Saturday, April 20, 2024
Homeसाहित्यदुर्मीळ पुस्तके : २५

दुर्मीळ पुस्तके : २५

काकांचे स्वप्न

काॅण्टिनेण्टल प्रकाशनाने सन १९८७ मध्ये My Uncle’s Dreem या दस्त्येवस्की या रशियन लेखकाच्या कादंबरीचा अविनाश बिनीवाले यांनी मराठीत अनुवाद केलेले ‘काकांचे स्वप्न’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकाचे मुखपृष्ठ किशोर यशवंत यांचे असून १५ प्रकरणे व शेवटी लेखकाचा परिचय आहे. या १८२ पृष्ठांच्या पुस्तकाची तेव्हाची किंमत होती तीस रुपये.
प्रकरण पहिले मार्या अलेक्सान्द्रोव्ना मस्कालयेव ही मोर्दासोव् मधली बडी असामी.महागर्विष्ठ. लोक तिचा तिरस्कार करतात पण तिला घाबरुन असतात.मोर्दासोवपासून ४-५ किलोमीटर अंतरावर ग्रामीण भागात तिचा जमीनजुमला आहे. १२० वेठबिगार आहेत. अफनासी मात्वेयिविच हा मार्याचा नवरा.रंगरुपानं चांगला व तत्त्वनिष्ठ. कामात कच्चा आणि मनाने अत्यंत दुबळा. तो सरकारी नोकरीत होता. राजधानीतील एक इन्स्पेक्टर त्याच्यावर चांगलाच उखडला त्यामुळे मार्याच्या नवर्‍याची कामावरुन उचलबांगडी झाली. त्याची रवानगी ती ग्रामीण भागातील जमीनजुमलाच्या ठिकाणी करते. तिथे तो अगदी सुखी समाधानी असतो.
आना निकोलायेव्ना आन्तिपोव ही पब्लिक प्राॅसिक्युटरची बायको. मार्याची कट्टर शत्रू पण वरवर ती तिची मैत्रिण असल्याचे भासवायची.

झिनैदा अफ्नास्येव्ना ही मार्या व अफसानी यांची एकुलती एक मुलगी. अत्यंत लावण्यवती, चांगली, खूप शिकलेली, वय २३ व अविवाहित. दीडएक वर्षापूर्वी जिल्ह्याच्या शाळेतील एका फालतू मास्तराबरोबर तिची काहीतरी भानगड सुरु होती अशी अफवा होती. मार्या मात्र कलंकित करणार्‍या घटनेकडे दुर्लक्ष करते.
झीनाला साजेसं स्थळ म्हणजे एकच ते म्हणजे प्रिन्सचं. पीटर्सबर्गचा मझग्ल्याकोफ् ज्याचा वरचा मजला रिकामा आहे तो तिच्या भोवती पिंगा घालत असतो. तो विलक्षण बडबड्या आहे.
एका भल्या सकाळी प्रिन्स ‘का’ गावात आले आणि मार्याच्या घरी जाऊन उतरले. ते फक्त तीनच दिवस राहिले.

प्रकरण दुसरे प्रिन्स ‘का’ खप्पड नि खंगलेले दिसत. चार हजार वेठबिगार, जमीनजुमला, मानमरातब असलेले त्यांचे घराणे होते. तरुणपणी त्यांची प्रतिमा चांगली होती. पण त्यांनी जवळच्या संपत्तीची वाट लावून टाकली होती व म्हातारपणी तांबडा पैसा शिल्लक राहिला नव्हता. ते मोर्दासोव् मध्ये सहा महिने राहिले व उरले सुरले तेही उधळून टाकले होते. जुगार खेळण्यात, आसपासच्या प्रदेशातील बायाबापड्यांबरोबर भानगडी, कुलंगडी करण्यात त्यांनी वेळ घालवला. प्रसाधनगृहात त्यांचा अर्धा दिवस जाई त्यामुळे ते वेगळेच दिसत. केसांचा विग होता. खोट्या मिशा व खोटे कल्ले होते. गालांना ते लाली व भरपूर पावडर लावत.जुन्या काळात एकदा त्यांनी खिडकीतून उडी मारली होती त्यात त्यांनी एक फासळी गमावली होती. पॅरिसमध्ये असताना डावा पाय कृत्रिम बसवावा लागला होता. उजवा डोळा खोटा व काचेचा होता. दातांची कवळी ते पूर्वीपासूनच वापरायचे.
प्रिन्सची दूरच्या नात्यातील म्हातारीचा कायदेशीर वारस मेला आणि प्रिन्स दुहानोवो गावातील त्या इस्टेटीचे वारसदार ठरले. मालदार झाले. त्यासाठी ते पीटर्सबर्गला निघाले. गावातील सार्‍या बायकांनी मिळून मेजवानी केली. पण पीटर्सबर्गला अपेक्षित काम झालेच नाही. ते तिथून दुहानोवोला परतले ते स्तेपानिदा मात्वेयेव्ना या धिप्पाड, पोक्त बाईसोबत. तिच्याच आज्ञेत ते असायचे. ती प्रिन्सला आंघोळ घालायची. प्रिन्स मार्याकडे उतरले हे समजल्यावर आना निकोलायेव्ना मात्र भलतीच भडकली. कारण प्रिन्स दूरचे का होईना पण तिच्या नात्यातील होते. ती मार्याकडे जाण्याचे ठरवते.

प्रकरण तिसरे मार्याच्या घरी सकाळी १० वाजता चहापाण्याची जय्यत तयारी होते. तिची दूरची नातेवाईक तिशीच्या घरातील विधवा व रंगाने काळीसावळी पण दिसायला सुंदर असलेली नतस्या पेत्रोव्ना झाब्लोक तिच्याकडे राहत होती, ती व्यवस्था पहात होती. तिला दोन मुले होती व ती शाळेच्या वसतीगृहात होती. तिचा नवरा सैन्यात अधिकारी होता. तिथे २५ वर्षांचा बिनडोक तरुण मोझग्ल्याकोफ् आहे. तो झीनावर आशीक झालेला असतो.झीना मात्र त्याच्या बाबतीत मख्खपणे वागते. पावेल अलेक्सांद्रोविच प्रिन्सला घेऊन मार्याच्या घरी आलेला असतो. स्वेतोझेरस्कि मठाच्या रस्त्यावर एक बग्गी घसरुन तिरकी पडते. मोझग्ल्याकोफ् तिथे मदतीला धावतो. त्यात प्रिन्सची भेट होते. तो ओरडतो ‘प्रिन्स! काका!’. अग्ला मिहानोव्ना त्याची आत्या. तिनेच प्रिन्स दुरच्या नात्याने काका असल्याचे सांगितलेले असते. प्रिन्स ४-५ तास प्रसाधनगृहात नट्टापट्टा करुन मग दिवाणखान्यात प्रवेश करतात.

प्रकरण चौथे प्रिन्स म्हणजे ठिकठिकाणी स्प्रिंगा वगैरे लावून चालतं बोलतं केलेलं बुजगावणे होते. ते थोडे लंगडत चालत. एका डोळ्यावर चष्मा जो काचेचाच होता. अंगात जाकिट. अंगावर भरपूर सेंट चोपडलेले. ते जरा बोबडे होते. मार्याला ते आना निकोलायेव्ना समजतात.
पूर्वी त्यांनी एक विनोदी उपहासात्मक संगीतिका लिहिलेली असते. प्रिन्ससाठी एखादी मुलगी पाहून त्यांचं लग्न करुन द्यावे असे पावेल मार्याला सुचवतो. काकांची बायको व्हायला नतस्या सुद्धा योग्य आहे असे त्याला वाटते. प्रिन्स गव्हर्नरकडे जायला निघतात. मार्या त्यांना निरोप देते.

प्रकरण पाचवे मार्या आणि झीना या कुलुपबंद खोलीत बोलत बसलेल्या असतात आणि नतस्या किल्ली लावायच्या भोकातून पहात असते. मार्या झीनाला मोझग्ल्याकोफ् बाबत विचारते. प्रिन्सशी तिचं लग्न करुन तिचं भवितव्य उज्ज्वल करुन घ्यावं असेही ती झीनाला सुचवते पण त्या जख्ख म्हातार्‍याशी लग्न करणे म्हणजे शुध्द मूर्खपणा होईल असे झीना तिला सांगते.मार्या तिला दोन वर्षापूर्वीची गोष्ट सांगते. मित्या हा झीनाचा धाकटा भाऊ. त्याला शिकवायला एक मास्तर यायचा. त्याने झीनाला भुलवलं होतं. त्याच्याशी लग्न करायचं म्हणून झीना आईला म्हणाली होती. एक दिवस तो पोर्‍या झीनाच्काशी भांडला. तिची प्रेमपत्रं गावाला दाखवीन म्हणाला. झीनाने त्याच्या थोबाडीत मारली होती. झीनाचं एक पत्र झाउशिन या गुंडाला तो दाखवतो. ते पत्र नतालिया दिमित्रिव्नाच्या म्हणजे मार्याच्या कट्टर शत्रूच्या हातात पडते. तो मास्तर वीष खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. नतास्याला २०० रुबल देऊन ते पत्र मार्या परत मिळवते व अब्रू वाचवते.पुढे त्या तरुणाला टी. बी. होतो. प्रौढ कुमारिका म्हणून जगण्यापेक्षा तरुण विधवा होणं अधिक चांगले असे आई झीनाला सांगते. प्रिन्सशी तिने लग्न करावे. त्याच्या मृत्यूनंतर तिने खुशाल त्या तरुणाशी लग्न करावं.लग्न नसेल करायचे तर किमान त्याचा टी. बी वर उपचार करुन त्यातून त्याला बरे कर असे नानापरी आई झीनाला समजावून सांगते. त्याच वेळी तिथे कर्नलची बायको सोफिया पेत्रोव्ना येते व मार्याची चौकशी करते. झीना उठते आणि पळत खोलीतून बाहेर पडते.

प्रकरण सहावे सोफया पेत्रोव्ना कार्पुहिन ही कर्नलची बायको. तिची चर्पटपंजरी सारखी चालू असायची. नाही नाही त्या कंड्या पिकवण्यात तिचा हातखंडा होता. ती नवर्‍याशी सारखी भांडायची. तो निवृत्त झालेला होता. तिला सकाळ संध्याकाळ व्होडका लागायची. आना निकोलायेव्ना आंतिपोफ व नतालिया दिमित्रियेव्ना यांनी तिला घराबाहेर काढले होते त्यामुळे त्यांचा ती द्वेष करत होती. प्रिन्स नतालियाकडे असल्याचे ती मार्याला सांगते. मार्याला धक्का बसतो. ती धावत झीनाच्या खोलीत जाते. ती प्रिन्सशी लग्न करायला तयार असल्याचे आईला सांगते. त्या प्रिन्सला लौकरात लौकर सुखरुपपणे घेऊन यायला पाहिजे असे ठरवतात. मार्या त्यासाठी आपली घसरगाडी घेऊन निघते. जबरदस्त इच्छा सक्तीसारखीच असते. तिकडे कर्नलची बायको नतास्या पेत्रोव्नाला मार्याचा बेत सांगते. नतास्या पेत्रोव्ना काय चीज आहे ते मार्याला दाखवण्याचे तीही ठरवते.

प्रकरण सातवे मार्याच्या मार्गातली सगळ्यात मोठी अडचण म्हणजे मोर्दासोफमधल्या बायकांची. उच्चभ्रू बायका मार्याच्या शत्रू होत्या. मार्याने आपल्या २३ वर्षाच्या मुलीचं – झीनाचं लग्न प्रिन्सबरोबर ठरवून टाकले ही बातमी – अफवा प्रत्येकाच्या तोंडी होती. ती बातमी लोकांना त्रासदायक वाटत होती. मार्या प्रचंड उत्साहाने मोर्दासोफच्या रस्त्यांवर फिरत होती. प्रिन्स परत यावा यासाठी ती आकाश पाताळ एक करत होती. तिने प्रिन्सला रस्त्यातच गाठले व आपल्या गाडीत घालून ती त्यांना जेवणासाठी परत घेऊन आली. नतालियाकडे प्रिन्सने आधीच ३ ग्लास शँपेन घेतलेले होते. जेवताना परत घेतली त्यामुळे त्यांची शुध्द हरपली. मार्या मझग्ल्याकोफला कटवते. तो बोरोदुएफला भेटायला निघतो. नतास्या पेत्रोव्ना त्याला झीनाचं लग्न प्रिन्सशी करण्याच्या खटपटी सुरु असल्याचे सांगते. ती त्याला अडगळीच्या खोलीत घेऊन जाते. किल्लीच्या भोकातून ऐकायला लावते.

प्रकरण आठवे नतालियाच्या घरी मजा आली ना प्रिन्स असे मार्या विचारते. जेवण झाल्यावर ती त्यांना दिवाणखान्यात घेऊन जाते. रात्री जेवताना प्रिन्सने ६ ग्लास रिचवले होते त्यामुळे ते लडखडत होते. वटवट चालू होती. हीच सुवर्णसंधी आहे असे मार्याला वाटते. प्रिन्सची नजर झीनावर एकाग्र असते. प्रिन्स नतालियाची स्तुती करतो. पण मार्या तिचा खोटेपणा सांगते. प्रिन्सचा विश्वास बसत नाही. नतालियाबद्दल मार्या एक घटना सांगते. एवढी साखर तिने खाल्ली? याबद्दल प्रिन्सला आश्चर्य वाटते. तिचा बांधेसूदपणा व १४ वर्षांची नाच करणारी सोनिष्का प्रिन्सला आठवते. ती अनाथ असल्याचे मार्या सांगते. प्रिन्स झीनाकडे एकटक बघत असतो. ती मार्याच्या सांगण्यावरुन प्रिन्सकरता गाणे म्हणते. तिला पाहून प्रिन्सला कौन्टेस नाइस्कि जी ३० वर्षापूर्वी मेलेली असते ती आठवते. तिने फ्रेंच खानसाम्याबरोबर लग्न केलेले होते. झीना एक फ्रेंचगीत गाते. प्रिन्स खुळावतो. तिच्यावर त्यांचं प्रेम बसलं असे मार्या त्यांना सांगते. तिच्याशी लग्न व्हावे असे प्रिन्स बोलून दाखवतात. नंतर झोपी जातात. झीना खोलीत एकटीच होती. इतक्यात तिथे दरवाजा उघडून मझग्लाकोफ आत येतो.

प्रकरण नववे मझग्लाकोफने सगळं, सगळं ऐकलं होतं. तू काय आहेस ते आज कळून आलं असे तो झीनाला बोलतो. तिचे डोळे रागाने लाल होतात. ती प्रिन्स काळाबरोबर लग्न करायला निघाली मात्र आपला काहीच अधिकार नाही? असे तो झीनाला विचारतो. तो मूर्ख व विकृत असल्याची तिची खात्री पटली असल्याचे सांगते. ती त्याला निरोप देते. जायला सांगते. मझग्लाकोफ रागाने लालीलाल होतो. त्याचक्षणी मार्या दारापाशी येते. ती त्याचे बोलणे ऐकते. तो प्रिन्सच्या जवळचा माणूस होता. त्याने काही केलं तर घोटाळा होईल असे मार्याला वाटते. ती त्याचे मन वळवायचा प्रयत्न करते. प्रिन्सशी लग्न करुन झीनाला गडगंज संपत्ती मिळेल. प्रिन्स लवकरच मरेल व मग तिला आपल्या प्रियकराशी लग्न करता येईल असे मार्या त्याला पटवून सांगते. त्याला व्यापार्‍याकडे जायला सांगते. मग झीना दरवाजा उघडून आत येते. तिने त्यांचे बोलणे ऐकलेले असते. आता आपण भलतं सलतं करणार नाही. हलकटपणा करणार नाही असे ती आईला बजावून खोलीबाहेर जाते. मार्या मग घाईघाईने घसरगाडीत बसून मोर्दासोफमधल्या बर्फाच्छादित रस्त्यावरुन निघते.

प्रकरण दहावे प्रिन्सला हस्तगत करुन गडप करायचं आणि त्यांना लौकरात लौकर इथून हलवायचं नि आपल्या गावाकडच्या वाड्यावर नेऊन ठेवायचं, अशी विलक्षण कल्पना मार्याच्या डोक्यात चमकून जाते. गावाकडे तिचा काॅन्सिलर नवरा अपनासी एकटाच असतो. तिला शिपायांची भीति वाटत असते. काहीही करुन लग्न उरकून घ्यायचं. थाटमाट, सण-समारंभ वगैरे नंतर करायचे. प्रिन्सना भरपूर दारु पाजायची. त्यांना सारखं नशेत ठेवायचं असे नाना बेत मार्या आखते. विचाराच्या तंद्रीतच ती गावाकडच्या घराच्या फाटकापाशी येते. घरात जाऊन ती नवर्‍याची खरडपट्टी काढते. तो घाबरुन तिला ‘मा – मा – मासाहेब!’ म्हणतो. मार्या संतापते. ती ग्रिश्काला हाक मारुन नवर्‍याला नीट तयार करायला सांगते.प्रिन्स के आपल्याकडे रहायला आले आहेत असे मार्या आपल्या नवर्‍याला सांगते. यजमान ह्या नात्यानं त्यांना गावाकडच्या घरी येऊन राहण्यासाठी आग्रहाचं निमंत्रण करायचं असे मार्या नवर्‍याला सांगते. मार्या नवर्‍याला घेऊन मोर्दासोफ शहरात शिरुन घराबाहेर थांबते. तोच त्यांना समोरुन आना निकोलायेव्ना आन्तिपोकची घसरगाडी येताना दिसते. त्यात नतालिया पण असते. त्या पण मार्याच्या घरासमोर उतरतात.

प्रकरण अकरावे पावेल मझग्ल्याकोफ दार उघडून बाहेर पडला. लाकडी पायर्‍यांवरुन उतरुन तो बर्फावर गेला. एवढ्यात ४ शिकारी कुत्री भुंकत आली. आरडा-ओरडा करुन तो त्यांना हाकलतो. एका कोपर्‍यापाशी येऊन थांबतो तेव्हा त्याच्या लक्षात येते की त्याचा रस्ता चुकला आहे. अर्धा तास भटकल्यावर तो मार्याच्या घरासमोर उभा राहतो. मार्या नवर्‍याला घेऊन बाहेर गेली आहे आणि प्रिन्स वरच्या मजल्यावर आहे हे त्याला कळते. तो तडक ‘प्रिन्स काकांना’ भेटायला जातो. त्याला प्रिन्सच्या केसांच्या टोपाचे रहस्य कळते. त्यांच्या मिशाही कृत्रिम असल्याचे प्रिन्स काका सांगतात. कल्लेसुध्दा खोटे असल्याचे कळते. ती रहस्ये कुठे फोडणार नाही याबद्दल प्रिन्स त्याच्याकडून वचन घेतात. जेवणानंतर तिथे डुलकी घेत असताना प्रिन्सला स्वप्न पडते. त्यांना एक दांडगा भलीमोठी शिंगे असलेला बैल दिसतो. नंतर त्यांना एक पब्लिक प्राॅसिक्युटर दिसतो. त्यालाही शिंगे असतात. तो बहुतेक निकोलाय वासिलिच आन्तिपोफ असणार. मग दिसला नेपोलियन बोनापार्ट. तो एका बेटावर असतो. प्रिन्सची तो बोलून बोलून करमणूक करतो. ते तत्वज्ञानावर गप्पा मारतात. प्रिन्स असे बरळत असतात. एकीला मागणी घातल्याचे सांगतात. ते स्वप्न तर नव्हते ना असे मझग्ल्याकोफ प्रिन्स काकांना विचारतो. लोकांना नातेवाईकांना हे कळले तर ते त्यांना वेड्यात काढतील व स्थानबद्ध करतील अशी भीति तो प्रिन्सला घालतो. त्यांनी खरोखरच लग्नाचं ठरवलं तर काय करायचं? असा प्रश्न प्रिन्सला पडतो. सरळ सांगून टाकायचे की ते स्वप्न होते असा पावेल सल्ला देतो. दोघे सकाळी वेगवेगळे तिथून निघून जायचे ठरवतात.

प्रकरण बारावे मार्या आलेक्सान्द्रोव्नाच्या घरी आना निकोलायेव्ना, प्रास्कोव्या इलियिच्ना, लुइझा कालोव्ना, नतालिया द्मित्र्येव्ना, कातेरीना पेत्रोव्ना सगळ्याजणी जमलेल्या असतात. त्या नाटकाची व्यवस्था पूर्ण करण्याचा विचार करतात. प्रिन्स बहुतेक एखाद्या पडद्याच्या आडोशाला झीनाबरोबर गप्पा मारत बसले असतील असे आनाला वाटत असते. तिथे बायकांची अक्षरशः रीघ लागते. त्यांचे स्वागत करायला मार्या धावाधाव करत होती. तिला तिथे मझग्ल्याकोफ दिसतो. तो तेथिल बायकांना प्रिन्सचा हालहवाल सांगतो. दुसर्‍या दिवशी भल्या सकाळी ते फादर मिखाएलच्या मठात जाणार असल्याचेही सांगतो. मार्यामात्र त्यावेळी अगदी अगतिक होऊन जाते. त्याचवेळी तिथे कर्नलची बायको अतिविक्षिप्त सोफया पेत्रोव्ना येते व मार्याच्या समोर उभी राहते. आख्ख्या गावाला बोलावणं धाडला आणि मलाच तेवढं वगळलं म्हणून ती मार्याला विचारते.ती तिथून निघून जाते. तोच तिथे गोड हसत प्रिन्स येतात.

प्रकरण तेरावे प्रिन्सना बायका गराडा घालतात. मार्या तिच्या नवर्‍याची अपनासी मात्वेयिचची प्रिन्सशी ओळख करुन देते. नवरा बसलाय अडून नि बायको गेल्याय निघून या गाण्यातला सज्जन माणूस तोच का म्हणून प्रिन्स मझग्ल्याकोफला विचारतात. प्रिन्स आपल्याला एक छान स्वप्न पडले होते असे बायकांना सांगतो. फेलिसाता महालोव्ना पैजेवर सांगते की प्रिन्सना ते एका रुपसुंदरीसमोर गुडघ्यावर टेकून प्रियाराधन करताहेत, तिला लग्नाची मागणी घालताहेत. तिचा स्वप्नाबद्दलचा अंदाज खरा असल्याचे प्रिन्स सांगतात. बायका प्रिन्सना लग्न कराच असा आग्रह करतात. मार्या तिथे हस्तक्षेप करीत तिच्या रुपसुंदर कन्या झीना हिला प्रिन्सनी लग्नासाठी मागणी घातल्याची घोषणा करते. ते ऐकून जमलेली प्रत्येक व्यक्ती आश्चर्यचकित होते. प्रिन्सचं अभिनंदन केलं जातं. मार्याने आपलं स्वप्न बरोबर जाणलं असे प्रिन्स बायकांना सांगतात. पण ते स्वप्न नव्हते तर वस्तुस्थिती होती असे मार्या सांगते. झीनाने त्यांना एक पोवाडा म्हणून दाखवला होता याची आठवण करुन देते. ते स्वप्न होते की खरेच तसेच घडले होते याबद्दल प्रिन्सचा ठाम निर्णय होत नाही. यामागे मझग्ल्याकोफ आहे हे मार्याला कळून चुकते. झीनाने त्याला नाकारले म्हणून त्याने असा हलकटपणा केला अशी तिची खात्री पटते. मार्याचा नवरा उलट तिलाच तसे स्वप्न तर नाही ना पडले असे मूर्खपणे विचारतो. त्यावर सगळ्या बायका खिदळतात. त्यात एक व्यक्ती पुढे येते आणि संपूर्ण दृश्य पार बदलून जाते.

प्रकरण चौदावे झिनैदा अफ्नासीयेव्ना विलक्षण संतापते व पुढे येऊन आईसमोर उभी राहते. झालं तेवढे पुरे झाले म्हणते. ही बदनामी सहन होत नसल्याचे सांगते. प्रिन्सची ती माफी मागते. झीनाच्या बोलण्यामुळे प्रिन्सच्या डोळ्यात पाणी येते.तिची इच्छा असेल तर ते तिच्याशी लग्न करीन की म्हणतात.खरं तर ते माझं स्वप्न होते हेही सांगतात. झीना मझग्ल्याकोफवर उखडते. तो कबूल करतो की त्यानेच प्रिन्सच्या गळी उतरवले असते की जे घडले ते स्वप्न होते. तो प्रिन्सला सगळे खरेखरे सांगतो. त्यात बायकांमध्ये जुंपते. त्या गोंधळात प्रिन्स तिथून निघून जातात. सगळे पांगतात. मार्या अलेक्सांद्रोव्ना एकटीच उरते.

प्रकरण पंधरावे दुर्दैवाचा फेरा एकदा का चालू झाला की त्याला अंत नसतो. मार्या अलेक्सांद्रोव्नाची बदनामी पुरेशी नव्हती की म्हणून तिच्या दुर्दैवाने दुसर्‍या दिवशीही तिच्यापुढे आणखी काहीतरी वाढून ठेवलेले होते.सकाळचे १० वाजलेले. एक अगदी गरीब, दु:खी कष्टी म्हातारी अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनीच मार्याच्या घरापाशी येते. ती मार्याला झोपेतून उठवण्यास सांगते. झीना उठून तिच्याजवळ येते. वास्याला बघायला घरी चल कारण त्याची प्रकृति अगदी खराब झाली असे ती म्हातारी झीनाला सांगते. मरण्यापूर्वी एकदा तरी झीनाचं दर्शन घडावे अशी वास्याची इच्छा असते. झीना म्हातारीबरोबर जायला निघते. वास्या जर्जर मरणासन्न अवस्थेत असतो. झीनाने त्याला माफ केलेले असते. ती सारखी हुंदके देते. वास्या तिला आपलं दु:ख बोलून दाखवतो. झीना त्याला सांगते की ती कधीच लग्न करणार नाही. तोच तिचा पहिला नि एकमेव प्रियकर आहे. दरम्यान मार्या तिला पाचपन्नास वेळा घरी निघून येण्यासाठी निरोप पाठवते. मग मार्या स्वतःच तिला परत आणायला जाते. पण तिला एकटीलाच परतावे लागते. रात्रभर झीना वास्याजवळ बसून राहते. वास्याची प्राणज्योत मालवते. झीना तिथून निघते. पुढे मझग्ल्याकोफ तिची वाट पहात उभाच असतो. ती त्याच्याकडे निर्विकारपणे पहाते आणि काहीही न बोलता पुढे निघून जाते. मोर्दासोफमध्ये एका पाठोपाठ एक घटना घडतात. त्यातच एक मोठी वाईट गोष्ट घडते. प्रिन्स अत्यावस्थ होतो. त्याची शुध्द हरपते. नंतर ३ दिवसातच प्रिन्स मरण पावतो. दुसर्‍या दिवशी गावात एक नवा पाहुणा येतो. तो प्रसिद्ध प्रिन्स श्चेपेतिलोफ होता. तो म्हातार्‍या प्रिन्सचा नातेवाईक होता. त्याने सर्व गोष्टी मझग्ल्याकोफकडून आपल्या ताब्यात घेतल्या. मझग्ल्याकोफ तिथून पसार होतो. मार्या व झीना शेतावरच्या वाड्यावर रहायला जातात. नंतर ते व अफ्सानी माॅस्कोला जातात. त्यांचा शेतावरचा वाडा व मोर्दासोफमधलं घर ते विकून टाकतात. लोक त्यांना पार विसरुनही जातात. मार्या दुसर्‍या कुठल्यातरी खेड्यात व जवळच शहरात घरे घेऊन आपले बस्तान बसवते. झीना कुमारीकाच असल्याच्या अफवा होत्या. प्रिन्स काकांच्या मृत्यूनंतर मझग्ल्याकोफ गावातून नाहीसा होतो. गव्हर्नर जनरलच्या बायकोसाठी आयोजित बॅलडान्स पार्टीत तो जातो तर दुसरी तिसरी कोणी नसते तर ती झीना असते. नंतर त्याला मार्याही दिसते. त्या त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. तो तिथून निघतो आणि ही कादंबरी संपते.
म्हातारा प्रिन्सची बुजगावण्याप्रमाणे व्यक्तिरेखा, त्याच्याजवळील संपत्तीमुळे त्याच्या भोवती लोकांचा विशेषतः बायकांचा गराडा, मार्याने आपल्या तरुण मुलीचा झीनाचा त्याच्याशी लग्न करुन देण्याचा प्रयत्न,पण झीनाला लग्नाची मागणी घातली हे स्वप्न होते असे मझग्ल्याकोफने प्रिन्स काकाला सांगणे आणि ते स्वप्न की वस्तुस्थिती याचा प्रिन्सच्या मनात गोंधळ उडणे. शेवटी म्हातार्‍या प्रिन्सचा मृत्यू. अशी एकंदरीत कादंबरी रशियन जीवनाचं एक दर्शन घडवते. अविनाश बिनीवाले यांनी रशियन कादंबरीचा अनुवाद अतिशय सुंदर केला आहे. कुठेही तो अनुवाद आहे असे वाटत नाही. हेही पुस्तक आज दुर्मीळ झालेले आहे.

विलास कुडके.

— परीक्षण : विलास कुडके.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Vilas Baburao Sarode,Chh.sambhajinagar, Aurangabad on प्रेरणेचा झरा : अलका भुजबळ
विजय पवार, नासिक on प्रेरणेचा झरा : अलका भुजबळ