Thursday, May 30, 2024
Homeसाहित्यदुर्मीळ पुस्तके : ३३

दुर्मीळ पुस्तके : ३३

पानदान

काॅण्टिनेण्टल प्रकाशनाने प्रकाशित केलेले वसन्त सबनीस यांचे ‘पानदान’ हे पहिले पुस्तक १९५९ मध्ये प्रकाशित झाले. जीवनात साध्या साध्या गोष्टींकडे किंवा घटनांकडे थोडे गमतीने पाहिल्यास बरेच मनोरंजन होते व बरीच विनोदस्थळे हाती लागतात आणि त्यातूनच हे ‘पानदान’ तयार झाले असे मनोगत त्यांनी व्यक्त केले आहे.

१.घ्या लवंग सुपारी राया, पानं पिकली पानतंबाखूच्या व्यसनाला व्यक्तिमत्त्व आहे. पानतंबाखू खाणारा इसम म्हणजे गप्पांत रंगणारा, दिलखुलासपणे हसणारा, मनमोकळा,स्वागत करुन पानाचा डबा पुढे सरकविणारा रसिक मनुष्य. या व्यसनाला जरी चुकीचे व्यसन म्हणत असले तरी ते प्रसन्न व्यसन आहे ज्याला जगाशी, जीवनाशी जमवून घेता येत नाही, त्याचे पानाशीहि जमत नाही. पानतंबाखूला चोरटेपणा नामंजूर आहे. रस आणि रंग यांचा सुरेख मिलाफ यात आहे. पानाच्या शिरेशिरेत रसिकपणा भरला आहे. धुम्रपानात वलय असेल तर पानतंबाखूत लय आहे. हे जनतेचे व्यसन आहे. ते जनताभिमुख आहे. सर्वांना त्यात सारखाच रस असतो. रंगणे हा पानाचा धर्म आहे. ते स्वतः रंगते आणि खाणार्‍यालाहि रंगविते. शृंगारात त्याला मानाचे स्थान आहे. इतिहासाची साक्ष विड्यांच्या बाजूने आहे. पैजेचे विडे, स्वामिनिष्ठेचे विडे, निरोपाचे विडे अशा प्रथा इतिहासाच्या पानापानांतून दिसतात. सार्‍या भारतीय संस्कृतीत तांबूलाने रंग भरला आहे. संस्कृत वाङमयात अनेक ठिकाणी तांबूलाचा उल्लेख आहेत. नागवेल आणि कात यांना औषधात जागा मिळाली आहे. सर्पदंशावर नागवेलीचे मूळ विड्यात घालून दिले जाते. काळी पाने रेचक आहेत. भारत म्हणजे पान खाणार्‍यांचा देश. कातर विडा, गोविंद विडा, त्रयोदशगुणी विडा, पलंगतोड विडा असे कितीतरी प्रकार आहेत. पानांचेही बंगला, देशी, बनारशी, कलकत्ता, रामटेक असे प्रकार आहेत. पानांमागून तंबाखू आलीच. तंबाखूचेही कितीतरी प्रकार. लोड – तक्क्यांच्या बैठकीबरोबर पानाचे तबक गेले असले तरी त्यातील जिनसि ठेल्यांवर जाऊन बसल्या. घरोघरी स्टीलचे डबे आणि पानदान आले. माणसे जोडण्यात पानतंबाखूसारखा सोबती नाही असे रंजक खुमासदार वर्णन यात लेखकाने केले आहे.

२.अनिवार असा रविवार हवा
जगापुढे असंख्य प्रश्न आहेत. त्यात लेखकाचे दोन प्रश्न आहेत. चांगली चांगली माणसं दाढी का वाढवतात? आणि रविवार हा घातवार कसा असू शकतो? रविवारी सुट्टी असते म्हणून अनेकांना रविवार आवडतो. लेखकाला मात्र त्यातली सुट्टी मोह घालीत नाही. तर त्यातील मुक्तपणा आवडतो. इतर वारीही कधीकधी सुट्टी येते पण त्यांना रविवारसारखा रुबाब नसतो. रविवार हा भव्य, उदात्त, उमदा आणि रसिक असा वार आहे. लेखकाला सोमवार आळसावलेला वाटतो. मंगळवार, बुधवार निष्क्रिय व बुजगावण्यासारखे रुक्ष वाटतात. गुरुवार – शुक्रवारला थोडे तेज आल्यासारखे वाटते तर शनिवार कुबड्या घेऊन चालणार्‍या पांगळ्यासारखा वाटतो. रविवार एखाद्या सम्राटासारखा उगवतो.पान, चहा आणि किंचित आळस हा त्याचा लवाजमा असतो. काही कवी रविवारीच कविता करतात. रविवारवरही कविता करतात. कवितासंग्रहही बहुतेक रविवार नावाने प्रसिद्ध करण्याचा त्यांचा मानस असतो. रविवारी सोमवारची खंत करणारे कमनशिबी असतात. कचेरीचे काम घरी आणून घर, कचेरी आणि रविवार काही बिघडवतात. रविवार असा सत्कारणी लावणार्‍यांचा लेखकाला राग येतो. रविवार म्हणजे रंगलेली मैफल. रविवारी कसे मनसोक्त मुक्त व्हावं. रविवारच्या मारेकर्‍यांमध्ये बायकांचा नंबर लागतो. रविवारला पिशवीचा शाप आहे. रविवारी दुपारी झोपेचे दिवास्वप्न पहावे तर बायको मुलांना डोक्याशी आणून आदळते. दर आठवड्याला येणारा रविवार लेखकाला मनिआॅर्डरसारखा प्रिय वाटतो.

३.मी तो गुलाम भारवाही
या मिश्कील लेखात लेखक आपल्या बायकोबद्दल विनोदी पध्दतीने खरं सांगतात. लग्नाच्या आधी त्यांची बायकोबद्दल भलतीच कल्पना होती. एका पुरुषाला सुधारुन त्याचा उध्दार करण्यासाठीच आपला अवतार झाला आहे, अशी तिची समजूत होती. लेखक पान खातो, तंबाखू खातो पण त्याबद्दलच्या तिच्या प्रश्नांना लेखक उत्तर देऊ शकत नाही. लग्नाला ८ वर्षे झाली. लेखक या प्रश्नांवर पान गिळून गप्प बसतात. त्यांच्या कपड्यावर सुईच्या अग्राएवढा डाग दिसला तरी त्या त्यांचा पानउतारा करतात. तिच्यापेक्षा ते चंचीची अधिक काळजी घेतात असं त्यांचं म्हणणं असते. लग्न झाल्यावर बायकोने गोड गोड बोलावे अशी कल्पना असते पण आता तिने गप्प रहावे असे लेखकाला वाटते. लेखक गबाळे व अजागळ आहे व त्यांना नीटनेटकेपणाची सवय नाही अशी तिची समजूत असते. तिच्याबरोबर बाहेर गेले तर रस्त्याने तिच्या सारख्या सूचना येत असतात. बायकोची उंची कमी असेल तर किती कुचंबणा होते ते लेखकाने यात सांगितले आहे. त्यांची बायको बुटकी आहे. लेखक तिला प्रसंगी हरबर्‍याच्या झाडावर चढवतात. ती डोक्यावर चढून बसते. लेखकाला रोज दारे खिडक्यांच्या कड्यांशी झगडावे लागते. पोटमाळ्यावरचे फळ्यांवरचे डबे काढून द्यावे लागतात व परत वर ठेवावे लागतात. संसारात चढउतार जास्त आहेत ते असे असे लेखक विनोदाने लिहितात. दर रविवारी घर साफ करण्याचा जुलमी कार्यक्रम असतो. तिचे डोळे कधी वटारलेले किंवा पाणावलेले असतात. तिचे डोळे पाहण्याचे काम न करता पहार्‍याचे काम करतात. तिचे नाकही तिक्ष्ण आहे. त्यांचा ती कांदा सोलायला उपयोग करते. तिच्या ‘डोम्बलं’ ‘मेलं’ या शब्दांचा अर्थ लेखकाला उलगडलेला नाही. घरात लेखक व त्यांच्या दोन मुली केर करतात आणि कुठलीही वस्तू आणताना लेखक डोक्याचा वापर करत नाही अशी तिची खात्री असते. वाण-सामान आणणे ही लेखकाला शिक्षा वाटते. ती स्वतःला काटकसरी समजते. लेखक उधळ्या आणि ती काटकसरी अशी विभागणी झाली आहे. ती कलेच्या प्रांतांतही पाऊल टाकून आली आहे.तिने रेशमाने भरलेले बदक, गुलाबी अंगरखा घातलेले बाळ व सुस्वागतम आहे. तिला दाखवायच्या कार्यक्रमात ते लेखकाने पाहिलेले होते. लग्नानंतर मात्र तिने एकही भरतकाम केले नाही. लोकरीचे विणकाम आणि गाणं हेही तिचे छंद सांगण्यात आले होते. लेखकाचा घातवार म्हणजे ऋषिपंचमी. आठ दिवस आधी लेखकाचे श्रमदान सुरु होते. बायको रागावली की अधिक क्रियाशील होते. ती रागावलेली असली की लेखक चार हात दूर राहतात. त्यांच्या संसारात लेखकाचे काय स्थान आहे ते सांगू शकत नाही मात्र बोहारणीला फार महत्त्वाचे स्थान आहे. बोहारीण आली की त्यांच्या घरातील वातावरण आनंदी होते. इतक्या यातना लेखक सहन करतो ते केवळ अन्नासाठी. तिच्या हातचा स्वयंपाक हाच त्यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. असे बायकोचे लोभसवाणे गुणवर्णन यात खुमासदार पध्दतीने केलेले आहे.

४.सरळसोट आणि सुप्त
लेखकाचा मित्र मनू माने उंदरावर, घुशींवर कविता करतो आणि ऐकवतो. उंदराचे आणि लेखकाचे संबंध बर्‍यापैकी आहेत. लेखक त्यांचा मांजराइतका वैरी नाही. लेखक त्यांना खात नाही अशी त्यांची खात्री आहे. उलट खाण्याच्या बाबतीत उंदरांनीच त्यांच्यावर मात केली आहे. उंदरांनी लेखकाचे अन्न खाल्ले, धान्य खाल्ले, कपडे खाल्ले, नोटा खाल्ल्या, गाद्या चावल्या.पण लेखकाला त्यांची चीड येत नाही. लेखकाच्या आयुष्यात आलेल्या स्त्रिया उंदरासारखा हृदय आणि आयुष्य कुरतडून गेल्या. उंदीर मात्र लेखकाला सोडून गेले नाही. तो लपून बसला तरी त्याला आपल्या शेपटीचा विसर पडत असतो. तो अतिशय चलाख, बेरकी आहे. माणसाची धाव बिळापर्यंत असते हे तो जाणून असतो. माणसाचे आणि उंदराचे संबंध घरोब्याचे असतात. सांपळ्यात सापडलेल्या उंदराला सापळ्यात अडकल्याच्या दु:खापेक्षा मांजरांपासून संरक्षण झाल्याचा आनंद होतो. लेखकाला आपण चाकरीच्या पिंजर्‍यात राहून सुरक्षिततेचा आनंद लुटीत असतो असे वाटते.

५.माझे गुणी शेजारी
माणसाला देणेकरी चुकविता येतात. पोलिस चुकविता येतात. पण शेजारी आणि मरण चुकविता येत नाही. कुणी शेजार्‍याचा द्वाडपणा तर कोणी शेजार्‍याचा शिष्टपणा कुणालातरी सांगत असतो. आपला उत्कर्ष शेजार्‍याला खपत नाही असे कुणाला वाटते. संत निंदकाचे घर शेजारी असावे म्हणतात. लेखकाला मात्र शेजारी चांगला असू शकतो असे वाटते. शेजार्‍यावर प्रेम करा असे सांगणारे बायबल लेखकाला आदरणीय वाटते. ब्रह्मदेव जशा लग्नगाठी आधीच मारुन ठेवतो तशा शेजार्‍याच्याही गाठी मारुन ठेवत असेल असे लेखकाला वाटते. एखाद्याच्या नशिबात सज्जन शेजारी येतात तर कोणाच्या नशिबात दुर्जन. लेखकाच्या गाठी नेहमी चांगले शेजारी आले. ते प्रेमळ होते आणि हितचिंतक होते. एका शेजार्‍याला लेखकाचा आळस फार वाढेल का याची चिंता होती. लेखक दुपारी झोपले की नेमके त्यावेळी तो घरातील बादल्या, फर्निचर यांचे दुरुस्तीचे काम काढी. लेखकाला झोप लागणार नाही अशा बेताने तो खिळे ठोकायचा. दुसर्‍या एका शेजार्‍याने तर लेखकाची रात्रीचीही झोप कमी करुन टाकली. हा सज्जन पहाटे तीन वाजता संगीत साधना करायचा. लेखकाचा झोपेवरचा विश्वासच उडाला. त्याची बायको मात्र नेपोलियनसारखी धीरोदात्तपणे गाढ झोपत. एकदाच त्याचा सर्दीने घसा बसला होता त्यावेळी चार दिवस पहाट शांततेत गेली होती. तो शेजारी सोडून गेला तरी लेखकाला अजूनही पहाटे त्याचे बेसूर सूर ऐकू येतात व झोप उडून जाते. लेखकाच्या आजारपणात त्यांच्या खर्‍याखोट्या चिठ्ठ्या तो कचेरीत पोचवायचा. प्रसंगी घरात पाहुणे जास्त झाले की त्यांना त्याच्या खोलीत जागा द्यायचा. त्याच्या जागी बारा पुत्रांचा ‘पंचपुत्रे’ शेजारी आला. तो वर्षभर राहिला नंतर त्याची बदली झाली. तो मोकळा, धीरोदात्त आणि नेहमी प्रसन्न असायचा. बारा पुत्रांचा दिवसरात्र दंगा चालायचा. शेजार्‍यांमधील चांगला गुण म्हणजे एक शेजारी दुसर्‍यासारखा नसतो. दुसरा गुण म्हणजे एका शेजार्‍याचे सर्व शेजार्‍यांशी चांगले संबंध नसतात. नंतर आले ते निपुत्रिक निनावे. सकाळी उठल्यापासून त्यांच्या घरात कचाकचा भांडण सुरु व्हायची. तो कचेरीत गेल्यावर त्याची बायको एकटीच स्वतःशी भांडत बसायची. त्यांच्या जाहिर संसाराचा नमुना पाहून लेखकाच्या बायकोचा भांडणाचा आवेश कमी झाला. शेजार्‍यामुळे हा एक फायदा झाला. शेजार्‍याशी भांडणाचे प्रसंग लेखकावर क्वचित आले. एक शेजारी असा भेटला की त्याच्याशी भांडणाशिवाय पर्याय नव्हता. तो भाडेकरुच होता पण त्याचा रुबाब मालकासारखा होता. त्याच्या परवानगीशिवाय इतर भाडेकरुंनी काही करायचे नाही असा त्याचा दंडक होता. तो सर्वात जुना भाडेकरु होता. नळाचे पाणी, मोलकरीण आणि मुलांचे खेळ ही अखिल जगात शेजार्‍यांशी भांडणाची सर्वसाधारण कारणे आहेत. नळ आणि खरकटी भांडी यावर वाड्याचा मधला चौक आणि पडवी येथे सतत वाद होत राहीले. शेवटी लेखक बायकोच्या सांगण्यावरुन दुसरे घर शोधतो. घर सोडताना लेखकाची बायको शेजारणीला सांगते की आम्ही जातो आता खुशाल नळाला तोंड लावून बसा. असे असले तरी शेजार्‍यांबद्दलचा लेखकाचा आदर कधीच कमी झाला नाही. त्यांच्या प्रेमळपणावरचा विश्वास कधीच उडाला नाही. लेखक घरात नसताना धोब्याने आणून दिलेले कपडे व्यवस्थित ठेवून घेणारे, मुलांना खाऊ देणारे, गावाला निघाल्यावर स्टेशनपर्यंत पोचवायला येणारे, आजारपणात विचारपूस करणारे शेजारी लेखक विसरु शकत नाही. त्यांच्याबद्दल लेखकाला नेहमीच कृतज्ञता वाटते. जन्मोजन्मी असेच शेजारी मिळावेत म्हणून लेखक वटपौर्णिमेला चोरुन प्रार्थना करतो.

६.मी घर बांधणार नाही
माणसाच्या आयुष्यात मूर्खपणाचे दोनच क्षण असतात. एक तो लग्न करतो तेव्हा आणि दुसरा तो घर बांधतो तेव्हा असे लेखक सांगतो. दोन्ही गोष्टी सारख्याच ताप व पश्चात्तापदायक असतात. ३/४ चिंता याच दोन गोष्टींमुळे निर्माण होतात. लग्नानंतर खर्च व चिंता वाढतात. घराच्या बाबतीतही तेच होते. घर बांधणे या गोष्टीबद्दल लेखकाच्या मनात धास्ती निर्माण झाली. घर बांधण्यात आयुष्याचे सार्थक मानणार्‍या माणसांची लेखकाला कीव येते. टकलावर केस येण्यासाठी उपचार करायचे नाहीत आणि घर म्हणून बांधावयाचे नाही असे निर्धार लेखक करतो. कारण मूर्ख माणसे घर बांधतात आणि शहाणी माणसे त्यात राहतात.

७.तापदायक तापहरिणी
मानवाच्या तापहरणाचे कार्य करणाऱ्या वस्तूंपैकी तापदायक वस्तू म्हणजे छत्री. वारा येईल तशी पाठ फिरवणारी आणि बिकट प्रसंगी वार्‍याला फितूर होऊन उलटणारी ही छत्री. तिचे आणि लेखकाचे संबंध पहिल्यापासून बरे नाहीत. लहानपणी एका बालमित्राशी त्यांचा छत्रीवरुन जो खटका उडाला तो लेखकाला छत्रीचा खटका दाबताना अजूनही आठवतो. लेखकाने त्याची छत्री नेली होती व परतही केली होती पण ती मुळीच परत केली नाही असे बालमित्राचे म्हणणे होते. पुन्हा ही छत्री माध्यमिक शाळेत ड्राॅइंगच्या तासाला माॅडेल म्हणून छळू लागली. ती लेखकाकडून कागदावर उतरेना. ती त्यांच्या मनातून मात्र उतरली. छत्रीच्या निमित्ताने कादंबर्‍यातील नायिकांप्रमाणे लेखकाची कुठल्याही सुंदर व लोभस तरुणीची ओळख झाली नाही किंवा कुठलीही तरुणी वा प्रौढा त्यांच्या छत्रीत आली नाही.छत्री आपले मुख्य काम सोडून इतर हजार कामे करत असते. ऊन आणि पाऊस ह्यापासून माणसाचे संरक्षण करणे हे खरे छत्रीचे काम. पण माणसाला परोपकारी बनवण्याचे साधन म्हणून छत्रीचा फार उपयोग होतो. छत्री मागून नेणे किंवा दुसर्‍याच्या छत्रीत घुसणे या प्रथा अनादिकालापासून सुरु आहेत. छत्रीमध्ये कांदे-बटाटे भरुन आणणारे, लेकरांची पायताणे लपवून आणणारे, काठीसारखा आधार म्हणून किंवा मारामारीचे एक साधन म्हणून उपयोग करणारे लोक आहेतच. छत्रीने धुणी वाळत घालतात. त्यांचा मित्र तर छत्रीचा उपयोग कवितेसाठी करतो. एका लग्नप्रसंगी उखाण्यातही छत्रीचा उपयोग केला आहे. हरवणे किंवा विसरणे हा छत्रीचा स्वभाव आहे. कोणतीही छत्री लेखकाच्या मुठीत राहिली नाही. पहिले एक दोन पाऊस लेखक छत्रीवर न घेता अंगावरच घेतो. पावसाचा जोर वाढला की लेखक छत्री खरेदी करण्याचा विचार करतो. ज्या दुकानात छत्र्या जास्त त्या दुकानात काही कळत नसूनही पाच सहा छत्र्या उघडून व मिटून पाहून घासाघीस करुन लेखक छत्री खरेदी करतो. इतर वेळी न भेटणारे नेमके त्या दिवशी भेटतात व नवीन खरेदी का म्हणून छत्री हातात घेऊन पाहतात. कुणी फसलात म्हणून अभिप्राय देतात. घरी कुटुंबाला छत्री खरेदीत व्यवहारशून्यता दिसते. लेखकाने नवी छत्री घेतल्याची बातमी शेजार्‍यांच्या तोंडी होते. शेजार्‍याने नवी छत्री घेतली म्हणजे आपल्याला नवी छत्री घ्यायची आवश्यकता नाही अशी काही शेजार्‍यांची कल्पना असते. आठ दहा दिवस लेखक छत्रीला जपतो. काय मेलं त्या छत्रीचं कौतुक एवढं म्हणून कुटुंबाचा रोष ओढवून घेतो. छत्री हातात रुळली की लेखक तिच्याबद्दल बेफिकीर बनतो आणि त्यातच ती हरवते. त्यांच्या कुठल्याही छत्रीने एकापेक्षा अधिक पावसाळे पाहिले नाहीत. चार महिने रोज छत्री हातात ठेवणे त्रासदायक असते. त्यात मोकळेपणा नष्ट होतो. स्वातंत्र्य जाते. छत्रीतच अडकून पडल्यासारखे वाटते. हातात आणखी सामान असेल तर केविलवाणी स्थिति होते. चालताना लेखकावर छत्र धरायचे सोडून कुणाच्या छत्रीत अडकणे, कुणाच्या केसात गुंतणे, कुणाच्या डोळ्यात घुसू बघणे, कुणाच्या शिव्या खाणे, कुणाचा धक्का खाणे असे तिचे इतर उद्योग सुरु असतात. चिंब भिजलेली छत्री जवळ बाळगणे जिकिरीचे असते. ती नादुरुस्त झाली की एखाद्या दुराराध्य प्रेयसीप्रमाणे तोंड उघडत नाही आणि एकदा उघडली की तोंड मिटत नाही. काड्या निसटणे हा तर तिचा सर्वसामान्य रोग आहे. एकदा दुरुस्त केलेली छत्री पुन्हा दुसर्‍याच दिवशी नादुरुस्त होऊ शकते. छत्रीवर लेखकाने काही नैतिक बंधने घातली आहे. ओलेत्याने घरभर फिरु नये. उघड्या अंगाने बसू नये. जो येईल त्याच्या पुढेपुढे करु नये, एका बाजूला कोपर्‍यात उभे राहावे इ. पावसाळ्यानंतर लेखक छत्री अडगळीत फेकून देतो आणि आठ महिने सुखात घालवतो.

८.मर्दाचे शिरोभूषण
एकदा पडू लागल्यावर थांबवता येत नाही किंवा अडविता येत नाही अशा दोनच गोष्टी असाव्यात.एक पाऊस आणि दुसरे टक्कल. लेखकाला झकास टक्कल पडले आहे असे ते सांगतात. टक्कल पडल्याने माणसाला केसभरही कमीपणा येत नाही. केसवाल्या लोकांना टकलाबद्दल चिंता वाटते. स्त्रियांना सहसा टक्कल पडत नसल्याने टक्कल पडणे हे मर्दाचे काम आहे. असंख्य पापे घेऊन उजळ माथ्याने फिरण्यापेक्षा निष्पाप टक्कल उघडे टाकून फिरण्यास हरकत नाही. ही सिध्दावस्था प्राप्त होण्यापूर्वी माणसाला फार यातना सोसाव्या लागतात. डोक्यावर टक्कल उगवते आहे याची रुखरुख माणसाला बेचैन करते. आपल्यामध्ये बघण्यासारखे आता फक्त टक्कलच राहिले अशी त्याची समजूत होते. डोक्यावर शिल्लक असलेल्या केसांचा तो टक्कल झाकण्यासाठी उपयोग करु लागतो. आपल्याला टक्कल पडत नसून आपले फक्त केस गळत आहेत असा त्याचा गैरसमज होतो. वेळीच उपाय योजले तर टक्कल निघून जाईल असाही त्याचा गैरसमज होतो. लेखकाने तेलाचे प्रयोग केले पण गेलेला एकही केस परत आला नाही. टकलाचा मोकळ्या मनाने स्वीकार व स्वागत करण्यात टकलाचा पराभव आहे हे तत्वज्ञान लेखक सांगतो. टकलामुळे आपले व्यक्तिमत्त्व आकर्षक झाल्याचे दिसून येते. माणसात मर्दानी झांक येते. जगातले बहुतेक बुध्दिमान लोक टक्कलवाले आहेत ही नवी दृष्टी त्याला लाभते. टक्कल हे मर्दाचे शिरोभूषण आहे. केस काय, आज आहेत तर उद्या नाहीत ;पण टक्कल कायम राहाणारे आहे. ते दगा देत नाही.

९.माझे पानिपत
प्रत्येक मनुष्य काटकसर करण्याचा खटाटोप करतो पण ती मनासारखी होत नाही. काटकसर शिकवून येत नाही तर माणसाची वृत्तीच तशी असावी लागते. बालपणापासून काटकसरीचे धडे मिळतात. पेन्सिल पुरवून वापरा. संसार काटकसरीने असावा. म्हातारपणापर्यंत काटकसरीची कसर माणसाला इतकी पोखरुन टाकते की, तो खर्च न करता फक्त काटकसरच करत राहतो. काटकसर ही फक्त दुसर्‍याला करायला सांगण्याची गोष्ट आहे अशी लेखकाची समजूत होती. आपण उधळे नसल्यामुळे काटकसरीचा संदेश आपल्याला लागू नाही अशीही त्यांची समजूत होती. अंथरुण पाहून पाय पसरावे ही म्हण डोक्यात पक्की बसलेली असते. काटकसरीची कांटेरी वाट चालताना लेखकाला फार मानसिक कसरत करावी लागते. काटकसर विसरुन झोपले की झोप चांगली लागते.परशुरामतात्या एक यशस्वी काटकसर्‍या होते. ते हयातीत पोटभर जेवले नाही. आंगभर वस्त्र ल्यायले नाही. एका चपातीत तीनजण जेवत. आजारपण आले की त्यांना नाईलाजाने औषध आणावे लागे.त्यात पाणी घालून ते तीन दिवस पुरवत. शेवटी त्यांच्या आर्युमानात काटकसर होऊन ते मेले. लोक त्यांचा काटकसरीतील अघोरीपणा विसरले पण त्यांनी साठवलेले दहा हजार रुपये त्यांच्या लक्षात राहिले. लेखक मग काटकसरीचे घरात विविध प्रयोग करतात. पण काटकसरीला नेहमी खर्चाचा शाप असतो. महिनाअखेरीस पाहुणे येतात. काटकसरीच्या बाबतीत मात्र आपले पानिपत आहे असे लेखक शेवटी कबुल करतो.

१०.यावर उपाय नाही!
दोन तास ब्रिज खेळून त्यावर दहा तास चर्चा करणारे, सकाळपासून रात्रीपर्यंत तब्येत, बायको, साहेब, नोकरी, जग, झोप याबद्दल अखंडपणे तक्रार करणारे यांच्या सहवासात राहण्याची कला लेखकाने आत्मसात केली आहे. पण आयुर्वेद, अ‍ॅलोपथी, होमिओपॅथी व निसर्गोपचार यातील स्वल्पज्ञानी हौशी वैद्यांची लागण त्यांना अस्वस्थ करते. एकवेळ हे परवडले पण हौशी हाडवैद्य अगदी कठीण. अशा हौशी वैद्यांच्या संगतीत कोणताहि निरोगी माणूस राहू शकेल का? आपले नशीब बलवत्तर म्हणून अजून हौशी सर्जन निर्माण झालेला नाही. हौशी वैद्य म्हटला की लेखकाला दरदरुन घाम फुटतो. हौशी वैद्य औषधापुरताही नको असे वाटते. हौशी वैद्यावर उपाय नाही.

११.असा हा कर्‍हाडा
गोविंदपंत बुंदेल्यांपासून गोविंदराव टेंब्यांपर्यंत अनेक थोर लोक कर्‍हाडे ब्राह्मण जातीत जन्मले. झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि जावई मारणारी जात या दोन गोष्टींबद्दल ही जात फार प्रसिद्ध आहे. कोकणस्थ शरीराच्या विशिष्ट ठेवणीवरुन व देशस्थ कपड्यांवरुन ओळखता येतो. तसे कर्‍हाडे ब्राह्मणाचे लक्षण सांगता येणार नाही. तुंगभद्रेपासून नर्मदा – गोदावरीपर्यंत करहाटक प्रांत जो आज नकाशात नाही, त्याची राजधानी करहाटक क्षेत्र म्हणजे आजचे कर्‍हाड. दहाव्या शतकापासून येथे शिलाहार राजे राज्य करत होते. त्यांची कुलदेवता महालक्ष्मी. बहुतेक कर्‍हाडे ब्राह्मणाचे कुलदैवतही महालक्ष्मी हेच आहे. करहाटक प्रांतातले ब्राह्मण कोकणात उतरले तेव्हा ते कर्‍हाडे ब्राह्मण म्हणून ओळखले जावू लागले असावे.जी ब्राह्मण घराणी कर्‍हाड सोडून गेली नाही ती कर्‍हाडे झाली नाही, ती देशस्थ म्हणून राहिली. कर्‍हाडे एकवेदी(ऋग्वेदी) , एकसूत्री(आश्वलायन) व एक शाखी (शाकल शाखी) आहेत.ते उदारपणा, स्वच्छता, टापटीप व व्यवहारदक्ष असतात.त्यांची मातृका म्हणून देवी होती. वंशवृध्दीसाठी तिला नरबळी जावई किंवा भाचा यांचा दिला जाई. दरवर्षी कार्तिक शुद्ध पौर्णिमेस कुलधर्म करावयाचा व विष घालून नरबली द्यायचा असा हा प्रवाद आहे.

१२.मी आणि शिंपी
कुंचीच्या निमित्ताने माणसाच्या जीवनात शिरणार्‍या शिंप्याची संगत मरणापर्यंत टळत नाही. वेळेवर पाऊस पडणे आणि शिंप्याने वेळेवर कपडे देणे हे दैवाधीन असते. वक्तशीरपणाशी त्याचे वैर असते. लग्नाचा मुहूर्त आला तरी त्याच्याकडील कपड्याचा पत्ता नसतो. सारा लग्नमंडप नववधूच्या आतुरतेने शिंप्याची वाट पाहतो. वधूसुध्दा नवरदेवाऐवजी शिंप्याच्या वाटेकडे डोळे लावून बसते. शिंपी कापड खातात हा सार्वजनिक गैरसमज आहे. शिंपी स्वतःसाठी कापड खरेदी करताना दिसत नाही. काहीवेळा तो जास्त झालेले कापड बाजूला काढून ठेवतो पणे ते कापड खाणे म्हणणे त्याच्यावर अन्याय आहे. अनुरुप शिंपी मिळणे ही भाग्याची गोष्ट आहे. ते भाग्य काही लेखकाच्या वाट्याला आलेले नाही.एकाने शर्ट शिवला तो काखेत दाटला. एका शिंप्याने त्यांचा गळाच आवळला.दुसर्‍या एकाने शर्टाची छातीच अरुंद करुन टाकली होती. कापड-खरेदी करण्याच्या बाबतीत लेखक कसा गाफील व गबाळा आहे हेच तेव्हा शिंप्याने सिद्ध केले.जागा बदलली तरी खिशाचे कार्य बदलत नाही असा उलट हितोपदेश शिंपी करत असतो. कपड्यांमुळे आपल्याकडे नजरा वळाव्यात असे वाटण्याच्या वयापासून लेखकाला शिंप्यांचा राग येऊ लागला आहे. संत नामदेवाच्या वंशातले म्हणून लेखकाला त्यांच्याविषयी आदर वाटतो. पण बहुतेक शिंप्यांनी त्यांच्या शरीराशी विसंगत असेच कपडे शिवले. तसे भेटलेले शिंपी स्वभावाने चांगले होते. लेखकाने बरेच शिंपी बदलले. इतक्या बदलाबदलीत नाही म्हणायला दोन-तीन शिंपी लेखकाच्या अंगावर बर्‍यापैकी कपडे चढवून गेले. लेखक अजूनही अनुरुप शिंप्याच्या शोधात आहे. जर शिंपी मिळाला नाही तर स्वतःच्या शरीराच्या प्रमाणबध्दतेवरील त्यांचा विश्वास हमखास उडणार आहे. जिंकायला भूमि राहिली नाही म्हणून अलेक्झांडरवर ढसढसा रडण्याची पाळी आली तशी बदलायला शिंपी राहिला नाही म्हणून येईल की काय, अशी लेखकाला भिती वाटते.

१३.संसार करावा नेटका
संसाराला शास्त्रशुद्ध पाया हवा. संसार हा ‘पोरखेळ’ आहे असा आतापर्यंत गैरसमज होता. संसार हा सागर आहे,संसार म्हणजे लढाई आहे,असे कोणी म्हणतात तर कोणी ती नदी आहे म्हणतो. तर संसार असार आहे असा काहींचा दावा आहे. नेमका संसार म्हणजे काय, हे कोणी सांगू शकलेले नाही. मागच्या पिढ्यांनी संसार केले पण संसाराचे ज्ञान नसतांना त्यांनी संसार केले. संतांनी तर संसाराविरुध्द बंडच पुकारले. संसार ही माया आहे. तिच्या नादी लागू नका असाच त्यांचा संदेश होता. नाही म्हणायला रामदास स्वामींनी ‘संसार करावा नेटका’ एवढाच संसाराबद्दल उपदेश केला. तुकारामाने संसार न सोडता भक्तिभाव शिकवला. आमच्या पिढीला जागा नसल्यामुळे एका खोलीत संसार रचावा लागतो. महागाईमुळे पैसा पुरत नाही. डालडावर हौस भागवावी लागते. रेशनिंगचे धान्य पोटापर्यंत पोंचवावे लागते. साग्रसंगीत बाळंतपण न करता मॅटर्निटी हाॅस्पिटलमध्ये ते उरकावे लागते.’संसाराचा रथ’ ‘विवाहितांचा स्वर्ग’ ‘संसार-गंगा’ ‘अष्टपुत्रा सौभाग्यवती भव’ सारख्या संसारोपयोगी पुस्तकातून अलिकडे नवविवाहितांना अनेक मार्गदर्शक सूचना उपलब्ध आहेत. नवर्‍याच्या तर्‍हा, नवरा – बायकोची भांडणे कां व कशी होतात? भांडणाचे नमुने असे सुध्दा त्यात मार्गदर्शन केलेले असते. संसारात पडण्यापूर्वी, संसारात पडताना, विवाहितांचे नंदनवन, संसार-मंजूषा अशी कितीतरी पुस्तके दिसतील. कदाचित संसारात पडल्यावर, संसारात आपटल्यावर, संसार आटोपल्यावर अशीही पुस्तके निघू शकतील. लग्नात अशी पुस्तके हमखास भेट म्हणून दिली जातात. संसारापेक्षा संसाराची पुस्तके वाचण्यातच पुढच्या पिढीचा अधिक वेळ जाईल. असा हा उपहासात्मक विनोदी लेख आहे.

रघुनाथ दामोदर सबनीस उर्फ वसंत सबनीस (६/१२/१९२३-१५/१०/२००२) यांची चिल्लरखुर्दा (१९६०), भारुड (१९६२),मिरवणूक (१९६५),पंगत(१९७८),आमची मेली पुरुषाची जात (२००१) हे प्रसिद्ध लेखसंग्रह आहेत.
एकटा जीव सदाशिव, सोंगाड्या हे चित्रपट त्यांच्या कथांवरुन बनले. अशी ही बनवाबनवी, एका पेक्षा एक, गंमत जंमत, नवरी मिळे नवर्‍याला, बाळाचे बाप ब्रह्मचारी या चित्रपटांच्या कथा – पटकथा त्यांच्या होत्या. पानदान (१९५९) हा ललित लेख संग्रह ,आत्याबाईला आल्या मिशा (१९८५),विनोदी द्वादशी (१९८८),बोका झाला संन्यासी (२००१)हे विनोदी लेखसंग्रह
निळवंती (१९६३), म्हैस येता घरा (१९६९), सौजन्याची ऐशी तैशी (१९७५), घरोघरी हीच बोंब (१९८८), गेला माधव कुणीकडे (१९९४) ही प्रसिद्ध नाटके, विच्छा माझी पुरी करा (१९६८) या त्यांच्या लोकनाट्याने यशस्वितेचा विक्रम केला.
ते राज्य शासनाच्या तत्कालीन प्रसिध्दी संचालनालयात होते. तसेच किशोर मासिकाचे संपादकही होते. पानदान हे त्यांचे पहिलेच पुस्तक आज दुर्मीळ झालेले आहे.

विलास कुडके.

— परीक्षण : विलास कुडके.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments