतात असे सुंदर विचार यात मांडले आहेत.
आजमितीस हे पुस्तक दुर्मीळ झालेले आहे.

विलास कुडके.

— परीक्षण : विलास कुडके
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

7 COMMENTS

  1. छान निबंध, सर्वसामान्यांना आपल्याच वाटतील अशा गोष्टींबद्दल. मलाही वेळ घालवायला एसटी स्टँण्डवर निरुद्देश बसायला आवडते.

  2. खूप छान,दुर्मिळ पुस्तकाची माहिती तीही लेखांद्दल सुंदर शब्दात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Vilas Baburao Sarode,Chh.sambhajinagar, Aurangabad on प्रेरणेचा झरा : अलका भुजबळ
विजय पवार, नासिक on प्रेरणेचा झरा : अलका भुजबळ