Sunday, April 21, 2024
Homeसाहित्यदुर्मीळ पुस्तके : २१

दुर्मीळ पुस्तके : २१

घुमटावरले पारवे

“घुमटावरले पारवे” हा बा. भ. बोरकर यांचा प्रिया प्रकाशन, मुंबई या प्रकाशनाने १९८६ मध्ये प्रकाशित केलेला लघुनिबंध संग्रह ! यात १३६ पृष्ठांमध्ये ३५ लघुनिबंध आहेत.

१. घुमटावरले पारवे या लघुनिबंधात गोव्याच्या निसर्ग लावण्याला तोड नाही, ते समृद्ध आणि संस्कृतिसंपन्न आहे अशी लेखकाची भावना व्यक्त होते. कलाशिक्षणाच्या सोयींचा अभाव असूनही येथील भूमीत प्रत्येक पिढीत थोर थोर कलावंत आणि कारागीर जन्मास आलेले आहेत. गोव्यातील देऊळे, ख्रिस्तमंदिरे यांचा उल्लेख लेखकाने केला आहे. त्यात शिखरांची जागा घुमटांनी घेतली आहे. घुमटावर पारवे घुमायला हवे,त्यांनी खाली उतरुन दाणे टिपावे आणि पुन्हा घुमटावर जाऊन घुमत रहावे असे त्यांना वाटते. त्यांच्या लीलेने मंदिर खर्‍या अर्थाने सजीव झाले असे वाटते. घुमटाची उंची, त्याचा आकाशाचा आकार आणि त्याच्या भोवतीचे पारव्यांचे सामगायन यांचे संतुलन झाल्याचा त्यांना प्रत्यय येतो.

२. तांबडी भाजी या लघुनिबंधात राजगिर्‍याच्या भाजीसारखी दिसणार्‍या पण मुलायम आणि माधुर्य असलेल्या गोव्यातील तांबड्या भाजीच्या आवडीविषयी, तांबड्या भाजीविषयक आख्यायिका, लोकगीत यांचे वर्णन केलेले आहे. कवळ्याच्या शांताईला कांदा घातलेल्या तांबड्या भाजीचा आणि लसूण लावलेल्या नारळाच्या दुधाची कोकमकढीचा नैवेद्य दाखवला जातो. रुक्मिणीला तांबड्या भाजीचे डोहाळे लागले होते अशी आख्यायिका यात सांगितली आहे.

३. कोठिल कोण मी ? या लघुनिबंधात रमण महर्षींचे नरसिंहस्वामींनी लिहिलेले चरित्र वाचताना त्यांनी सांगितलेला आत्मदर्शनाचा मार्ग लेखक वाचतात. ते संतकवी कृष्णंभट बांदकरांचे ‘कोठिल कोण मी न जाणिला हा पत्ता |आजवरी अज्ञाने मिरवली विद्वत्ता..’ हे पद गाऊ लागतात. महर्षींचे तत्वज्ञान व ऋषिकवी बांदकर यांची महती यात वर्णन केली आहे.

४. प्रेम कविता या लघुनिबंधात पत्नीला कोणत्याही विषयावरची कविता चालते पण प्रेम कविता असेल तर ती अवघडून जाते. या वयातही त्यांनी प्रेमकविता लिहावी हे तिला अशिष्ट वाटते. या अनुषंगाने प्रेम कवितेविषयी समाजात बसलेली अढी, रतीच्याच भाषेतील उत्कट भक्ती असे अनेक पैलू उदाहरणातून लेखकाने यात उलगडून दाखविले आहेत.प्रेमकवीच जगाला युद्धाच्या विध्वंसापासून वाचवू शकेल हे बट्रंड रसेल यांचे सुवचन उल्लेखनीय आहे.
५. व्हीनसचा पुतळा या लघुनिबंधात गोवा स्वतंत्र झाल्यावर तेथील समुद्र वेळांवर सुरु झालेल्या हिप्पी स्त्री – पुरुषांच्या वर्दळीनंतर त्यांना नागव्याने वावरु देऊ नये अशी तक्रार घेऊन काही तरुण लेखकाकडे येतात त्या अनुषंगाने नग्नतेवर चिंतन मांडले आहे. संस्कृतीला विकृती जडली आणि जे जे सुंदर आहे, सुखद आहे, चित्त रिझवणारे आहे त्याच्या त्याच्यावर पापाचे शिक्के मारले. परिणाम असा की प्रत्येक नैसर्गिक सुख आपण चोरुन घेऊ लागलो. मुलांना अशा विकृतीत वाढू देणार नाही असे लेखक निर्धार करतात आणि व्हीनसचा पुतळा घेऊन येतात व लेखनाच्या टेबलावर ठेवतात.
६. प्राजक्ताचा सांगात या लघुनिबंधात बोरी हे लेखकाचे गोव्यातील मूळ गाव फुलांचे माहेरघर, तिथली जाई गोव्यात उत्कृष्ट विपुल पिकणारी, तिथल्या चाफ्यांचे विविध प्रकार, विविध फुले यांचे सुंदर वर्णन केले आहे. अबोली आणि रत्न अबोली ही गोव्याची खासीयत, निसर्गाने ठिकठिकाणी करुन ठेवलेली पुष्परचना, फुलत झडत राहणारी बकुळ आणि प्राजक्त, त्यांच्याशी लहानपणापासूनचे सख्य, जिथे जिथे त्यांचे दीर्घ वास्तव्य झाले तिथे तिथे प्राजक्ताचा मिळत गेलेला सांगात अशी हळूवार सुंदर गुंफण यात केलेली आहे. प्राजक्तावर नजर गेल्यावर कविता स्फुरावी अशा त्यांच्या चित्तवृत्ती फुलून येतात.
७ अकल्पित कलाशिल्प या लघुनिबंधात अध्यात्माची अनावर हाक प्रत्येकाला केव्हा ना केव्हा ऐकू येते पण तिने संपूर्णतया झपाटून जाणे सगळ्यांनाच साधते असे नाही, हा विचार मांडला आहे. खवटे त्यांना दत्तगुरुंचे संगमरवरी शिल्पाची कल्पना सांगतात. त्यांना ती कल्पना खवटे यांनी सांगितल्यावर ते शिल्प डोळ्यासमोर उभे राहणे आणि त्यांना दत्तगुरुंवर श्लोक सुचणे ही अनुभूती यात मांडली आहे.
८. कवितेतील साम्यस्थळे या लघुनिबंधात कवितेतील साम्यस्थळांविषयी अनेक उदाहरणे देऊन चिंतन केले आहे. दूधसागर हा कवितासंग्रह १९४७ साली प्रसिद्ध झाला तेव्हा एका टीकाकाराने त्यावर कवि कुलगुरु कालिदासाचा प्रभाव असल्याचे म्हटले होते. तोपर्यंत त्यांनी कालिदास अभ्यासलेला नव्हता.
९-मंदिरभक्ती या लघुनिबंधात गोव्याचे सर्वश्रेष्ठ ऐश्वर्य म्हणजे मंदिरे मग ती देवळे, इगर्जी, दर्गे, मशिदी अशी कोणतीही असो. मंदिरभक्तीने संगीत, कथा, कीर्तन, वादन, सण, उत्सव, सोहळे, नाटके, गावजेवणे यातून सर्व संवेदना पोसल्या आहेत. मंदिरे संस्कृति केंद्रे आहेत.
१० – प्रसादपाकळी या लघुनिबंधात गोव्यातील देउळे ही केवळ पूजास्थाने वा श्रध्दास्थाने नसून ती संस्कृतीची माहेरघरे असतात. आपल्या कला, हरहुन्नर आणि संस्कृतिविशेष यांचा ठेवा या देउळाने जतन करुन ठेवला आहे. कौल लावण्याच्या प्रसाद पाकळ्यांविषयी यात सुंदर विवेचन केले आहे.
११ – आख्यायिकेचा प्रभाव या लघुनिबंधात प्रत्यक्षात कधी न घडलेल्या पण कल्पकतेने घडवलेल्या गोष्टींबद्दल चर्चा केली आहे. रावणाला दहा तोंडे होती ही एक आख्यायिका आहे. आख्यायिका वास्तव सत्याला धरुन नसेल पण त्यापेक्षाही श्रेष्ठतर असलेल्या सत्याचे दर्शन घडवण्याची शक्ती तिच्यात असते. पंडितजींचे कपडे पॅरीसहून धुऊन येत हीही एक आख्यायिका. ही गोष्ट खोटी असल्याचे त्यांनी आत्मचरित्रात लिहिले आहे. सुभेदाराची सून, थोरातांची कमळा याही आख्यायिका. अशा अनेक आख्यायिका देऊन यात चर्चा केली आहे.
१२-कवितेची ‘पेश’ कारी या लघुनिबंधात चांगली कविता लिहिणे ही जशी एक कला आहे तशीच ती चांगली ‘पेश’ करणे कला आहे असे मांडले आहे. भल्या भल्या कवींना आपली कविता नीट पेश करता येत नाही. त्यासाठी नटाचे गुण अंगी असावे लागतात. कविता पेश करण्याचे अनेक उदाहरणे यात वर्णन केले आहेत.
१३-स्वातंत्र्याचे पुण्यस्मरण या लघुनिबंधात स्वातंत्र्य मिळाले पण राष्ट्रीय कर्तव्याची जागृती का नाही असा लेखकाला प्रश्न पडतो. स्वातंत्र्याची झालेली परवड यात मांडली आहे. दप्तर दिरंगाई, गंगाजळीची उधळपट्टी, लाचलुचपत, भ्रष्टाचार, मतांचे राजकारण इ. ने ते व्यथित होतात.
१४ – माझे धुम्रपान या लघुनिबंधात लेखन अखंडित चालायला, कल्पनेच्या आकाशात अविक्षेप विहार करायला सिगरेटची विशेष मदत होते या प्रचितीविषयी, तिच्या आवडीविषयी लिहिले आहे. तिच्याशी जुळलेले सूत, अनेक निमित्ताने तिच्या आहारी जाणे, लग्न झाले तरी तिच सहचरी बनने, तिचे व्यसन सोडण्याचे प्रयोग यांचे वर्णन केले आहे.
१५-शेरे आणि ताशेरे या लघुनिबंधात दुसर्‍यावर शेरे – ताशेरे झाडणे आणि त्याची वर्मे कर्मे किसून चवीने सांगणे ही प्रवृत्ती मनुष्यमात्रात सर्वत्र आढळून येते या विषयी लिहिले आहे. अनुमानाहून सत्य किती निराळे असते याची अनेक उदाहरणे दिली आहेत. दुसऱ्याचे पतन आपल्या संतोषाची बाब मानण्यात आणि त्याची चविष्टपणे चर्चा करण्यात आपण आपलाच अध:पात घडवून आणत असतो असा विचार यात मांडला आहे.
१६ – आपला हात जगन्नाथ या लघुनिबंधात कोंदिलॅक या शिक्षण शास्त्रज्ञाचा विचार की माणूस विचार करु शकला, त्याची बुध्दी विकसित होऊ शकली ती त्याला लाभलेल्या हातामुळे हा मांडला आहे. माणसाच्या हाताचे अपार कौशल्य आणि सामर्थ्य, आपली संस्कृती हाताने उभी केली आहे. आपला हात जगन्नाथ ही प्रचीती यात घडवली आहे.
१७-माझे नाव या लघुनिबंधात आपल्याला नाव परेच्छेने मिळते. त्यांना ठेवण्यात आलेले नाव बाळकृष्ण. पण ते पाळण्यातच राहिले आणि सगळे त्यांना ‘बाकी’ या नावानेच ओळखू लागले. ‘बाकी’ या नावामागचा मनोरंजक इतिहास त्यांनी यात सांगितला आहे. त्यांची आत्या त्यांना ‘बाकीट’ म्हणायची. हळूहळू ट गळाला आणि ते बाकीबाब म्हणून ओळखले जाऊ लागले. नावाविषयी अनेक प्रसंग उदाहरणे यात वर्णन केली आहेत.
१८-व्यवहाराचा वस्तुपाठ या लघुनिबंधात ज्याला या जगात सुखाने जगायचे असेल व जीवनकलहात टिकायचे असेल त्याला व्यवहार कळावाच लागतो असे नमूद केले आहे. माणसांशी, जीवमात्रांशी, सृष्टीशी आणि परिस्थितीशी यशस्वी रीतीने मुकाबला करण्याचे कसब म्हणजे व्यवहार. याबाबत अनेक किस्से व उदाहरणे यात दिली आहेत.
१९-संधी उदंड जीवनोत्साहासारखा वर नाही आणि त्याच्या अभावासारखा शाप नाही. पुरुषार्थाला संधी मिळत नाही अशी रड ऐकू येते पण अनेक किस्से व उदाहरणे याद्वारे त्यांनी संधी विषयी रंजक वर्णन केले आहे.
२० – विठूचा स्वातंत्र्य – दिन या लघुनिबंधात शेजारी नारायणराव स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर पिंजर्‍यातील ‘विठू’ नावाच्या पोपटाला सोडून देतात त्याबद्दल ललित चिंतन मांडले आहे. त्यांना मोझार्तची आठवण होते. या विख्यात संगीत संयोजकाला पक्ष्यांचे पिंजरे विकत घेऊन त्यातील पक्ष्यांना अवकाशात सोडून देण्याचा नाद होता. लोक त्याला वेडात काढत कारण तीच पाखरे फासेपारधींना सोपेपणी सापडत आणि ते त्यालाच ती पुन्हा विकीत.
२१-सुके घालावे आम्हांसी गोवेकरांच्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ पक्वान्न म्हणजे मासळी. तिच्यावेगळे जेवण अगदीच शिवराक! सरस्वतीच्या काठांवरच्या सारस्वतांनी तिच्या पोटातली सर्व मासोळी खाऊन संपवल्यामुळे सरस्वती नदी गुप्त झाली असावी असे त्यांना वाटते. यात गोवेकरांची मासळीभक्ती वर्णन केली आहे.’ तुका म्हणे गर्भवासी |सुके घालावे आम्हांसी||यातील’ सुके’म्हणजे मासळी अशी त्यांनी कोटी केली आहे.
२२ – आरशाचा तुकडा शाळेसमोरील पटांगणात एका चिमुकल्या माकडाच्या हातात आरशाचा तुकडा असतो. त्याच्या माकडचेष्टा पाहून यात ललित चिंतन मांडले आहे.
२३-नावाची पाटी लेखकाच्या वाढदिवसाला त्यांची मुलगी दुर्गा त्यांच्या नावाची दुधीया वर्णाच्या अक्षरांची नयन मनोहर शिसवी लाकडाची पाटी भेट म्हणून आणते. ती पाहून त्यांच्या वृत्ती खुलून येतात. त्यांच्या प्रसिध्दिपराङमुखतेवर तो उतारा हवा असे तिला वाटते. या निमित्ताने आत्मस्तुती, अहंकाराचे षोडशोपचार पूजन याविषयी चिंतन केले आहे.
२४-अश्रूंचे वरदान यात लेखकाने त्यांच्या आयुष्यातील रडण्याच्या प्रसंगांच्या आठवणी वर्णन केल्या आहेत. रडण्याची शक्ती ही ईश्वराचे वरदान आहे असे ते मानतात. माणसाला जन्म लाभतो तो शापामुळे हे जर खरे असेल तर त्याला लाभलेले अश्रू हा त्याचा उ:शाप आहे असे त्यांना वाटते.
खुषीव्रत रामनवमी आणि कार्तिक-पौर्णिमा हे गावच्या नवदुर्गेचे २ महत्त्वाचे महोत्सव. गावाच्या जीवनात प्रसंगोपात एकादी गरज उद्भवली आणि ती भागवायला एकादा गावकर पुढे झाला तर त्याने ही जबाबदारी कायमची स्वीकारली. त्याने हे खुषीने घेतलेले व्रत मानले जाते. याविषयी यात विचार मांडले आहेत.
२६-जीवनाचा शिलालेख खिस्ती स्मशानभूमीतील शिलालेखांवर यात चिंतन मांडले आहे. आपल्या जीवनाचा सार्थ शिलालेख कोणता असू शकेल याविषयी ते विचार करतात. ‘या माणसाने आयुष्यभर फक्त प्रेमच केले’ हा शिलालेख असावा असे त्यांना वाटते.
२७-माझी जीवनगाथा यात आत्मचरित्र लिहिण्याविषयी चिंतन मांडले आहे. कवीची आत्मकथा त्याच्या कवितेतच असते. पण कवितेत आले नाही ते गद्यात लिहिले पाहिजे असे आचार्य काकासाहेब त्यांना सांगतात. त्यानुसार ते आत्मवृत्त लिहायला बसतात.
२८-माणुसकीचे ऐश्वर्य आत्मवत् सर्व भूतानि हे सूत्र माणुसकीची मेख आहे. माणुसकीचे दर्शन कसे कसे घडते आणि माणुसकी नाही याचेही कसे दर्शन घडते याबाबत यात चिंतन केले आहे. मोठ्यांचा छोटेपणा पाहून ते व्यथित होतात आणि छोट्यांचा मोठेपणा पाहून त्यांना दिलासा वाटतो.
२९ – शोधा म्हणजे सापडेल आपल्या ठिकाणची बुध्दी कितीही अल्प असो, तिने जर एखाद्या प्रश्नाचा वा विषयाचा ध्यास घेतला तर त्याचे उत्तर वा मर्मे हाती लागायला फारसा विलंब लागत नाही. शोधा म्हणजे सापडेल याबाबत उदाहरणे देऊन विवेचन केले आहे.
३० – जीवनाच्या उतारावर आयुष्याची चढण चढताना एकमेकांना हात देण्यात थोडी हयगय झाली तर चालू शकते ;पण उतार ओलांडतांना एकमेकांना हात दिल्याशिवाय प्रवास सुखाचा होऊ शकत नाही हा विचार यात मांडला आहे.
३१-शैशवास जपणे वार्धक्य ही एक मनोवृत्ती आहे. तिचा वयाशी संबंध नाही. ऐन तारुण्यात लोक म्हातारे होतात. ऐंशी वर्षांचे तरुण दिसतात. कवीला स्वतःचे वयच नसते. या अनुषंगाने यात चिंतन केले आहे.
३२-ज्ञाताच्या कुंपणावरुन केशवसुतांच्या झपूर्झा कवितेत हा शब्दप्रयोग आला आहे. ज्ञाताच्या कुंपणावरुन प्रतिभा अज्ञातात उड्डाण घेते. हे उड्डाण ज्ञातातून अज्ञातातले नाही तर ज्ञातातून अज्ञेयाकडे आहे. याबाबत यात चिंतन केले आहे.
३३-अनासक्त कुतूहल वाढदिवसाच्या शुभेच्छांमध्ये ‘जन्ममृत्युजरातिग:’ या विष्णूनामाच्या उल्लेखाने चिंतन मांडले आहे.
३४-दूरदर्शन एशियाडच्या निमित्ताने टी. व्ही सेट्सची खरेदी गोव्यात जोरात सुरु झाली. घरात टी. व्ही आला की लेखन – वाचनाचे खोबरे होईल. किती अडचण होईल. पण त्यांची मुलाखत दूरदर्शनवर दाखवणार म्हटल्यावर घरात टी. व्ही येतो.
३५-झडलेला मोहोर नवे नवे साहित्य – संकल्प करण्याची लेखकाला संवय आहे. अपुऱ्या साहित्य – संकल्पांच्या कितीतरी वह्या कपाटाच्या अडगळीत गोळा झाल्या. त्यातील एकीचा तर्जुमा त्यांनी यात मराठीत केला आहे.

विलास कुडके.

— परीक्षण : विलास कुडके
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments