Saturday, July 27, 2024
Homeसाहित्यदुर्मीळ पुस्तके : ३१

दुर्मीळ पुस्तके : ३१

उघडे लिफाफे

केशव भिकाजी ढवळे यांनी १९४४ मध्ये प्रकाशित केलेला व १९५० मध्ये पुनर्मुद्रित केलेला “उघडे लिफाफे” हा ११२ पृष्ठांचा लघुनिबंधसंग्रह. मूल्य होते दीड रुपया. या संग्रहाला वा. ल. कुलकर्णी यांची प्रस्तावना लाभली असून संग्रहाच्या शेवटी लघुनिबंध :स्वरुप व स्वभाव हा प्रबंध ना. मा. सन्त यांनी जोडला आहे.
ना. मा. सन्त ह्यांचा जन्म १९०९ मध्ये झाला. पुण्याच्या फर्गसन काॅलेजमधून ते बी. ए. झाले. फर्गसन मराठी मंडळाचे ते चिटणीस होते. याच मंडळाने कविता, लघुकथा व लेख यांचा ‘जोत्स्ना’ हा संग्रह प्रसिद्ध केला होता. त्याचे संपादन त्यांनी केले होते व या संग्रहात त्यांचा पहिला ललितनिबंध ‘फुलपांखरु’ हा प्रसिद्ध झाला होता. १९३९ मध्ये ते मुंबईच्या एस टी काॅलेजमधून बी टी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी पुणे व मुंबई येथे शिक्षकाचे काम केले.१९४३ पासून ते बेळगाव येथील मराठी ट्रेनिंग काॅलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करु लागले होते. जून, १९४६ मध्ये त्यांचे आकस्मिक निधन झाले. ते आणि त्यांची पत्नी इंदिरा संत यांच्या कवितांचा एकत्रित संग्रह ‘सहवास’ व ‘भारत-नेते’ हा भाषांतरित ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्यांचे काही उत्तम टीका-लेख व ललित निबंध अद्याप असंग्रहित आहेत.

व्हीनस प्रकाशनने १९६९ मध्ये इयत्ता दहावीसाठी प्रकाशित केलेल्या साहित्य-सुगंध या पाठ्यपुस्तकात त्यांचा ‘मेणबत्तीच्या प्रकाशात’ हा लघुनिबंध घेतलेला आहे. तर मंगल वाचन या वि. स. खांडेकर यांनी संपादित केलेल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात त्यांचा ‘पतंग’ हा लघुनिबंध घेण्यात आला आहे.

१ वार्‍याची झुळूक व्यवहार हा संसाराच्या सोयीसाठीच संसाराच्या पोटी जन्माला आला आहे. जीवनाला स्थिरता आणून देणार्‍या या व्यवहारानेच जीवनाला रुक्ष आणि नीरस स्वरुप प्राप्त झाले आहे. आपण आपल्या जीवनाला सर्व बाजूंनी मर्यादा घालून घेतल्या आहेत. प्रत्येक मनुष्य हा आपल्या आखीव परिघात घाणा ओढीत असतो. विशिष्ट गोष्टी विशिष्ट वेळी करण्याची सक्ति केल्यामुळे जीवनाचं कटकटी घड्याळ झाले आहे. त्याच त्या गोष्टींच्या भिंती उभारुन आपण स्वतःला तुरुंगवास करुन घेतला आहे. अशा अवस्थेत पोस्टमनने पत्र आणून दिले की ती दूरस्थ प्रदेशावरुन वाहात आलेली वार्‍याची झुळूक वाटते.

२.कात्री हरतर्‍हेच्या खेळण्यांनी न समजणारं मुलांचं मन कात्री हाती लागतांच हर्षभराने फुलून येतं. कात्रीने खेळण्याचा मोह केवळ लहान मुलांना होतो असे नाही तर मोठ्यांनाही होतो. ज्या वृत्तीमुळे आहे त्या वस्तूचं आहे ते स्वरुप मान्य करायला तयार होत नाही त्या वृत्तीमुळेच आपण तिला नवीन स्वरुप द्यायला उद्युक्त होतो. नवीन स्वरुप द्यावयाची इच्छा, नवीन कृती घडवायची मनीषा, ज्या अनेक स्वरुपात ही शक्ति व्यक्त होते त्यांत कातर-काम महत्त्वाचे समजले जाते. जीवनपटांतून ललितकथेचा चित्रपट तयार करताना लेखकाला विशिष्ट हेतूची कात्रीच चालवावी लागते. हजार प्रसंगांतून आणि हजारो व्यक्तींमधून आपल्या ध्येयाला परिपोषक अशाच व्यक्ति आणि असेच प्रसंग लेखकाला निवडून घ्यावे लागतात. कात्रीचा प्रभाव वाङमयातहि आहे.

३.चाळिशी डोळ्यांवर चाळिशी आली. आता केस देखील रुपेरी व्हायला लागतील या विचाराने लेखकाचं मन सुन्न होते. लेखक संशयाने वारंवार आरशात डोकावून पाहतो. एक रुपेरी केस चमकताना आढळतो तेव्हा तो उपटून काढतो. चाळिशीबद्दल चष्म्याबद्दल ज्यांना ती लावणे अपरिहार्य आहे त्यांना आकर्षण असते आणि ज्यांना ती लावण्याचे भाग्य लाभत नाही त्यांनाही असते. तेही आपली चाळिशीची हौस भागवून घेतात. डोळ्यांतून दिसणारं जग पाहून अंतर्मनात आपण अगदी कंटाळून जातो. दुसर्‍या कुठल्यातरी भिंगातून जगाकडे पाहावेसे वाटते. या प्रवृत्तीचं प्रत्यंतर म्हणजे आपली वाङमयाची आवड. वाङमय म्हणजे दुसर्‍याच्या डोळ्यांनी पाहिलेलं जग! प्रत्येक कलाकृति म्हणजे जीवनाकडे पाहाण्याची एक अभिनव चाळिशीच आहे.

४.पोष्टाची पेटी माणूस आत शिरताना खळकन लागणारी तुरुंगाची दारं आणि पत्र आत टाकून हात बाहेर काढताच टपकन होणारा दाराचा आवाज ही दोन्हीही लेखकाला भयानक वाटतात. पण मग टेबलाच्या खणातील पत्र-संग्रह लेखकाच्या दृष्टीस पडतो. तो पोस्टाच्या पेटीचाच प्रसाद होता. पोष्टाच्या पेटीने आपलं तोंड उघडं ठेवलं असलं, तरी कायमचं मौन धारण केलं आहे.

५.दुसर्‍याचे कपडे आपले कपडे आपल्या सरावाचे झालेले असतात, पण जेव्हा आपल्याला दुसर्‍याचे कपडे वापरण्याची पाळी येते तेव्हा मन बेचैन होते. त्या कपड्यात आपल्याला स्वस्थ वाटत नाही. आपली स्थिती विचित्र होऊन जाते. कामाची गाडी पण बिघडून जाते. लेखक पक्कं ठरवून टाकतो की दुसर्‍याचे कपडे वापरायचा प्रसंग येऊ द्यायचा नाही. कोणत्याही कपड्याकरताच काय, पण वस्तूकरताहि दुसर्‍याकडे पाहायची वेळ येऊ नये इतकी जय्यत तयारी लेखक करत असतो.

६.बोहारी स्त्रियांना स्वभावत:च बोहार्‍याचं मोठं आकर्षण वाटतं. दागिन्यांपेक्षांहि भांड्यांची निगा बायका विशेष ठेवतात. कारण दागिन्यांहून कांकणभर जास्त त्यांचा लोभ भांड्यांवर असतो आणि म्हणूनच सुबक भांड्यांनी संसाराची सजावट करायला साहाय्य करणार्‍या बोहार्‍याबद्दल त्यांना एक विशेष आकर्षण वाटत असतं. सौदा पटविण्याचा आनंद आणि संसार सजविण्याचं आकर्षण हे कारण त्यात असतं. या सौद्यात जुनं देऊन नवं घेतल्याचा आनंद असतो.

७. आजारीपणाचं सुख लेखकाला आजारी पडण्याची हुक्की येते ती दररोजच्या चक्रनेमिक्रमांतून काही काळ सुटी मिळावी म्हणून नव्हे किंवा अति कामाने जीव वैतागला म्हणजे आजाराच्या निमित्ताने विश्रांतीचं सुख मिळावं म्हणूनही नव्हे. तर गादीच्या भरदारपणाचा आल्हाद, उश्यांचा मृदमृदुल संभारात डोकं रुतवून घेण्याचं सुख, पांघरूणाच्या गुलगुलीत उबदारपणाची सुखावह लपेट यासाठी. कोलन वाटरची घडी आणि तिवईवरील तांबड्या औषधाची बाटली आणि ग्लास याने शहारा येतो पण पलिकडे डिशमध्ये रसाळ घोसदार द्राक्षं आणि दाणेदार डाळिंब पाहिली की जीव खाली पडतो. आजारीपण लेखकाला हवेहवेसे वाटते ते त्यांच्या पत्नीचा प्रेमळ सहवास ह्यावेळी घडतो म्हणून. हा सहवास याच वेळी घडतो कारण एरवी तिच्या स्वभावाला व्यवहाराची मुरड पडल्याने एक प्रकारची रुक्षता आलेली असते. मुलांच्या खस्ता काढता काढता तिच्या स्वभावात त्रासिकपणाची लकेर आलेली असते. ह्या तुटक संसारीपणाचे सल लेखकाला इतके बोचू लागतात की त्यांना आजारी पडावेसे वाटू लागते. आजारी पडले की दुर्मीळ झालेले दोस्तही गोळा होतात. शेल्फवरील ग्रंथमंडळी देखील लेखक आजारी पडण्याची वाट पाहत असतात कारण लेखकाला त्यांना स्पर्श करण्याची फुरसत तेव्हाच मिळत असते. याच आजारपणात कल्पनाशक्ति तरल होते. म्हणूनच लेखकाला आजारी पडण्याची तीव्र इच्छा होते.

८.बँक-बुक घरखर्च चोखपणे चालवून गांठी पैशांचा संग्रह करणं ही मोठी कला आहे. लेखकाला याचसाठी चमचा लिंबू शर्यतीची गंमत वाटते. संसाराच्या अडचणीतून शिलकेचे लिंबू बँकेपर्यंत सांभाळीत नेण्याचं कामही लेखकाला तसेच वाटते.

९.पानाचा षोक लेखकाच्या वडिलांचा पानाचा षोक म्हणजे लेखकाला घराचं एक वैभव वाटते. दिवाणखान्यात स्वच्छ बिछायतीवर शुभ्र गादीतक्क्याजवळ मांडलेले पानाचं साहित्य पाहून कुणाचेही मन उल्हसित होईल. लखनौचं पानदान. त्यात केतकीसारखी पिवळी जर्द पाने, पानांची निगा, चुन्याची मिजास, मालमसाला. वडिलांच्या पानाच्या षोकात त्यांच्या चैनीबद्दल लेखकाला कौतुक वाटत नसतं तर ते त्यांच्या कलासक्तीबद्दल वाटत असते. लेखकाला मात्र ही सवय जडलेली नसते. मात्र सिगरेट ओढल्यावर लेखक पान खाल्ल्याशिवाय घरी येत नाही.

१०. साखरेची गोडी आपल्या रोजच्या जीवनात साखरेने केवढी मोहिनी पेरली आहे. मित्राच्या घरी गप्पा मारायला जावं आणि तास अर्ध्या तासात कपबशांचा आवाज आला नाही की गप्पांचा बहर ओसरु लागतो. साखर-नियंत्रणामुळे चहाची साधी मिजास करणं सुध्दा कठीण होऊन बसले आहे. साखरेने आपल्या जीभेचा ताबा घेतला आहे. तिने आपल्या मनावरही वर्चस्व मिळविले आहे. सकाळच्या पेयाचे गोड घोट प्यायला मिळाले नाही तर सगळं बेचव वाटतं. स्वयंपाकघरात पक्वान्नापासून तो चटणी कोशिंबिरीपर्यंत कोठल्याही पदार्थाला साखरेच्या मध्यस्थीशिवाय पानावर स्थान मिळणे कठीण होतं. स्वयंपाकघराबाहेरही तिचा प्रभाव आहे. दुसऱ्याला खूष करण्यास साखरेसारखं दुसरं गुणकारी काही नाही. आनंदप्रसंगी तोंड गोड करण्याची रीत आहे. सणाचा आणि साखरेचा दाट संबंध आहे.

११. लिफाफे लेखकाचा कित्येक वर्षातला पेटीत सांचलेला पत्रव्यवहार आहे. पत्रांच्या प्रेमाकरितांच त्यांनी ती सारी पत्रे साठवून जतन केली आहेत. ह्या पत्रव्यवहारापासून त्यांना असीम आनंद मिळतो हे त्याच्या मूळाशी कारण आहे. दुसरं काही करण्यासारखं नसलं की, मन कुठे लागत नसले की, त्यावर पत्रांची पेटी उघडून बसणे हा लेखकाला रामबाण उपाय वाटतो. या पत्रव्यवहारात बहिणी, मैत्रिणी तसेच पत्नीशी लग्नापूर्वी व लग्नानंतर झालेला पत्रव्यवहार आहे. इंजिनिअर, पायलट, डाॅक्टर, शिक्षक, संपादक, नट अशा कितीतरी मित्रांशी, नातेवाईकांशी, परक्यांशी झालेला पत्रव्यवहार आहे. अनेक व्यक्तींच्या प्रकृति लेखकाने त्यांच्या पत्ररुपाने सांभाळून ठेवल्या आहेत. मानवी मनाचे गूढ व्यापार कधी कधी लिफाफ्यासारख्या छोट्या गोष्टींनीही व्यक्त होतात.

१२. हिशेबाचे व्यसन हिशेब करणे लेखकाला कधीच जमत नाही, म्हणून तो ठेवण्याचे प्रसंग लेखक सहसा टाळीत असतात. वडिलांची बिनहिशेबीवृत्तीच स्वभावात उतरली असं पितृभक्तीच्या अभिमानाने सांगणे ते पसंत करतात. हिशेब ठेवणं हे हिशेबीवृत्तीच्या माणसाच्या बाबतीत एक व्यसनच असावं. कोणतीही वस्तू खरेदी केली तरी त्यापासून त्यांना लगेच समाधान होत नसावं. गजरा घेऊन त्याचा सुवास लुटला , चार मित्रात आईस्क्रीमची लज्जत लुटली, चित्रपट पाहताना किंवा सिगारेट्सची मजा घेतली यात त्यांना समाधान वाटत नसून हिशेबाचा ताळेबंद जमला की त्यांना खरे समाधान लाभत असेल. एक पैचा हिशेब जमविण्यात रात्रभर तळमळणारा एकनाथ त्यांना आठवतो. हिशेब जमविल्याच्या समाधानाचा अंमल दांडगा असतो.

१३.चक्रवर्ति आणि रस्ते लेखकाला पुणे शहराबद्दल नेहमी आकर्षण वाटत आलेले आहे. पुण्यात झालेला बदल दृष्टीस पडतो आणि ते अधिक प्रिय होते. पुण्यातील रस्ते पूर्वीसारखे अवखळ व खेडवळ वाटत नाही. पुण्यातील पुष्कळसे लोक ‘चक्रवर्ती’ आहेत असा उल्लेख लेखक करतात. सायकलस्वारांचा आणि रस्त्यांचा जेवढा जिव्हाळ्याचा संबंध आहे तेवढा इतरांचा नाही. रस्त्यांचं खरंखुरं सुखदु:ख सायकलस्वारालाच कळते. रस्ता जर लहरी माणसासारखा चढेल आणि उतरेल असेल तर सायकलस्वाराला जास्त दमछाट करावी लागते. रस्ता आडवळणी असेल तर सायकलस्वाराचे थोबाड फुटण्याची शक्यता असते. पक्क्या डांबरी रस्त्यावरुन सायकल मारण्यात मौज असते. पुण्यातल्या लोकांना सायकलीचं एक व्यसनच जडलेले आहे. पुण्याच्या रस्त्यात सायकलस्वार हिंडतात ते मुलं अंगणात खेळतात तसे निर्धास्तपणे. इतर वाहने धावतात ते सायकलच्या आदबीने. पुण्यात अपघात होतात पण त्यात विघ्नापेक्षा विनोदच जास्त होतात. एवढ्याचसाठी लेखकाला पुणे आणि पुण्यातील रस्ते ह्याविषयी आकर्षण वाटते.

१४.माझा प्रेमळ मित्र ! पुण्यात राहणारा भाडेकरु काय किंवा मालक काय कुणालाच राहत्या जागेवर आपली एकमेव मालकी सांगता येणार नाही. भाडेकरु आले आणि गेले. जुना मालक जाऊन नवा आला तरी काही मंडळी पिढ्यानपिढ्या तेथे वस्ती करुन असतात. सांपळे, मच्छरदाण्या इ. किती साधने असतात पण त्यांना ही मंडळी पुरुन उरतात. लेखकाला डासाबद्दल कौतुक वाटते. ढेकणाचे निराळेपण लेखक वर्णन करतो. उंदराबद्दल लेखकाला सुहृद्भाव वाटतो. डासांचा अहंभाव किंवा ढेकणाचा कडवेपणाचा लेशही त्याच्या स्वभावात आढळणार नाही. डास किंवा ढेकूण यांच्याशी मैत्री शक्य नाही पण ती उंदराशी ती अगदी शक्य आहे असे लेखक सांगतो. उंदराचा स्वभाव लेखकाला उमदा, निष्पाप आणि सरळ वाटतो. तो लेखकाला गमत्या वाटतो. काॅलेजचे शिक्षण घेत असताना पिटुकल्या उंदराशी कशी सलगी झाली. त्याने कशी चेष्टा मस्करी केली. हळूहळू त्याचे रुपांतर मोठ्या उंदरात कसे झाले, टेबलाला भोक कसे पाडले, घड्याळ बिळात कसे लपवले याचे गंमतीदार वर्णन लेखकाने यात केले आहे. पुढे प्लेगच्या दिवसात पुण्यातून लेखकाला बाहेर जावे लागले. ते परतले तेव्हा इतर सर्व मित्र त्यांना भेटायला आले पण त्यात त्यांचा हा प्रेमळ मित्र मात्र नव्हता !

१५.उधळेपणा मित्रांबरोबर सिनेमाला गेलेलं बायकांना खपत नाही. बायकांच्या सहवासात पुरुष खर्चिक बनतो पण त्याचं खरे औदार्य मित्रपरिवारात उसळून येते. दोस्तांच्या संगतीतच पैशाच्या उधळपट्टीचे योग येतात. स्त्रिया स्वभावत:च कंजूष किंवा खर्चिक असतात. पुरुष मात्र मित्रांच्या संगतीत अगदी दिलदार होतो. दिलदारपणाच्या नशेत सार्‍या गोष्टी ‘ए वन’ मिळाल्या पाहिजेत. त्या मिळणं हिच जिव्हाळ्याची गोष्ट असते. पैसे खर्च होणे ही नाही. अनुनयाच्या मोसमात पुरुष प्रेयसीपुढे पैशाचे पाकीट उघड करतो पण ती लहर असते. दिपवून टाकण्याची भावना त्यात असते. पण मित्रांच्या सहवासात मात्र पुरुष उधळेपणा करतो.

१६. मुखवटे चेहेर्‍यावर एखाद्या भावाचा गोड मुखवटा चढवला की मग आपण वाटेल ते विचार करायला मोकळे आहोत, या समजुतीने लेखक वागत. पण मनात एक असता बाहेर दुसरं दाखवणं जमायचं नाही असे लेखकाला वाटू लागते. निर्मळ अंतःकरणाचं स्वच्छ प्रतिबिंब दाखवणारा प्रामाणिक चेहेरा लाभणं हे खरोखरी भाग्य आहे. यासंदर्भात या लघुनिबंधात चिंतन केलेले आहे.

१७. खाजगी दानत लेखकाच्या शेजार्‍याला त्याच्या शेजारच्या खोलीतील नुकत्याच लग्न झालेल्या बहुधा प्रीतिविवाह झालेल्या जोडप्याचा त्रास होत होता व त्यामुळे रात्रभर त्याच्या डोळ्याला डोळा लागत नसल्याबद्दल तो लेखकाजवळ कुरकुर करत असतो. स्वभावाचे सत्व पाहणारे प्रसंग क्वचित येत असतात. केवळ बाह्य वर्तणुकीवरुन स्वभावाची वर्गवारी लावणे चुकीचे असते. शेजार्‍याच्या घराला कान लावणे, दुसर्‍याची पत्रे वाचण्याची इच्छा होणे, मुलीच्या ट्रंकेतील पत्रे दिसली तर ती उलगडून वाचण्याचा मोह होणे यात तुमच्या दानतीची कसोटी असते. कायद्याबद्दल आस्था, परस्त्रीला दाखविलेला आदर इ. गोष्टींची नोंद चित्रगुप्ताच्या वहींत होणार नसून तुमच्या हातून एकान्तांत घडलेल्या गोष्टींची टिपणं तीत केलेली आढळतील आणि त्याच गोष्टी त्या न्यायासनासमोर तुमचे भवितव्य ठरवतील.

१८. माझी पहिली लघुकथा प्रसिद्ध झाली तेव्हा – कधी वेळ जात नसला म्हणजे आपल्या लेखांच्या छापील कात्रणांचे फाईल लेखक उगाचच चाळू लागतो. कविता, लघुकथा, लघुनिबंध, लेख इ. जे काही त्यांनी लेखन केले त्याचं सरमिसळ असं दप्तर त्या फायलीत तयार झाले आहे असे लेखक यात नमूद करतात. (ते वाचताना मनात आले की हे दप्तर जर आज हाताशी आले तर त्यांचे अप्रकाशित साहित्याचा खजिना रसिकांसाठी खुला होईल. त्यांच्या अकाली निधनामुळे या सर्व दुर्मीळ ठेव्याला आपण पारखे झाले आहोत.) त्यांच्या फायलीच्या तळाला जे कात्रण डकवलं आहे ते कवितेचे आहे. (इंदिरा संत आणि त्यांचे पती ना. मा. सन्त यांचा एकत्रित कवितांचा संग्रह ‘सहवास’ प्रसिद्ध झालेला आहे आणि तोहि आज दुर्मीळ आहे) ती कविता पहिल्या उमेदीत लिहिली गेली असल्याने तिच्या उमदेपणाबद्दल लेखक साशंक आहे. तिजबरोबर त्यांचा छापील संसार सुरु झाला हे ते विसरु शकत नाही. आपली पहिली लघुकथा लिहून झाली तेव्हा नवनिर्मितीचा हर्ष झाला की नाही हे लेखकाला आठवत नाही पण ती लिहून होताच त्यांच्या मनात एक असमाधान निर्माण झाले. कारण लघुकथेच्या निर्मितीच्या आनंदापेक्षा तिच्या प्रसिद्धीचाच आनंद लेखकाला हवासा वाटला. तिच्या प्रसिध्दीची त्यांना हुरहुर लागली. नवोदित लेखकाला वाटणारी प्रसिद्धीची अधीरता त्यांच्या ठिकाणी होती. ती कथा छापून न आल्याने ती तगमग त्यांनी अनुभवली. असे लागोपाठ पाच-सहावेळा झाल्यावर ते कवितेकडे पुन्हा वळाले. अचानक त्यांना ती कथा एका मासिकात प्रसिद्ध झाल्याचे मित्र लक्षात आणून देतात. त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. दुसरा आश्चर्याचा धक्का असा बसतो की संपादक आणखी लघुकथेची मागणी करतात. त्यानंतर लेखकाने अनेक लघुकथा लिहिल्या व त्या प्रसिद्धही झाल्या पण पहिल्या लघुकथेच्या वेळी त्यांनी आशा-निराशेची आणि सुखदु:खाची जी गोड आंदोलने अनुभवली तशी पुन्हा अनुभवास आली नाहीत असे लेखक नमूद करतात. म्हणून ज्या ज्या वेळी फाईल चाळताना ते त्यांच्या पहिल्या लघुकथेशी येऊन थांबतात तेव्हा त्यांच्या मन:स्थितीचा त्यांना पुन:प्रत्यय घडतो आणि त्यामुळे क्षणभर का होईना पण जे एक सुख होतं ते अगदी निराळं असतं असे ते यात नमूद करतात.

१९. सुरुवात कोणत्याही लेखन प्रकाराची विशेषतः लघुनिबंधाची सुरुवात कठीणच. लघुनिबंध लिहायला कोणतीच सबब नसते. कोणताच बाहेरचा आधार नसतो. कारण लघुनिबंधात गुंफायच्या विचार-मालिकेचा धागा आतूनच बाहेर यावा लागतो. लेखकाला लघुनिबंधाची सुरुवात करणं कठीण जातं. पण एकदा का सुरुवातीचं वाक्य कागदावर उतरले की वाक्यामागून वाक्यं येतात व लेखाचा वेग वाढत जातो.त्यांच्या चालढकलपणाचा त्यांना राग येतो. मनात ठरवलं आणि त्याप्रमाणे सुरुवात केली असं कधीच होत नाही. किंचित कातरता, थोडीशी दिरंगाई आणि मनाचा चंचलपणा त्यांना सुरुवातीला छळतो. अगदी सकाळीच लिहायला बसायचा त्यांचा शिरस्ता आहे. आवडत्या सिगारेटची तल्लफ येते. तिची लज्जत घेत घेत सुरुवात करावी तर भिंतीवरचा फोटो कललेला दिसतो. तो नीट लावून टेबलाशी वळावं तर शेल्फवरची पुस्तके उस्कटलेली दिसतात. टेबलखुर्ची नको वाटते .मग आरामखुर्ची घालतो. पण मग सुरुवात करावी तर त्यांचेच विचार त्यांना आठवत नाही. अशी लेखनप्रक्रिया लेखकाने यात मांडलेली आहे.

लघुनिबंध :स्वरुप व स्वभाव (प्रबंध) – आत्मप्रकटीकरण करणारा तो मानव अशी व्याख्या लेखकाने मांडली आहे. विचार, भाषा आणि हसणे ही आत्मप्रकटीकरणाचे मार्ग आहे. ती आत्मप्रकटीकरणाची साधने आहेत. अखिल मानवी संस्कृती आत्मप्रकटीकरणाच्या खटपटीतून निर्माण झाली आहे. भावगीत आणि लघुनिबंध या दोघांचाही हेतू आत्मप्रकटीकरण असल्याने दोहोंत आश्चर्यकारक साम्य आहे. दोहोंच्या मुळाशी प्रेरणा असावी लागते. विचार, आठवणी आणि कल्पना यांचा ललितरम्य विलास म्हणजे लघुनिबंध. प्रेरणेने उत्पन्न झालेल्या कवीच्या मन:स्थितीत भावनोत्कटता असते आणि त्यामुळेच त्या मन:स्थितीला अलौकिकता प्राप्त होते. भावनेच्या झिरझिरीत शेल्याखाली झाकून ठेवलेला विचार, स्मृति आणि कल्पना यांचा नजराणा म्हणजे लघुनिबंध. रोजच्या जीवनात प्रतिबिंबित झालेली लौकिक सौंदर्ये हीच लघुनिबंधकाराची सामुग्री. लेखकाने आत्मचरित्र आणि लघुनिबंध यातील एकत्व मांडले आहे. विषय हा केवळ निमित्तमात्र असतो.लघुनिबंधात्मक आत्मचरित्राची लेखकाने उदाहरणे दिली आहेत. जे. बी. प्रिस्टले यांचे ‘मिडनाईट ऑन द डेझर्ट’, साॅमरसेट माॅम यांचे ‘ ऑन समिंग अप’, वामनराव म. जोशी यांचे ‘स्मृतिलहरी’. पत्र या वाङमयप्रकाराचे लघुनिबंधाशी साम्य आहे असे लेखक सांगतो.

लघुनिबंधकाराचे कार्य म्हणजे या जीवनात वावरत असूनही त्यातील ज्या गमतीच्या गोष्टीकडे आपले लक्ष गेले नाही, त्याकडे लक्ष वेधणे. जीवनाकडे पहाण्याची नवीन, उत्सुकलेली आणि कौतुकाची दृष्टि देणे. हे करण्यापूर्वी तशी दृष्टि लघुनिबंधकाराला स्वतःला प्राप्त झालेली असली पाहिजे. लघुनिबंधकाराच्या जातिवंतपणाची खूण म्हणजे तो जे विषय निवडील ते बाह्यतः अगदी क्षुद्र, उपेक्षणीय आणि हास्यास्पद वाटणारे असतील. आणखी एक लक्षण म्हणजे त्याच्या लघुनिबंधाला कोठेही खटपटीचा किंवा कलाचातुरीचा वास येत नसतो. लघुनिबंध म्हणजे जीवनावर केलेली प्रेमाची टीका. जातिवंत लघुनिबंधकाराची प्रतिभा विपुलप्रसव असते इत्यादी तात्विक विवेचन लेखकाने विस्तृतपणे व मुद्देसूदपणे या प्रबंधात केलेले आहे.

ना. मा. सन्त यांचे अप्रकाशित लघुनिबंध, लेख, कथा आणि कविता कधीतरी कोणी प्रकाशक मनावर घेऊन रसिक वाचकांसाठी प्रकाशित करील अशी आशा वाटते. त्यातून हे काळाच्या पडद्याआड गेलेले धन पुन्हा खुले व्हावे हीच इच्छा आहे.

विलास कुडके.

— परीक्षण : विलास कुडके.
— संपादक : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. लघु निबंध या विस्मृतीत गेलेल्या लेखन प्रकाराचा चांगला परिचय श्री विलास कुडके यांनी मांडला आहे. आजच्या वाचकांना त्याची माहिती यामुळे होईल.
    धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments