कथाशिल्प
गो. ए. प्रकाशन, पुणे मार्फत पूर्वी इयत्ता नववीकरिता स्थूल वाचनासाठी ‘कथाशिल्प’ नावाने प्रातिनिधिक कथासंग्रह १९७३ मध्ये प्रकाशित केला होता. रु २.५० किंमतीचा हा कथासंग्रह दुर्लभ आहे. कवी कुसुमाग्रज, मो. अ. उपाध्ये आणि सु. के. पाटील यांनी हा कथासंग्रह संपादित केला आहे.
कथावाङमयाच्या या स्थूल अभ्यासाच्या कथामालेत प्रातिनिधिक अशा नऊ कथांची निवड करण्यात आलेली आहे.
माहेर ही पहिली कथा अरविंद गोखले यांची आहे.सायलीची वेल हे या कथेतील एक सजीव पात्र आहे. वेलीला माणसांसारख्या भावना आहेत. कथेला माहेर हे नाव दिले आहे ते वहिनींनी माहेरची आठवण म्हणून मागील दारी वेल लावला म्हणून. वहिनींनी संसारात पुढील दाराने प्रवेश केला आणि वेल मागील दाराने आत आली. विरंगुळा, माहेरची आठवण आणि फुलांची हौस म्हणून ती वहिनींनी वाढवली. वेलीचा व वहिनींचा संसार एकाच वेळी सुरु झालेला आहे. वहिनींच्या संसाराशी वेल एकरुप झाली आहे. अतिशय सुंदर कथा आहे.
संस्कार ही दुसरी कथा वामन चोरघडे यांची आहे.कथेला संस्कार असे नाव दिले आहे. प्रायमरी मराठी शाळेत ते जात होते. ते मराठी दुसरीत होते तर सलमा उर्दू दुसरीत होती. खेड्यातील मुलगी. अनवर अब्बांचा पानमळा होता. ते उन्हात गोट्या खेळत. सलमा पडवीच्या खांबाला टेकून त्यांचा खेळ पाहत असे. एकदा गोट्या खेळताना त्याची गोळी चुकली. पोरे हसतात तसे सलमालाही हसू आल्यासारखे त्याला भासते. तिच्याबद्दल अढी बसते. तो तिला सकाळी शिव्या देतो. चिडवतो. पण ती त्याला दुपारी बोलावते. त्याने अभद्र बोलायला नको होते असे ती त्याला सांगते. ते तिला आवडलेले नव्हते. कारण तो तिला सुंदर वाटत होता.वाईट वागलं म्हणजे आपलं मन वाकडं होतं आणि मग चेहराही वाईट होतो असा संस्कार ती त्याच्यावर करते. खेड्यातील संस्कार फार होऊ नये म्हणून त्याला शहरात पाठवण्यात येते पण नव्या शाळेतील पडवीचे खांब त्याला राक्षसासारखे निर्लज्ज, विरुप वाटतो. त्याला सलमाची नेहमी आठवण येत राहते.या कथेला साजेसे चित्र यात आहे.
बदला ही तिसरी कथा पु. भा. भावे यांची आहे. जळत्या सूडाच्या तात्कालिक इच्छेवर मात करुन माणसाच्या मनातील शाश्वत मानवता कशी जागृत होते याचे अतिशय हृदयस्पर्शी चित्र त्यांनी या कथेत रेखाटले आहे.देशाची वाटणी झाल्यावर पोरसवदा नारायणावर दंग्याचा घाला पडतो व त्यात त्याचा बळी जातो. पोटच्या पोराला मूठमाती देण्याची शिक्षा संतू जगतापला होते. रक्ताचे अर्ध्य नारायणाच्या आत्म्याला देण्याचा तो निर्धार करतो. रक्ताचा बदला तो रक्ताने घेणार होता. तो सुरा घेऊन भक्ष्य शोधायला निघतो. चौपाटीवर त्याला एक सोळा सतरा वर्षाचे अचपळ पोर उड्या मारताना व हसताना दिसते. भरतीच्या लाटा घोंगवतात. संतू त्याला धरायला जातो तेवढ्यात एक प्रचंड लाट सोसाटत येते आणि ते पोरगे खाली फेसाळत्या समुद्रात कोसळते. त्याला मारायला निघालेला संतू ‘नाही मरु देणार पोरा’ म्हणून त्याच्या पाठोपाठ समुहात उडी मारुन त्याला वाचवतो आणि त्याला छातीशी कवटाळून ढसढसा रडत हंबरडा फोडून म्हणतो ‘माझ्या नारायणा !’
मी लग्नाला जातो ही चौथी कथा डॉ अ. वा. वर्टी यांची आहे. मुंबईमध्ये जवाहिर्याच्या दुकानातून ते त्यांची पत्नी सुलूसाठी मोत्याची माळ खरेदी करतात. आपल्या खरेदीबाबत ते विचारांच्या तंद्रीत असतांनाच त्यांच्या दंडाला धरुन कोणीतरी एका सार्वजनिक हाॅलच्या दिशेने ओढून नेतो.तिथे कुणाचे तरी लग्न असते. ‘केव्हा आलात नाशिकहून?’ असे त्यांच्या दंडाला धरुन घेऊन जाणार्या गृहस्थाने भाऊकाकांनी डाॅक्टरांना विचारतात. डाॅक्टर नाशिकहून अगत्याने लग्नाला आल्याचा भाऊकाका आणि मंडळींचा समज होतो. ते त्यांना मानाने पहिल्या रांगेत बसवतात. तेथे लग्नात आलेल्या एका जवाहर्याला ते खरेदी केलेली मोत्याची माळ दाखवतात. ते मोती खरे नसतात. कल्चर असतात. त्यांना जेवणाचा राहण्याचा आग्रह होतो. ते वधुवराला आशीर्वाद देतात. कोणी काय भेटवस्तू दिली ते भाऊकाका त्यांना दाखवतात. डॉक्टर शेवटी नमस्कार करुन निघतात.त्यांना परत नमस्कार करण्याचेही कोणी सौजन्य दाखवत नाही. मागे फिरुन पाहतात तो सगळे जणू त्यांच्याकडे रागाने पाहत असल्याचा त्यांना भास होतो. लोकांच्या या विचित्र वागणुकीबद्दल कोडे त्यांना उलगडत नाही. त्यांचे आदरातिथ्य कोणत्या हेतूने करण्यात येत होते हे डाॅक्टरांना कळले नव्हते.
ज्ञान मेले पण जग वाचले ही पाचवी कथा भालबा केळकर यांची आहे.वस्तुविज्ञानशालेतील शास्त्रज्ञ श्री ख. रा. दुर्विचारे यांनी खाजगी रित्या संशोधन करुन एक यंत्र तयार केलेले असते. त्याच्या योगाने कोणत्याही सजीव वस्तूचे विभाजन होऊन क्षणार्धात ती अणुरुपात विलीन होते. शेतकी कार्यालय प्रमुख के. रामराव हे प्रा.व्यवहारे या तज्ज्ञाचा सल्ला घेण्यासाठी पत्र देऊन कार्यालयातील एकाला पाठवतात. ते दोघे ते यंत्र तपासायला श्री दुर्विचारे यांच्या प्रयोगशाळेत जातात.दोघे बरोबर खिशात पिस्तुल ठेवतात. श्री व्यवहारे यांच्या बरोबर आलेल्याला ते त्या यंत्राच्या खुर्चीत बसायला सांगतात. दांडा फिरवल्याबरोबर तो गायब होतो व त्याला पुन्हा प्रकट केले जाते. मग व्यवहारे बसतात. दांडा फिरवल्यावर ते गायब होतात पण श्री दुर्विचारे हे त्यांना प्रकट करायला तयार होत नाही. त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवल्यावर ते श्री व्यवहारे यांना प्रकट करतात. मग ते श्री दुर्विचारे यांना यंत्राच्या खुर्चीत बसायला सांगतात. ते गायब होताच श्री व्यवहारे पिस्तुल झाडून ते यंत्रच नष्ट करतात. अशा रितीने ज्ञान मरते पण जग वाचते.या कथेला साजेसे चित्र यात आहे.
विटीदांडू ही सहावी कथा प्रेमचंद यांची आहे. गुल्ली-दंडा या कथेचा अनुवाद श्री र. वि. सोमण यांनी केला आहे.या कथेत इंजिनियर झालेल्या अधिकार्याला सर्व खेळात विटी-दांडूच अधिक आवडत असतो. बालपणाच्या मधुर स्मृतीत विटी-दांडूची स्मृतीच अधिक गोड वाटते. त्यांच्या संवगड्यात गया नावाचा एक मुलगा होता. त्यांच्यापेक्षा २-३ वर्षांनी मोठा. त्यांच्या विटी-दांडू क्लबचा चॅम्पियन. एक दिवस ते दोघे खेळत असताना गयाने त्यांच्यावर डाव आणला होता. त्याच सुमारास वडिलांची बदली झाली. वीस वर्षे उलटली. त्याला एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची जागा मिळाली.योगायोगाने त्याच जिल्ह्याच्या दौऱ्यावर जातो. गयाची चौकशी करतो. तो डिप्टीसाहेबांच्या घोडागाडीवर असतो. इंजिनिअर त्याला विटी-दांडू खेळायला तयार करतो. ते खेळतात. पण लहानपणी जसे ते सारख्या पातळीवर होते, त्यांच्यात भेद नव्हता तसे त्यावेळी नव्हते. तो खोटं खेळत होता व त्यांचं मन राखत होता. पद मिळाल्यामुळे त्यांना तो आपला जोड समजत नाही.
मोहोर ही सातवी कथा लक्ष्मणराव सरदेसाई यांची आहे. या कथेला आंतरराष्ट्रीय लघुकथास्पर्धेत पहिले बक्षीस मिळाले होते. वेगळ्या परिस्थितीत असलेल्या पण मनाने अत्यंत थोर असलेल्या दोन व्यक्तींचे स्वभावचित्र रेखाटले आहे. लक्ष्मीबाईंचा आग्रह म्हणून नारायणराव देशप्रभू त्यांची अवघ्या १२ वर्षांची मुलगी तुळशीच्या सोयरिकीसाठी पुरुषोत्तमबाबा केंकरे यांच्याकडे जायला निघताना कनवटीला त्यांच्या पिढीजात घराण्याचा पवित्र वारसा असलेली मोहोर बांधून जातात. त्यांच्या वडीलांनी ती अंतकाली त्यांना आपल्या शेजारी बसवून त्यांच्या हातावर ती मोहोर ठेवत म्हटले होते, “ही आपल्या घराण्याची लक्ष्मी आहे. केवढीही आपत्ती ओढवली तरी हातची जाऊ देऊ नकोस. सत्कार्याला निघताना ही कनवटीला लाव, हरवू नकोस. पुरुषोत्तमबाबा म्हणजे मोठे प्रस्थ होते. नारायणरावांचा मात्र पडता काळ होता. पुरुषोत्तमबाबा संपत्तीपेक्षा माणुसकीचे जतन करणारे होते. ते आदल्या दिवशीच मंगेश संस्थानाला निघून गेलेले होते. त्यांचा अविवाहित धाकटा मुलगा विष्णू त्यांच्याबरोबर गेला होता. थोरला मुलगा पणजीला गेला होता. तरीपण नारायणरावांचे वाड्यावर यथोचित स्वागत होते. पाहुण्यांसाठी एक स्वतंत्र दिवाणखाना होता. तेथे त्यांची उठण्याबसण्याची व्यवस्था करण्यात आली. ते वामकुक्षी घेत होते तेव्हा तिथे घरातील दहाबारा मुले खेळांत दंग होती तोच त्यांच्या घोळक्यात गोंधळ उडाला. पुरुषोत्तमबाबांच्या नातवाच्या हातातील मोहोर खेळता खेळता अदृश्य झाली होती. मोहरेचा तपास सुरु होतो. कारभार्यांच्या शंकेखोर नजरा नारायणरावांच्या आसपास कुजबुजू लागतात. दिवाणखान्यातील घोळका कमी झाल्यावर ते आपल्या कनवटीची मोहर काढून जिथे मुले खेळत होती त्या कोपर्यात केरसुणीखाली ठेवून आपल्या आगमनाचे प्रयोजन न सांगता कुत्सित नजरांचा स्वीकार करत वाड्याचा निरोप घेतात. दोन दिवसांनी पुरुषोत्तमबाबा घरी परततात. हरवलेली मोहोर दुसर्याच दिवशी सापडली ते त्यांच्या कानावर जाते. नारायणराव काही निरोप न ठेवता निघून गेले याची त्यांना चुटपुट लागते. ते त्यांना पत्र लिहायला बसतात तो वाळूने भरलेल्या चिनी मातीच्या दौतीवजा भांड्यात चिमूट घालतात. त्यांच्या बोटांना मोहोर लागते. मग कोपर्यात गवसलेली मोहोर कोठून आली असा प्रश्न त्यांना पडतो आणि मग त्यांना लख्ख उलगडा होतो. ते ती मोहर घेऊन नारायणरावांना भेटायला पालखीतून जातात. ते मोहर नारायणरावांच्या सुपूर्द करतात आणि आपल्या विष्णूसाठी त्यांच्या तुळशीला मागणी घालतात अशी ही कथा आहे.

धुळा ही आठवी कथा शंकर पाटील यांची आहे. खेडेगावातील एका सेवकांचे हे मजेदार पण तितकेच हृदयस्पर्शी चित्र आहे. धुळा नावाचा त्यांचा एक गडी होता. म्हटल्यास खुळा, म्हटल्यास शहाणा. घरातला बाजारहाट सगळा तोच करी. तो व्याप सांभाळताना तो अनेक गंमती करी. भाजी आणायला सांगितले तर भाजी विकणार्या बाईलाच तो घेऊन येई. डोकं इतकं तल्लख की एका कामात दोन कामे उरकून येई. साखर आणायला गेला की न सांगता चहाही घेऊन येई. लेखकाला धुळाचा लळा लागलेला होता. त्याच्या खांद्यावर बसून ते शाळेत जात.या कथेत त्याच्या स्वभावाचे दर्शन होईल असे तीन प्रसंग लेखकाने वर्णन केले आहे. पहिला प्रसंग म्हणजे लेखकाला ते दूध प्यायची वेळ झाली म्हणून शाळेतून त्या दिवशी शाळा तपासणी सुरु असताना डेप्युटी नापस करतील म्हणून आधी मामलेदारांच्या कचेरीत व नंतर घरी घेऊन जातात. परीक्षेपेक्षा त्याला मालकाचे वेळेवर दूध पिणे महत्त्वाचे वाटते. दुसरा प्रसंग म्हणजे रावसाहेबांना परगावी जायचे असते. ते धुळाला न्हावी आणायला सांगतात. न्हावी शोधायला तो जो जातो ते संध्याकाळीच येतो. येताना न्हाव्यालाही तो नाही नाही म्हणत असतानाही घेऊन येतो. रावसाहेब त्याची वाट पाहून केव्हाच निघून गेलेले असतात. असा तो भाबडा असतो.
तिसरा प्रसंग म्हणजे आईचे संधिवाताने गुडघे धरले होते आणि ती अंथरुणाला खिळून राहिली होती. धुळा मग न सांगता दिवसातून ४ वेळा वैद्याला घेऊन येई. त्यात एक दिवस तो घरातून बेपत्ता होतो. सगळे चिंतातूर होतात. अगदी अनपेक्षितपणे तो तिसऱ्या दिवशी संध्याकाळी डोक्यावर एक पोतं घेऊन परततो. त्या पोत्यात संधिवातावर गुणकारी पाला असतो. सह्याद्रीच्या डोंगरात तहानभूक विसरुन त्याने तो गोळा करुन आणलेला असतो. असा हा धुळा !
सिंधूचा बाप ही नववी कथा आचार्य प्र.के.अत्रे यांची आहे. अतिशयोक्तीवर आधारलेली विनोदी शैलीतील ही कथा आहे. ‘एकच प्याला’ हे नाटक सिंधूची ट्रॅजेडी आहे असे जे लोक समजतात ते बरोबर नाही,खरे सांगायचे म्हणजे ती सिंधूच्या बापाची ट्रॅजेडी आहे असे लेखक सांगतात. एवढा कुबेराला कर्ज देणारा ४ गिरण्यांचा मालक, पण त्याला जावयाकडून शिव्या खाव्या लागतात आणि त्यांची मुलगीही तोंडावर सांगते की “तुमची मुलगी मेली. तुम्ही आपला रस्ता सुधारा “. नाटककाराने सिंधूच्या बापाच्या डोक्यावर उपेक्षेचा भला मोठा सोटा हाणला आहे. एकच प्याला या नाटकातील सिंधूचा बाप म्हणून काम करायला नाटक मंडळींकडे माणूसच नसतो. ऐनवेळी भाऊभटांना सिंधुचा बाप म्हणून उभे केले जाते. त्यात ते सिंधूच्या बापाच्या भूमिकेशी इतके समरस होतात की सुधाकरची पाचावर धारण बसते. सुधाकरला तो बाप सोट्याने झोडून काढतो. गडकरी यांनी सिंधूचा बाप असा रंगवला नव्हता. भाऊभट म्हणतात ते जर खरेच सिंधूचा बाप असता तर त्या सुध्याला सुधा सोडला नसता. लेखकालाही त्यांची भूमिका पटते व सिंधूच्या बापाची ट्रॅजेडी मोठी आहे असे त्यांना वाटू लागते.
तर असे हे स्थूल वाचनासाठी एकेकाळी नेमलेले पुस्तक आज काळाच्या ओघात लुप्तप्राय झाले आहे. मिळणे दुरापास्त झाले आहे. असे पुस्तक आज नजरेस पडले तर काहींना कदाचित नाॅस्टलजिक वाटेल.

— परीक्षण : विलास कुडके
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800