Thursday, May 30, 2024
Homeसाहित्यदुर्मीळ पुस्तके : ३५

दुर्मीळ पुस्तके : ३५

सुरंगीची वेणी व इतर कथा

भारत-गौरव-ग्रंथमालेतील कापडी बांधणीतील किंमत एक रुपया असलेले १६६ पृष्ठांचे हे पँटेलिमाँन रोमोनाॅव्ह यांचे
“सुरंगीची वेणी व इतर कथा” हे पुस्तक आहे. यावर रुपांतरकार कुमार रघुवीर (रघुनाथ ज. सामंत) यांनी ‘धागा‘ म्हणून दि. २४/१२/१९३५ रोजी मनोगत लिहिले आहे. सुरंगीच्या वेणीतील धागा या भूमिकेतून.

प्रभाकर पाध्ये यांनी ‘प्रसाधन’म्हणून दि. २३/१२/१९३५ रोजी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. रोमोनाॅव्ह यांच्या ५ गोष्टींचा ज्या रुपांतरकार यांच्या आवडीच्या होत्या त्यांचा समावेश यात करण्यात आला आहे.

पँटेलिमाॅन सर्गेयेविच रोमानोव्ह (Panteleimon Romanov) (२४/७/१८८४-८/४/१९३८) यांची On the Volga & other stories, Three pairs of silk stockings, Rasskazy, Diary of a Soviet Marriage, Childhood (1920),Without Bird – Cherry blossoms(1926),Five volumes on Russia इ. साहित्य प्रसिद्ध आहे.

पँटेलिमाँन रोमोनाॅव्ह. रघुनाथ ज. सामंत

१. “सुरंगीची वेणी“
वसंत आहे पण तिला वसतिगृहात खिन्न वाटत असते. तिच्या हातून काही तरी वाईट गोष्ट घडली असे तिला वाटते. तिच्या टेबलावर फुटक्या गळ्याच्या फुलदाणीत तिने कोमेजलेली सुरंगीच्या फुलांची चुरगळलेली वेणी खोवलेली असते. तिच्याकडे पाहून तिला रडू कोसळते. तिचे वसतिगृह म्हणजे घाण, धुरळा, अव्यवस्था. सिगारेटची थोटके. काळे मचकट पडदे. ते नवीन इमारतीत जाणार म्हणून ऐदीपणा आलेला. खोली सुंदर व स्वच्छ असावी याकडे त्यांचे दुर्लक्ष झालेले असते. सौंदर्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदललेला असतो. ते त्याकडे तिरस्काराने पाहतात. अचकट विचकट, ओंगळ, घाणेरडे शब्द वापरणे अंगवळणी पडलेले. तिला त्या विश्वविद्यालयात आल्याबद्दल वाईट वाटते.

तिची आई एका खेडेगावात सुईणीचे काम करत असते. वसतिगृहात प्रेम म्हणजे काय ते कोणाला समजत नाही. फक्त वैषयिक संबंध तेवढे कळत असतात. मुलींनी तरुण मित्रांबरोबर स्वतंत्रपणे राहणे. सहज एकादी रात्र एकादा आठवडा किंवा महिना त्याच्याबरोबर घालवणे नेहमीचे झाले आहे. तिची आणि त्या विद्यार्थ्यांची नव्याने ओळख झालेली असते. त्याचा गंभीरपणा व शांत डोळे यामुळे ती त्याच्याकडे आकर्षिली गेलेली असते. पण विद्यार्थ्यांच्या घोळक्यात मात्र त्याच्या हालचाली तिला असभ्य व ओंगळ वाटतात. तो देखणा होता त्यामुळे त्याच्याकडे मुली आकर्षिल्या जात आणि तो हुशार असल्याने विद्यार्थी त्याच्या भोवती असत. तिला तो एकीकडे गंभीर व खंबीर मनाचा सभ्य तरुण भासे तर दुसरीकडे अचकट विचकट ओंगळ प्रवाह पतित मवाली भासे. तो तिला सूर्यास्ताच्या वेळी त्याच्या खोलीवर चल असे म्हणतो.

एक मुलगी “सुरंगी ss “असे ओरडत वेण्यांची टोपली घेऊन येत असते. ती एक वेणी निवडून घेते. तिच्या निरर्थकतेबद्दल तो तिच्याशी चर्चा करतो. ती वेणी आंबाड्यावर माळते. आपल्या मनातील कोमल भावनांना वाव देऊन जिवाभावाच्या गोष्टी बोलाव्या असे तिला वाटते. पण त्याने मात्र हलकट शब्दांनी व ओंगळ कल्पनांनी तिचा विरस केलेला असतो. तिला त्याचा तिटकारा वाटू लागतो. ते चालत असताना बाकावर बसलेल्या एका तरुणीकडे तो निरखून पाहू लागतो. तिला ती गोष्ट सलते. तिच्याकडे पाहता यावे म्हणून तो तिला तिथे बसण्याचा आग्रह करतो. तिला विंचू डसल्यासारखे होते. ती त्याला जाते असे म्हणते. तोही निघून जातो. तिला त्या सुंदर वातावरणातही एकाकी असल्यासारखे वाटते. तिला ते सहन होत नाही व परिणामाचा विचार न करता ती परत फिरते व त्याच्या खोलीचा रस्ता धरते. ती परत येईल असे त्याला वाटत नव्हते. तो अभ्यासास लागणार होता. ती आल्याचे पाहिल्यावर तो म्हणतो संपला का शिष्टपणा व तिला हाताने जवळ ओढतो. “तो घरी नाही “अशी चिठ्ठी दाराला लावून येतो म्हणून तो खोलीबाहेर जातो.

असल्या घाणेरड्या ओंगळ खोलीतच प्रेमाचा तो पहिला दिवस, आयुष्यातील सुखाचे महत्त्वाचे क्षण जाण्याचा प्रसंग यावा ही जाणीव तिला कांट्यासारखी बोचते. बाहेर मोकळ्यावर फिरायला जाऊ असे ती त्याला म्हणते. तो त्रस्त होतो. तिचे काही एक ऐकणार नाही व तिला कोठेही जाऊ देणार नाही असे म्हणतो. तिची द्विधा होते. मित्रमंडळी परत फिरण्यापूर्वी मनाची एकदा तृप्ति व्हावी असे त्याला वाटत असते. पण जे होते आहे ते काही योग्य नाही असे तिला वाटते. तिच्या डोळ्यातून अश्रु गळू लागतात. ती तिथून जाते म्हणून ओरडते. तो तिच्या पाठीवरुन हात फिरवत तिची समजूत घालू लागतो. कानाशी कुजबुजू लागतो. ते दोघे एकांतातच आहेत या वस्तुस्थितीमुळे तिच्याही मनात उत्कट इच्छा प्रकट होते. तो दिवा विझवतो. काळोखात तिला आलिंगन देतो. तिला बरे वाटते. कोणीतरी येईल म्हणून तो तिला खिडकीजवळून ओढून नेतो…. दिवा लावून तो शेजारच्या विद्यार्थ्याचा बिछाना झटकून साफसूफ करतो. खाली वाकून तिचे केसातील आकडे शोधून तिला देतो व मागल्या दाराने जायला सांगतो. ती रस्त्यावर येते. यंत्रवत चालू लागते. आकडे आंबाड्यांत अडकवण्यासाठी ती हात मागे करते तो ती सुरंगीची वेणी एका बाजूस लोंबकळत असते. ती हळूच वेणी सोडवून घेते. ती कोमेजलेली असते, चुरगळलेली असते. तिच्या डोळ्यातून ओझरणारे अश्रू त्या वेणीवर टपकत राहतात अशी ही मूळ रशियन कथा लेखकाने मराठीत रुपांतरीत केलेली आहे.


२. ”लपवा-छपवी“ एका स्त्रीची पत्रे.

पहिले पत्र – सांधा बदलला
दुसरे पत्र – लपवा-छपवी
भय्यासाहेबांना दुपारी रस्त्यात त्यांचा एक बालमित्र मोहन भेटल्याचे ते त्यांच्या पत्नीला आनंदाने सांगतात. त्यांच्या स्वभावात जमीन आस्मानाचा फरक असतो. भय्यासाहेब शांत, कुढ्या प्रकृतीचे तर त्यांचा चित्रकार बालमित्र भावनाप्रधान व काहीसा गडबड्या असतो. भय्यासाहेब त्याला आपले लग्न झाल्याचे सांगतात व त्यांची निवड कशी काय आहे ते पहावयाला तो घरी येणार असल्याचे पत्नीला सांगतो. भय्यासाहेबांचा हा मित्र तिला अगदी नवखा होता. त्यांचा एका खोलीत थाटलेला संसार व बावळट गृहिणी पहावयास तो मित्र येणार म्हटल्यावर तिला भिती वाटू लागते. तिच्या पोशाखाची व खोलीची नीट व्यवस्था लावायला व आकर्षक वेषभूषा करायला तिला तीन तास लागतात. ती तयार झाल्यावर भय्यासाहेबांकडे पाहते पण त्यांचे तिच्याकडे लक्षच नसते. त्यांनी वळून पहावे अशी तिची अपेक्षा असते. बालमित्र येतो. दारात उभा असताना त्याच्याकडे ती जेव्हा प्रथमच पाहते तेव्हा त्याच्या नजरेत जणू काही तो स्वतःसाठीच एखाद्या स्त्रीची निवड करीत असल्यासारखा भाव होता. ती चहा करते. मधून मधून पाहुण्याकडे पहाते. एखाद्या अनोळखी स्त्रीकडे पहातांना ज्या नजरेने तो पाहील तशा तर्‍हेचा मोह त्यावेळी तिला होतो. त्या इच्छेनेच ती भय्यासाहेबांजवळ जाऊन लडिवाळपणे बसते व मित्राच्या चेहर्‍याकडे दृष्टी भिडवते. थोड्याच वेळात तोहि विषयाला धरुन वा न धरुन तिच्याकडे वारंवार दृष्टी स्थिर करु लागतो. तिचा चेहरा लज्जेने व उत्कंठेने चूर होतो. त्या अननुभूत अनुभवामुळे भीतिमुळे तिचे हृदय जोराने धडधडू लागते. त्या अनुभवाची तिला जणू चटकच लागते. त्या क्षणापासून दोघात काहीतरी अज्ञात असे निर्माण होते. पाहुण्याच्या अज्ञात व एकप्रकारच्या मुग्ध, अदृश्य सहवासामुळे तिच्यात अगदी नाविन्यपूर्ण व संस्मरणीय भावना उत्पन्न होऊ लागतात. एकप्रकारचे नवे चैतन्य तिच्या शरीरात व एकंदर आयुष्यात अवतरते. त्यामुळे तिला एकदम उत्साहाचे भरते येते. ही सर्व कथा व मनोगत ती लीला, सुशीला या मैत्रीणीला पत्रांमधून सांगत असते.

पत्र तिसरे – आट्यापाट्याचा खेळ
नवर्‍याला आपली बायको आपल्या पूर्ण ताब्यात असावी, तिचे शरीर, तिचे मन यांचे आपण धनी असावे असे त्याला वाटते. स्त्री मात्र तिचे मनोगत वा तिला काय आवडते हे उघड न सांगता लपवा-छपवी आट्यापाट्याचा खेळ चालू असतो.

पत्र चौथे – नाटक सुरु झाले
मोहन निघून गेल्यावर भय्यासाहेब तिला कसा काय वाटला त्यांचा मित्र म्हणून विचारतात. आपल्यात जे गुण नाहीत ते सर्व त्याच्यात असल्याचे सांगतात. ती मात्र तिच्या खर्‍या भावना नवर्‍याची वरवर स्तुती करुन त्यांच्यापासून लपवते.हे स्त्रीपुरुषांचे वैवाहिक संबंध शेवटपर्यंत सुखकारक होऊन, आदर्श म्हणून ठेवण्यासारखे झालेले फार क्वचित दृष्टीस पडतात.

पत्र पाचवे – दुबळी लग्नसंस्था
लग्नसंस्थेच्या आसर्‍यात भय्यासाहेबांकडून मिळणार नाही ते मोहनरावांच्या पहिल्याच भेटीत तिला मिळाले. केवळ वैषयिक संबंधांतील सुखसोयींना स्त्रिया मोहू शकत नाहीत. त्यांना व्यक्तित्वाची खरी भूक असते. स्त्री मनाला अव्याहत वाढ, पूर्णत्व, समाधान व इच्छाशक्ति यांची अपेक्षा असते.पण लग्नसंस्थेच्या आसर्‍याखाली हे क्वचित आढळून येते. स्त्री ही आता स्वतःचे स्वतंत्र जीवित असलेली एक नवी व्यक्ती बनत चालली आहे. स्वतःचे मन मारुन आपल्या नवर्‍याच्या छातीवर हतबलपणे मान टेकण्यापेक्षा स्वतंत्र मार्गावर येणेच तिला जास्त आवडेल. स्त्री म्हणजे नवर्‍याच्या आयुष्यातील नेहमीची व हक्काची बाब होते. स्त्रीला आळस, तिच्याविषयीची त्याची बेफिकीरी, निरुत्साहीपणा या गोष्टी दिसल्या की तिला वाईट वाटते. असे असले तरी त्याच्याबरोबरचा सर्व प्रकारचा संबंध, निष्प्रेमपणे काहीवेळा केवळ कर्तव्य म्हणून पुढे चालविण्यास ती तयार होते.

पत्र सहावे – मनाची आंदोलने.
स्त्रीची लपवा-छपवी दोन प्रकारे असते. एकतर ती मौन स्वीकारते किंवा काही बोलत नाही. भय्यासाहेब तिला विचारुन मोहनरावांना दुसर्‍यांदा बोलावतो. मोहनराव रिगलला सिनेमाला जाऊ असे म्हणतो. ते सिनेमाला जातात. भय्यासाहेबांना तीन तिकिटे मिळवता येत नाही पण मोहनराव मात्र ती मिळवून घेऊन येतात.

पत्र सातवे – व्यभिचार
कितीहि मैत्री असली तरी केवळ मैत्रीखातर, एकादा मनुष्य त्याला आपल्या मित्राच्या बायकोविषयी आकर्षण वाटत असल्यास, ते दाबून ठेऊ इच्छित नाही. त्याला नवराहि एकप्रकारे साह्यच करतो. सर्वसाधारण दृष्टीला तिचे वागणे बेकायदेशीर व व्यभिचारी वाटेल पण त्या माणसाचा सहवास, त्याच्याशी होणारा विचारविनिमय, यामुळे तिच्या हृदयात जो उत्साहाचा झरा वाहू लागतो, मनाची जी सर्वांगीण उन्नति झाल्यासारखे वाटते ती तिच्या नवर्‍याच्या सहवासात होत नाही. त्याच्यापासून तिला कसलेच सुख होत नाही.

पत्र आठवे – आत्मवंचना
मोहनरावांच्या प्रथम भेटीत तिच्या वाढलेल्या उत्साहामुळे, ती सुरुवातीस भय्यासाहेबांकडे हळुवारपणे पहात असे ;पण नंतर त्यांच्याशी कायमची जखडली असल्याच्या भावनेमुळे व ते नेहमी तिच्या सन्निध असतात या अनुभवामुळे त्यांच्याविषयी वाटणारा तिचा तिटकारा वाढत जातो. नंतर त्यांच्यातील अनैसर्गिक शांतता वाढत जाते. संबंध दुरावतात. नेहमीच्या शारीरिक जडजीवनाशिवाय त्यांच्या आयुष्यात सौख्यसौंदर्य काहीच राहत नाही.

पत्र नववे – हृदयविदारक मन:स्थिति
एके दिवशी भय्यासाहेब खिडकीजवळ खुर्ची टाकून पुस्तक घेऊन बसतात. त्यांचे वाचनाकडे लक्ष नसते. तिची चाहूल लागताच त्यांनी वाचण्यात गुंग असल्याचे दर्शविले. एक काळ असा होता की एकमेकांच्या सहवासात काही तासांचा जरी खंड पडला तरी त्यत्यांना जाणीव होई.मोहनराव येणार आहे का म्हणून ती विचारते पण भय्यासाहेब कोरडेपणे माहित नाही म्हणतात.त्यांच्यात परस्पर संबंधांतील जिव्हाळा व अकृत्रिम आपुलकी राहिलेली नव्हती. दिवसेंदिवस त्यांच्यातील लपवा-छपवी वाढत जाते.

पत्र दहावे – दोन मार्ग
अशावेळी स्त्रीपुढे दोन मार्ग असतात. एक पतिव्रता स्त्रीचा. पण त्यामुळे तिच्या व्यक्तित्वाच्या खर्‍या आयुष्याची माती होते. तिच्या अंगातील जीवनांश – उत्साह हळूहळू मरुन जातो. नवर्‍यासाठी आपले मन मारणारी स्त्री स्वतः जगत नसते. दुसरा मार्ग – स्वतःला प्रामाणिकपणे वाटते त्याप्रमाणे जगात वागणे. पण त्यामुळे जोडीदाराला अत्यंत दु:ख होते. तसे होऊ नये म्हणून लपवा-छपवी पुन्हा सुरु होते. पतिवंचना की आत्मवंचना यात ती पहिला मार्ग निवडते.

पत्र अकरावे – अनुकंपा
वैवाहिक जीवन म्हणजे एक प्रकारचा आट्यापाट्याचा खेळ, आत्मवंचना, लपवा-छपवी. दुसर्‍याला फसवण्यापेक्षा स्वतःला फसवणे सोपे असते. दुसर्‍याच्या दु:खास कारण होऊ या कल्पनेने ंप्रथम त्याच्याविषयी कीव उत्पन्न होते. अशा स्त्रिया माघार घेतात व आहे तेच वैवाहिक जीवन पुढेहि चालू ठेवतात.

पत्र बारावे – वणवा पेटला!
भय्यासाहेब व मोहनराव यांच्या परस्पर संबंधातहि फरक पडत जातो. सुरुवातीला मोहनराव वारंवार येत नाही म्हणून भय्यासाहेब कुरकुर करीत. पण नंतर त्यांचे उत्कट स्वागत होत नाही. परत येण्याचा आग्रह होत नाही. त्यांच्या संबंधात शुष्कता येते.

पत्र तेरावे – पुरुषांचा अनुभव – एकाच प्रकारचा!
भय्यासाहेबांचे व्याख्यान बुधवारी असते आणि त्यामुळे त्या दिवशी मोहनराव तिला भेटायला घरी येतात. पण व्याख्यान पुढे ढकलण्यात आलेले असते व भय्यासाहेब लायब्ररीत गेलेले असतात. आपल्याला अपूर्व एकांत लाभल्याचे मोहनराव तिला सुचवतो. पण तिची वृत्ति त्यांच्या अपेक्षेपेक्षा वेगळी असते त्यामुळे मोहनरावांची निराशा होते. त्यांच्या हाताचा तिच्या मांडीस स्पर्श होतो. त्या स्पर्शाने ती दचकून कोचाच्या कडेला जाऊन बसते. मोहनरावांचा चेहरा लज्जेने काळवंडतो व नंतर ते तिचा सौम्यपणे निरोप घेऊन दाराकडे वळतात. नाखुशीने निघून जातात. भय्यासाहेब, मोहनराव यांच्या सारख्या दुसर्‍या एखाद्या व्यक्तीकडून आयुष्यातील स्वतंत्र जीवंतपणा, आसरा छत्र हुडकत होतो असे तिला वाटते. पण ते कायमचे संपले याची तिला जाणीव होते. स्वयंपूर्ण, स्वतंत्र आयुष्याचे प्रकरण सुरु झाल्याचे तिला जाणवते. ते स्वतंत्र आयुष्य जास्त मौल्यवान आहे अशी तिला खात्री वाटू लागते. नवर्‍याच्या प्रेमावर ती तोपर्यंत जगत होती. पण आयुष्याला लागणारा तो उत्साहाचा झरा, प्रेमाचा साठा तिला यापुढे स्वतःच्या हृदयांतच शोधावा लागेल, त्यासाठी दुसर्‍या व्यक्तीची जरुरी नव्हती या जाणीवेने तिला धीर येतो.

पत्र चौदावे – जुना पाश तोडला!
ती भय्यासाहेबांना पत्र लिहिते. मोहनरावांसाठी तिने त्यांना सोडलेले नाही असे ती त्यांना लिहिते. वैवाहिक जीवनाची सुरवात आणि होत असलेला शेवट.. लौकिकदृष्ट्या ते एक आदर्श जोडपे होते. एकमेकांची वंचना केली नाही, भांडलेतंटले नाही. पण हृदयातील पूर्वीचा अज्ञात झरा कोरडा झाला. उत्कट इच्छाच राहिली नाही. पण आता जे अनुभव आले त्यावरुन तिने केवळ स्त्री व स्वतंत्र व्यक्ती म्हणून आयुष्य कंठायचे ठरवले असल्याचे ती पत्रात लिहिते.

पत्र पंधरावे – व नवाहि!
ती मोहनरावांना पत्र लिहिते. ज्या गोष्टी भय्यासाहेबांबरोबरील तिच्या वैवाहिक जीवनात तिला पारख्या वाटत होत्या, त्याच त्यांच्या एका बालमित्राच्या क्षणिक सहवासाने उचंबळून आल्या हे ती पत्रात लिहिते. विवाहित व्यक्तीच्या आयुष्यात उत्साह, अंत:शक्तीचा सांठा, तिच्या जोडीदार व्यक्तीस निरुपयोगी होत गेला असला, तरी तो सुप्तावस्थेत तिच्या आयुष्यात कायमच असतो हे ती मोहनरावांच्या भेटीत शिकल्याचे ती लिहिते. वैवाहिक जीवनांतील दुबळी शांतता व निकटवर्ती व्यक्तीचे सुख:दुख यांना मोहून मनुष्यप्राणी आत्मवंचना करत असतो ही दुसरी गोष्ट ती मोहनरावांमुळे शिकलेली आहे तेही ती पत्रात लिहिते. पण त्यांना केवळ तिचा ताबा हवा होता हे तिला उमगते. तेव्हा मित्र आहे तोपर्यंतच आपण दूर सरुया असे ती मोहनरावांना लिहिते आणि ही कथा संपते.

३. दु:ख
निवेदक पुन्हा एकदा एकाकी झालेला असतो. त्याला जगापासून दूरदूर रहावेसे वाटते. तो खेडेगावात एका घरात उतरतो. सूर्यास्ताच्या वेळी तो बंदूक घेऊन निघतो. त्याच्या कोटाच्या आत त्याला शेवटचे आलेले पत्र असते. त्याच्या मनात दु:ख व शून्य असे वातावरण असते. एक आठवड्यापूर्वीची गोष्ट त्याला आठवते. त्या खेड्यात तो असाच भटकत असताना त्याचे पाय ओळखीच्या रस्त्याकडे वळले होते. त्याच रस्त्यावर एक उंच तांबडे घर होते. ते त्याला परिचित होते. तीन वर्षांपूर्वी त्याच खेड्यात एक मोठे वादळ झाले असताना त्याने त्या घराचा आश्रय घेतला होता. विजेच्या चकचकाटाने व गडगडाटाने घाबरुन त्याला बिलगणार्‍या तरुण स्त्रीचा स्पर्श त्याला आठवतो. तीन वर्षांनंतर दुसर्‍या दिवशी त्याच रस्त्यावर तिची व निवेदकाची भेट होते. तिचे आयुष्य दुसर्‍या पुरुषाशी निगडित होते. ते त्या तांबड्या घरापाशी येतात. दरवाज्याशी उभे राहिल्यावर त्याला आठवते की त्याच दाराच्या फटीतून तो तिच्यासाठी चिठ्ठ्या लिहून आत टाकीत असे. ती त्याच्या छातीवर डोके टेकवून त्याच्या गळ्याला घट्ट मिठी मारते. ते निराश्रितासारखे दाराजवळ उभे राहतात. तिचे आता दुसर्‍या पुरुषाबरोबर जडजीवन चालले होते पण पूर्वीचे प्रेमाने भरलेले जीवित पाहिजे होते. ती तिच्या आयुष्यात आलेल्या त्या पुरुषाला सर्व सांगेन व तसे पत्राने कळवेन असे ती निवेदकाला सांगते. निवेदक निबिड अरण्यात नदीच्या काठावर एका कापलेल्या जुनाट झाडाच्या बुंध्याशी येतो. दुसर्‍या दिवशी तिथे येऊन हाती येणारे एक पत्र वाचू असे त्या झाडाला वचन देतो. ठरल्याप्रमाणे तो बुंध्याजवळ पत्र घेऊन जातो. तिला त्याच्या सोबतचे सर्व काही आठवत असते. पण ती जडजीवनाच्या दृष्टीनेच आयुष्याच्या भवितव्याकडे पहायचे ठरवते. जी भेट झाली ती शेवटचीच होती असे ती त्याला सांगते.

४. प्रेम करण्याचा हक्क
ती २७-२८ वर्षांची होती. काॅलेजात लेक्चरर होण्याचा तिला मान मिळाला होता. ती योग्य प्रकारे आपले काम बजावत होती पण तोपर्यंत तिने कोणावर प्रेम केले नव्हते. आपल्याला खेळकरपणे बोलता येत नाही, जास्त रंगेल, आनंदी असल्यासारखे दाखवता येत नाही. पुरुषाने स्त्रीच्या अंतरंगाकडे, तिच्या गुणांकडेच पहावे असे तिचे प्रांजळ मत होते. स्त्रीचे प्रेमळ हृदय.. त्यात तिच्या प्रेम करण्याच्या हक्काचा समावेश होतो असे तिला वाटे. तिचे नाव वेणू होते. अगदी सरल हृदय बाला होती ती. तिचे ते पावित्र्य.. ते सोवळेपणा प्रत्येकाचाच थट्टेचा विषय झाला होता. तिच्यासारख्या पवित्र, प्रेमळ स्त्रीलाच फक्त प्रेम करण्याचा जगात हक्क आहे अशी तिची समजूत होती. एका रविवारी ती नातलगाला भेटायला बोरिवलीला गेली होती. परत मुंबईस येताना उशीर झाला. ती पुरुषांच्या डब्यात एकटीच होती. अंधेरीला एक तरुण डब्यात शिरतो. त्याचे नाव सुंदरराव. त्याचे लक्ष वेणूकडे जाते. तिच्यासमोर खिडकीशी बसतो व तिच्याकडे टक लावून पाहतो. तिला तिच्या मैत्रिणीची गोष्ट आठवते. आगगाडीच्या प्रवासात तिची एका नवख्या तरुणाशी ओळख होते. क्षणिक आकर्षणाचे रुपांतर दृढ मैत्री व प्रेमात होते. तिच्या शेजारी पडलेले वृत्तपत्र घ्यायच्या मिशाने तो उठून तिच्या शेजारी बसतो. तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करतो. तिचा बांध एकदम कोसळतो. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागतात. ती जागेवरुन उठून पुढच्या बाकावर अंग टाकते. तो तरुण तिची क्षमा मागतो. त्यांच्यात संवाद होतो. दिवसेंदिवस स्त्रीचे पवित्र, शाश्वत प्रेम विसरत चाललो असल्याचे तिला सांगतो. स्त्रीकडे पाहण्याची दृष्टी वैषयिक स्वरुपाची होत चालल्याचे सांगतो. जगाचे रहाटगाडगे व्यवहारी, व्यापारी स्वरुपाचे होत चालले आहे असे तो सांगतो. चर्नीरोड स्टेशन येते. दोघेही डब्यातून खाली उतरतात. तो गर्दीत दिसेनासा होतो. ती त्याला हाका मारते. तो येतो व घरी पोहोचवायला तयार होतो. ती आनंदाने अनुमती देते. प्रथम तिच्याबरोबर रानटीपणे वागणारा तो नवखा पुरुष, जवळ जवळ सारी रात्र तिच्या एकाकी खोलीत तिच्याजवळ बसून मोकळेपणे गप्पा मारुन जात आहे ही गोष्ट तिच्या हृदयाला आनंदाची भरती आणते. तिच्यात बदल होतो. प्रेम म्हणजे काय हे तिला प्रथमच समजून येते. ज्याला प्रेम करण्याचा हक्क आहे, त्याला खरोखर जगांत जगण्याचा हक्क आहे असे तिला वाटू लागते. तो तिला मोहिनीचे आलेले पत्र दाखवतो. त्यात तिने निर्लज्जपणे लिहिलेले असते की सुंदरलाल गेल्यावर तिला चैन पडत नव्हती. पुरुषांच्या संगतीची.. सहवासाची तिची उत्कट इच्छा तिच्या आटोक्याबाहेरची आहे. एका देखण्या व हुशार तरुणाशी तिची नवी ओळख झाली असून ती ‘सुखी ‘आहे. नंतर सुंदरलालला समजते की तिला ती म्हणत असलेल्या तरुणाचाहि सहवास शेवटी नकोसा झाला आहे. ती सुंदरलालकडे परत येते. तिची त्याची दिलजमाई झाल्याचे सुंदरलाल वेणूला पत्रातून कळवतो. वेणू पुन्हा एकाकी होते अशी ही कथा!

५. त्याग
परीक्षा संपल्यावर तरुण मंडळी लिनीच्या घरी करमणुकीसाठी जमतात. दारावरची घंटा वाजते. लिनी दार उघडते शरद आलेला असतो. तिच्या कपाळावर त्रासिक आठ्या पडतात.
शरदचे लिनीविषयीचे मुग्ध व उत्कट प्रेम तिला ठाऊक होते. पण त्याच्या लोचटपणाचा तिला राग येई. तो जवळ असताना मात्र सुंदर, आनंदी व अत्यंत उत्साही दिसण्याची ती धडपड करी. शरद तिथून निघून जातो. स्वातंत्र्य हिरावून घेणारे पुरुष लिनीला आवडत नाही. खर्‍या प्रेमात त्यागाची वृत्ति असते. सगळी मंडळी निघून गेल्यावर दाराशी शरद उभा असतो. तो तिच्यावर किती उत्कट प्रेम करतो ते तो तिला सांगतो. लिनी त्रस्त होते. त्याला राग यावा म्हणूनच ती सगळी मंडळी जमली असताना आत गौतमरावाबरोबर गेली होती. तो तिच्या स्वातंत्र्यावर घाला घालतो, लोचटपणा करतो म्हणून त्याचा राग येतो असे ती त्याला सांगते. बोलतबोलत ते नदीवरील पुलावर येतात. तो तिला त्याचा तिटकारा येतो म्हणून विचारतो. ती तीन वेळा हो म्हणते. तो अतिशय रागात भान न राहून तिला ढकलतो. ती नदीत पडते. पुलावर तो एकटाच उरतो. त्याच दिवशी पहिल्या गाडीने तो खेडेगांवचा प्रवास सुरु करतो. आपल्याला आता धरतील अशी त्याला भीति वाटू लागते. आपले आयुष्य संपले असे त्याला वाटू लागते. यापुढे जगण्यात अर्थ नाही अशी त्याची खात्री होते. त्याला घरी राहवेना. त्याचे सारे लक्ष उडते. जिथे तिचा भीतीने भेदरलेला चेहरा शेवटचाच पाहिला त्या ठिकाणी तो जातो. खाली वाकून पाहतो. तो एकदम मागे पाहतो तर कोपर्‍यावरुन जाणाऱ्या ट्रॅममध्ये त्याला लीना बसली असल्याचा भास होतो. तो धावतच त्या बाजूस जातो. ती लीनाच असते. फिकी व वाळलेली. पूर्वीचा रंगेल व खेळकर भाव राहिलेला नव्हता. तर गांभीर्य व खिन्नता दिसत होती. ट्रॅम एकदम गर्दीतून पुढे निघून जाते. सकाळी उठल्यावर त्याचे पाय लिनीच्या घराकडे वळतात. तिच ती तिथे उभी असते. तो ओळख द्यायचा प्रयत्न करतो. पण ती न थबकता पुढे चालू लागते. शरदने लिनीला नदीत ढकलले व ती नदीत धबकन खाली पडली. पण रात्री जाळी सोडावयास फिरणार्‍या कोळ्यांना ती दिसून येते. ते तिला काठावर आणतात. पोलिसांनी विचारल्यावर ती खोटेच कारण देते. शरदने नदीत ढकलले ही बातमी ती षटकर्णी होऊ देत नाही. का ते तिला उमगत नाही. तो पुन्हा भेटला तर तिचा तिटकारा करेल का असा तिला प्रश्न पडतो. त्याच्या अत्युत्कट अनुरागांतच हा राग, ही सूडभावना दडलेली असावी असे तिला वाटते. त्या भेटीनंतर शरद लिनीच्या राहत्या घरी जाऊन, तिच्या खिडकीच्या तावदानांतून आशाळभूतपणे, उत्सुकतेने व अपेक्षेने पहात. एक दिवशी ती पडदा दूर करते. पुन्हा त्यांचे नव्याने जीवन सुरु होते. अशी ही कथा !

विलास कुडके.

— परीक्षण : विलास कुडके.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments