Saturday, October 5, 2024
Homeसाहित्यदुर्मीळ पुस्तके : ३६

दुर्मीळ पुस्तके : ३६

महाश्वेता नि इतर कथा –

श्री रघुनाथ गोविंद सरदेसाई (७/९/१९०५-११/१२/१९९१) केशव भिकाजी ढवळे प्रकाशनाने १९४५ मध्ये प्रकाशित केलेला हा ११२ पृष्ठांचा कथासंग्रह! दीड रुपया किंमत. मुखपृष्ठ दिनानाथ दामोदर दलाल यांचे.
श्री र. गो. सरदेसाई यांचा जन्म व शिक्षण कोल्हापूरमध्ये झाले. त्यांनी पुण्यात स्फूर्ती व चित्रमय जगत मासिकात संपादक व सहसंपादक म्हणून काम केले. नंतर मुंबईत चित्रा, तारका, नवयुग, विविध वृत्त, विहार इ. साप्ताहिके, मराठा दैनिक, यशवंत मासिक यामध्ये संपादक मंडळात काम केले. दै. नवाकाळ मध्ये ते काहीकाळ सहसंपादक होते. आमचा संसार (विनोदी लेखसंग्रह), कागदी विमाने, चलनी नाणी (लघुनिबंध संग्रह), क्रीडा (खेळ, खेळाडू यांचे चुटके), खेळ किती दाविती गमती (विविध खेळांच्या कथा), खेळांचा राजा (लाॅन टेनिसचा इतिहास), खेळांच्या जन्मकथा भाग १ व २, चित्रा (कथासंग्रह), स्वाती (कथासंग्रह), बहुत दिन नच भेटती (ललित), महाश्वेता (कथासंग्रह), माझ्या पत्र जीवनातील शैली(व्यक्तिचित्रणे), सुरसुरी (विनोदी लेखसंग्रह), हिंदी क्रिकेट ही त्यांची साहित्य संपदा.

१. ”महाश्वेता” – सदाशिव सबनीस नावाचा तरुण पी. डब्ल्यू. डी खात्यात ६० रुपये पगारावर मुंबईत कसाबसा पोट भरत असतो. महाश्वेता हे काही त्याच्या प्रेयसीचे खरे नाव नव्हते. कित्येक दिवस तो तिला महाश्वेता म्हणत होता. हे नाव देण्याचे कारण म्हणजे त्याने तिला प्रथम पाहिली त्या दिवसापासून तिच्या अंगावर पांढर्‍या स्वच्छ पातळपोलक्याखेरीज दुसर्‍या कुठल्याच रंगाचे कापड पाहिले नव्हते. जवळ जवळ ३ वर्षे तो तिला पहात होता. ताज्या परीटघडीचे पिवळ्या किनारीचे पांढरे पातळ, पांढरे पोलके, हातात स्वच्छ छोटा रुमाल नि पांढरी मनीबॅग, पायात पांढर्‍या पट्ट्याच्या नाजूक चपला नि डोक्यात निशिगंधाची वेणी हा तिचा परिवेष असे. तिच्या पोषाखातील श्वेतप्रियतेमुळे त्याचे तिच्याकडे लक्ष वेधले जात. तो ओशियाना बिल्डिंगवरील घड्याळासमोर समुद्राकडे पाठ करुन रोज संध्याकाळी पॅरापेटवर बसत. विविधरंगी गर्दीत रोज न चुकता फिरावयास येणाऱ्या महाश्वेतेकडे तिच्या पोषाखी पांढरेपणामुळे त्याचे मन आकर्षिले जाते. ती सुंदर होती असे नाही. सावळीच पण रेखीव व ठसठशीत होती. सम्राज्ञीसारखा तिचा रुबाब असायचा. रोज ठराविक वेळेला ती आपल्या एक दोघी मैत्रिणीबरोबर नियमितपणे फिरायला यायची. तिच्या दर्शनाचा त्याच्या मनाला चाळा लागला होता. तिला त्याची दादही नव्हती. एके दिवशी ती त्याला सकाळी प्रार्थना समाजाच्या नाक्यावर म्यूझिअमकडे जाणाऱ्या ट्रॅमची वाट पाहात असलेली दिसते. तिच्या हातात पुस्तके होती. ती काॅलेजकडे निघाली असावी असा तो अंदाज बांधतो. तोही तिच्या पाठोपाठ ट्रॅममध्ये चढतो. ती तिथेच जवळपास रहात असावी असा तो तर्क करतो. तो तिला संगम बोलपट पाहावयास आलेली पाहतो. योगायोगाने त्याच्याच शेजारी ती बसते. झूला या बोलपटाच्या वेळीही त्यांची गाठ पडते. राजाराणी, पहिला पाळणा या बोलपटांच्या वेळी त्यांची गाठ होते. तो मनात मांडे खात असतानाच त्यांची जमत असलेली साखळी अडते. ती त्याला दिसेनाशी होते. पंधरा वीस वारांच्या तळमळीनंतर तिचे त्याला दर्शन होते ते” लोकमान्य “च्या अंकात तिचा एका पुरुषाबरोबर मंडोळ्या बांधलेल्या फोटोत. त्याच्यावर जणू वज्राघात होतो अशी ही विचित्र एकतर्फी प्रेमकहाणी आहे.

२. ”गरीबोंकी दुनिया “- मूनलाईट मूव्हिटोनचे दिग्दर्शक मास्तर एम. राघवेंद्र हे “गरीबोंकी दुनिया “या बोलपटाचे चित्रीकरण करत असतात. मालक डाह्याभाई असतात. मूव्हिटोनचे दोन तीन बोलपट एम. राघवेंद्र यांनी दिग्दर्शित केलेले असूनही क्रेडिट टायटलमध्ये राजमल नाथालाल यांचेच नाव येत होते. एम. राघवेंद्र, असिस्टंट दिग्दर्शक यांचा मात्र नाममात्र उल्लेख केलेला होता. त्यांना ती गोष्ट तीव्रतेने बोचत होती. पगार वाढविण्याची मागणी मालकाला सोसण्यासारखी नसल्यामुळे राजमल मूनलाईट मूव्हिटोनला रामराम ठोकतो सनलाईट सिनेटोन कंपनी काढतो. जाताना मुख्य तारकेला आपल्या कंपनीत भागीदारीण म्हणून घेऊन जातो त्यामुळे मालक एम. राघवेंद्र यांना नवीन बोलपट दिग्दर्शित करायला सांगतात. त्यामुळे त्यांच्या सुप्त आकांक्षेला वाट मिळते. “गरीबोंकी दुनिया “या बोलपटासाठी ते एका गुणी पण उपेक्षित नटीला घेतात. ते त्यावर जादा मेहनत घेत असतात. त्यासाठी ते अनेक ठिकाणी जाऊन गोरगरीबांचे निरीक्षण करत असताना त्यांच्या कानावर कुठून तरी एक आर्त हाक येते. एक स्त्री त्यांना विकल अवस्थेत पडलेली दिसते. तिच्याइतके भावपूर्ण डोळे त्यांनी त्यापूर्वी पाहिलेले नव्हते. ती चार दिवसांची उपाशी असते. गलितगात्र अवस्थेत असते. ते तिला घरी नेऊन तिच्या जेवणाची सोय करतात. तिला घर नसते. ती चांगल्या घरची असते. लग्न होईपर्यंत तिचं आयुष्य सुखात गेलेले असते. तिचा नवरा व्यसनी निघतो. तिचा छळ करतो. मारपीट करतो. तिला हाकलून लावतो. तिची कहाणी ऐकून तो तिला घरी ठेवून घेतो. तिला सिनेमात एक्स्ट्रा नटी म्हणून काम देतो. तिची स्क्रीन टेस्ट घ्यायची असते. कॅमेरा नुसता पोजमध्ये लावून ठेवलेला असतो. स्टिल फोटोग्राफर मास्तर भीमराव झोकांड्या खात तिथे येतो. तो काळं कापड उचलून त्यात डोके खुपसतो. पण स्क्रीन टेस्टसाठी मेकअप करुन आलेल्या त्या स्त्रीवर झडप घालतो. एम. राघवेंद्र याला नंतर उलगडते की ती धंदेवाईक स्त्री असते. भीमरावला तिने पुरेपूर नागवलं होते आणि लाथाडले होते. वर्षापूर्वी ती कोणाचा तरी हात धरुन बेपत्ता झाली होती. एम. राघवेंद्र मात्र ते पाहून सुन्न होतो अशी ही कथा आहे.

३. ”स्री आणि पुरुष “- नव्याने आलेल्या बिर्‍हाडातील वीस एकवीस वर्षाची जान्हवी त्याच्या दृष्टीस पडते. ती व तिचे थोरले भाऊजी माधवराव एवढे बिर्‍हाड होते. माधवराव पोस्टात होते. जान्हवीचे लग्न होऊन दोन तीन महिने उलटत नाही तोच तिचा पती एका साथीत जातो. एके दिवशी ती गात असलेले”कृष्णा मिळाली कोयनेप्रति, सखे ग, सुरेख संगम किती “ हे पद त्याच्या कानावर येते. ते तिला अर्धेच येत असते. त्याच्याकडे वहीत माधवानुजाचे ते पूर्ण लिहिलेले असते. तो वही आणून देतो. त्या वहीचे नाव त्याने “मधु – कोष “असे ठेवलेले होते. जान्हवीला वाचनाचा नाद होता. त्यामुळे तो तिला पुस्तके आणून देई. एके दिवशी समाजसुधारणेत कोण आड येते? पुरुष की स्त्री यावर त्यांच्यात चर्चा होते. एके दिवशी त्याच्या वाढदिवसाला ती तिने विणलेला रुमाल भेट म्हणून देते. त्या रुमालाच्या कोपर्‍यात त्याचे नावही तिने विणलेले असते. कार्यालयातून त्याला फिरतीवर जाण्याचा आदेश होतो. नेमके त्याच वेळी माधवराव जान्हवीला माहेरी घेऊन जावे लागेल असे सांगतो. फिरतीचे ठिकाण जिथे होते. तिथेच तिचे माहेर होते. त्यामुळे तिला त्याची सोबत मिळते. रस्त्यात ओढा लागतो. तो ओढ्याच्या पाण्यात पडतो. एक अणकुचीदार दगड त्याच्या पायाला लागतो. रक्तबंबाळ झालेल्या त्याची ती सुश्रुषा करते. एके दिवशी ती औषध द्यायला जातो. तो औषधाऐवजी तिचा हात धरायला जातो. औषधाची बाटली फुटते. तिचा चेहरा रागाने लाल होतो. ती निघून जाते. अशी ही कथा आहे.

४. ”ससा आणि हरिणी “- यमुनाजळि खेळू खेळ, कन्हैया, कां लाजता, बहुमोल अशी ही वेळ अरसिका, का दवडता, या गाण्याच्या लकेरीने गंगारामला जाग येते. पूर्वेची खिडकी चुकून उघडी राहिली होती. तिथूनच ही लकेर आलेली असते. एरवी खिडकी पलीकडे भिकार इमारत आणि दरिद्री बिर्‍हाडे असल्याने तो खिडकी बंदच ठेवी. एक तरुणी लांबसडक केस खांद्यावरुन पुढे घेऊन तिपेडी वेणी घालता घालता गाणे गुणगुणत होती. तिचीही गंगारामकडे नजर जाते आणि अय्या असे किंचाळून ती गाणे थांबवते. तिच्या दर्शनाने गंगाराम आणि त्याची खोली यांच्यात कायापालट होतो. एके दिवशी गंगाराम खेळण्याच्या दुकानातून मोठा ससा घेऊन येतो व टेबलावर ठेवून देतो. “किती छान आहे बघ “असे तिचे उद्गार त्याला ऐकू येतात. एके दिवशी गंगाराम जवळच्या संगीतशाळेत प्रवेश घेतो. त्याला सुप्तसुरांचे ज्ञान होण्याच्या आत ती हरिणी अदृश्य होते. गंगाराम रागाने सशाच्या चिंध्या करुन टाकतो अशी ही कथा आहे.

५. ”खाऊचे पुडे! “- नारायणाश्रमात निवेदक आणि बाबुराव भाड्याने राहत होते. पोटाच्या मागे लागून दोघे पुण्यात आलेले होते. बाबुराव एका छापखान्यात प्रुफरीडर म्हणून नोकरीस होते. निवेदक ए. आर च्या कचेरीत टायपिस्ट होते. बाबुराव बाजारात गेले की येताना खाऊचा पुडा आणत व तो खोलीतील कपाटात ठेवलेल्या बरणीत ठेवत. याचे निवेदकाला नवल वाटत असे. एकदा ते न्यूजपेपर स्टाॅलवरुन एक मासिक घेतात. त्या मासिकातील एक फोटो समोर ठेवून बाबुराव बरणीतील खाऊ त्या फोटोला दिल्यासारखे करुन तो स्वतःच खात बसलेले निवेदकाला दिसते. रमाकांत गोडसे वय वर्षे दोन याचा तो फोटो होता. रक्ताच्या नात्याचे बाबुराव यांना कोणी नव्हते. तसेच त्यांनी कोणावर जीव लावावा असेही कोणी नव्हते. त्यांचे गावचे सावकार गोडसे यांच्याकडे ते रोज सकाळी एकवेळ जेवणास जात. त्या मोबदल्यात ते सावकारी वह्यांचे पक्के लिखाण करुन देत. एके दिवशी जेवण सुरु असताना सावकाराचा सहा महिन्यांचा नातू रांगत रांगत पंक्तीत येतो आणि सावकाराच्या पानांत घुसतो. सावकार त्याला सांभाळा म्हणून बाबुराव यांना सांगतात. तिथून बाबुरावांच्या अंत:करणात रमाकांतबद्दल वात्सल्य वाढू लागते. सावकाराला चोरुन पैशा दोन पैशाचा खाऊ ते त्याला आणून देत. पण बाबुराव यांना नोकरीमुळे त्याला सोडून यावे लागल्याने ते त्याची आठवण म्हणून खाऊचा पुडा आणत याचा उलगडा निवेदकाला होतो.

६. ”दिवाळीतील सत्याग्रह “ प्रायव्हेट इंग्लिश हायस्कूलमधील इतिहासाचे शिक्षक सदाशिवराव भुस्कटे यांना त्यांची पत्नी सौ. सरलाबाई दिवाळीची रजा केव्हापासून पडणार आहे असे विचारते. दिवाळीला माहेरी जायचे ठरवले असेल तर हक्काचा दिवाळसण वसुल करण्यासाठी सदाशिवराव एका पायावर तयार असतात. त्यांना मागच्या दिवाळीतील त्यांच्या यशस्वी सत्याग्रहाची आठवण होते. ती लग्नानंतरची पहिली दिवाळी होती.सरलाबाई सातार्‍याच्या तात्या वैद्याची मुलगी. त्या भलत्याच अबोल होत्या. नवर्‍याशी बोलणे म्हणजे महापाप अशी तिची समजूत होती त्यामुळे प्रणयोत्सुक सदाशिवरावांची अवस्था विचित्र झालेली असते. ते तिला बोलते करण्यासाठी माजघरात गेले की ती स्वयंपाकघरात शिरत आणि ते स्वयंपाक घरात गेले की ती न्हाणीघरात पळत. त्यांचा संसार मुक्यानेच चालला होता. तशात दिवाळी येते. सासरे त्यांना दिवाळसणाचे आमंत्रण देतात. जाताना त्यांच्या मुलीला घेऊन जातात. सदाशिवराव अनिच्छेनेच दिवाळसणाला जातात. त्यांना पाहून ओट्यावर असलेली सरला आंत पळते. सरलाप्रमाणेच सदाशिवराव मौनव्रत घेतात. सासुरवाडची मंडळी जावईबुवा रुसले म्हणून हवालदील होतात. दोन दिवसात सौ. सरलाबाईंचे नखही सदाशिवरावांच्या दृष्टीस पडत नाही. त्यांच्या मनाची तगमग वाढते. संताप वाढतो. जावाईबुवांचा रुसवा जावा म्हणून तात्या झोकदार खड्याची आंगठीही देतात. सत्याग्रहाचा त्यांच्या लेकीवर परिणाम होत नव्हता. सदाशिवरावांना त्यांचा वर्गबंधू गजा केळकर भेटतो. सदाशिवराव व सरलाबाई यांचा एकत्र फोटो काढण्याचा विचार तो सांगतो. तो फोटो घ्यायला घरी येतो पण सरलाबाई मागच्या दाराने कुठेतरी निघून जाते. पावसाचे चिन्ह दिसू लागते. सदाशिवराव त्यांची वळकटी व बॅग भरुन घराबाहेर पडून मोटार स्टँडच्या दिशेने चालू लागतात. तात्या व मेहुणा त्यांना अडवण्याचे प्रयत्न करतात. पण भर पावसात ते पुढे निघतात. तो गावकऱ्यांच्या कुटाळकीचा विषय होतो. या सत्याग्रहाचा परिणाम असा होतो की तात्या मुलीला घेऊन येतात. सरलाबाई त्यांची क्षमा मागते. तेव्हापासून तिची जी टकळी सुरु होती ती कशी थांबवावी अशी विवंचना सदाशिवरावांना लागते,अशी ही कथा आहे.

७. ”भूतदया “- निवेदकाला जगन्नाथ बरोबर सरकारी कामाकरिता पॅसेंजरने मुंबईस जायचे होते. कसेबसे ते सामान आवरुन आरामखुर्चीवर पडले तोच गेले दोन तीन महिने गेलेली त्यांची पत्नी त्यांच्यासमोर येऊन उभी राहते त्यामुळे त्याला स्टेशनवर जायला अर्धा तास उशीर होतो. नशीब म्हणून गाडी मिळते. जागाही मिळते. जगन्नाथ व निवेदकात भूतदया विषयावर शब्दाशब्दी सुरु होते. हल्लीच्या जगात भूतदयेला पात्र अशी एक सुध्दा व्यक्ति नाही असे ते म्हणतात तोच त्यांच्यापुढे तीस बत्तीस वर्षाची विधवा येऊन उभी राहते. जगन्नाथाने हे अनाहूत संकट ओढवून घेतले होते. ती तिची कर्मकहाणी त्यांना सांगते. तिचा जन्म ब्राह्मण कुळांत झालेला. कोकणात खोत घराणे. ती १३-१४ वर्षांची झाल्यावर तिच्या वडिलांनी तिच्या लग्नाचा विचार सुरु केला. त्याचवेळी नागपूरचे विश्वनाथराव जोशी वकील त्यांच्या मुलासाठी वधू पाहण्यासाठी येतात. लग्न झाल्यावर कळले की तो काही वकील नाही तर लफंगा आहे . तो आणि त्याचा मुलगा दोघेही ख्रिश्चन होते. ख्रिश्चन म्हणून तिला घराबाहेर काढण्यात येते. तिला कोणी पाणी देत नाही. तीन दिवसापासून ती उपाशी असते. भूतदयेला ती पात्र आहे की नाही ते ती दोघांना विचारते. निवेदकाला तिची दया येते. तिला पुण्याचा पत्ताही देतो. मुंबईचे काम संपवून निवेदक परत येतो. एके दिवशी निवेदक मंडईतून घरी येतो तो ती बाई सोप्यावर बसलेली दिसते. जवळ मारक्या म्हशीसारखी त्याची क्रुध्द सौभाग्यवती असते. आरड्याओरड्याने शेजारीपाजारी गोळा होतात. निवेदक जगन्नाथाची मदत घेऊन तिची कशीबशी सोय लावतो, अशी ही कथा आहे.

८. “त्रिस्थळी यात्रा – देवरुखच्या शाळेतील खंडेराव देवस्थळी याने पुण्याच्या काॅलेजमध्ये प्रवेश करण्यास आणि प्रेमाने त्याच्या हृदयात प्रवेश करण्यास एकच गाठ पडते. शिक्षणाचा खुळा नाद सोडून त्याने बोहल्यावर चढावे असे त्याच्या मामाला वाटत असे. काॅलेजमधील पोरी हा त्याला नवीनच विषय मिळतो. वर्गातील लीला देशमुखच्या आंबाड्यातील गुलाबाच्या फुलाकडे त्याची दृष्टी खेचली जाते. तिची ओढ त्याला जाणवू लागते. तिच्याशी बोलण्याची संधि मिळावी अशी त्याची उत्कट इच्छा होती पण ओळख होण्याचा योग येण्यापूर्वीच पहिली टर्म संपून दिवाळीची रजा पडते. दोघेही पास होतात. उन्हाळ्याची सुट्टी लागते. खंडेराव ती सुट्टी लीला देशमुखच्या चिंतनात विरहात घालवतो. काॅलेज सुरु होते पण लीला देशमुखचे नाव प्रवेश यादीत दिसत नाही. नंतर त्याला कळते की तिचे लग्न झाले आहे. नंतर खंडेरावच्या लक्षात येते की आता त्याची नजर त्रिवेणी देवकडे धावत आहे. तिची गालावरची खळी त्याला मोहून घेते. लीला देशमुख पेक्षा ती त्याला सुंदर भासू लागते.तिच्याशी जास्त सलगीचे संबंध निर्माण करता येण्यापूर्वीच काॅलेजला दिवाळीची रजा पडते. रजा संपते तशी त्याची त्रिवेणीशी भेट होते. अभ्यासासाठी तिच्याकडे वारंवार जाऊन देखील खंडेरावला आपले प्रेम बोलून दाखवण्याचे धैर्य होत नाही. पुरुषाला हसत हसत आपल्यापासून योग्य अंतरावर दूर ठेवण्याची खुबी त्रिवेणीत असल्याचे खंडेरावला जाणीव होते. तिच्याकडून त्याला हवे तसे उत्तेजन मिळत नाही. परीक्षा संपल्यावर गावी जाण्यापूर्वी तो तिच्या घरी जातो तो ती वसंतराव शहाणे या तरुणाशी बोलत असते. दोन वर्षांपूर्वीच त्रिवेणीचा त्याच्याशी वाङ्निश्चय झालेला असतो. तो एम बी बी एस च्या चौथ्या वर्षात असतो. डॉक्टर होताच विवाह होणार होता. त्रिवेणीचे तोंड न पाहण्याची तो मनाशी प्रतिज्ञा करतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत तो घरी आल्यावर मामा मधु दीक्षितशी लग्न करण्याचा तगादा लावतो. पण खंडेराव त्यांना थांबा म्हणतो. काॅलेज बदलतो. एकदा तो मिनर्व्हात बोलपट पहायला गेला होता. तो तिकीट काढण्याच्या रांगेत होता तोच मागून वर्गातील सिंधू सबनीसचा मंजुळ आवाजातील हाक त्याच्या कानावर येते. ती त्याला तिकिटे काढून द्यायला सांगते. नकळत त्याची तिसरी प्रेमयात्रा सुरु होते. तिच्या धीटपणाचे त्याला कौतुक वाटू लागले. दिवाळीची रजा पडण्यापूर्वी त्याने तिच्या घरी ये जा करण्यापर्यंत मजल मारली. सिंधु त्याच्याशी जितक्या मोकळेपणाने बोले चाले तितकीच ती तिच्या इतर मित्रांबरोबरही नि:संकोचपणे वागे.तो सिंधूचा पत्र लिहून आपली मनोव्यथा कळवतो. दुसर्‍याच दिवशी तिचे उत्तर येते. निराशेचा तिसरा तडाखा त्याला बसतो. संतापाच्या भरात तो गावी मधू दीक्षितबरोबर लग्नाला तयार असल्याचे मामाला सांगतो आणि त्यांचे लग्न होते अशी ही कथा आहे.

९. पितृ – ऋण – नानासाहेब त्यांच्या मुलीला पदरात घेतील म्हणून भास्कररावांकडे येतात. त्यांचा आणि भास्कररावांच्या वडिलांचा जिव्हाळ्याचा स्नेहसंबंध असतो. भास्कररावांच्या जन्मानंतर चार वर्षांनी त्यांच्या कुसुमचा जन्म होतो तेव्हा ते जिव्हाळ्याच्या स्नेहसंबंधास नात्याने निगडित करण्यासाठी वचनबद्ध झाले होते. भास्कररावांच्या वडिलांनी मरेपर्यंत ती आशा बाळगली होती. ते वचन पुरं करण्याच्या उद्देशाने नानासाहेब भास्कररावांकडे शब्द काढतात. पण ते नकार देतात. एका ख्रिश्चन बाईच्या नादी लागून नकार दिल्याबद्दल नानासाहेब तिरस्कार व्यक्त करतात त्यामुळे भास्कररावांना ते सहन होत नाही. ती ख्रिश्चन बाई बहीण असल्याचे सांगतात. सुमारे वीस पंचवीस वर्षांपूर्वी बाबांच्या घरी सहा सात महिने चिमाबाई नावाची विधवा बाई स्वपाकीण म्हणून होती. ती बाई दागिने घेऊन त्या गावातून पळून गेल्याचे खोटे कारण लोकांना सांगते कारण तिला तिच्या पतीच्या लौकिक बेअब्रूची भीति वाटत होती. प्रत्यक्षात चिमाबाई आईच्या संमतीनेच व आग्रहामुळेच त्यांच्या घरातून पळून गेली होती हे सत्य भास्करराव नानासाहेबांना सांगतात. ते दागिने सुध्दा आईनेच चिमाबाईला बाबांचे घसरलेले पाऊल सावरावं म्हणून व आपल्या नवर्‍याच्या हातून झालेल्या पापाला वाचा फुटून त्याचा बदलौकिक होऊ नये म्हणून बक्षीस दिले होते. तिच्या हातचा कागद मैनाने भास्कररावांना दाखविलेला असतो. चिमाबाईने स्वतःचे संरक्षण करण्यासाठी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. ती फार दिवस जगली नाही. आपल्या पोटच्या मुलीची उपेक्षा करण्याचे जे पाप बाबांच्या हातून घडले ते पुत्र या नात्याने निस्तारणे आपले कर्तव्य आहे म्हणून बहिण या नात्याने तिचा सांभाळ करण्याचे वचन दिलेले असल्याचे तो नानासाहेबांना सांगतो अशी ही कथा आहे.

१०. दोस्तांचे जग ! – रिटेंचमेंटमध्ये त्रिविक्रम नोकरीतून कमी होतो. त्यामुळे आॅफिस सुटल्यावर त्या इमारतीशी जडलेला ऋणानुबंध संपणार म्हणून ती इमारत शेवटची पाहून घेतो. दुसर्‍या दिवशी तो ते गाव सोडून जाणार म्हणून प्रत्येक परिचित गोष्टीचा निरोप घेतो. जिथे जेवत तो शंकराश्रम, त्याचा लंबाड्या मालक, पोस्ट आॅफिस, भाजी मंडई, वाङमय मंडळाचे आॅफिस जिथे त्याने व्याख्याने दिली होती,त्या मंडळाचा चिटणीस, नेहमीचा पोस्टमास्तर त्याला तिर्‍हाईतसारखे भेटतात. खानावळीतील चारदोन दोस्त भेटतात. दुसर्‍या दिवशी हमालाकरवी तो सामान स्टेशनवर नेतो. आपण गावी जाणार म्हणून कोणी निरोप द्यायला येईल म्हणून त्याला आशा वाटते पण कोणीच येत नाही, अशी ही कथा आहे.

११. सामर्थ्यहीन संपदा – पळसगाव हे तालुक्याचे गाव. मध्यम वस्तीचे व साधारणपणे वाढत्या रहदारीचे असल्यामुळे तेथील बाजाराला साहजिकच किंमत आली होती. तिथे बराच मोठा बाजार भरत. संध्याकाळ होत चालली की परगावचे लोक बाजार संपवून आपापल्या गावी परत जात. बाजार उठून गेला की त्या बाजूला कोणी फिरकत नसे. इतर अनेक लोकांप्रमाणेच ग्यानबाही वेळेवर बाजाराला आला होता. त्याचे गाव दोन कोसांवर होते. एका सावकाराचे शेत त्याने खंडाने घेतले होते. साध्या मीठभाकरीत समाधान मानणारा तो गरीब कुणबी होता. त्याच्या परड्यातील घोसळाच्या वेलाची त्या खेड्यात खूप वाखाणणी होई. त्या दिवशी तो भाजीचा हारा घेऊन बाजारात आलेला होता. खांद्यावरचे कांबळे जमिनीवर आंथरुन त्यावर तो हार्‍यातील भाजी व्यवस्थित मांडून ठेवतो. त्याचा माल घेण्यास गिर्‍हाईक उत्सुक दिसे; पण किंमतीत पटत नसे. कसेही झाले तरी संध्याकाळपर्यंत मालाचे साडेतीन चार रुपये करुच करु असा त्याने आईला शब्द दिलेला असतो त्यामुळे तो किंमतीत देवाण घेवाण करायला तयार होत नव्हता. तितक्यात तिथे मामलेदार साहेब येतात. ते नावाने गोडबोले पण कृतीने गळेकापू होते. त्यांचा तापटपणा, कद्रूपणा सार्‍या गावाला माहित होता. मुन्सफ कोर्ट पळसगावात तपासणीसाठी फिरतीवर असल्याने त्यांच्या सरबराईसाठी मामलेदार आलेले असतात. त्या रात्री ते एक जंगी चांदणी भोजनाची पार्टी देणार होते त्यामुळे बाजारहाट करण्यासाठी ते स्वतः आलेले होते. ग्यानबाच्या रसदार कोवळ्या भाजीने त्यांची लुब्ध दृष्टी भारली जाते.ग्यानबा सार्‍या भाजीचे चार रुपये सांगतो पण बारा आणे देईन असे म्हणून मामलेदार शिपायांना ती सर्व भाजी घेऊन जायला सांगतात. त्यांना आडवायला गेलेला ग्यानबा तीन रुपये तरी द्या म्हणून काकुळतीला येतो. शिपाई त्याच्या दंडाला धरुन दूर करतात व सर्व भाजी गोळा करुन निघून जातात. मामलेदार ग्यानबाच्या आंगावर काही नाणी फेकून निघून जातो. त्यामुळे ग्यानबाची अवस्था दिग्मुढ होऊन जाते अशी ही कथा आहे.

काळाच्या ओघात मागील पिढीतील लेखकांच्या दुर्मीळ होत चाललेल्या पुस्तकांचे जतन व्हावे ही तळमळ आहे. त्यामुळे त्यावर प्रकाशझोत टाकून ओझरते दर्शन व्हावे हा प्रयत्न आहे. रसिक वाचकांनी त्याचा आस्वाद घेऊन मनमुराद दाद द्यावी, अभिप्राय नोंदवावेत अशी इच्छा आहे !

विलास कुडके.

— परीक्षण : विलास कुडके
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. छान ओळख, दुर्मिळ पुस्तकांची छान ओळख तुमच्यामुळे नेहमीच वाचायला मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

वैशाली कोंडाजी on “माध्यम पन्नाशी” : ९
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” : ९