दीपकळी
दीपकळी हा कुसुमावती देशपांडे यांचा १९३५ मध्ये प्र.श्री.कोल्हाटकर, मुंबई यांनी प्रकाशित केलेला पहिला कथासंग्रह.
मलपृष्ठावरील तीन रंगी चित्र लेखिकेने अब्दुल रहिमान चुगताई यांच्या एका चित्रावरुन कल्पना घेऊन काढलेले आहे.
१०२ पृष्ठांच्या या पुस्तकाची तेव्हाची किंमत होती १२ आणे.
१. माया लेखिका दुपारी कसले तरी पुस्तक घेऊन अर्धवट गुंगीत व्हरांड्यावर पडल्या होत्या. त्यांच्या कानावर कर्कश गाणे येते, ‘तनकि आग बुजवाय’ पाठोपाठ बारीक आवाजात पालुपद ‘भजले रामलीला’. ते भिकारी जोडपे असते. त्यांच्या गाण्याने दुपारची स्तब्धता नाहीशी होते. त्या आवाज कारुण्य होते आणि अत्यंत कणखरपणाही होता. ती हसतमुख होती व तिच्या पोटाशी तान्हे मूल होते. मात्र तिचे हसणे उपरोधिक होते. लेखिका अनिमिषपणे त्या कुटुंबाकडे पहात राहतात व त्याच्या अंगावर एक जुना पण चांगला कपडा टाकते. त्याला आनंद होतो. त्याने गाणे थांबवले व चौकात इतरांना मदतीसाठी आवाहन करु लागतो. चारपाच दिवसांनी लेखिका एका वस्तीवर जाते. तिथे या जोडप्यांची झोपडी असते. लेखिका भिकारणीच्या मुलाची विचारपूस करते. तिला कळते की तान्हे पोर नेहमी आजारी असते. त्याला ताप येई. ती मजुरी करत असते. नवरा बाजारात जमलेल्या वस्तू विकायला गेलेला असतो. ती सांगते की तिचा नवरा लंगडा नाही. ती सांगते की ते आळशी नाही. दोघे गिरणीत काम करत होते. संप झाला. गिरणी बंद झाली. दुसरं काम मिळेना. मग भिक्षेची वेळ आली. धडधाकट माणसाला कोण भिक्षा देतो म्हणून नवर्याने लंगड्याची माया केली. खोटेपणा करु नये तर जगावं कसं ? असे ती लेखिकेला सांगते.
२. एकटीच गंगाकाकूंचं वय झाले तरी उत्साही असतात. त्या पाहुण्या म्हणून आल्या की घरात प्रसन्नता भरुन राहते, गप्पासप्पांना रंग चढतो, असे लेखिका सांगते. एका संध्याकाळी काकू विणीत बसल्या होत्या. त्या सांगतात की स्त्री ही मुख्यतः पत्नी आहे की माता आहे? पण खरं तर ती अगदी एकटी आहे. आता कुठे कुठे बदल दिसतो. सहानुभूतीचा ओलावा दिसतो. काकूला आपला संसार आठवतो. कैक दिवसात समजपूर्ण सहानुभूतीचा कळकळीचा विचारपुशीचा शब्द नाही. यंत्राप्रमाणे सदूंचं करावं, घरातलं करावं. दिवस मालवला की थकून निजून जावं असे दिवस गेलेले. ते बाहेर बैठकीत गप्पाष्टक झोडत. सहा महिन्याच्या सदाशिवला ताप येई. ती रात्र जागून काढी पण कुणाला पर्वा.मुलांसाठी हाडाची काडे करावी पण त्यांनीही आपल्याला केवळ एक स्वतःच्या सुखसोयीचे साधन समजावं. आई जुनाट वाटू लागते. तिची लाज वाटू लागते. बायकोच्या बाळंतपणात मात्र आईची गरज लागते. संसारात असूनही स्त्री एकटीच कशी असते ते या कथेत लेखिकेने चित्र उभे केले आहे.
३. निराधार -! लेखिका आगगाडीने प्रवास करत असते. लवकरच स्टेशन येते. याच स्टेशनवर माणिक लेखिकेच्या डब्यात येते. तिच्याबरोबर तिची आई, दोन लहान भाऊ व आणखी एक कोणीतरी बाई होती. ती मंडळी माणिकच्या कोणच्याशा भावाच्या लग्नाला पुण्याला निघाली होती. लेखिकापण पुण्याला चालली होती. माणिक लेखिकेच्या शाळेविषयी माहिती काढून घेते. माणिक लेखिकेच्या शाळेत येते.तिला खालच्या वर्गात बसावे लागते. लेखिकेची तिथे शेवटची टर्म होती. सुट्टीनंतर लेखिका पुण्याला काॅलेजमध्ये जाते. तेव्हा माणिकला त्या शाळेत आलेले पाहतात.त्यांना आनंद होतो. तिथे एका मुलीकडून माणिकबद्दल लेखिकेला कळते की तिचे वडील बेपत्ता आहेत. तिच्या आईच्या दुर्वर्तनामुळे त्यांनी संसाराला रामराम ठोकलेला असतो. माणिकला मलेरिया होतो. तरी घरी पाठवले जाते. लेखिका तिला पत्र पाठवते. तिचं एका ३०-३२ वर्षाच्या श्रीमंत गृहस्थाशी लग्न करुन द्यायचे तिच्या आईच्या मनात असते.बाप देशोधडीला, आई तिर्हाईताच्या घरी सुखाने राहणारी, मामा मानलेला, माणिकची कोणालाच पर्वा नाही. तापात तिला देवाज्ञा झाल्याचे मामा लेखिकेला कळवतो.
४. चिमणी अगदी बालपणापासून चिमणीला कपड्यांचा कंटाळा असतो. ती दोन अडीच वर्षाची होते तेव्हा तिला आपल्या मऊ गोंडस अंगाचा अभिमान वाटतो. काही दिवसांनी तिला उघडे रहावयाची लाज वाटू लागते. ती चार पाच वर्षाची होते तेव्हा व्यवस्थितपणात पूर्ण पारंगत होते. ती भराभर शिकत होती. तिचा नेहमी पहिला नंबर होता. तिच्या स्वाभाविक विश्वात प्रेम होते, समता होती, आंब्याचिंचेपासून मैत्रिणीपर्यंत सर्वांना तेथे जागा होती. ती काॅलेजमध्ये जाते. बुध्दीवैभवाची कीर्ति कायम राखते. थोड्याच दिवसात तिचे नेत्र रघुवर खिळते. रघुही स्वप्नात दंग असे. पुढे दोघांचे एक लहानसे घर होते. एके दिवशी बाळाचे आगमन होते. चिमणी खूप मोठी होते. गावच्या स्त्रियांची पुढारी होते. सरकार तिला जे. पी. करते. अशी ही चिमणीची जीवनकहाणी लेखिकेने उभी केली आहे.
५.भय्या त्याचे नाव रामचरण. पण घरात त्याचे नाव भय्याच पडते. जुन्या भय्याच्या जागी नवा भय्या येतो. एक फूल गळते त्याच्या जागी दुसरे उमलते तसे. रामचरण आल्यामुळे काकींना एक नवीन करमणूक होते. त्यांच्या गप्पांना रंग चढतो. रामचरणला घरच्या शेताची आपल्या बालपणाची आठवण होत असे. एके रात्री लहानग्या झोपडीच्या अंगणात चार पुरभय्ये देहभान विसरुन हिंदी दोहे गात होते. तिथे तल्लीन होऊन दोहे ऐकत असलेला भय्या दिसून येतो. त्या जाग्रणात भय्याचा आनंद सांठवला होता. त्याच्या मन:स्वातंत्र्याचे ते मूळ होते. भय्याला उठायला उशीर होण्याचे कारण समजते. असे रामचरण भय्याचे शब्दचित्र रेखाटले आहे.
६.कला आणि कला गजानन भास्कर कुळकर्णी हा स्कूल आॅफ आर्टचा तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी संध्याकाळी झपझप चाललेला असतो. तो दुमजली घराच्या दिशेने निघतो. तिथे त्या घराचा मालक ‘मास्तर’ व एकच एक रहिवासी बसलेला होता. मास्तरांच्या उमाळ्यांना मूर्त स्वरुप मिळे ते त्यांच्या चित्रकलेद्वारे. कधी कधी त्यांना आनंदसमाधि लागे ती आवडत्या चित्रकारांच्या वृत्तीची तन्मय होतांना. ते कुठल्या आर्ट स्कूलमध्ये गेलेले नव्हते. त्यांच्या कलेवरच्या प्रेमात त्यांच्या जीवनसौंदर्याचा झरा होता. दहा घरी जावून गजानन भास्कर कुळकर्णी तिथे अकराव्या घरी पोहचतो. मास्तर त्याला बसवतात. गजानन एका वकीलाचे पत्रक करतात त्यांच्या पुढे करतात. त्याला आर्ट स्कूलच्या शेवटच्या परीक्षेला मुंबईस जावयाचे होते. त्यासाठी तो वर्गणी मागत फिरत होता. पाच रुपयेच कमी पडत होते. तो मास्तरांना एन्लार्जमेंटसच्या हँडवर्कचा, लँडस्केपचा नमुना दाखवतो. तिसरे चौथे चित्र दाखवतो. चित्रकार झाल्यावर पुढे काय करणार आहेत असे मास्तर गजाननाला विचारतात. तुम्ही मजजवळ वाटेल ते मागा परंतु या अभ्यासासाठी पैसे मागू नका असे मास्तर गजाननाला सांगतात.खरेच कलेचं दान करता येते का, मोठ्या लोकांची लँडस्केप करुन खरेच समाधान मिळतात असे ते विचारतात. गजानन ते रंगीत कागद गोळा करुन निघतो अशी ही कथा आहे.
७. मृगाचा पाऊस ही कथा बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात येऊन गेली आहे. चार दिवसापासून दुपारचे ढग येत व अंधारुन येत. सोसाट्याचा वारा सुटे आणि ते अवसान निघून जाई. ती दोन दिवस वाट बघते. तिसऱ्या दिवशीही तेच. घरातला दाणादुणा संपत आलेला होता. उद्याला खायला नव्हते म्हणून ती बाजाराकडे निघते. तिच्या तान्ह्याला ती टोपलीत फडक्यात गुंडाळून झरोक्याखाली ठेवते व त्याला एकट्याला टाकून झोपडीला कडी घालून ती निघते. बाजारात वादळाच्या भीतीनें तारांबळ उडाली होती. तशात वारा सुटतो. त्याच्या बरोबर काळेकुट्ट मेघ येतात आणि टपोरे थेंबही येतात. पाच मिनिटात सर्व जलमय होऊन जाते. अवसान ओसरते पण पाऊस पडतच राहतो. तिचा बाजार करायचा राहून जातो. वादळाचा पहिला थेंब अंगावर पडताच ती सरीइतक्या वेगाने धावत निघते. तिचे छबडे झरोक्याखाली असते.वादळाने एकादे कौल उडवून दिले तर ते बाळाच्या अंगावर पडायचे. रस्त्याने तिचं चित्त बाळापाशीच असते. ती विचार करत निघालेली असते. ती घरी येते. एक कौल पडलेले असते पण बाळापासून चार हातावर. तिचा जीव खाली पडतो. ती बाळाला जवळ घेते. टोपली चिंब भिजलेली असते. तिच्या डोळ्यांतून आनंदाच्या मृगधारा वाहू लागतात अशी ही एका आईची कथा!
८. सीता सीता आणि रामजीच्या वयात १०-१५ वर्षांचे अंतर होते. तिचा ५-६ वर्षेच संसार होतो. रामजीचा मळा गावाबाहेर असतो. तिथेच त्याची झोपडी असते. सीता माळ्याची पोर असते. एक दिवस अचानक रामजी भरल्या संसारातून उठतो व त्याचा टुमदार मळा परतफेडीसाठी ३ वर्षे सावकाराकडे जातो. सीता निराधार होते. म्हादबा तिच्याशी पाट लावू पाहतो पण तिचं संसारावरुन मन उडालेलं असतं. एकदा सीता बायकांबरोबर शेतावर मजुरीसाठी जाते. ते शेत म्हादबाचे असते. एका संध्याकाळी ती ग्लानीत निजली असताना दार ढकलून म्हादबा येतो आणि सीतेवर झडप घालतो. आता तरी लावशील ना पाट हे शब्द थैमान घालतात. त्वेषाने व संतापाने तिचे मन भरुन जाते.सकाळी ती पाटलाच्या चावडीची वाट धरते. म्हादबा फुशारकी मारुन सीता वश झाल्याची बातमी गावात फैलावतो. पाटलांजवळ म्हादबाच्या गुंडगिरीचा वशीला होता. सीता अगतिक ठरते. सुन्नपणे ती घराची वाट धरते. दुसर्या दिवशी ती एका बंगल्यावर जाते व काम मागते. रहायला जागा पण मागते. कास्तकारांच्या वस्तीकडे कायमची पाठ फिरवते. पण तिथे तिला धक्का बसतो. तिला कळून चुकते की तिला दिवस राहिले. सारजी तिला जडीबुटीचा उपाय सुचवते. पण सीता त्याला नकार देते. जगरहाटीच्या दृष्टीने ती भ्रष्टा ठरते पण त्यातूनच तिच्या हिंमतीमुळे तिच्या जीवनात हेतू येतो.
९. छाया प्रकाश लाकडाचे ओंडके फोडणारे दोन मजूर, जमिनीच्या तुकड्याचा बंधारा नीट आहे का नाही ते भर पावसात पाहणारा लंगोटीतील इरले डोक्यावर घेतलेला शेतकरी, खेड्यातील जीवन, राखण नीट कर सांगणारी शेतकऱ्याची ललकारी, पहाटेचे चांदणे, पाखरांची किलबिल, गोफण भिरकवणारा शेतकरी अशी शब्दचित्र यात लेखिकेने उभी केली आहेत.
१०. विचारशील प्राणी मनुष्य हा अत्यंत विचारशील प्राणी आहे. विचारांतच मनुष्याचे मनुष्यत्व आहे, त्याच्या जोरावरच त्याने आपले जीवन सौंदर्यमय आणि पुण्यमय बनवले हे एका व्याख्यात्याचे विचार लेखिका ऐकते. मुलांना हवं तसं मोकळे, स्वच्छंद वातावरण मिळू नये व मग आपल्या उत्साहाला, धडपडीला कसा तरी वाव मिळावा म्हणून त्यांनी काही उपद्व्याप केला की त्यांच्या पाठीत धपाटे बसावे, हे लेखिकेला विचारशीलत्वाचे लक्षण वाटत नाही. लेखिकेला अमंगळ मुलांच्या स्पर्शाने रागावलेले गुरुजी दिसतात. असे प्रसंग पाहिल्यावर लेखिकेला प्रश्न पडतो की मनुष्य हा विचारशील प्राणी आहे का? लेखिका आपल्या जागेचा राजीनामा देते आणि एका साधारण लोकांच्या वस्तीत येऊन राहते जिथे त्यांना चार समाधानाचे शब्द सांगता येतील व लेखिकेला आपली सुखदु:खे सांगून लेखिकेचे म्हणणे ऐकून घेतील!
११. निराशेतून दिनू वकील असतो. मनुच्या आयुष्यात तो नंतर आलेला असतो. दिनू घराबाहेर गेल्यानंतर मनूला तिच्या काॅलेजमधील दिवस आठवतात. त्याकाळात ती बोर्डींगमध्ये न राहता मुंबईला आईची मैत्रिण गोदूताईच्या घरी राहत असे. आईने तिला घरातून बजावलेले असते की उगीच कोणाशी अघळपघळ बोलू नकोस, कुणाशी संबंध वाढवू नकोस..घराबाहेर मैत्री नसलेली बरी. वामनराव मोठा व्यासंगी आणि मनमिळाऊ मनुष्य, गोदाताईचा नवरा असतो. मनूला वामनरावांबद्दल आपलेपणा वाटू लागतो. त्यांची मैत्री झपाट्याने वाढत जाते. पहिली उन्हाळ्याची सुट्टी येते. सुट्टी संपायच्या आधीच चार दिवस ती मुंबईला परतते. तिला वामनरावांच्या वागण्यात संकोच वाटतो. ते कावरेबावरे उदास दिसत. मनूच्याही वागण्यात चोरटेपणा येतो. वामनराव मनूशी अत्यंत आपुलकीने वागत तर गोदूताईशी व मुलांशी तिरसटपणे वागत. मनूची परीक्षा आटोपते. ती तिच्या खोलीत सामानाची आवराआवर करत असते. सांडलेल्या पत्रांपैकी कांही वाचत ती टेबलापाशी उभी असते. तिची दाराकडे पाठ असते. पाठीमागून वामनराव येऊन मनूला घट्ट मिठी मारतात. त्या प्रसंगाने ती घाबरते. त्यांच्या हातून स्वतःला सोडवून घेऊन निसटते. वामनरावही खाली मान घालून खोलीतून निघून जातात. त्या प्रसंगाने तिचं मन विटून जाते. पुन्हा काॅलेज सुरु होते तेव्हा वामनरावांच्या घरी जायचे नाही असे ती ठरवते. बोर्डींगमध्ये जाते. चार वर्षांनी तिच्या आयुष्यात दिनू येतो अशी ही कथा आहे.
१२. पश्चात – बुध्दि ती इंटरला बसणार असते. परीक्षा जवळ आलेली. त्यात महत्वाचे काम निघते म्हणून ती वसतिगृहातून सदाशिव पेठेतील एका आप्ताकडे जाते. निघेपर्यंत सकाळचे नऊ होतात. तिच्यासाठी टांगा आणण्यात येतो. टांग्यात बसताना तिला एक १६-१७ वर्षाचा मुलगा स्केल, पेन्सिल, टांक व एक जाडशी वही घेतलेला व परीक्षेला निघालेला मुलगा दिसतो. तिच्यासाठी टांगा ठरवलेला असताना टांग्यावाल्याने त्या मुलाचीपण सवारी कशी घेतली म्हणून ती टांग्यावाल्याला विचारते व त्याला टांग्यात बसू देत नाही. पुढे गेल्यावर तिला आठवते की त्या मुलाच्या पायात काही नव्हते. छत्रीही नव्हती. त्याची मॅट्रिकची परीक्षा होती. त्याला उशीर झाला, उन्हाने पेपर वाईट गेला, तो नापास झाला तर त्याच्या अपयशाला आपणच जबाबदार होऊ असे तिला वाटते. असमाधानाने तिचा जीव वैतागून जातो व ती असं पुन्हा करणार नाही असे ठरवते अशी ही कथा आहे.
१३. संवगडी आई आणि बाळू यांच्यातील नात्याची ही कथा. बाळूचे खेळून होते व आईने दिलेल्या टाईम्समधील चित्रं कापून वहीत डकवणार असल्याचे तो आईला सांगतो. तो चित्रं कापतो. नंतर आईला गोष्ट सांगायचा आग्रह धरतो. नंतर गाणं म्हणण्याचा आग्रह करतो. तिच्या कुशीत शिरतो. ती दोन ओव्याही म्हणत नाही तोच तिच्या सवंगडीला झोप लागते, अशी ही कथा आहे.
या पुस्तकाची सन १९३५ नंतर पुन्हा आवृत्ती निघालेली नाही त्यामुळे हे पुस्तक अतिशय दुर्मीळ आहे.
— परीक्षण : विलास कुडके.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
छान ओळख, ओळख कसली ? ज्यांना उपलब्ध होवू शकणार नाही त्यांच्यासाठी कथासंग्रहाची संक्षिप्त आवृत्तीच आहे ही.
मनापासून धन्यवाद सर