Saturday, July 27, 2024
Homeसाहित्यदुर्मीळ पुस्तके : ३४

दुर्मीळ पुस्तके : ३४

“निबंध-सुगंध” : भाग – २

१४.आरशांत दिसणारं माझं रुप !

माणसाला स्वतःविषयी जे ज्ञान होतं, ते पुष्कळ अंशानं लोक काय म्हणतात त्यावरुन होत असतं. लोकमत हा आरसा आहे. त्यात प्रतिबिंब बघण्याची इच्छा प्रत्येक माणसाच्या ठिकाणी आहे. लोकात परस्परविरोधी मते असतात. फडक्यांनी मराठी कादंबरी चटकदार केली, सुबक केली, आकर्षक केली, मराठी भाषेला सुंदर शैलीची देणगी दिली असे लेखकाचे चाहते म्हणतात. तर टीकाकार म्हणतात की फडक्यांनी कथेच्या तंत्राला वाजवीपेक्षा अधिक महत्त्व दिले. त्यांच्या कथा कादंबर्‍यात तंत्राचं सौंदर्य भरपूर आहे, परंतु आशयाची भव्यता नाही. आता फडक्यांनी लेखनीला रजा द्यावी, लेखनातून मुक्त व्हावं असा पोक्त सल्लाहि ते देतात. जे काही लिहायचे ते वाचनीय, चित्ताकर्षक, चटकदार झाले पाहिजे आणि त्यासाठी जे काही करायचे त्याला ‘तंत्र ‘म्हणतात.यासाठीच त्यांनी कलेसाठी कला या मताचा पुरस्कार केला. मानवी जीवन हाच ललित साहित्याचा विषय आहे. या अर्थाने ते जीवनवादी आहेत. खरी कसोटी सौंदर्याचीच असली पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे. सौंदर्य हीच त्यांच्या लेखनाची खरी शक्ती आहे. त्यांच्या साहित्याची योग्यता टीकाकार ठरवतील ती किंवा सरकार ठरवील ती आहे असे ते मानीतच नाही.

केवळ साहित्याबद्दलच नाही तर लेखकाच्या स्वभावाबद्दल देखील वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे ग्रह आहेत. कुणी अहंकारी म्हणतात, कुणी उध्दट तर कुणी प्रेमळ म्हणतात. लेखकाला ते अहंकारी आहे आणि नम्रही आहे असे वाटते. इतर कित्येक परस्परविरोधी गुण त्यांच्या ठिकाणी आहेत. ते नास्तिक आहे परंतु श्रध्दावान आहेत. ते परमेश्वराचे अस्तित्व मानतात. जी थोर माणसे होऊन गेली त्यांचे आदर्श डोळ्यापुढे ठेवले पाहिजे असे त्यांना वाटते.

स्वत:अनुभवलेली सुख-दु:ख हाच कथालेखकाचा कच्चा माल आहे. यामुळेच लेखकाच्या कथा साहित्यात त्याच्या स्वतःच्या चरित्राचं चित्रण बर्‍याच अंशी असते. लेखकाने त्यांच्या कादंबर्‍या राजकीय प्रचारापासून अलिप्त ठेवल्या असून लालित्य हाच मुख्य गुण मानून ते लिहित आले आहे. मराठी साहित्याची परंपरा पुढे चालविण्यास अल्पसा हातभार लावला आहे एवढीच शुध्द जाणीव लेखकाला आहे.

१५.माझा राजकीय पुढारीपणा
लेखकाला लोकमान्य टिळकांच्या राजकारणाबद्दल विलक्षण आदर होता. त्यांचा लोकोत्तरपणा त्यांना अधिकाधिक पटू लागला होता. १९२० मध्ये ते त्यांच्या सहवासात आले. त्यांच्या राजकारणात शक्य तेवढा भाग घेण्याची इच्छा त्यांच्या मनात अंकूर धरु लागली.

१ आॅगस्टला लोकमान्य टिळकांचे देहावसान झाले. दहाव्या दिवशी लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा झाली. त्यात लेखकाने अत्यंत भावनाप्रधान भाषण केले. त्याबद्दल लाला लजपतराय यांनी त्यांना शाबासकी दिली व सांगितले की त्यांच्यासारखी माणसे चळवळीत पडली पाहिजे. लेखक अच्युत बळवंत कोल्हाटकरांच्या सहवासात आले. न्यू पूना कालेजात प्रोफेसर म्हणून काम करु लागल्यावर व्याख्याता म्हणून त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले.

लेखकाला लोकप्रियतेचे व्यसन लागले होते. लेखक गांधीजींच्या असहकारितेच्या चळवळीत सामील व्हायचं ठरवतात आणि काॅलेज सोडतात. या कृत्यामुळे खळबळ उडाली.श्री तात्यासाहेब केळकर यांच्या निमंत्रणावरुन ते केसरी – मराठाच्या संपादक वर्गात दाखल झाले. टिळक राष्ट्रीय विद्यापीठात ते विनावेतन अध्यापनाचे कार्य करत होते. नंतर मात्र लेखक राजकीय चळवळीतून अंग काढून घेतात. केसरी कचेरी पण सोडतात. त्याबद्दल त्यांना उपहास आणि विटंबना सोसावी लागते. गांधीजींनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स काॅलेजच्या प्रिन्सिपॉल रुद्र जे त्यांचे स्नेही होते त्यांना पत्र लिहून लेखकाला तिथे नोकरी मिळवून देतात. ती नोकरी हंगामी होती. नंतर ते सिंध हैदराबादच्या कॉलेजात गेले. तीही नोकरी नंतर सुटली. अखेर १९२६ मध्ये ते कोल्हापूरच्या राजाराम काॅलेजात गेले आणि स्थिरावले.

१६. माझ्या हातून घडलेला एक प्रमाद
१९१६ साली न्यू पूना काॅलेज (सर परशुरामभाऊ काॅलेज) निघालं. प्रारंभापासूनच त्यात लेखक प्रोफेसर म्हणून काम करु लागले होते. ते एम. ए. झालेले नव्हते तरीही त्यांची तिथे तर्कशास्त्र आणि तत्वज्ञान या विषयांचा प्राध्यापक म्हणून निवड झाली होती. तरी ते नूतन मराठी शाळेतील सहाव्या सातव्या इयत्तांना इंग्रजी शिकविण्याचे काम करतच होते. त्यावेळी ते अवघे २२ वर्षांचे होते पण त्यांच्या हातात छडी असायची. विद्यार्थी १५-१६ वर्षांचे होते. एक गोवंडे नावाचा विद्यार्थी होता. शाळेबाहेर लेखक त्याचे सवंगडी होते. तो त्यांच्या बरोबर क्रिकेट क्लबमध्ये खेळत. एक दिवस त्याने घरचा अभ्यास करुन आणला नाही. त्याच्या अंगावर लेखकाने सपासप छडी ओढली. त्यानंतर सुट्ट्या लागणार होत्या त्यामुळे ते मुंबईला निघून जातात. मुख्याध्यापक घारपुरे त्यांना शोधत मुंबईला येतात. गोवंडेला मारल्याबद्दल लेखकाशी संतापून बोलतात. ‘असं व्हायला नको होते ‘असे लेखक त्यांच्याजवळ कबूल करतात.

१७.प्राध्यापकाच्या पेशांतील सुख – दु:खे
लेखकाला सुरुवातीला मामलेदार व्हावे असे वाटायचे. वडिलांना मात्र ते वकील व्हावे असे वाटायचे. लेखकाने मात्र नंतर प्राध्यापकाचा पेशा पत्करला. या पेशात अर्थलाभ फार बेताचा पण यासारखी दुसरी नोकरी नाही. चार तास शिकवावे. मन:पूत खेळ खेळावे. सवडीचा वेळ मिळेल त्यात साहित्य निर्मिती करावी. तरुण विद्यार्थ्यांत मिसळावे आणि स्वतःचे तारुण्य कायम राखावे! पण रोजच्या रोज द्याव्या लागणार्‍या व्याख्यानांचा मधून मधून कंटाळा येतो. परीक्षांचं रहाटगाडगे चालू असते. परीक्षक म्हणून वर्णी लागते. पेपरांचे गठ्ठे तपासतांना जीव आंबून जातो. आपलं इंग्रजी बिघडेल का अशी भिती वाटू लागते. जिमखान्याचे काम, वार्षिक संमेलन यांचं काम करावेच लागते.

१८. ना खेद! ना खंत
लेखकाला भेटायला आलेला एक मित्र त्यांचा सनातनी थाटातला एक विलक्षण फोटो पाहिल्याचे सांगतो. त्यात लेखक धोतर नेसलेले होते व अंगांत बंद काॅलरचा पायघोळ कोट घातलेला असतो आणि डोक्याला जरीकाठी पांढरा शुभ्र रुमाल! लेखक असे आणखी वेगवेगळे फोटो असल्याचे सांगतात. बूट, कोट, पॅन्ट, नेकटाय व डोक्याला अस्सल कोल्हापुरी साफा अशा पोशाखातही फोटो आहेत. पायांत काळा पंपशू, अगदी तलम धोतर, रेशमी शर्ट, रेशमी कोट आणि डोक्याला फरची टोपी अशाही वेषातील फोटो आहेत. एक फोटो प्रवचन करतांनाचा असा आहे की त्यात लेखकाने मांडी घातली आहे. अंगावर फक्त उपरणे. कपाळाला बुक्का व पुढ्यात ज्ञानेश्वरी!
आज जे काही मानसिक स्वरुप आहे ते घडवण्यास या अवस्थाच कारण झाल्या असे लेखकाला वाटते. आज त्या विसंगत दिसतील. हास्यास्पद वाटतील पण त्या त्या वेळी आपण तसे होतो असे लेखक सांगतात. सिंधमध्ये गाढव प्रतिष्ठित समजले जाते. विद्यार्थ्यांसाठी लेखक गाढवावरसुध्दा बसले होते. त्या त्या वेळी लेखकाने ती रुपे घेतली याचा त्यांना खेद वाटत नाही आणि ती रुपे टाकली याची खंत वाटत नाही.
भाग चवथा
स्थलचित्रं व व्यक्तिचित्रं

१९.पन्नास वर्षांपूर्वीची माझी शाळा!
लहानपणचं पुणं लहान होते. जीवनक्रम आटोपशीर होता.लेखक त्यांच्या नूतन मराठी शाळेतील आठवणी सांगतात. मास्तर आणि विद्यार्थी यांचे संबंध अधिक निकष आणि जिव्हाळ्याचे होते. छडी होती तसे जिव्हाळ्याचे प्रेमही होते. खेळांच्या स्पर्धा होत्या. विद्यार्थी तालमींना जात. दिनकर बळवंत देवधर हे विख्यात क्रिकेटर नूतन मराठीचे विद्यार्थी होते. वार्षिक परीक्षा संपल्या की उन्हाळ्याची सुट्टी लागण्यापूर्वी सकाळी सन्माननीय पाहुण्यांचे व्याख्यान आणि संध्याकाळी वासंतिक रसपान होत. शेराशेराचे पितळी तांबे आणि पावशेर मापाची फुलपात्र असायची. रसाची गुर्‍हाळ लावली जायची. उन्हाळ्याच्या सुट्टीत नदीच्या डोहात किंवा विहिरीत यथेच्छ पोहणे व्हायचे. कीर्तनं ऐकली जायची. कीर्तनाच्या गर्दीत बेटकुळ्या फेकल्या जायच्या. असे स्वच्छंद आनंदाचे दिवस लेखकाने वर्णन केले आहे.

२०.हे माझं पुणं
पुणं लेखकाची जन्मभूमि नाही. परंतु त्यांचे बहुतेक शालेय शिक्षण आणि संपूर्ण महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. तीस वर्षे पुण्यापासून लेखक दूर होते व परत पुण्यात येऊन स्थायिक झाले. त्यामुळे त्यांचे पुण्यावर फार प्रेम होते. वीस वर्षात पुणे शहराचा भौगोलिक विस्तार वाढला. अंतरंग आणि बहिरंग पार बदलून गेले. लेखकाने यात पुण्याचे जुने स्वरुप वर्णन केले आहे. पुणेरी टांगेवाला म्हणजे साहित्याचा विषय होईल अशी अजब वल्ली होती. इंग्रजांच्या राजवटीत मुंबई प्रांताचा गव्हर्नर जिथे रहात असे ती विस्तीर्ण नयनरम्य सृष्टिशोभेची जागा पुणे विद्यापीठाला मिळाली आहे. लग्न थाटाने करावयाचं असेल तर पुण्यास करावे असे बाहेरगावचे लोक म्हणतात. आज बैलांनी ओढल्या जाणाऱ्या घाण्याचे रसाचं गुर्‍हाळ दिसत नाही. पूर्वीसारखी फुलवाल्यांची दुकाने दिसत नाहीत. पुण्यातील शांत सुखी जीवनक्रम आता दुर्मीळ झाला आहे. आता जिकडे तिकडे गर्दी, धावपळ, घाई दृष्टीस पडते. अपघात वाढले. चोर्‍यामार्‍या वाढल्या. पण लेखकाला खेद वाटत नाही. लेखकाला पुणं अत्यंत प्रिय वाटते आणि पुण्याची सर कोणत्याही शहराला नाही असे त्यांना वाटते.

२१. खाऱ्या पाण्याखालची गंगा!
कोल्हापूर शहराची चौफेर वाढ चालली आहे. राजाराम काॅलेजात नोकरीच्या निमित्ताने लेखकाने १९२६ पासून २३ वर्षे काढली. शाहू महाराजांच्या काळातील खेडेवजा कोल्हापूरचे वर्णन लेखकाने केले आहे. सावकाश, धीम्या, ठाय लयीत व्यवहार चालत. घाई, गडबड, धावपळ, धांदल नव्हती. बस नव्हती. शाहू महाराजांच्या गराज मध्ये चार किंमती मोटारगाड्या होत्या तेवढ्याच. शाहू महाराज घोड्यांच्या खडखडीतून फिरायचे. कलात्मक बांधणीचे जुने छोटेसे रेल्वे स्टेशन जाऊन आता त्या जागी मोठं स्टेशन उभं राहिलेलं आहे. पूर्वीचा शांतपणा गेला. विश्रब्धता नाहीशी झाली. सुखासीनता हरपली. कोल्हापूरचा गूळ आणि कोल्हापूरी साज यांचे माहात्म्य आजही कायम आहे. अंबाबाईच्या देवालयांत यात्रेकरुंची गर्दी बारा महिने आढळते. कोल्हापूर बदलले तरी शहराचा मुख्य गाभा कायम आहे. कोल्हापूरच्या अस्सल व्यक्तित्वाचं गंगोदक झुळूझुळू वाहताना नेहमी दिसणारच असे गौरवोद्गार लेखक शेवटी काढतात.

२२.पेशानं हुजर्‍या, परंतु वृत्तीनं रसिकाग्रणी
कोल्हापूरात लेखकाची भेट केशवराव पाटलांशी होते. त्यांचा नित्य सहवास त्यांना घडला. तालमीचा षोक, पैलवानी थाट, झोकदार तलम धोतर, परीटघडी शर्ट, किंमती कोट, डोक्याला साफा. शाहूमहाराजांचे ते एक हुजरे होते. मोतीबाग कामगार हा हुद्दा त्यांना मिळालेला. कोल्हापूरास येणाऱ्या दरबारी पाहुण्यांची सरबराई करायची संधि त्यांना मिळे. पाहुण्यांवर केशवरावांच्या बुध्दीची, रसिकतेची आणि नम्रतेची छाप पडे. अनेक गायिका, गवय्ये, कलावंत, नट, मल्ल, लेखक, कवी, वक्ते सार्‍यांना ते प्रिय होते. मन व अंत:करण विशाल, उच्च अभिरुचि, कलेचे व्यसन असे हे व्यक्तिमत्त्व होते. ज्ञानेश्वरी हा त्यांचा पूजाग्रंथ होता. त्यांना उत्तम प्रकारच्या जेवणाचं व्यसन होते. त्यांचे सुंदर व्यक्तिचित्र रंगवले आहे.

२३.नट-सम्राट गणपतराव जोशी
शेक्सपीअरचं नाटक आपल्या मराठी संस्कृतीशी आणि राहणीशी बहुतांशी विसंगत आहे. मात्र शाहूनगरवासी कंपनीमार्फत गणपतरावांचा ‘हॅम्लेट (विकारविलासित) ‘ मराठी प्रेक्षकांच्या काळजाला एकदम भिडला. शेक्सपीअरची थोरवी महाराष्ट्राला गणपतरावांमुळे समजली. ‘त्राटिका’,’ झुंझारराव ‘,’ राणा भीमदेव ‘,’ हॅम्लेट ‘, ‘तुकाराम ‘या गणपतरावांच्या नाटकांनी लोकांना वेड लावले. १९०१ ते १९०६ पर्यंतचा काळ त्यांच्या चढत्या भाग्योदयाचा होता. त्यांना अमाप पैसा व लोकप्रियता मिळाली. बडोद्याचे महाराज सयाजीराव यांचा त्यांना आश्रय मिळाला. लोकशिक्षणाच्या हेतूने त्यांनी ‘तुकाराम ‘’रामदास ‘नाटकं सादर केली. देशकल्याणाच्या चळवळींना त्यांनी एकेका खेळाचं सबंध उत्पन्न धाडलं. गांधीजींच्या चळवळींनी प्रेरीत होऊन त्यांनी व्यवहारातच नव्हे तर रंगभूमीवर देखील खादीचे कपडे वापरण्यास सुरुवात केली. त्यांना दारुचं व्यसन होतं. वयाच्या १४ व्या वर्षी घरातून पळून, आपल्या विधवा आईला टाकून, ते ‘शाहूनगरवासी ‘मंडळीत दाखल झाले होते. ७ मार्च, १९२२ रोजी वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांनी आपली इहलोकाची यात्रा संपवली आणि मराठी रंगभूमीवरचं गणपतरावाचं युग संपलं! असं सुंदर व्यक्तिचित्रण लेखकाने केले आहे.

२४.जुन्या निबंधकारांतील रसिकाग्रणी शिवराम महादेव परांजपे राजकीय, सामाजिक, धार्मिक प्रश्नांवर लोकजागृति करण्यासाठी चिपळूणकर, आगरकर, टिळक प्रभृति मंडळी निबंध-लेखन करीत. परंतु शिवराम महादेव परांजपे यांच्या निबंध लेखनाचे विशेष गुण होते. प्रतिपक्षाला वादात हास्यास्पद करुन टाकणे, व्याजोक्ति, वक्रोक्ति, उपरोध या हत्यारांनी त्याची धूळधाण करुन टाकणे हे त्यांच्या निबंधाचे विशेष गुण होते. त्यांचा संस्कृत वाङ्मयाचा व्यासंग जबरदस्त होता. रसग्रहणात्मक निबंधात त्यांच्या कल्पनाशक्तीची झेप, सौंदर्य संवेदनेची तरलता आणि सूक्ष्मता विशेष होती. लेखकाने त्यांच्या ‘कालिदासानं न लिहिलेलं नाटक ‘या लेखाचा उल्लेख केला आहे. रत्नाकर जुलै १९२८ च्या अंकातील Lette -hit ( प्रणयिनीचा मनोभंग) या चित्राच्या उत्कृष्ट रसग्रहणाच्या लेखाचा लेखकाने उल्लेख केला आहे.

२५.कादंबरीकारांचे मूर्धाभिषिक्त राजे- हरिभाऊ
लेखकाचा हरि नारायण आपटे यांच्याशी न्यू पूना काॅलेजच्या कामानिमित्त परिचय झाला.त्यांच्या लेखनाचे ते चाहते होते. भक्त होते. तोपर्यंत त्यांची ‘अल्ला हो अकबर ‘ही कादंबरी प्रसिद्ध झाली होती. लेखकाला सामाजिक जीवनाच्या धकाधकीत आणि भानगडीत रस घेणार्‍या आपट्यांचे दर्शन झाले. हरिभाऊ लेखन करीत असत बहुधा रात्री किंवा पहाटे. त्यांचा सारा दिवस दिवाणखान्यातील बैठकीत. त्यांना निरनिराळ्या कामासाठी भेटायला येणार्‍या माणसांची आणि मित्रमंडळींची बैठक अष्टौप्रहर असायची. हरिभाऊ सबंध दिवस गुंतलेले असायचे. कुणालाही ते नाही म्हणायचे नाही. बैठकीत काय किंवा कामाच्या रगाड्यांत काय माणसांच्या हजार तर्‍हा हरिभाऊंना भेटत त्यांतच त्यांच्या लेखनाची तयारी होत असे. ४ नाटके,११ ऐतिहासिक व १० सामाजिक कादंबर्‍या, काही कथासंग्रह, चरित्र, कविता, स्फुट, लेख, व्याख्याने म्हणजे त्यांची प्रगल्भ प्रतिभा व बुध्दीचा प्रकाश. १८८६ ते १९१७ या कालावधीत ते मराठी कादंबरीकारांचे मूर्धाभिषिक्त राजेच होते. त्यांनी जे लिहिले ते चिरंजीव आहे. समाजजागृतीविषयी त्यांची कळकळ मोठी होती. हरिभाऊंच्या शाबासकीची थाप लेखकाला हवी होती ती मिळवायची तशीच राहिली याची लेखकाला खंत वाटते.

२६.पंतप्रधान गेले!.. पंडित जवाहरलाल नेहरू अमर आहेत!
२७ मे, १९६४ रोजी एक महापर्व संपलं. नेहरूंची असंख्य दर्शनं लेखकाच्या नजरेपुढून सरकत असतात पण त्यातले दोन प्रसंग लेखकाला विशेष आठवतात. लाहोर येथील काँग्रेसच्या अधिवेशनात रावी नदीच्या तीरावर रात्री बाराचा ठोका पडून गेला आणि १९३० च्या नव्या संवत्सराच्या पहिल्या क्षणी अध्यक्ष जवाहरलाल नेहरूंनी स्वतंत्र भारताचा झंडा फडकवला. स्वातंत्र्याची गंभीर प्रतिज्ञा त्यांनी ३० हजार लोकांकडून वदवून घेतली. दुसरा प्रसंग पंतप्रधानकीची वस्त्रं त्यांनी अंगावर चढविली आणि सार्‍या जगालाच उद्देशून भाषण दिले. त्यांचं भाषण ऐकण्यासाठी लक्ष लक्ष घरातील माणसे रेडिओपुढे बसली होती. लेखकाने या लेखात नेहरूंविषयी भावपूर्ण लिहिले आहे.

असे हे व्हीनस प्रकाशनाचे १९६६ मधील अतिशय दुर्लभ आणि दुर्मीळ पुस्तक राहुल जोश आणि त्यांची सहकारी साक्षी मोरे यांच्या अथक प्रयत्नातून हातात आले याबद्दल कृतार्थता वाटते. अशा काळाच्या ओघात लुप्तप्राय होत चाललेल्या ठेव्याचे जतन व्हायला हवे. या लेखमालिकेतून अशा दुर्मीळ पुस्तकांवर प्रकाशझोत टाकण्याचा माझा प्रयत्न आहे. या प्रयत्नांची फारशी दखल घेतली जात नाही, उत्स्फूर्तपणे मनापासून अभिप्राय नोंदवले जात नाही. पण असे असले तरी या लेखमालिकेच्या निमित्ताने मी त्या त्या पुस्तकाचा सखोल आस्वाद घेतो आणि जुन्या काळातील त्या पुस्तकाचा नाॅस्टलजिक काळ अनुभवतो हे समाधान खूप मोठे आहे.

विलास कुडके.

— परीक्षण : विलास कुडके
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments