Saturday, April 13, 2024
Homeसाहित्यदुर्मीळ पुस्तके : २६

दुर्मीळ पुस्तके : २६

वेळी – अवेळी

ग. पां. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई यांनी १५/२/१९६३ मध्ये प्रकाशित केलेला “वेळी – अवेळी” हा १३१ पृष्ठांचा व किंमत चार रुपये असलेला २० लघुनिबंधांचा संग्रह! वि. ना. गोलिवडेकर यांनी मुखपृष्ठ सजवले आहे.

लघुनिबंध कोणत्याही विषयाचे बंधन मानीत नाही. अत्यंत क्षुद्र वाटणारा विषय लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचे रंग घेऊन आला की वाचकांचे चित्त वेधते आणि अदृश्य सौंदर्याचे पैलू त्याच्या दृष्टीस पडून त्यातील चमत्कृतीने त्याचे मन उल्हसित होते असे लेखकाने मनोगतात म्हटले आहे.

१.वेळी – अवेळी आपली ठरलेली कामं काटेकोरपणे वेळच्या वेळी करणार्‍या, वक्तशीर माणसांविषयी आता हेवा वाटत नाही असे लेखकाने म्हटले आहे. वक्तशीरपणासाठी काही शहाणपण लागतं असे नाही. प्रत्येक गोष्ट ठरलेल्या वेळात करण्याच्या नादात माणसं माणुसकी विसरतात आणि जीवनातला सारा आनंदच गमावून बसतात असे लेखकाला वाटते. आयुष्यातील सारी सुखं यावी ती वळवाच्या पावसासारखी – अचानक, अनपेक्षितपणे !

२.पहिली तारीख पहिली तारीख म्हटली की लेखक दचकतो. मन अस्वस्थ होतं. संकटाच्या सावलीचा भास होतो. तो पगाराचा दिवस असतो खरा पण तो एकप्रकारे इतरांच्या पगाराचा असतो. आपण केवळ भारवाही हमाल असतो. हाती आलेल्या पैशांचा अल्पावधीतच क्षय होतो. आठवडा संपण्याच्या आधीच खिसा मोकळा होतो. लेखकाला पहिल्या तारखेची भीति वाटते. वर्गणी, देणगी, मदत मागणार्‍यांना मंडळींना एक तारखेकडे बोट दाखवून ‘नाही’ म्हणता येते. मग अशी मंडळी हमखास एक तारखेलाच वर्गणी मागायला येतात. एवढे सारे असले तरी तिच्या उदरात सारी सुखं दडलेली आहेत. जे सुख आज मिळविता आलं नाही ते उद्या मिळविता येईल असा दिलासा देणारी ती देवता आहे असे लेखकाला वाटते.

३.शेजारी वरुन गोड आणि आंतून कडू असे दोन शेजार्‍यांचं असतं. लेखकाला भेटलेले शेजारी कसे नमुनेदार होते याचे रंजक वर्णन लेखकाने यात केले आहे. त्यांना विमा एजंट भेटतो. तोपर्यंत ते विमा एजंटला चातुर्याने चुकवायचे पण तोच शेजारी म्हणून लाभल्यावर ते हवालदील होतात. पण ६ महिने होतात तरी शेजारी विम्याचं नांवहि काढत नाही. पण एक अनपेक्षित घटना घडते. जवळचे नातेवाईक हृदयक्रिया बंद पडून वारतात. सांत्वनासाठी अर्थात शेजारी येतो आणि मग लेखकाचा विमा उतरविला जातो. नंतर लेखकाच्या शेजारी एक वकील राहायला येतो. येशू ख्रिस्त सांगतात Love thy neighbour पण त्याऐवजी लेखक उपदेश करतो की Leave thy neighbour(शेजार्‍यांकडे दुर्लक्ष करा) असा कानमंत्र देतात. तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर शेजार्‍यांकडे पाहून तोंड देखलं हसा पण त्यांच्या व्यवहारांत कधी तोंड खुपसू नका असा लेखक सल्ला देतो.

४.सोमवार सोमवार हा लेखकाचा घातवार आहे असे त्यांना वाटते. सोमवार उजडला की पहिला धक्का बसतो तो त्या दिवशी सुट्टी नाही. सोमवार उजडल्याची जाणीव मोठी दु:खाची असते. सोमवार उजडला की कितीतरी गोष्टी करायच्या राहून गेल्या आहेत याची आठवण होऊ लागते. सोमवारी आठवड्याचा दरवाजा उघडला की कामांची अडगळ दिसून जीव गुदमरुन जातो. पण सोमवारीच काम आठवड्यात पूर्ण करायची बढाई मारता येते व तसा संकल्प सोडता येतो. रविवारला जोडून सोमवारी सुट्टी आली की लेखकाला हायसं वाटतं.

५.न पाहिलेली सौंदर्यस्थळं ताजमहाल, अमृतसरचे सुवर्णमंदिर, गिरसप्पाचा धबधबा, दिल्लीचा कुतुबमिनार आपल्याला पाहता आलेला नाही यांची खंत लेखकाला वाटत नाही. कारण ती स्थळं कल्पनेत जितकी सुंदर वाटतात तितकी प्रत्यक्षात कमी सुंदर असतात असा लेखकाचा अनुभव आहे. सौंदर्यस्थळच नाही तर मोठ्या पुढार्‍यांच्या बाबतीत आणि थोर थोर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रंथकारांच्या बाबतीत लेखकाचा अपेक्षाभंग झालेला आहे. न ऐकलेले वक्ते श्रवणीय असतात आणि न वाचलेल्या ग्रंथात गोडी असते असा विचार लेखक मांडतो.

६.नवं औषध लेखकाचं त्यांच्या शेजार्‍यांशी कधी भांडण होत नाही. कारण ते त्यांच्याशी कधी संबंधच ठेवत नाही. पण ते एकमेकांशी कधी बोलतच नाही असे नाही. शेजारी कधी पाहावा तेव्हा गंभीर, दगडी, निर्विकार चेहरा मग कशाला मुद्दाम कोण बोलायला जाईल ? रात्रंदिवस आपल्या म्हातारपणी आपलं कसं होईल हीच काळजी त्याला. उद्याच्या काल्पनिक दु:खाच्या जाणीवेने आजची सुखाची घटिका नासून टाकणे लेखकाला वेडेपणा वाटतो. सार्‍या रोगांवर हास्यासारखं दुसरं औषध नाही असे लेखक सांगतो.

७.तुम्हाला व्यवहार कळत नाही लेखकाने काही प्रसंग वर्णन केले आहे ज्यात त्यांना व्यवहार कळत नाही असे ऐकून घ्यावे लागले. त्यांच्या शेजार्‍याच्या मुलीचे लग्न ठरते. ते लेखकाला बोलणे करायला बरोबर घेऊन जातात. जमलेलं लग्न कुणी मोडणार नाही हे ओळखून शेजारी मुलांकडचे मागणे अंगाबाहेर टाकत आहे हे लक्षात आल्यावर लेखक पर्याय सुचवतो. त्यावर त्यांना व्यवहार कळत नाही असे ऐकून घ्यावे लागते. दुसर्‍या एका प्रसंगी महारोग झालेल्याला एकाला सारे घराबाहेर काढलेले असते. लेखक त्यालाच तो थंडीने कुडकुडत असल्याने घरात घेतात व व्यवहारशून्य ठरतात. याच व्यवहारशून्यतेतून त्यांच्याकडे बनावट खोटी नाणी जमलेली होती. माणुसकीला पारखं होणं आणि दुसर्‍याला बेमालूम फसवणं यालाच ‘व्यवहार’ म्हणतात हे लक्षात आल्यावर लेखकाला व्यवहारशून्य म्हटलेलंच चांगलं, असे वाटते. पंडित मदनमोहन मालवीय, न्या. रानडे अशा मोठ्या लोकांच्या व्यवहारशून्यतेची उदाहरणे लेखकाने दिली आहेत.

८.नाही, असं व्हायचं नाही! ज्या गोष्टी विसरणं आवश्यक असतं त्या न विसरतां आल्यामुळे माणसाचं जिणं दु:खांचं होत असतं. माणसानं विसरायला शिकलं पाहिजे. झाला असेल एखाद्याचा लग्नकार्यात अपमान ; पण तेवढ्यासाठी सार्‍या जन्मभर क्षणिक दु:खाचे शल्य जतन करुन ठेवण्यात काय भूषण आहे? पण नाही, तसं व्हायचं नाही! ही माणसं करारी असतात. ती कधी अपमान विसरत नाही. याउलट जे काही उणंअधिक घडलं ते तेवढ्या वेळेपुरतंच आहे असे मानणारी माणसं मोठी समाधानी असतात. Forget and Forgive हा जीवनाचा महामंत्र आहे असे लेखक सांगतो.

९.झोपणं आणि उठणं रोज पहाटे उठावे असे लेखकाला वाटते पण तसे जमत मात्र नाही. पहाटे उठण्याची सवय लागावी म्हणून लेखक खूप प्रयत्न करतात. एक दिवस लेखक ‘Early Risers’ Association (ERA) असे बॅज लावलेले विद्यार्थी काॅलेजात पाहतो. लेखक त्या संस्थेचा सभासद होतात. पण त्यांना नियमाने पहाटे उठणे जमेना. पुढे लेखकाला रात्री बराच वेळ जागं राहायला लागणारी नोकरी मिळते त्यामुळे पहाटे उठण्याचा प्रश्नच उरत नाही. नंतर लेखकाला झोपणे उठणे याचे वेळापत्रक का आखावे असा प्रश्न पडतो. ही कृत्रिम बंधने कशाला हवीत असे लेखक आपल्याला विचारतो. झोप आली की झोपावे आणि जाग आली की उठावं असे लेखकाला वाटते.

१०.डोमकावळ्यांचा पिसारा लोकांच्या आवडी – निवडी रोज बदलतात. जग बदलतय. जुनं जातय. नवं जन्माला येतंय. आता विद्वत्ता अंगी येण्यासाठी कष्ट नकोत, व्यासंग नको, काही नको. प्रसिध्दीची आधुनिक तंत्रं अवगत असली की मूर्खशिरोमणीचा विद्वतशिरोमणी एका रात्रीत होऊ शकतो. हवे तेवढे विद्वान भाड्याने मिळतात. अंगांत गुण नसले तरी ते आहेत असं नाटक करा. विद्वत्ता नसली तरी विद्वत्तेचे प्रदर्शन मांडा. मोठं होण्याचा हा राजमार्ग आहे असे लेखक उपहासाने सांगतो. राजहंसाचे पंख कापून घेऊन ते डोमकावळ्यांनी लावावयाचे असा हा नवा जमाना आहे,असे लेखकाला वाटते.

११.संकल्प आयुष्यात लेखकाला अनेक गोष्टी जमलेल्या नाहीत.रोज पहाटे उठणे, व्यायाम करणे, रोजनिशी लिहिणे, नियमाने वाचन करणे, कुणाच्याहि रागा-लोभाची पर्वा न करता मनात असेल ते स्पष्टपणे सांगून टाकणे, कुणाची खोटी स्तुति करायची नाही असे कितीतरी संकल्प केले पण एकही सिध्दीस गेला नाही.कसलाच संकल्प म्हणून करायचा नाही असा नवा संकल्प लेखकाने अलिकडे केला आहे . ठरवावं एक आणि घडावं भलतंच असे लेखकाच्या बाबतीत होत असते. लहानपणी लेखकाला कीर्तनकार व्हावं असं स्वप्न होतं पण ते भंगले. नंतर त्यांना सार्वजनिक कार्यकर्ता व्हायचे होते. पण ते होऊ शकले नाही. नंतर लेखकाने आदर्श शिक्षक व्हायचे ठरवले. पण तिथेही अपवित्र गोष्टींचा सुकाळ असल्याचे त्यांच्या लक्षात आले. काहीच न ठरविता जीवनाच्या मार्गावर जी सुखदुखं भेटतील त्यांचं हसतमुखाने स्वागत करण्याची तयारी माणसानं ठेवावी यांतच खरे सुख आहे असे लेखक सांगतात. चाळिसी उलटल्यानंतरही विलायतेत जाऊन पुन्हा एकदा विद्यार्थी होण्याची संधि अनपेक्षितपणे लेखकाच्या जीवनात आली आणि सुखाचा वर्षाव झाला.

१२.टोप्यांचं दुकान चार ठिकाणी चौकशी केली म्हणजे वस्तु चांगली आणि स्वस्त मिळते यावर लेखकाचा विश्वास नाही. गर्दी असलेल्या दुकानापेक्षा लेखकाला गर्दी नसलेल्या दुकानात जायला आवडते. गर्दीच्या दुकानातून माल आणला की लोकांना आपण फसलो असे वाटत नाही. माणसाला आपण फसल्याचं दु:ख होत नाही तर आपण एकटेच फसलो याच्या त्याला यातना होतात. लेखक एका टोप्यांच्या दुकानात शिरतो. वास्तविक ते काही टोपी घालत नव्हते. कदाचित ते टोपी घेणार नाही असे दुकानदाराने अंतर्ज्ञानाने ओळखले असावे.तरी लेखक टोप्यांचे विविध प्रकार दाखवायला सांगतो आणि शेवटी दुकानाबाहेर पडतो. माणसानं ठरलेल्या चाकोरीच्या बाहेर जाऊ नये. ज्या रस्त्याने जायचं नाही त्याची पृच्छा करु नये असे लोकांना का वाटते असा लेखकाला प्रश्न पडतो. रिकाम्या चौकशाच काय पण रिकामटेकड्या गप्पा मारत बसणे हा देखील लोकांना कालापव्यय वाटतो. लेखकाला मात्र याचं व्यसनच जडलं आहे. रिकाम्या, मनमोकळ्या गप्पा म्हणजे मनांत सांचलेले विचार, गुदमरलेल्या भावना, दडपलेल्या वासना यांना मोकळं सोडण्याचे एकमेव दार! असे लेखक सांगतो.

१३.परोपकारी माणसं लेखकाला परोपकारी माणसाची भीति वाटते. सेवा हा आता धंदा झाला आहे. लेखकाच्या आॅफिसांतल्या ट्रकचा उपयोग करणार्‍या भगिनी गरीब मुलांची सेवा करतात तो अनुभव लेखक सांगतो. काही व्यवहार चतुर माणसं उपकाराचं बी पेरतात आणि परतफेडीचं भरघोस पीक घेतात. औदार्याचं प्रदर्शन करणार्‍या माणसांची लेखकाला शिसारी येते.

१४. स्वभावाचे कंगोरे वयानं मोठा झालो असलो तरी लेखकाच्या बालपणांतल्या किती तरी आवडी – निवडी अजूनही तशाच आहेत. आवळे , रायआवळे आजही आवडतात. गरमागरम थालीपीठ आणि लोणी आवडते. पाहुण्यांबद्दलची आवडही तशीच आहे. माणसाचं व्यक्तिमत्त्व म्हणजे त्याच्या स्वभावाचे कंगोरे. रोजच्या विरोधी परिस्थितीशी घासून घासून ते एवढे गुळगुळीत होतात की त्याचा ‘स्व’ भावच नाहीसा होतो.

१५.तांबड्या आकड्यांच्या तारखा इतके दिवस लेखक सुटीच्या दिवसाची आतुरतेने वाट पहायचे. पण आताशा सुटीचा दिवस म्हटला की ते एकदम दचकतात. त्यांच्या मित्रांना, नातेवाईकांना आणि हितचिंतकांना त्यांच्या स्वप्नांचा भंग करायला नेमका हाच दिवस सापडतो. सुटीच्या दिवशी लेखकाला कोणी निर्वेधपणे, मनमोकळे वागू देत नाही. म्हणून त्यांना सुटीच्या दिवसाचा राग येतो. उसने मागायलाही याच दिवशी कोणीतरी येतं. ठरवावं एक आणि घडावं भलतंच. सुटीचे दिवस कॅलेंडरवर तांबड्या रंगात छापणार्‍यांच्या कल्पकतेचे लेखकाला कौतुक वाटते.

१६. सुभाषितं एका व्याख्यानात लेखक ऐकतो की मनुष्याला सुखी करण्याचं, आयुष्यांतली सारी दु:ख विसरण्याचं एकच अमोघ साधन या जगात आहे-छंद! लेखकाला कसलाच छंद नव्हता. मोठमोठ्या ग्रंथकारांची सुभाषितं गोळा करण्याचा छंद जोपासावा असे लेखक ठरवतो. सुभाषित दृष्टीस पडले की शिंपल्यात मोती सापडल्याचा लेखकाला आनंद होई. पण त्यांची सुभाषितांवरची सारी श्रध्दाच डळमळू लागेल असे प्रसंग उद्भवले.’ एकसे भले दो ‘ ‘संकटाच्या वेळी धावून येतो तो मित्र’ ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ या म्हणींच्या विपरीत अनुभव लेखकाला येतो आणि त्यांचा सुभाषितांचा छंद सुटतो.

१७.विचित्र भूक कुणाची तरी मनधरणी करुन, कुणाची तरी आर्जवं करुन, कुणाची तोंडदेखली स्तुति करुन, आपलं हित साधावं हा व्यवहार लेखकाला कधी जमला नाही. स्वतःच्या कर्तबगारीवर’ असाध्य ते साध्य’ करण्याची त्यांची मनोधारणा होती. पण असा विचित्र प्रसंग येतो की लेखकाला ज्याचं तोंड पाहायची कधी इच्छा नव्हती त्याच्याकडे लाचारीने जाण्याची वेळ आली. त्याची खोटी स्तुती करावी लागली. आपल्या अंगी नसलेल्या गुणांचं कुणीतरी कौतुक करावं अशी एक विचित्र भूक माणसाच्या ठिकाणी असते.

१८.नवी भूमिका माणसाला निरनिराळ्या भूमिका कराव्या लागतात. या सर्वात लेखकाला सेवकाची भूमिका सर्वच दृष्टीने विचित्र आहे असे वाटते. लोकांवर अनियंत्रित सत्ता गाजविणारे लोकनेते आपण जनतेचे सेवक आहो असं नाटक करतात. लेखकाला अनेक वरिष्ठांच्या हाताखाली नोकरी करण्याचे प्रसंग आले. सच्छील, पापभीरु, हसतमुख, रागीट, व्यसनी, लाचखाऊ असे सर्व प्रकारचे. या माणसांच्या मनाप्रमाणे वागायचे म्हणजे तारेवरची कसरत. सच्छील आणि पापभीरु मालकाला संतुष्ट करण्यासाठी व्यसनी, लाचखाऊ लोकांची त्याच्यादेखत निंदा करायची आणि त्याला संतुष्ट करायचं. दुसर्‍याच उणं ऐकण्याची प्रवृत्ति माणसाच्या स्वभावात मूळ धरुन आहे. काही माणसं चारित्र्यप्रीतीचं आणि नीति -प्रेमाचे नुसते अवडंबर माजवतात. तर काहींना नीति-अनीतीचं सोयरसुतक नसते. बिरबल हा सेवकांचा बादशहा.

१९.गुप्त धन लेखकाला भांडणाची सर्वात जास्त भीति वाटते. कुणाला भांडतांना पाहिलं तरीसुद्धा त्यांच्या अंगाला दरदरुन घाम सुटतो. पण म्हणून लेखकाला भांडताच येत नाही असे नाही.एकदा लेखकावर भांडण्याचा प्रसंग येतो. पत्नीबरोबर. भांडणाचं कारण क्षुल्लक होतं. घरातलं जुनं टेबल विकून नवं आणावं की नाही यावरुन.ज्यावर लेखकाने अभ्यास केला. कंटाळा आला म्हणून डोकंहि टेकलं, कथा कादंबर्‍यांचे आराखडे आखले त्याला केवळ ते जुनं झालं म्हणून खुशाल परक्याला देऊन टाकू? लेखकाचं प्रेम बसलं होतं ते जुन्या टेबलापेक्षा त्या टेबलाशी निगडीत जुन्या आठवणींवर! लेखकाची जुनी पुस्तके, जुने कोट आणि शर्ट, घरांतली जुनी भांडी इ. बद्दलही लेखकाची अशीच भावना आहे. जुनी वास्तू सोडतानाही असाच कालवाकालव होतो. जुन्या घरात जुन्या आठवणींचं गुप्तधन होतं आणि घर सोडताना ते काही बरोबर नेता येत नव्हते!

२०.न टाकलेली पत्रं! सत्य, सेवा, परोपकार, प्रामाणिकपणा या सार्‍या दुसर्‍यांनी करायच्या गोष्टी आहेत. अशांची आपण तोंडभर स्तुति करतो, गोडवे गातो. प्रत्येकाने वक्तशीरपणे आलंच पाहिजे असा आग्रह लेखक धरत असतात पण तेच वेळेवर हजर नसतात. वेळच्या वेळी सार्‍या गोष्टी झाल्याच पाहिजेत असा लेखकाचा कटाक्ष असतो, मात्र ते त्या तशा करतातच असे मात्र नाही. सामान्यतः आलेल्या पत्रांची उत्तरे लेखक शक्य तो लगेच लिहितात व स्वतः पोस्टाच्या पेटीत टाकतात. एखादं पत्र मात्र असतं की त्याचं लेखक रागाच्या भरात उत्तर लिहितात पण पोस्टाच्या पेटीत मात्र टाकावेसे लेखकाला वाटत नाही. मग ते घरमालकाला लिहिलेले असेल,आॅफिसांतल्या साहेबाला लिहिलेलं असेल. कुणाच्या तरी हाती पडावी म्हणून ही पत्रं लिहिली नव्हती तर जे सांगावंसं वाटत होतं ; जे उघड बोलून दाखविता येत नव्हतं, पण बोलावंसं वाटत होतं ते सारे मनावेगळं करण्यासाठी लेखकाच्या अतृप्त मनाने केलेला खेळ म्हणजे ती पत्रं. ती पोस्टात टाकली नाही हेच बरे झाले असे लेखकाला वाटते. काही अशीच पत्रे लेखक कपाटाबाहेर काढून पाहतो तेव्हा उत्कटतेचा आणि सौहार्दाचा सुगंध सभोवती दरवळतो असे लेखकाला वाटते. ती पत्रं लेखकाला दीपगृहासारखी वाटतात. ही पत्रं लेखकाला बकुळीची फुलं वाटतात. मन सुगंधित ताजंतवानं करणारी वाटतात.

वि. वा. पत्की

विश्वनाथ वामन पत्की हे कादंबरीकार, कथाकार व समीक्षक म्हणून ओळखले जातात. रत्नागिरी जिल्ह्यातील देवडे गावी त्यांचा जन्म १२नोव्हेंबर, १९१२ रोजी झाला व दि. २७ एप्रिल, १९९२ रोजी त्यांचे निधन झाले. शिक्षकी पेशानंतर त्यांनी महाराष्ट्र शासनाचे प्रसिध्दी अधिकारी म्हणून काम पाहिले. नंतर ते जनसंपर्क अधिकारीही होते. जनसंपर्क, वृत्तपत्रविद्या, जाहिरातकला या विषयांचे ते अध्यापन करत. त्यांच्या ‘आंधळा न्याय’ , ‘साक्षात्कार’ , ‘लक्ष्मणरेषा’ , ‘शोभेची बाहुली’ या काही कादंबर्‍या आहेत. ‘आराधना’ , ‘तुझं सुख ते माझं सुख’ हे कथासंग्रह, ‘पश्चिमवारे’ हे प्रवासवर्णन, ‘खरं सांगू तुम्हाला?’ ‘वेळी-अवेळी’ हे लघुनिबंधसंग्रह, ‘युगप्रवर्तक फडके’ हा शि. न. केळकर यांच्यासह लिहिलेला समीक्षात्मक ग्रंथ,’ शिशिरातील गुलाब (माजी राष्ट्रपती न्या. छगला), माझा जीवन प्रवाह (चिंतामणी देशमुख)व ‘स्वप्नसिध्दीची दहा वर्षे (माजी पंतप्रधान इंदिरा गांधी) ही अनुवादित आत्मचरित्रे, वि. स. खांडेकर यांच्या खासगी पत्रांचं संपादन ‘दीपगृह’ अशी विपुल साहित्य संपदा त्यांच्या नावावर आहे. वेळी – अवेळी हा लघुनिबंध संग्रह आज दुर्मीळ आहे.

विलास कुडके.

— परीक्षण : विलास कुडके
— संपादन : देवेंद्र भुजबळ.☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments