Saturday, April 13, 2024
Homeसाहित्यदुर्मीळ पुस्तके : ३१

दुर्मीळ पुस्तके : ३१

श्वेतरात्री – भाग २

“श्वेतरात्री” ही एक भावनाप्रधान प्रेमकहाणी आहे. एका स्वप्नाळू माणसाच्या आठवणी आहेत. सुरुवातीला इ. तुर्गेनेंव यांच्या फूल या कवितेमधील ओळीं ‘… तुझ्या काळजापाशी निदान निमिषमात्र राहता यावे म्हणूनच तो जन्माला आला होता का?’आल्या आहेत.

रात्र पहिली : निवेदक सबंध पीटरबुर्गला ओळखत असतो. पीटरबुर्गमध्ये राहणारा प्रत्येकजण दाचाकडे म्हणजे गावाबाहेरील उन्हाळी निवासस्थानाकडे पळत होता. निवेदक चांदण्यात शहराच्या वेशीपर्यंत भटकत जातो. शहरात घरी परततो तेव्हा रात्रीचे दहा वाजतात. येताना कालव्याच्या कठड्याशी निवेदकाला एक स्त्री उभी असलेली दिसते. ती कसल्यातरी विचारात गढलेली असते. निवेदकाला तिचे हुंदके ऐकू येतात. ती तरुणी रडत असते. निवेदकाची चाहूल लागताच ती स्वतःला सावरुन कालव्याकाठच्या रस्त्याने पुढे निघून जाते. निवेदक तिचा पाठलाग धरतो तर ती दुसर्‍या बाजूने पादपथावरुन चालू लागते. एकाएकी तिच्या जवळ एक फ्राॅक कोटातला भक्कम वयाचा गृहस्थ निवेदकाला दिसतो. चालताना त्याचा झोक जात असतो. तो गृहस्थ तरुणीच्या मागे धावू लागला होता. त्याने तिला गाठले आणि तिने किंचाळी फोडली. निवेदकाकडे गाठाळ छडी होती. निवेदक तरुणीला त्या गृहस्थाच्या तावडीतून सोडवतो. तिच्या घरापर्यंत तिला सोबत करतो. परत आपण भेटणार नाही का म्हणून निवेदक तिला विचारतो. त्याबद्दल ती काही सांगू शकत नसते. निवेदक तिला दुसर्‍या दिवशी तिथे येईन म्हणून सांगतो. तरुणी एका अटीवर तिथे यायला तयार होते. निवेदकाने तिच्या प्रेमात पडू नये अशी ती अट घालते. ती मैत्रीला तयार होते. तिला निवेदकाविषयी विश्वास वाटू लागतो. पुन्हा भेटू म्हणून ते एकमेकांचा निरोप घेतात.

रात्र दुसरी : दुसर्‍या रात्री ते भेटतात. निवेदकाने त्यांच्या गुपितांसह सर्व सांगितले पाहिजे असे ती सांगते.ती तिच्याबद्दल सांगते. तिची आंधळी आजी असते. तरुणी जेव्हा वात्रट वागते तेव्हा आजी तिला तिच्या फ्राॅकशी सेप्टीपीन लावून अडकवून ठेवते. आजी पायमोजे विणते. निवेदक सांगतो की तो एक नमुना आहे. म्हणजे अस्सल विचित्र माणूस. तो स्वतः स्वप्नाळू आहे. तिही स्वप्नाळू असते. चिनी राजपुत्राशी लग्न झाल्याचे ती स्वप्न पाहते. तिचे नाव नास्त्येन्का असते.तिच्यापुढे तो त्याचं अंतःकरण उघड करतो. आतापर्यंत जगलेलं एकाकीपण सांगतो. ती तिची कहाणी सांगू इच्छिते व तिला त्याचा प्रामाणिक सल्ला हवा असतो.

कहाणी नास्त्येन्काची
तिची एक म्हातारी आजी असते. ती अगदी लहान असतानाच तिच्याकडे रहायला गेली होती. कारण तिचे आई – वडील वारले होते. आजी पूर्वी खूप श्रीमंत असावी. तिने तिला फ्रेंच भाषा शिकविली नंतर तिच्यासाठी मास्तर ठेवला.ती पंधरा वर्षाची झाली तेव्हा तिचे शिक्षण थांबले. एकदा तिच्याहातून वात्रटपणा होतो. नेमकं काय केलं ते ती सांगत नाही. त्याबद्दल तिची आंधळी आजी तिला तिच्या जवळ बसवून ठेवते. सेफ्टी पिन घेऊन तिचा फ्राॅक स्वतःच्या फ्राॅकला अडकवून ठेवते. एक दिवस ती धूर्तपणे फ्योकला तिच्या मोलकरणीला जी बहिरी असते तिला तिच्याऐवजी आजीजवळ बसवून ठेवते व ती मैत्रिणीकडे जाते. आजी फ्योकला प्रश्न विचारते पण ती बहिरी असल्यामुळे तिला ऐकू येत नाही. ती सेफ्टी पिन काढून पसार होते. नास्त्येन्काला शिक्षा होते. आजीने एक तरुण भाडेकरु ठेवलेला असतो. त्याच्याकडे खूप फ्रेंच पुस्तके असतात. हळूहळू त्यांच्यात मैत्री होते. एक दिवस तो माॅस्कोला जायला निघतो. नास्त्येन्का तिच्या सगळ्या कपड्यांचे गाठोडे बांधून त्याला भेटायला जाते. तो सांगतो की तिच्याशी लग्न केलं तर कशावर गुजराण करायची. जेव्हा परिस्थिती सुधारेल तेव्हा तो लग्न करण्याचे तिला आश्वासन देतो. एक वर्षाने तो परत आला आहे. तो तिन दिवस तिथे असतो पण तिला भेटायला आलेला नसतो. असे सांगून ती रडायला लागते. तो त्याला भेटून तिची मदत करु का म्हणून विचारतो. त्याला दुसरी कल्पना सुचते पत्र लिहिण्याची.ती पत्र लिहून ते त्याच्यापर्यंत पोहोचवण्याची कामगिरी निवेदकावर सोपविते.

रात्र तिसरी : ती आनंदाने फुलली होती. त्याच्या उत्तराची वाट पहात होती. उत्तरादाखल तो स्वतःच येणार होता. तिच्या हाकेला ओ देण्यासाठी तो धावत येणार होता. ती निवेदकाआधी तासभर आधी ठरल्या ठिकाणी येऊन बसली होती. ती निवेदकाला सांगते की तिला निवेदक आवडला कारण तो तिच्या प्रेमात पडला नाही. निवेदक किती नि:स्वार्थी आहे याबद्दल ती त्याची स्तुती करते. पण निवेदकाला मात्र त्या क्षणी खूप उदास वाटते. दोघे त्याची वाट पाहतात पण तो त्या रात्री येत नाही. ती निवेदकाला दुसर्‍या दिवशी त्याच्याकडे जाऊन उत्तर आणण्याची कामगिरी सोपविते. ती निवेदकाबद्दल विचार करते. तो निवेदकासारखा का नाही. ती दोघांची तुलना करते. तो कशाला – निवेदक का नाही? तो निवेदकापेक्षा कमी आहे पण तरीही ती निवेदकापेक्षा त्याच्यावर जास्त प्रेम करत असते. तसे ती निवेदकाला सांगते. तो येतच नाही मग दोघे एकमेकांचा निरोप घेतात. त्याला निराशेने घेरलेले असते.

रात्र चौथी : तो रात्री नऊ वाजता ठरल्या ठिकाणी येतो. पहिल्या वेळी ती जशी उभी होती तशीच तेव्हा कठड्याला रेलून उभी होती. तो तिला हाक मारतो. ती वळून विचारते ‘कुठे आहे पत्र? ‘ त्याच्याकडे ते नसते. म्हणजे अजून तिचा तो आलेला नसतो. तिच्या आसवांचा बांध फुटतो. ती हुंदके देते. आता तिच्याकडून एकही शब्द, एकही वाक्य लिहिले जाणार नाही. त्याला विसरुन जाईल असे ती निवेदकाला सांगते. निवेदक तिला त्याचे तिच्यावर प्रेम असल्याचे सांगतो. नास्त्येन्का पुरती गोंधळून जाते. ती निवेदकाला सांगते की त्याने तिला टाकले, तो तिला विसरला पण तरीही ती त्याच्यावर अजून प्रेम करत आहे. तिचं त्याच्यावर प्रेम आहे पण ते नाहीसं होईल. तिला तो नजरेसमोर नकोसा झाला. निवेदकावर ती प्रेम करते असे त्याला सांगते. ती निवेदकाच्या खांद्यावर विसावते. ती निवेदकाला त्यांच्याकडे रहायला बोलावते. ते धुंद भटकतात. एका क्षणी त्यांच्या जवळून एक तरुण माणूस चालत जातो. तो नास्त्येन्काला ओळखून हाक मारतो. तो तरुण तोच असतो ज्याच्यावर ती प्रेम करत असते. ती दचकते. निवेदकाच्या हाताला झटका देऊन ती त्याला भेटायला धावते. निवेदक हताश होऊन त्यांच्याकडे पहात राहतो. ती जेमतेम त्याला हात देते. आलिंगन देते आणि परत ती निवेदकाकडे वार्‍यासारखी विजेच्या वेगाने धावते आणि आवेगात निवेदकाचे चुंबन घेते. मग एकही शब्द न बोलता ती त्या तरुणाचा हात धरुन त्याला घेऊन जाते. त्यांच्या पाठमोर्‍या आकृतीकडे निवेदक टक लावून पहात राहतो.

सकाळ
निवेदकाच्या रात्री संपल्या होत्या. दिवस वाईट होता. पाऊस कोसळत होता. तेवढ्यात पोस्टमन त्याचे पत्र आणून देतो. ते नास्त्येन्काचे असते. ती लिहिते तिला क्षमा करावी. तुम्हा दोघांवरही एकाच वेळी ती प्रेम करु शकली असती तर. जर निवेदक तो असता तर! ज्या बंधुवत प्रेमाने निवेदकाने तिच्यासमोर अंतःकरण मोकळं केले. ती स्मृती तिने जपून ठेवली आहे. निवेदकाला ती कायम मित्र, भाऊ म्हणून राहण्यास सांगते. पुढच्या आठवड्यात ती तरुणाबरोबर लग्न करणार आहे. तो तिला कधीही विसरला नव्हता. निवेदकाच्या हातातून ते पत्र गळून पडते. आपल्या भविष्याचा अंधारमय आणि विषण्ण देखावा त्याला सर्वत्र दिसू लागतो. तरीही तिच्याबद्दल त्याच्या मनात सद्भावना असते. तिचे तो कल्याण चिंतितो अशी ही हृदयस्पर्शी कथा आहे.

एक ओंगळ घटना पीटरबुर्गमध्ये एका दुमजली घरात जनरल पदाचे मानकरी असलेले तीन अत्यंत प्रतिष्ठित गृहस्थ शँपेन घेत संभाषण करण्यात गुंतले होते. गुप्त सल्लागार स्तेपान निकीफोरोविच, ६५ वर्षांचे ब्रम्हचारी घराची वास्तुशांती व स्वतःचा वाढदिवस साजरा करत होते. त्यांच्या बरोबर त्यांचे माजी सहकारी व हाताखालचे कर्मचारी तसेच राज्य सल्लागार सेम्योन इवानोविच शिपूलेन्को व इवान इल्यिच प्रालीन्स्की हे दोघे होते. प्रालीन्स्कींना नुकतीच जनरलपदी बढती मिळाली होती.
ते एकमेकांचे निरोप घेऊन निघतात. इवान इल्यिचच्या बग्गीचा पत्ता नसतो. गाडीवान त्रिफोनही गायब असतो. शिपूलेन्को त्यांना पोहचवू का म्हणून विचारतो. पण संतापलेला इल्यिच पायी चालत निघतो. चालत निघालो हे बरेच झाले असे त्याला पुढे वाटू लागते. रात्र सुरेख होती. तुटक आणि असंबद्ध बडबड करीत तो फूटपाथवरुन चालत होता. एका मोडकळीस आलेल्या एकमजली घरात त्याला संगीत ऐकू येते. तिथे जल्लोष चालू असतो. ते कारकून प्सेल्दोनिमोवचे रजिस्ट्रारचे घर असते. तो लग्न करणार असतो. इल्यिच त्याचा बाॅस असतो. प्सेल्दोनिमोवला लग्नात हुंडा म्हणून ते लाकडी घर आणि रोख ४०० रुबल मिळणार होते. इल्यिचच्या मनात अनेक विचार चमकून जातात. हाताखालच्या कारकूनाच्या लग्नाला गेलो तर काय होईल हे इल्यिच विचार करतो. तो त्याच्या कनिष्ठाच्या, रजिस्ट्रार प्सेल्दोनिमोवच्या घरात शिरतो. तिथल्या कुत्र्याला तो तिरस्काराने लाथ मारतो. बाहेर थंड करण्यासाठी ठेवलेल्या मांसाच्या जेलीच्या भांड्यात त्याच्या बुटाचा डावा पाय फसतो. तो जेलीच्या खुणा बुटावरुन पुसून आत जातो. सगळे नाचाची शेवटची फेरी पूर्ण करण्यात गुंतलेले होते. इवान इल्यिचकडे कुणाचेही लक्ष जात नाही. पण त्याच्याकडे लक्ष जाताच सगळे स्तब्ध होतात.’ मी तुम्हाला अडथळा आणले वाटते’ असे इल्यिच म्हणतो. पण प्सेल्दोनिमोव भानावर येऊन त्यांचे स्वागत करतो. त्यांना दिवाणावर बसवतो. इल्यिचच्या लक्षात येते की तिथे तोच बसलेला होता आणि बाकी सारे उभेच होते. ते दृश्य अप्रिय होते. तिथे त्यांचा मुख्य कारकून आकीम पेत्रोविच झूबीकोव येतो व इल्यिच खूष होतो. त्याला आनंद होतो. ते त्याला सांगतात की ते नुकतेच स्तेपान निकीफोरोविच निकीफोरोव यांच्याकडून आलो आहे, त्रिफोनने बग्गी कुठेतरी नेली. नाईलाजाने पायी चालत आलो.नव्या नवरीशी ओळख करुन दे असे इल्यिच प्सेल्दोनिमोवला सांगितल्यावर तो नवरीच्या हाताला धरुन तिथे येतो. ती त्याला अनुरुप होती. अचानक सर्व पांगतात. एक स्थूल देहाची वयस्क बाई तिथे अवतरते. तिच्या हातातील गोल तबकात शँपेनची बाटली आणि दोन चषक होते. ती जनरलपाशी येते आणि त्यांना ती मदिरा स्वीकारुन तरुण जोडप्याचे अभिनंदन करण्यास सांगते. ती मुलाची आई असते. एक मुलगी सफरचंदे, टाॅफी, मार्मालेड, आक्रोड इ. चे तबक तिथे घेऊन येते व ते जनरलपुढे ठेवते. दरम्यान नवरी खी – खी हसते.काय झाले म्हणून इल्यिच विचारतात त्यावर ती उत्तरली की इवान कोस्तेन्कीनिच तिला हसवताहेत. त्या तरुणाची जवळीक इल्यिचला रुचत नाही. इतक्यात तिथे सर्वोत्कृष्ट नर्तक प्सेल्दोनिमोव आत घुसतो. हावरेपणे दारुने भरलेले काचपात्र धरतो. ग्लासात वोदका ओततो. जेवणानंतर मासजी नृत्य करण्याचे धाडस करणार असल्याचे जाहीर करतो. नृत्य होते. त्यात सर्व सामील होतात. इवान इल्यिचचे अस्तित्व सर्व विसरुन जातात. प्सेल्दोनिमोव इवान इल्यिच यांना जेवणाचे निमंत्रण द्यायला येतो. ते जेवणाच्या टेबलाकडे निघतात. जेवायला बसतात. इल्यिच यांच्या जवळ पुन्हा शँपेनची बाटली येते. ते शँपेन पितात. पाठोपाठ वोदका घेतात. टेबलाभोवती ३० पाहुणे बसलेले असतात. तिथे नवरीची आई येते. ती जनरलांकडे संतापी उपहासगर्भ कटाक्ष टाकते.जनरल इवान इल्यिचच्या आगमनाने सगळा बेरंग झाला होता. ते त्या विवाहसोहळ्यात अनामंत्रित होते. शँपेन आणि वोदका पिल्याने त्यांचा स्वतःवरील ताबा सुटतो. उलटसुलट चर्चा होते सगळ्यांच्या नजरेतून ते उतरतात. एक कर्मचारी जबरदस्त झिंगलेला डोळ्यांमधून आग ओतत सगळ्यांच्या वतीने इवान इल्यिचला उत्तर देतो. इवान इल्यिच संतापतात. वाद होतात त्यात ते फरशीवर पडतात. त्यांच्यासाठी बग्गी मागविण्यात येते.

पण शुध्दीवर न आलेले इवान इल्यिच फार आजारी होतात. प्सेल्दोनिमोवला प्रश्न पडतो की आजार्‍याला कुठे निजवायचे. नवविवाहिताच्या पलंगावर इवान इल्यिचला झोपवण्यात येते. नवरी संतापते. नवविवाहित जोडप्यासाठी खुर्च्यांवर गाद्या पसरविण्यात येतात. प्सेल्दोनिमोवची आई इवान इल्यिचच्या उशाशी सबंध रात्र शुश्रूषा करीत बसते. इवान इल्यिचला हगवण लागते. ती त्यांचे पोटच्या मुलाप्रमाणे सर्व करते. इकडे नवविवाहित जोडप्यांची गादी खुर्च्या सरकल्याने धपकन खाली कोसळते. नवरी संतापाने विव्हळते. नवरीची आई प्सेल्दोनिमोववर आरोप करते. कचेरीत त्याच्यासमोर कोणते भवितव्य वाढून ठेवले याची त्याला चिंता वाटू लागते. इकडे इवान इल्यिच सकाळी उठतो. कनिष्ठाच्या विवाह सोहळ्यात घडलेल्या अप्रिय घटना त्यांना आठवतात. रात्रभर सुश्रुषा करणार्‍या म्हातारीचे आभार न मानता ते तेथून रस्त्यावर येतात. घरी जातात. आठ दिवस ते कचेरीत जात नाही. आठ दिवसांनी ते कचेरीत जातात त्यांचे आदरपूर्वक स्वागत होते. अशी ही एका लेफ्टनंट कर्नलची कहाणी जो त्यांच्या कनिष्ठाच्या विवाहसोहळ्यात अनामंत्रित उपस्थित राहतो आणि सगळेच विपरीत घडते.
क्रमशः

विलास कुडके.

— परीक्षण : विलास कुडके
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments