मोळी
“मोळी” हा कुसुमावती देशपांडे यांचा तिसरा कथासंग्रह देशमुख आणि कंपनी, पुणे यांनी सन १९४६ मध्ये प्रकाशित केलेला आहे. या संग्रहात १५ कथा आणि चंद्रास्त हा लघुनिबंध यांचा समावेश आहे. ‘मोळी’ या संग्रहाच्या प्रारंभी लेखिका ‘मोळी’ या शीर्षकाखाली मनोगतात लिहितात…
‘आजची ही काळरात्र कशी निभावली जाईल?
दिवसभर पायपीट करुन मी थोड्याशा काटक्या मात्र आणल्या आहेत.
वाळून कोळी झालेल्या. शुष्क काटक्या.
झाडातला जीवनरस आटून जात असता सुकलेल्या आणि गळून पडलेल्या ह्या फांद्या.
उन्हात पोळलेल्या, वणव्यात होरपळलेल्या, पोटात आग साठलेल्या.
ह्या मोळीची शेकोटी पेटवून ठेवली, तर काळरात्रीच्या गडद अंधारात उजेडाची सोबत राहील; दिवसाच्या प्रकाशाची आठवण नाहीशी होणार नाही.
तेवढा तरी उपयोग होईल का या मोळीचा ?
ह्या शेकोटीच्या ज्वाळात जीवननृत्याची चित्रे अंधुकपणे तरी दिसत राहतील का ?
अनंत क्लेशांनी जर्जर होऊन तडे गेलेली भूमी ह्या शेकोटीच्या भोवती आहे. तिची उघडीनागडी भुकेली मुले तिथे अंग टाकून पडली आहेत.
ह्या शेकोटीने त्यांना ऊब कशी येईल ?… काळोखात गडप होणाऱ्या त्यांच्या आकृती क्षणभर दिसतील तरी. शेकोटीच्या उजेडात त्यांचे डोळे चमकतील. क्षणभर उठून दिसतील.
कचराही जळताना पाहण्यात मौज असते. कुणाला तेवढाच आनंद होईल. ‘असे हे काव्यात्मक आणि रुपकात्मक मनोगत. या मनोगतातून लेखिकेची सखोल चिंतनशीलता, काव्यात्म दृष्टी प्रतीत होते.

१.समांतर रेषा
इंदिरा लेखिकेच्या गड्याची मुलगी. समांतर पातळ्यांतून लेखिकेच्या मनात दोन बिंदू पुढे सरकत असतात. एक बिंदू इंदिराच्या वास्तविक जीवनाचा लेख लिहित असतो. दुसरा बिंदू मात्र त्याच जीवनाचा त्यांच्या मनातील आदर्श लेख लिहित असतो. ती आदर्श सृष्टी मानवतेची असते. इंदिरा हाताळ असते. ती लेखिकेच्या मुलांच्या गोट्या लांबवते.मुलं घरी नसताना त्यांच्या खोलीत जाण्याची तिची सवय आहे. मन मानेल तसं वस्तू पाहणे, चाळणे आणि खेळायला घेणे ती करीत असते. याबद्दल बापचा मार बसतो, लेखिकेची बोलणी बसतात पण तिची सवय कायम असते. तिची कृति स्वाभाविक आणि निव्वळ तिच्या बालमनातून उत्स्फूर्त अशी असते. लेखिकेच्या आदर्श सृष्टीच्या समांतर सरकत्या बिंदूत इंदिरा एका शेतकरी गड्याची मुलगी आहे जो खेडेगावात मनमुराद शेतीची कामे करुन सुखात आहे. इंदिरा शाळेत जाते. तिला घरकुल बांधायची हौस असते. पुढे ती पंधरा सोळा वर्षाच्या वयात स्थापत्यशास्राचे धडे घेते. तिच्या बुध्दीला वाव मिळतो. कल्पकतेला क्षेत्र मिळते. वास्तवतेच्या पातळीवर मात्र तिच्या नैसर्गिक वृत्तीचा विकास होणार नाही. तिचा बाप एका गड्याच्या पोराशी लग्न लावून देईन. तिची सारी शक्ती, तिची सारी बुध्दी हवे ते मिळवण्यात व जगाशी भांडण्यात जाईल. तिचं व्यक्तिमत्त्व नाहीसं होऊन ती दुसर्याचे काम उपसणारे यंत्र बनेल. या दोन रेषा नेहमीच समांतर राहतील का असा लेखिकेला प्रश्न पडतो.
२.जांभाई काॅलेजातील मुलींच्या खोलीत एका मोठ्या टेबलाभोवती जमलेल्या मुली कंटाळलेल्या असतात. घंटा होऊन वर्गात जाण्याची सर्वजणी वाट पाहून थकलेल्या असतात. कंटाळा.. शून्यपणा.. निष्क्रियता.. प्रतीक्षा.. जांभाईची लाट येते. घंटा होते. त्या वर्गात व्याख्यानाला जाऊन बसतात. पुन्हा त्या कंटाळतात. घंटा होऊन व्याख्यान संपण्याची वाट पाहतात. पुन्हा जांभाईची लाट सरकते. दुसर्या प्रसंगात दुपारी चौघी जावा विणीत बसतात. कितीतरी वर्षे झाली. त्या दुपारी विणीतच होत्या आणि कंटाळत होत्या. तिसऱ्या प्रसंगी संध्याकाळी चौघे मध्यमवयस्क कचेरीतून कंटाळून येत व कंटाळून चहा घेत. ठरीव रस्त्याने फिरायला जात. उद्याची प्रतीक्षा करत. हे असे जीवन एकीकडे आणि दुसरीकडे पृथ्वीवर अनंत अज्ञात प्रदेश पसरलेला.. मानवी प्रयत्नांनी निर्माण झालेला ज्ञानसागर. एकीकडे मानवी प्रयत्नांची, विजिगीषेची वाट पाहणारा निर्वात प्रदेश आणि दुसरीकडे कंटाळलेले, वाट पाहणारे आणि जांभाया देणारे.
३.भ्रमनिरास हरीशचे लोकसेवेचे पहिलेच वर्ष असते. पहिल्या वर्षाच्या उत्साहाची नदी एवढी खळखळते व वेगाने धावते की तिचा लवकरच तळ दिसू लागतो. हरीश एक – दोन साथीदारांना घेऊन शहराच्या दरिद्री भागातून हिंडू लागतो. वस्तीचे स्वरुप बदलण्याचा चंग बांधतो. पण ती उत्साहगंगा परिस्थितीच्या वाळवंटात विदीर्ण होते. उदास हरीश व्हरांड्यात पडलेला होता. तितक्यात त्याच्या कानावर एका भिकार्याच्या एकतारीचा आवाज पडतो. तो त्याला हाताशी धरण्याचे ठरवतो. त्याच्या सुरात त्याला कळवळा जाणवतो.पण हरिशला त्याच्याशी बोलताना समजते की तो फक्त बंगल्यांतूनच हिंडतो. हरिशला वाटले होते की त्याच्या आवाजात आर्त जाणीव आहे पण आळशी पोटाची हाक होती. त्याचे संगीत धनिकांच्या उंबरठ्यासाठीच राखून ठेवले होते. हरिशचा भ्रमनिरास होतो.
४.वहाणा ही वर्हाडातील उमगावमधील दादाजी चांभाराची कथा. तेव्हा गावात चहा कंपनीकडून पिवळ्या लेबलाचे पुडे घेऊन चहाचा प्रचार करायला घरोघर, कष्टकऱ्यांना बिनपैशाने चहा पाजला जायचा. दादाजीच्या दुकानाच्या तिन्ही भिंती खिळ्यांवर अडकवलेल्या वहाणांच्या एकजात उत्तम जोडांनी भरगच्च भरलेल्या असत. त्या एकखणी दुकानाच्या जोरावर दादाजींनी लहानसा मळा घेतला होता. चारखणी घर बांधले होते. वय झाल्यावर त्याने ते सर्व मुलाच्या सोमाच्या सुपूर्त केले होते. दिवसभरात दादाजी एखादा वहाणांचा जोड तयार करीत. नातीशी संभाषण करीत. त्याच सुमारास गावात ‘नाग’ कंपनीचा एजंट रामलाल उमगावांत येतो. तो दादाजींच्या वहाणा बनवण्याच्या कसबावर घाव होता. चार दोन वर्षे जातात. दादाजींच्या दुकानावर ‘नाग’ बूट कंपनीची पाटी लागते. दादाजीला तिथे आपल्या कसबाने घडवलेली वहाण दिसत नसत तर त्या जागी दुरुस्तीसाठी आलेली बाजारु वहाण दिसे अशी ही कथा.
५.त्यांची काळजी या कथेत चुनीलाल शेट रात्री घरात सामसूम झाल्यावर एक लहानशी पहार, थापी, एका लोखंडी घमेल्यात थोडा भिजवलेला चुना व थोडे सिमेंट घेऊन देव्हार्यापाशी येतात. देव्हारा उचलून त्याखालील फरशी काढून तिथे खड्डा करुन त्यात कपाटातील रुपयांच्या नाण्यांचा डबा तिथे ठेवतात व वरुन पुन्हा फरशी बसवून थापीने चुना सिमेंट लावतात. त्यांची फार मोठी काळजी दूर होते. त्याचवेळी एका चाळीत एका खोलीचे कुलूप उघडले जाते. एक थकलेली व्यक्ती आत शिरते.तो दुष्काळनिवारणाच्या कार्यात असतो. जनसमुदायापुढे भाषण देत आहे असे विचारस्वप्न त्याला पडते. त्याचे बांधव दर्याखोर्यांतून हिंडणारे, शेतात राबणारे, मेंढ्यांचे कळप पाळणारे, मासेमारी करणारे, कारकून असतात. त्याला त्यांची काळजी वाटत असते. त्या विचारांनी त्याला झोप लागत नसते. असे काळजी वाटण्याचे दोन टोके लेखिकेने यात मांडले आहेत.
६.लहरी उर्मिला व तिचा पती श्यामकांत. गेल्या पंधरा दिवसांपासून तिने मनाशी ठरवले होते की सुट्टीच्या दिवशी दोघांनीच समुद्रावर एका शांत ठिकाणी जाऊन सबंध दुपार तिथे गप्पा करीत, वाचत, समुद्राचे संगीत ऐकत घालवायची. पण तो आधीच ठरल्याप्रमाणे एका सभेला निघून जातो व तिला राग येतो व ती मग एकटीच समुद्रकिनारी जाते. समुद्राच्या लाटांबरोबर तिच्याही मनात विचारांच्या लाटा लहरतात.तिला अगदी एकटे वाटते. दुसरीकडे श्यामकांत घरुन सभेला निघतो.तिथे मित्राचे भाषण होणार होते. त्या सभेला येण्याबद्दल तो उर्मिलाला किती आर्जव करतो पण ती वळत नाही. बायकोच्या लहरीखातर तो ठरलेल्या भेटीगाठी टाळू शकत नसतो. पण तिथे त्याला एकटे असल्यासारखे वाटते. दोघे घराकडे निघतात. तो तिच्यासाठी वेणी घेऊन निघतो. ती त्याची वाट पहात असते अशी ही कथा.
७. नदी किनारी लेखिकेने या कथेत नदीकिनारी वसलेल्या व आगीत जळालेल्या बुरुडांच्या वस्तीचे शब्दचित्र उभे केले आहे. आग लागून सारे खाक होते पण वस्तीतील लोकांची तिच बेफिकिरी.. तिच हिंमत.. तिच एकजूट आणि आपल्यापैकी कुणाच्या विशेष गरजांची जाणीव लेखिकेला पहायला मिळते. पुन्हा कशीबशी बस्ती उभारायला लागते. त्यांचं जीवन म्हणजे एक आसरा सोडत दुसरा निवारा निर्माण करीत भटकत राहणारे.. हक्काची जागा नसलेले. शेवटी लेखिकेने आशावाद मांडला आहे.
८.दगडांची गोष्ट दगडांना वाचा फुटते आणि ते गोष्ट सांगू लागतात. आधीचे जीवन कसे मूकस्तंभ, विझलेल्या तार्यांसारखे, धरणीमातेचे संगीत कणाकणात भरुन घेत होते. मग तिथे मानव आला व त्याने त्यांचे चौरस चिरे बनवले. त्यांच्या अंतर्यामी संगीताचा झरा आटून ते मूक बनले. त्यांना एकावर एक रचून मानवाने मंदिर बनवले व एकातून मूर्ती घडवली. त्याची प्राणप्रतिष्ठा झाली. भाविकांपेक्षा भोंदूंची संख्या वाढली. दुसरीकडे वेगळ्याच घटना घडत होत्या. तिथे पहाटे चौघडा वाजत होता. त्या निनादाने रुग्णशय्येतील कित्येक जिवांना पहाटे सुखकर मौज वाटत होती. तेथे दगडांचे देवालय नव्हते तर मानवतेचे मंदिर होते. त्या मंदिराचे चिरे ही गोष्ट सांगतात.
९.दमडी ही कथा अनेकदा मराठी भाषेच्या पाठ्यपुस्तकांत आलेली आहे. दहाबारा वर्षाच्या पोरसवदा दमडीचे हे शब्दचित्र. ती आपल्या आजीबरोबर बाजारात आलेली असते. सोनेगांवजवळ ठेक्याच्या वावरात ती सकाळी मोठ्या पहाटे आजीबरोबर गेली होती. तिच्या कमरेएवढ्या उंच वाढलेल्या गवताच्या पेढ्या ती बांधू लागली होती.दोन अडीच तास खपून भारे तयार झाले होते. ते डोक्यावर घेऊन दोन अडीच मैल चालून बर्डीच्या बाजारात पोहचलेले होते. तिथे आजी तिला सुट्टी देते. ती मग भाकरीची गठडी घेऊन सार्वजनिक नळावर हातपाय धुवून भाकरी खायला बसते. तिच्या पाठीशी शेव – भजीवाल्याची राहुटी असते. ती कल्पनेनेच जणू शेव खाते. भाकरी खाऊन झाल्यावर त्याच्या फटकुराची चुंबळ करुन ती उशाला घेऊन झाडाच्या मुळावर डोके ठेवून ती झोपी जाते. तिने डोळे मिटले, पण ती चालतच होती. तिच्या डोक्यावर भारा होता पण तो खमंग कुरकुरीत शेवेचा भारा होता. स्वप्नात तिला आजी दिसते. तिच्या मागून ती गोठ्यात जाते. आजी भारे सोडते. तिला निखार्यावर भाजल्या जाणाऱ्या भाकरीचा खमंग वास येतो. ती झोपेत कुठल्यातरी गावात पोहचते. स्वप्नात आजी तिला ‘दमडे – दमडे’ करत होती पण प्रत्यक्षात त्या आजीच्या हाका होत्या. आजी बाजारातून तिला उठवायला आलेली असते. दीड दमडीचा तो जीव तो असाच चालत बाजारी येईल असे लेखिका शेवटी म्हणते.
१०.संगीताचा झरा ती दहा अकरा वर्षाची असताना वडील तिला सुंदराबाईच्या राधेकृष्णाच्या भजनांची गाण्याची तबकडी आणून देतात. तिला तिचा नाद लागतो. तिच्या साथीवर ती स्वतः गायला लागते. वडील तिला गाणे शिकवतात. आईला ते नापसंत असते. जावई यशवंतराव गायनाचे हौशी होते. शैलाचा जन्म होतो. बाळू तीन वर्षांचा असताना यशवंतराव आजारी पडतात. त्यांना क्षय होतो. ती सावित्री सारखी नवर्याचा जीव वाचवते. पण तिच्यापुढे उपजीविकेचा प्रश्न असतो. ती गाण्याच्या बैठका करण्याचे ठरवते.केवळ कर्तृत्वाचाच नव्हे तर आपल्या अंतरंगाच्या अभिव्यक्तीचा मार्ग तिला सापडतो अशी ही कथा.
११.लहानी लेखिका भटकत भटकत एका गांवातील घराझोपड्यांपाशी पोहचते.त्यांना वालाच्या वेलांच्या मांडवात तीस पस्तीशीची लहानी बसलेली दिसते. तिची आंघोळ चाललेली असते. तिला कामदाराने ठेवलेली असते. तिचा नवरा लहानपणीच मरुन गेलेला. तिची पोरगी म्हणजे तिचे विश्रांतीस्थान होते. ती लेखिकेला तिथे शाळा खोलाल का म्हणून विचारते. लेखिका संध्याकाळी शहराकडे परतते. गढीच्या अवशेषांतच जणू ते गाव दबले गेले होते असे लेखिकेला वाटते. पेंढार्यांचे भूत जणू अजूनही गावाच्या छातीवर बसलेले लेखिकेला जाणवते.

१२.जाईबाई पन्नासीच्या घरातील मुख्याध्यापिका जाईबाई चौधरी यांना पिशवीत वर्गणीचे पुस्तक घेऊन भराभर जाताना नागपुरांत अनेकांनी पाहिलेले आहे. अनेकांना हौशीने पुढील वाट दाखवणे, लोकगीते ऐकवणे, गोड नाचू दाखवणे, स्वतःचे अनुभव, कहाणी सांगणे असे त्या करीत. सव्वाशे हरिजन मुलींच्या मराठी चार इयत्तांपर्यंत शिक्षणाची त्यांनी सोय केली. गरीब, हरिजन कुटुंबातील त्यांचा जन्म झालेला. बाप रस्त्यावरची मोलमजुरी करणारा. त्यात सन १८९६ चा दुष्काळ. बालपणात मिस ग्रेगरी साहेबांची शाळा त्यांच्या नजरेस पडते. मुलीने शाळेत जायला तेव्हा विरोध होता. पण बाप तिला शाळेत पाठवायला तयार होतो. १९०१ मध्ये जाईबाईचे लग्न होते. सासर उमरेडचे. ते नागपूरला येतात. जाईबाईला मिशनरीबाई शाळेत नोकरी देते. नवरा शाळेच्या टांग्यावर नोकरीला राहिला. जाईबाईला ख्रिश्चन व्हायला सांगतात तशी ती नोकरी सोडून मोलमजुरी करु लागते. त्यांना पहिला मुलगा झाला आणि तो वारलाहि. तिचे मन स्वतःच्या धर्मापासून चळले नाही. श्री ठवरे यांनी जाईबाईला त्यांच्या शाळेत काम दिले. पुढे ती शाळा नामशेष झाली. पण त्यांनी आपल्या जातीतील मुलींना साक्षर करणे चालूच ठेवले. स्वतःची शाळा काढली. नव्या जगातील स्त्री अशीच तडफदारपणे अडचणीतून मार्ग काढील असे लेखिका म्हणते.
१३.सदाचे निराश्रित ही पन्नाशीपलीकडच्या म्हातारा राणोजीची कथा. सहा सात वर्षापूर्वी तो घरात कामाला लागला. वर्ध्याजवळच्या एका खेड्यात त्याचे घर होते. शेते वायद्याने घेऊन कास्तकारी करायचा. वर्षाचे जे धान्य होई त्यावर बायको व तीन मुलींसहित राणोजी आनंदात राहात होता. दोन मुलींची लग्ने झाली. जावई नागपूरकडचे. राणोजी नागपूरला येतो. चपराशी जावयाच्या टीचभर बिर्हाडात त्याच्या अडगळीची भर पडते. मोठ्या जावयाच्या वशिल्याने राणोजी बांधकाम खात्यात चुन्यामातीचे काम करतो. पुन्हा आपले स्वतंत्र घर करतो. धाकट्या मुलीचं लग्न करतो. घरजावाई करतो. घरच्या घरी राहून जनावरं पहा. एवढ्याशा रुपयांसाठी दुसर्याच्या घरी राबता आणि घरचं चोरापोरी गेलेले पाहता असे घरजावाई त्यांना ऐकवतो. सदैव आसारा शोधणारा पण सदाचा निराश्रित राणोजी आजारी पडतो. राणोजी येणार नाही म्हणून नवीन नोकर ठेवला जातो पण आजारातून राणोजी कसाबसा घरकामाला हजर होतो. त्याच्या थरथरत्या हातांनी काम जड होत होतं. तो कोपर्यात जाऊन बसतो. आपलं काही काम उरलं नाही असं म्हणून तो सखूबाईच्या घरुन निघतो. पण सखुबाई सांगते जा आराम कर पण दुपारी लवकर ये. दसरा दिवाळी आली आहे. बसल्या बसल्या काम कर. अशी ही हृदयस्पर्शी कथा.
१४.कला धोबिणीचे वैभव ही कथा देखील पूर्वी मराठीच्या पाठ्यपुस्तकात होती.तिलंगणाच्या संस्कृतीतील कला धोबीण लेखिकेकडे कामाला लागली तेव्हापासून तिच्यावर जीव जडला होता. ती सहासात पोरांची भारदस्त आई होती. मधूनच हिंदी बोले. नवर्याच्या कौशल्याबद्दल त्याच्या उबळीबाबत बोले. कलाचा नवरा मरतो. ते समजत नाही. तिसरा दिवस असतानाच तिची मुलगी झालेले कपडे घेऊन येते. कला धोबीणीने दोन घरी काम मिळवले होते. बापाच्या मृत्यूने तिच्या पोरीबाळींचा निवारा कमी झाला असला तरी त्या उघड्या पडल्या नव्हत्या. त्यांच्या पाठीशी त्यांची आई दुणावल्या हिंमतीने उभी झाली होती. तिचा नवरा गेला पण तिला आपल्या कलेची वारसदार करुन गेला.
१५.आम्ही सकाळी लवकर उठून मळ्याला पाण्याचा एक फेरा करायचा व मग ताज्या भाजीच्या दोन टोपल्या घेऊन चंदीच्या घरी भाजी घेऊन जायची हा सारजीचा नित्यक्रम होता. त्याच्या जोडीला ग्यानबा होता. त्यांचा मळा गावापासून मैलभरावर होता.गाव लागले की पहिला बंगला डेप्युटी कमिशनरसाहेबांचा होता. तिथे रोज ताजी भाजी लागे. त्यांना एकलुती एक मुलगी सुमित्रा होती. सुमित्रा व तिची आई इंदिराबाई यांना गावात रावसाहेब महाजन यांच्याकडे जेवायला जायचे होते. त्या जातात तिथे. तिथल्या पोकळपणाने, दांभिकतेने सुमित्रीचे मन विटून जाते. कुठे एकमेकांविषयी सहानुभूति नाही. आम्ही असे. आम्ही तसे असा बडेजाव सुमित्राला तिथे खटकतो. तिला दुसरीकडे पीयर क्युरी व मारी क्युरी या संशोधकांची प्रयोगाची खोली डोळ्यापुढे येते.आता आम्ही रेडियमचे वजन निश्चित करण्यात गुंतलो आहो. प्रयोगाच्या यशस्वितेला आम्ही दोघी सारखे. यांचे ‘आम्ही’ कुठे आणि आईचे, पंगतीतील वकीलीणबाई डाॅक्टरीणबाई यांचे ‘आम्ही’ कुठे याची ती तुलना करते.
१६.चंद्रास्त एकदा लेखिकेची नजर चतुर्थीच्या चंद्रकोरीकडे जाते. चंद्रकोरीचे ते अलौकिक, मोहक रुप पाहून त्या मोहून जातात. त्या सौंदर्याचा आस्वाद लुटतात. हळूहळू ती चंद्रकोर अस्ताला जायला लागते. तेव्हा त्या अस्वस्थ होतात. प्रकाशाचा लोप आणि जीवनाचा अंत या कल्पना या लघुनिबंधात मांडल्या आहेत. त्याचवेळी त्यांना चंद्रकोरीसारखी नवतेजाने विलासणारी मृत वहिनी आठवते व त्या दु:खी होतात. अपुऱ्या जाणिवेमुळे आपल्याला ही दृश्ये पाहून हुरहुर वाटली असे त्यांना वाटते. आपण आपल्या भावना, विचार, कल्पना इतरांवर लादत असतो. त्यामुळे त्या गोष्टींचा आपल्याला आस्वाद घेता येत नाही. आपल्या दृष्टीने आपण समोरच्या दृश्याचा अर्थ लावतो पण ते चुकीचे आहे. तटस्थपणे सौंदर्याचा आस्वाद घेतला पाहिजे तरच ते निखळ आनंद देऊ लागते. माणसाने निसर्गाशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवले तरच सृष्टीची गुपिते आणि तिच्या जीवनातील अतिउत्कट क्षण अनुभवायला मिळतात असे सुंदर चिंतन लेखिका या लघुनिबंधात मांडते.

— परीक्षण : विलास कुडके
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800