Saturday, July 27, 2024
Homeसाहित्यदुर्मीळ पुस्तके : ३४

दुर्मीळ पुस्तके : ३४

निबंध-सुगंध

व्हीनस प्रकाशनने १९६६ मध्ये प्रकाशित केलेले ना. सी. फडके यांचे ‘निबंध सुगंध’ हे लघुनिबंधाचे दुर्मीळ पुस्तक ! सहा रुपये ही तेव्हाची किंमत. या पुस्तकाचे मुखपृष्ठ चित्रकार ना. गो. जोशी यांनी केलेले आहे.
आतापर्यंत अनेक दुर्मीळ पुस्तकांचा मी परिचय करुन दिला. एखादे दुर्मीळ पुस्तक हातात आले तर नेमके काय वाटते असा प्रश्न मला ‘निबंध-सुगंध‘ हे दुर्मीळ पुस्तक उपलब्ध करुन देताना Rahul Josh यांनी विचारला. हे पुस्तक केव्हापासून हवे होते असेही त्यांनी विचारले. या प्रश्नांनी मी विचार करु लागलो. अवर्णनीय आनंद झाला असे त्याला मी उत्तर दिले आणि साधारणतः १९८० पासून मी हे पुस्तक शोधत आहे असे सांगितले. उत्तर जरी एवढेच दिले तरी मनात खूप काही सांगायचे होते.

मला आठवते ‘काश्मिरातील वसंत’ हा धडा आम्हाला तेव्हा बालभारतीच्या क्रमिक पुस्तकात होता. त्यावेळी मला छंद होता की आवडलेला धडा किंवा उतारा कोणत्या पुस्तकातून निवडला आहे ते पुस्तक ग्रंथालयातून आणून वाचायचे. ‘काश्मिरातील वसंत’ हा सुंदर लघुनिबंध ना. सी. फडके यांच्या ‘निबंध-सुगंध ‘या पुस्तकातील आहे हे कळल्यावर त्या पुस्तकाचा मी सर्वत्र शोध घेतला पण ते पुस्तक काही मिळाले नाही. ना. सी फडके यांची इतर लघुनिबंधाची पुस्तके मिळाली पण हे पुस्तक काही मिळाले नाही. एखादे हवे असलेले पुस्तक मिळाले नाही की मन बेचैन होते. एक प्रकारची हुरहुर लागून राहते. वर्षामागून वर्षे उलटतात. एखादे बीज मातीत पडून राहावे आणि पावसाच्या थेंबांनी सिंचन होऊन ते अंकुरावे तशी ही दुर्मीळ पुस्तके मिळविण्याची सुप्त इच्छा असते. अनेक वर्षे शोधत असलेले दुर्मीळ पुस्तक अचानक हातात आल्यावर एकदम अनेक वर्षांची प्रतीक्षा संपते. एखादा जीवलग अनेक वर्षांनी भेटावा, भरत भेट व्हावी तशी ती दुर्मीळ पुस्तकाची भेट वाटते.

ते दुर्मीळ पुस्तक तुमचा तो काळ परत घेऊन येतो ज्या पासून तुम्ही वयाने बरेच दूर अंतर गाठलेले असते. लहानपणची अंकल्पी, मी मुद्दाम अंकलिपी म्हणत नाही कारण त्या वयात तिचा परिचय त्याच नावाने झालेला असतो ती जर हातात आली तर त्यातील तेव्हाची चित्रे पाहून आपण त्या वयात पुन्हा जातो.
दुर्मीळ पुस्तकाशी नेमके हेच नाॅस्टलजिक नाते असते. मला आठवते मराठी वाचनमाला पुस्तक दुसरे हे आहे पण त्याला वाळवी लागलेली आहे असे एका शिक्षकाने सांगितल्यावर मी त्याला सांगितले ‘चालेल मला’. एका रविवारी खास लोकलने त्याच्या घरी गेलो. ते पुस्तक मिळाले तेव्हा त्यावरील मुखपृष्ठ पाहून मी पुन्हा त्या शाळकरी वयात हरवून गेलो. त्यातील गुर्‍हाळ, विसराळू विनू असे धडे उडत उडत आठवले. नेमका हाच अनुभव मला राहुल जोश यांनी १९६६ मधील प्रथम आवृत्ती असलेल्या’ निबंध-सुगंध’ हे दुर्मीळ पुस्तक मिळवून दिले तेव्हा आला.

या २१९ पृष्ठांच्या पुस्तकात चार भाग आहेत. आपण ते क्रमशः पाहू.
भाग पहिला
१. लघुनिबंध म्हणजे काय? व ते कसे लिहावे ?
जुन्या निबंधाचे पांडित्य आणि प्रचार हे गुण होते. खंडण मंडण, पांडित्याचे प्रदर्शन, वादविवाद, स्वमत-प्रतिपादन, परमतनिर्दालन असे त्यांचे स्वरुप होते. शि. म. परांजपे यांच्या निबंधात कल्पनाविलास, भावनोत्कटता आणि वक्रोक्ति, व्याजोक्ति इ. अलंकार होते. १८८० ते १९२५ पर्यंत मराठी निबंध अग्रलेखांच्या स्वरुपात होते. मतप्रचार हा त्याचा हेतू होता. त्यांचा विषय वाचकांना महत्त्वाचा वाटे. नंतर या निबंधाच्या अंतरंगात क्रांति झाली. आता निबंधकार या व्यक्तीत गोडी वाटते म्हणून त्याचे निबंध वाचले जातात. आधुनिक लघुनिबंधाला विषयाची मर्यादा राहिलेली नाही. पांडित्याचा बडेजाव राहिलेला नाही. लेखकाच्या अंतरंगात उठणार्‍या विचारविकारतरंगाचे दर्शन घडावे व त्यापासून आल्हाद व्हावा एवढीच वाचकांची अपेक्षा असते. विषयापेक्षा विषयाच्या अनुषंगाने लेखकाच्या वक्तित्वाची, त्याच्या स्वभावाची, त्याच्या आवडी-निवडीची ओळख वाचकाला व्हायला हवी. नवा लघुनिबंध प्रथमपुरुषी झाला आहे. तो संभाषणाच्या स्वरुपाचा आहे. सुहृद्भाव हा त्याचा आत्मा आहे. याच कारणामुळे लघुनिबंधाचा प्रकार ‘रत्नाकर ‘मासिकात प्रथम रुढ करताना लेखकाने ‘गुजगोष्टी ‘हे नाव वापरले होते. धोब्याने उन्हात वाळत घातलेले कपडे पाहून लेखकाने लिहिलेला लघुनिबंध उदाहरण म्हणून यात दिलेला आहे.दोरीवर वाळणार्‍या कपड्यांना वाचा असती तर काय होईल ही या निबंधातील मध्यवर्ती कल्पना.उन्हात वाळणार्‍या कपड्याच्या वर्णनावरुन लेखक स्वतःच्या विचारावर येतो व धुलाईला कपडे देऊच नये असे लेखकाला वाटू लागते. पण शेवटी लेखक धुलाईला कपडे पाठवून देतो. लघुनिबंधात आत्मनिवेदनाला महत्त्व आहे आणि त्याला ठरलेले निमित्त हा त्याचा विषय. जो सामान्य दृष्टीला क्षुद्र वाटेल तो विषय निवडावा. या क्षुद्र विषयातहि लेखकाने काही तरी महत्त्वाचा आशय उभा केला की वाचकाला अधिक आल्हाद होतो. ताजेपणा, मुग्धपणा, सहजपणा हे लघुनिबंधाचे प्राणभूत गुण आहेत. त्यात रचनेची खटपट ‘दिसू’नये. त्यातील थोडासा विस्कळीतपणा त्याची शोभा वाढवतो. लघुनिबंधकाराच्या अंगी पांडित्य आणि कवित्व हे दोन्ही गुण असावे.

२. मी आणि माझे निबंध
यात लेखकाने रत्नाकर मध्ये ‘सुहास्य ‘हा लघुनिबंध लिहून कशी सुरुवात केली,त्यांना गुजगोष्टी हे नाव कसे दिले. नंतर ‘प्रतिभा ‘मासिकात ‘धुम्रवलये ‘या सदराखाली लघुनिबंध लेखन कसे केले ते निवेदन केले आहे. रत्नाकरच्या काळानंतर लिहिलेल्या निबंधात लेखकाने मित्रमंडळींच्या बैठकीत बसून मनमोकळेपणाने गप्पा मारण्याची भूमिका स्वीकारली. त्यामुळे त्या निबंधातील भाषा अधिक खेळकर व हलकी-फुलकी झाली.

३. मी लघुनिबंध का लिहितो
गार्डिनर, ल्यूकस या सारख्या लेखकांचे सुटसुटीत व चुरचुरीत निबंध फार लोकप्रिय ठरले होते. ‘आल्फा आॅफ दी प्लाऊ ‘ या टोपण नावाने लिहिले जाणारे इंग्रजी लघुनिबंध मराठी वाचकांच्या वाचनात येत होते. रिचर्ड किंग नावाचा लेखक टॅट्लर नावाच्या इंग्रजी साप्ताहिकात निबंध लिहित. लेखकाला त्याचे लेखन मोहक वाटे. हा वाङमयप्रकार मराठीत आणला पाहिजे अशी कल्पना लेखकाच्या मनात दृढ झाली. ‘पर्सनल एसे ‘’ इंटिमेट एसे’अशी नावं या वाङमयप्रकाराला इंग्रजीत रुढ झाली होती. त्यातूनच गुजगोष्टी या नावाने लेखक रत्नाकरमध्ये लघुनिबंध लिहू लागले. त्यांचा ‘सुहास्य ‘हा पहिला लेख एकदम लोकप्रिय झाला. या लेखनप्रकाराचं स्वरुप निकटवर्ती मित्रांशी केलेल्या गुजगोष्टीसारखं होतं. चमत्कृति हा त्याचा आत्मा. वाचक म्हणजे आपल्या अंतरंगांतले मित्र आहेत अशा भूमिकेतून लघुनिबंध लिहिला जातो. कथा, कादंबरी, नाटक या सर्वांपेक्षा या वाङमयप्रकारात आत्मप्रकटीकरणाला अधिक अवकाश आहे. यात सरळसरळ स्वतःविषयी लेखकाला लिहिता येते. अंगचे गुणच नव्हे तर दोष देखील वर्णिता येतात. लघुनिबंध म्हणजे लेखकाने स्वतःपुढे धरलेला आरसा, त्यांत दिसणार्‍या स्वतःच्या प्रतिबिंबाचं केलेलं वर्णन. म्हणूनच लेखकाला लघुनिबंध लिहावेसे वाटतात.

भाग दुसरा
लघु-निबंध
४. शब्द ! शब्द ! शब्द !
कितीतरी दिवसांनी लेखक फिरायला गेले होते. दहाबारा दिवसात पावसानं झोड उठवली होती. संध्याकाळी फिरायला बाहेर पडणे मुश्किल झाले होते. पावसाचा कंटाळा आला होता. पावसामुळे बारीकसारीक गोष्टीत अडथळे निर्माण होतात. सिगारेटमधील तंबाखू सरदलेली असते. काड्यापेट्यातील काड्या सरदलेल्या असतात. पाऊस गेला तो प्रसन्नतेची आणि सौंदर्याची विपुल व विविध संपत्ति मागं ठेवून. सृष्टीला त्याने रमणीय स्वरुप आणले होते. जे बघतो आहे ते त्या क्षणीच शब्दात पकडता येईल का असे लेखकाला वाटते. पण साहित्य तयार होतं ते साक्षात अनुभवाच्या क्षणी नाही तर तो अनुभव जरा मागे पडल्यावर. संधिकालात ढग नसतात. मळभ पसरलेलं असतं. दिशा धुंद असतात. वारा बिल्कुल नाही. सृष्टी स्तब्ध असते. माणसाच्या अंत:करणाची अवस्थाही अशीच असते. दु:ख असमाधान सांगता येत नाही. हुरहुर वाटते. ही हुरहुर शब्दात सांगता येईल का? शब्दांचं सामर्थ्य कितीहि वाढलं तरी प्रत्यक्ष अनुभव शब्दांच्या कक्षेच्या पलीकडेच राहणार.

५. माझा विरंगुळा
माणसाला जगायचं असेल तर त्याने उद्योग केलाच पाहिजे. उद्योगातून घटकाभर विरंगुळा मिळावा यासाठी दुसरीकडे वळावेसे वाटते. लेखक लहान मुलांत मिसळून क्रिकेट खेळतात. कॅरमचा किंवा पत्यांचा डाव टाकतात. रेडिओवर ध्वनिमुद्रिका ऐकतात. त्यांच्या राणी कुत्रीला घेऊन फिरायला जातात. त्यातून त्यांना हवी ती विश्रांती मिळून कामाने आंबून गेलेली त्यांची वृत्ति ताजीतवानी, टवटवीत होते. विरंगुळ्यासाठी खिडकीसमोर आरामखुर्ची मांडावी. सिगरेटचे झुरके घेत रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांच्या आणि माणसांच्या गर्दीकडे बघत राहावे. कुठेतरी फिरायला जावे. निसर्गशोभेचे एकांतस्थळ निवडावे. सूर्यास्ताच्या वेळी चालणारा रंगांचा खेळ बघावा.

६. आजी
शेकडा ९०%घरात आजी उरलीच नाही. प्रत्यक्ष व्यवहारात आई, बाप, अजून शिल्लक आहेत. कुटुंबाचा परीघ छोटा झाला आहे. ज्या घरात आजी नाही त्या घरातील मुलं दुर्देवी. लेखकाला लहानपणी आजी अधिक आवडत होती. ती आंधळी असल्यामुळे सदा माजघरातल्या एका कोपर्‍यात बसे. तिच्या गोधडीखाली एक डबी असे. त्यात पैसे असत. एका बरणीत खडीसाखर, मणुके असत. दारावर बोरे, कलिंगडे, काबली अशा वस्तू विकायला आल्या की आजीकडून त्यासाठी पैसे मिळत. आईपेक्षा आजीचेच प्रेम अधिक असल्याबद्दल लेखकाची खात्री पटे. तिला किती गोष्टी माहित असायच्या. त्या ऐकतांना तिच्या चौघडीत आणि कुशीत निजता येत असे आणि गोष्टी ऐकता ऐकता झोपी जाण्याची देखील मनाई नव्हती. एकीकडे शाळेच्या शिक्षणाचा परीघ वाढत आहे ;पण दुसरीकडे कौटुंबिक संस्कारांचा परीघ कमी होत आहे.

७. वर्षा ऋतु
वसंत ऋतूला ‘ऋतुराज ‘म्हटलं जातं. पण त्या पदवीवर एकट्या वर्षा ऋतूचाच हक्क पोहोचतो. राजाचे आगमन वाजत गाजत होते. तसाच वर्षा ऋतु येतो. मेघांचा गडगडाट, विजांचा कडकडाट इ. प्रकाराने वर्षा ऋतूची स्वारी येते. वर्षाकालाच्या वर्णनात बेडूक, मयूर – मयूरी, बगळे, चातक, काजवे आणि कोकिळ हटकून येतात. चातक पक्षी वर्षाकालाची वाट बघत चोच उघडून वर करुन बसलेला असतो. पहिल्या वृष्टीचे जलबिंदू पडले की त्याला विलक्षण आनंद होतो. आकाशात ढग जमलेले दिसले की मोर – मयूरी हर्षभरीत होऊन नाचू लागतात व सुंदर पिसारे पसरतात. समागमाची उत्सुकता वाढविण्याचा गुण वर्षाकालात आहे. पावसाची भेट व्हावी म्हणून पृथ्वी उत्कंठ होते. ती भेट झाल्यावर धान्याचा गर्भ राहतो. पृथ्वीला डोहाळे लागतात. विरहव्याकुळता व कामातुरता वर्षाकालाने जिकडे तिकडे उत्पन्न केलेले दिसतात. अंत:करणात प्रेमाची हुरहुर उत्पन्न करण्याचा गुण वर्षाकालात आहे. पराक्रम करण्यासाठी दूर गेलेले लढाऊ लोक, धंद्यासाठी बाहेर पडलेले व्यापारी इ. मंडळी पावसाळ्याच्या आरंभी घरोघर यायची. सबंध पावसाळा घरी काढायचा. शेतीत धान्य पिकवायचे. कापणी झाली की विजयादशमीला पुन्हा नवीन मोहिमेवर जायचे असा हा ठरीव क्रम होता. पावसाळ्यातले मुख्य सण म्हणजे नागपंचमी, नारळी पौर्णिमा, गोकुळाष्टमी, गणेश चतुर्थी, घटस्थापना आणि विजयादशमी. वर्षाकाल म्हणजे विरहसमाप्तीचा आणि प्रीतिसंगमाचा.

८. कश्मिरांतील वसंत
वसंत आला अशी ललकारी कतीज, सतूत, पोषनूल, फपसीर, सोनचिचूर, चकोर पक्ष्यांकडून कश्मीरच्या खोर्‍यात प्रथम ऐकू येते. कश्मीरमधील काही पक्षी हिवाळ्यात पंजाबात निघून जातात. वसंत ऋतु कश्मीरकडे निघाला की त्याची वर्दी द्यायला हे पक्षी पुढे धावतात. वेलींवर तांबडी, जांभळी, पिवळी, पांढरी अतिनाजूक फुले लगडू लागतात. गुलाबाची ताटवे डोलू लागतात. सफरचंद, नारावत, अक्रोड, बदाम फळझाडांवर फुलं प्रगटतात. त्यांचे सडे जागोजागी हिरवळीवर रांगोळी घातल्यासारखे पडतात. दल तलावात कमळाच्या वेली प्रफुल्लित होतात. टेच नावाचे पक्षी गवताच्या झुपक्यात हलतात. दुरुन भाला फेकून याची शिकार केली जाते. जेहलम नदीच्या दोन्ही बाजूस कुरणात, बागेत, मळ्यात गुलाब, पंजीना, योस्मन, एशिकपंचान, खताई, कारिपत्य, लिलि अशी वासंतिक फुलं फलतात. वार्‍याचे झोत सुगंधित वाहू लागतात. पक्ष्यांच्या नादमधुर शब्दांनी वातावरण गजबजून जाते. श्रीनगरचे लोक हा वासंतिक आनंद उपभोगतात. पुष्पमाला धारण करतात. जलविहार करतात. तमाशे बघतात. नर्तकीच्या घरांत रात्री दिव्यांचा झगझगाट दिसतो. जिकडे तिकडे फुललेली फुलं. कश्मीर सरकार वसंतोत्सव साजरा करतं. फुलांचं प्रदर्शन भरविले जाते. लोकगीतांचे आणि नृत्याचे कार्यक्रम होतात. जेहलमच्या पात्रात शृंगाललेल्या नौकांच्या मिरवणूक निघतात. निशात, शालीमार बागेत झुंडी उसळतात. दलाच्या जलमार्गात लोक शिकार्‍यातून निघतात. पत्ते खेळतात, गाणी गातात, फोनोग्राफ ऐकतात. मीठ घातलेला चहा पितात. जहांगीर बादशहाने १६१९ मध्ये शालीमार बाग तयार करवली. निशात बाग नूरजहान राणीचा आसफशाह याने नंतर बांधली. या ठिकाणी कश्मीरच्या वासंतिक शोभेची आणि उन्मादाची मजा किती लुटावी यावर बंधन नाही, असे बहारदार वर्णन लेखकाने यात केले आहे.

९. सुंदर स्त्रीची माझी कल्पना
जिचा चेहरा थोडासा लंबवर्तुळाकार आहे अशी स्त्री लेखकाचे लक्ष चटकन वेधून घेते. लेखकाला उंच स्त्री आवडते. सरळ नाक आणि टोकाशी गोबरं झालेलं, अरुंद कपाळ दाट केसांच्या मेहरपीत लेखकाला मोहक आणि देखणी वाटते. ओठ जरा मांसल आणि जाड हवे. काळासावळा रंग, अवयवांची पुष्टता, पाणीदार डोळे आणि मोहून घेणारं ‘काहीतरी ‘असावं असे लेखकाला वाटते.

१०. मित्र!मित्र !
मित्ररुपी धन ज्याच्याजवळ असेल त्याला कोणतीहि विपत्ती सुसह्य वाटेल. आयुष्याचे सार्थक होण्यासाठी मित्रपरिवार हवा. मित्र दोन चारच असावे पण ते पारखलेले असावे. खरा मित्र पाहिल्याबरोबर ओळखू येतो,असे लेखकाला वाटते.

११. जन्माचा जोडीदार
जन्म-मृत्यूप्रमाणे लग्नाची घटनादेखील व्यक्तीच्या इच्छेप्रमाणे घडत नसून विधिलिखिताप्रमाणे घडत असते. जन्माचा जोडीदार स्वत: निवडावा. आयुष्यातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे विवाह. साॅक्रेटिस आणि त्यांची पत्नी झांटिपी, तुकाराम आणि त्यांची बायको जिजाबाई, कार्लाईल आणि त्यांची बायको यांच्यात खडाष्टक होते.न्यायमूर्ति रानडे आणि रमाबाई रानडे, रेव्हरंड टिळक आणि लक्ष्मीबाई टिळक ही दंपती, त्यांची जीवितकार्य एकरुप झालेले होते. मादाम क्युरी आणि तिचा नवरा दोघेही संशोधन कार्यात होते. राॅबर्ट ब्राऊनिंग आणि एलिझाबेथ ब्राऊनिंग यांची प्रेमकथा अमर आहे. या अनुषंगाने लेखकाने यात चिंतन केलेले आहे.

१२. नको ती दूर- चित्रवाणी !
टेलीव्हिजनच्या फायद्यापेक्षा तोटेच अधिक आहेत. देव करो आणि टेलीव्हिजनचे भारतातलं आगमन लांबणीवर पडो अशी लेखक प्रार्थना करतो. रेडिओवर सामन्यांचे केवळ वृत्त ऐकू शकत होतो आता टेलिव्हिजनवर मैदानावर चाललेले सामने पाहता येतील. जे पहावंसं वाटतं ते पाहता येईल, त्याचबरोबर जे दृष्टीपुढे नको तेही पहावे लागणार. असे चिंतन लेखकाने यात मांडले आहे.

१३. एक रंगलेली बैठक
तात्यासाहेब केळकर, चिंतामणराव वैद्य, वामन मल्हार जोशी, ह. भ. प. पांगारकर ही चार बडी साहित्यिक मंडळी एकत्र येतात. तेव्हा लेखक कोल्हापूरच्या राजाराम काॅलेजात प्रोफेसर व करवीर नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष होते. या संस्थेच्या महोत्सवात या मंडळीला व्याख्यानांसाठी आमंत्रित केले जाते. त्यांच्या व्याख्यानांबाबत यात वर्णन केले आहे. या चार नामवंत साहित्यिकांच्या सहवासाची व संभाषणाची खरी मजा लेखकाने लुटली ती खाजगी बैठकीत. रात्रीच्या जेवणानंतर बैठक रंगते. प्रोफेसर माधवराव पटवर्धन, गोविंदराव टेंबे, मंजिखाँ हे सुध्दा होते. शेवटी पुढचा जन्म कोणता आवडेल ते चिठ्यांवर लिहिण्याचा कार्यक्रम झाला. तात्यासाहेब जोशींनी अमुक जन्म हवा असं निश्चयानं सांगता येत नाही, असे लिहिले. चिंतामण वैद्यांनी इमान राखणारा कुत्रा होण्याची तयारी दर्शविली. तात्यासाहेब केळकरांना मुंगीचा जन्म घ्यावासा वाटला. तर पांगारकर यांनी पोपटाचा जन्म घ्यावा असे लिहिले. अशी ही बैठक रंगली ते लेखकाने वर्णन केले आहे. (क्रमशः)

विलास कुडके.

— परीक्षण : विलास कुडके
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. सुंदर ओळख, ही तर पुस्तकाची संक्षिप्त आवृत्तीच जणू.
    ज्यांना पुस्तक उपलब्ध होवू शकणार नाही ते वाचनाची अनुभूती नक्कीच मिळवू शकतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments