शर्यत
“शर्यत” हा जयसिंग शिंदे यांचा चंद्रकांत शेट्ये प्रकाशन मंदिर, कोल्हापूर मार्फत १३/८/१९६४ रोजी प्रकाशित झालेला छोटेखानी कथासंग्रह.
प्रा. अच्युत केशव भागवत यांनी या कथासंग्रहाला प्रस्तावना लिहिली असून वि. स. खांडेकर यांनी आशीर्वाद दिले आहेत.
कोल्हापूरचे श्री जयसिंग शिंदे हे ऐन विशींत कथेच्या वाटेने लेखनाकडे वळले पण पुढे त्यांनी पत्रकाराचा पेशा पत्करला असा परिचय वि. स. खांडेकर यांनी करुन दिलेला आहे. काही वेगळ्या स्वरुपाचे आयुष्य जगणाऱ्या, हीनदीन पतितांच्या विश्वाशी एकरुप होऊन सत्याचे सुपीक वेचण्याचे सामर्थ्य ह्या संग्रहातील कथा दाखवतात असा उल्लेख प्रा. अच्युत केशव भागवत आपल्या प्रस्तावनेत करतात.
या संग्रहात श्री जयसिंग शिंदे यांच्या निवडक ९ कथा आहेत. त्यापैकी भेट ही कथा बालभारतीच्या पहिल्या मालिकेत येऊन गेली आहे. खडतर परिस्थितीतसुध्दा शिकण्याची जिद्द बाळगणारा शीख छोकरा, त्याचे ते तेजस्वी, बाणेदार व्यक्तिमत्त्व, त्याची ईर्ष्या, स्वाभिमान,आत्मविश्वास आणि मातृभक्ति ; निवेदकाच्या बेबीला बक्षीस देतांना त्याने दाखविलेली हृदयाची श्रीमंती.. हे सर्व थोडक्यात पण अतिशय प्रभावीपणे कथाकाराने दाखविले आहे याचा प्रस्तावनेत आवर्जून उल्लेख करण्यात आलेला आहे.
१.फूटपाथ
दत्ता आणि रामू एकाच वयाचे. बारा तेरा वर्षांचे. दोघेहि बूट – पाॅलिशचा धंदा करायचे. दोघांनाहि नात्यागोत्याचे कुणी नव्हते.काळ्या बाजारात थिएटरवर तिकीटे विकताना दत्ता पकडला जातो व तो तुरुंगात जातो. तोपर्यंत त्यांच्यात गट्टी होते. दोघे दुकानाच्या फळीवर झोपून दिवस काढायचे. पावसाळ्यात मात्र त्यांना दिवस काढण्याचा प्रश्न पडायचा. दत्ता तुरुंगातून परत येतो. रामूच्या मनात येते की तुरुंगात असतो तर वर कौलं असलेल्या चार भिंतींआड झोपायला मिळाले असते. रामू मग थिएटरवर तिकिटाचा काळाबाजार करायला जातो व स्वतःला अटक करवून घेतो अशी ही कथा आहे.
२.शर्यत
रंगा नाणावलेला पट्टीचा निष्णात स्वार. कित्येक चुरशीच्या शर्यती त्याने जिंकल्या होत्या परंतु गेल्या तीन शर्यतीत ऐन वेळी असं काहीतरी चमत्कारिक व्हायचं आणि हातातोंडाशी आलेली शर्यत तो गमावून बसायचा. तिसऱ्या वळणावर जिथे चार महिन्यांपूर्वी जहागिरदारांच्या विक्रमसिंहांना आणि रंगाला अपघात झाला होता तिथे आलं की अपघाताच्या आठवणींने तो घायाळ होई आणि सारं भान हरपून एकाएकी लगाम खेचून घोडा उभा करी. रंगाच्या घातकी कृत्यामुळे विक्रमसिंह यांचा अपघात घडून आला होता. त्यामुळे रंगांचं मन त्याचं त्याला खात होते. त्याला आठवतं विक्रमसिंह हा पाहुणे म्हणून आलेल्या जहागिरदाराचा पुत्र होता. महाराजांचा युवराज व विक्रमसिंह यांच्यात शर्यत लागते. युवराज जिंकला पाहिजे असे महाराज रंगाला बजावतात. त्याकरता रंगा विक्रमसिंह यांचा अपघात घडवून आणतो. पण या कृत्यामुळे प्रायश्चित्त म्हणून तो पुन्हा कधी शर्यतीत भाग घेत नाही अशी ही कथा आहे.
३.जाणीव निवेदकाच्या आॅफिसात सुगंधा नावाची नखरेल तरुणी टेलिफोन करायला येते. तिच्या बोटांचा स्पर्श निवेदकाला होतो आणि तो सुखावतो. त्याच्या घरी त्याची पत्नी शांता त्याला आठवते. तीन वर्षांपूर्वी नववधू म्हणून आलेली शांता आणि दीड वर्षाचा मुलगा कुटुंब यात गुरफटलेली शांता यात खूप बदल झालेला होता. दुसर्या दिवशी निवेदक कॅफेत शिरणार तोच त्याची सुगंधाशी भेट होते. निरनिराळ्या आॅफिसात ती स्टेशनरी माल पुरवठा करण्याचा व्यवसाय करत होती.ती आणि तिची मैत्रीण उपनगरात खोली घेऊन रहात होत्या. निवेदकाच्या ओळखीने त्यांच्या आॅफिसात स्टेशनरी घ्यावी म्हणून ती गळ घालते. ते कॅफेत काॅफी घेतात. ती व्हिजिटिंग कार्ड देते. रविवारी सायंकाळी घरी येण्याचे व नंतर पिक्चरला जाऊ म्हणून निमंत्रण देते. पुन्हा एकदा तिच्या बोटांचा निवेदकाला स्पर्श होतो. निवेदक सुखावतो. रविवारी तो दुपारची ताणून देतो. शांता त्याला झोपेतून जागे करते. ती सुगंधासारखीच नट्टापट्टा करुन तयार झालेली त्याला आढळते आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसतो. ती सांगते की आपल्या लग्नाचा चौथा वाढदिवस आपण हाॅटेलात व नंतर पिक्चरला जाऊन साजरा करु. तिच्यात एवढा बदल कसा झाला असे विचारल्यावर ती सांगते की आजवर मी फक्त माझाच विचार केला, रोजच्या कामांचा , मुलाच्या कटकटीचा, कमी प्राप्तीचा विचार केला त्यामुळे दुर्मुखलेली राहिली. मला कळून चुकलं की स्वत:ला दु:खात लपेटून घेतल्याने तुमचं मन घरातून उडालं असावं. हळूहळू घरावरचं, संसारावरचं व तिच्यावरचंहि प्रेम नाहीसं होईल याची तिला जाणीव होते. निवेदक सुगंधाचे निमंत्रण स्वीकारण्याऐवजी शांताचे मन मोडत नाही अशी ही कथा आहे.
४.नरभक्षक भंडार्यात थाडेझरी म्हणून एक खेडे आहे. तिथे निवेदकाने शिकारीसाठी मुक्काम ठोकला होता. त्या मुक्कामात एक वृद्ध खेडुत नरभक्षक वाघाची भीषण कथा ऐकवतो. त्या नरभक्षकाच्या मागावर निवेदक जातो. सोबत एक माहितगार शिकारी असतो. ते जंगल तुडवत निघतात. त्यांना पाणंद दिसते. पाणवठा दिसतो. नरभक्षक वाघाचा माग घेता घेता अचानक निवेदकाला एका दरडीच्या मागे त्याचे दोन कान दिसतात. नरभक्षक वाघ निवेदकाच्या तावडीत सापडायच्याऐवजी निवेदकच नरभक्षक वाघाच्या तावडीत सापडतो. त्या प्रसंगी निवेदक बंदूकीचा घोडा दाबतो तेव्हा त्याला दरडीपलिकडे उभा असलेला वाघ पळून गेलेला दिसतो. तो मागे पळतो पण निराश होऊन माघारी परततो तो दरडीपाशी एक वाघ मरुन पडलेला दिसतो. मग पळून गेलेला वाघ कोणता असा प्रश्न पडतो. पण मग नंतर कळते की पळून गेली ती मादी असते आणि मरुन पडलेला वाघ नरभक्षक वाघ असतो अशी ही कथा आहे.
५.ठिणगी
सौ दमयंती देसाई अकरावीच्या वर्गात शिकत होती. सुभद्राबाईंचे त्या वर्गावर तास असायचे. गंभीर प्रकृतीच्या सुभद्राबाईंना तिच्या हसर्या चेहर्याचा राग यायचा. सौ दमयंती देसाईबद्दल सुभद्राबाईच्या मनात नकळत सूक्ष्म अढी निर्माण होते. वस्तुत:एक हुषार मुलगी आपल्या वर्गात आली याबद्दल वर्गशिक्षिका म्हणून त्यांना आनंद वाटायला हवा होता पण तसं घडलं नव्हतं. तिच्या सौभाग्यालंकारावर सुभद्राबाईची दृष्टि खिळायची. एकदा टिफिनरुममध्ये सर्व मुली दमयंतीला नवर्याचे नाव घेण्याबद्दल भंडावून सोडतात. ती नाव घेते आणि तिथे हास्याची मोठी लाट उठते. नेमके तो प्रकार सुभद्राबाईंच्या दृष्टीस पडतो. त्यांच्या अंतर्यामी वेगळं दु:ख होतं. त्या अविवाहित होत्या. तरुण वयात एकाकी जीवन जगत होत्या. पण लग्न होऊन वर्गात आलेली दमयंती रोज दृष्टीला पडू लागल्यावर सुभद्राबाईंना तिचा हेवा वाटू लागला. त्यांच्या मनात चलबिचल होऊ लागली. एकदा सुभद्राबाईचा दमयंतीशी खटका उडतो. ती वर्गात काहीतरी चघळत असावी असा संशय येतो. सुभद्राबाई दमयंतीवर कडाडतात व वर्गाबाहेर घालवतात. तिला डोहाळे लागले असे मुली कुजबुजतात. परीक्षा जवळ आलेली असताना दमयंती ४ दिवस शाळेत गैरहजर होती याबद्दलही त्या कडाडतात. एक तर संसार करावा, नाहीतर शाळा तरी करावी हे बोलणे दमयंतीच्या जिव्हारी लागते. ती शाळेला पुन्हा येत नाही. सुभद्राबाई वरमतात. दमयंतीची रिकामी जागा त्यांना अस्वस्थ करत असते. त्या शाळेतील विधुर असलेल्या देशपांडेसरांशी लग्न करतात अशी ही कथा आहे.
६.शिकार
विलासपूर संस्थानांतील मानसिंगराव इनामदारांचा सत्वशील हा एकुलता एक मुलगा होता व तो एक निष्णात शिकारी होता. महाराजांची मानसिंगरावांवर विशेष मर्जी होती. मानसिंगराव अकाली कालवश होतात. त्यांच्यामागे तोच लोभ सत्वशीलच्या वाट्याला येतो. संस्थानांत एक नवीन धरण बांधण्याची योजना महाराज आखतात. त्यासाठी मुख्य इंजिनियर म्हणून विनायकराव नगरकर यांची नेमणूक करतात. त्यांची तरुण मुलगी सुरेखा जी मुंबईत मेडिकलला होती ती सुट्टीत घरी आल्यावर एकदा महाराजांच्या दृष्टीस पडते. ते तिला शिकार शिकून घ्यायला लावतात. त्यासाठी महाराज सत्वशीलला सांगतात. आठपंधरा दिवसात सत्वशील सुरेखाला शिकारीचं तंत्र शिकवतो. सुट्टी संपवून ती मुंबईला जाते. त्यानंतरचा सहा महिन्यांचा काळ सत्वशील सुरेखाच्या सहवासाच्या गोड आठवणीत घालवतो. तो तिच्या पुढील सुट्टीत परत येण्याची वाट पाहतो. सुरेखा येते पण तिच्याबरोबर एक तरुणही आलेला असतो. ती ओळख करुन देते. तो तिचा मित्र प्रकाश असतो. सत्वशील मनातून नाराज होतो. ती प्रकाशबरोबर रमून गेलेली सत्वशील पाहतो. सत्वशीलकडे ती दुर्लक्ष करते. त्याचे स्वप्न भंगते. सुरेखा व प्रकाश सत्वशीलला डुकराची शिकार दाखवायचा आग्रह करतात. तो डुकराची शिकार करतो. दुसर्या डुकराच्या शिकारीला सत्वशील सरसावतो. पण ते विहिरीत पडते. त्यामुळे सगळे भाले टाकून देतात. ते डुक्कर पाण्यातून वर येते तेव्हा सर्व बेसावध असतात. ते डुक्कर आक्रमक होते. प्रत्येकजण जीव मुठीत घेऊन पळू लागतो. डुक्कर मुसंडी मारुन प्रकाशच्या रोखाने धावू लागते. सुरेखा वाचवा म्हणून ओरडते. सत्वशीलच्या मनात क्षणभर वेगळा विचार येतो पण त्याच क्षणी त्याच्यातला शिकारधर्म जागा होतो व तो डुकराची शिकार करतो. प्रकाशचे प्राण वाचतात. दुसर्या दिवशी सुरेखा व प्रकाश मुंबईला निघून जातात. सुरेखा सत्वशीलला आभाराचे पत्र पाठवते. तेव्हा सत्वशीलला कळते की प्रकाशचं तिच्या मैत्रिणीशी लग्न ठरले आहे. सत्वशीलच्या डोळ्यांची भाषा तिला कळली असल्याचेही ती पत्रात लिहिते. त्यामुळे सत्वशीलला प्रेमसाफल्याचा आनंद होतो. सुरेखा त्याची होते. अशी ही कथा.
७.शाल
रविवारचा बाजार करुन परतलेल्या खेडुतांनी भरलेली गाडी कोल्हापूर स्टेशन सोडून हालते. डब्यातून रेटलेल्या गर्दीचे लेखकाने शब्दचित्र रेखाटले आहे. त्या गर्दीत डोक्याला टीचभर फडकं गुंडाळलेला आणि तोंडावर देवीचं ठोकं पडलेला इसम दाराजवळ बाकाच्या खाली बसलेला असतो. त्याने एक पिशवी फळीला उभी टेकून ठेवली होती. एक रेशमी तांबड्या रंगाची शाल पिशवीत कोंबलेली होती. त्याच डब्यात लखा चांभार दार पाठीशी घालून बसलेला असतो. रात्रभर खपून घाम गाळून त्याने वहाणा शिवल्या होत्या. सांगलीच्या बाजारात त्याचा एकही नग खपला नव्हता. तसेच गाठोडे घेऊन तो घरी परतला होता. कोल्हापूरच्या बाजारात त्याला आशा वाटत होती. पण तेवढ्यात पावसाची धार लागते. त्याला नगद पैशाची जरुरी होती कारण त्याचे दहा वर्षांचे पोर – यशवंत तापाने फणफणला होता. इंजेक्शनला सात रुपये नऊ आणे पडत होते. घरातील भगुणं घेऊन तो सावकराकडे जातो पण नड भागत नसते. हातकणंगले स्टेशनवर गाडी जास्त वेळ थांबते. जिरग्याच्या तांदळाचा काळाबाजार होतो या संशयावरुन पोलीस डब्याडब्यातून झडती घेत असतात. ते पाहून रेशमी तांबडी शाल कोंबलेल्या पिशवीचा मालक अस्वस्थ होतो. पुढील स्टेशनवर तो ती पिशवी तशीच ठेवून खाली उतरुन निघून जातो. लखाला ती शाल पाहून आशा वाटते. ती विकून सहज दहा रुपये येतील व पोराचं औषधपाणी होईल असे त्याला वाटते. ती पिशवी घेऊन तो स्टेशनवर उतरतो पण पोलीस त्याला पकडतात. त्या पिशवीतील लाल शालीतून दोन चोरट्या दारुच्या बाटल्या बाहेर पडतात अशी ही हृदयस्पर्शी कथा आहे.
८.बस
शालन देऊळगांवकर ही तरुणी इंटर आर्टला शिकत असते. निवेदक बँकेत असतो. दोघांची गाठ नेहमी एका बसस्टॉपवर होत असते. एके दिवशी ते शेजारीशेजारी बसतात. एका स्टाॅपवर तिची मैत्रीण बसमध्ये चढते म्हणून ती निवेदकाच्या शेजारुन उठून मैत्रीणीसोबत बसते. पण पुस्तके मात्र निवेदकाच्या शेजारीच विसरुन जाते. निवेदक मनातल्या मनात तिची काल्पनिक कहाणी रचतो. निवेदकाच्या समोरच बसमध्ये एक तरुण तिच्याशी परिचय करुन घेतो. पुढे त्यांनी लग्नाचा बेत आखल्याचे निवेदकाला समजते. पण त्या लग्नाला तिच्या घरच्यांचा विरोध असतो. ती घर सोडण्याचा निर्णय घेते. ती आठ दिवस बसला दिसत नाही. ती श्रीमंत बापाची पोर आहे म्हणून त्या तरुणाने तिच्याशी लग्न केलेले होते हे निवेदकाला अगदी उशीरा कळते. त्याने तिला बापाकडून पैसे आणायला सांगितले. तिने नकार दिल्यावर जळक्या लाकडाने तिच्या हाताला डाग दिला होता. तिची ती स्थिती पाहून निवेदकाला दु:ख होते. शालनचं जीवन उध्वस्त करायला जी एक नंबरची बस निमित्त झाली त्या बसने मग निवेदकाने कधी प्रवास केला नाही अशी ही कथा आहे.
९.भेट
निवेदकाला दिल्लीत स्थायिक होण्याचा योग येतो. चांदणी चौकातील बर्याच गोष्टींशी त्याचा परिचय होतो. त्याला थोडीबहुत खरेदी करायची असते.त्याची मुलगी बेबी नुकतीच इंग्रजी शिकायला लागली होती. तिच्यासाठी पहिलं प्रायमर आणायचे त्याने कबूल केलं होतं. ते एका दुकानातून खरेदी करुन तो घरी परत निघाला होता. बाजारातल्या एका दृश्यावर त्याचं लक्ष वेधले जाते. एक चार चाकांची ‘हरेक वस्तूं’ नी भरलेली हातगाडी एका झाडाच्या आडोशाला उभी असते. त्या गाडीच्या खाली सावलीत एक १०-१२ वर्षांचा तरतरीत शीख मुलगा खोक्यावर बसून पुस्तकात पाहून पाटीवर लिहित होता. त्याच्याशी चार शब्द बोलावे अशी निवेदकाला इच्छा होते. धाकट्या बेबीसाठी खेळणं घ्यायचे होते. निवेदक एक कापडाचा कुत्रा खरेदी करतो. एक नाणे निवेदक त्याच्यासमोर धरतो पण त्याची नजर निवेदकाच्या हातातील प्रायमरवर खिळलेली असते. त्याच्याजवळील पुस्तकातील एक पान अर्ध फाटलं होतं. निवेदकाच्या हातातील प्रायमर घेऊन तो मुलगा आपल्या वहीत मजकूर उतरुन घेतो. निवेदकाला त्याचे कौतुक वाटते. निवेदक त्या प्रायमरवर लिहितो ‘इंद्रजितसिंगास सप्रेम भेट’ व ते पुस्तक त्याला भेट म्हणून देतो. कुणाकडून काही घेतलेलं आईला खपत नव्हतं असे तो सांगतो. तो त्या पुस्तकाची भेट स्वीकारतो पण मग निवेदकाच्या मुलीसाठी एक ‘नेताजी’ चा मुखवटा असलेला रंगीत बिल्ला भेट म्हणून देतो. तुला अभ्यास कर म्हणून कोण सांगतं असे विचारल्यावर तो त्याच्या आईची खूप इच्छा होती की तो शिकून वडिलांसारखं वकील व्हावं. त्याला कोणीच नसतं. तो एकटाच असतो. अशी ही कथा आहे.
बालभारतीच्या इयत्ता पाचवीच्या १९७० मधील पुस्तकात ‘भेट’ हा धडा घेण्यात आला होता. त्यामध्ये श्री जयसिंग शिंदे (जन्म १९३२) यांचा ते गेल्या काही वर्षांपासून पत्रकार असल्याचा अल्पपरिचय मिळतो. पण या लेखकाचा अन्यत्र कोठेही पूर्ण परिचय आढळत नाही. त्यांचा एकमेव कथासंग्रह ‘शर्यत’ हा आजमितीस अतिशय दुर्मीळ झालेला आहे.
— लेखन : विलास कुडके.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
छान परिचय, पुस्तक वाचायला मिळाल्याची अनुभूती मिळाली
मनापासून धन्यवाद सर