Wednesday, June 19, 2024
Homeसाहित्यदुर्मीळ पुस्तके : ३८

दुर्मीळ पुस्तके : ३८

चोरलेल्या चवल्या

रामकृष्ण बुक डेपो, गिरगाव, मुंबई मार्फत हा स्टीफन लीकाॅकच्या खुसखुशीत विनोदी लेखनांचा सौ कमला फडके यांनी केलेला अनुवाद. ८० पृष्ठांच्या या पुस्तकाचे मूल्य १-८-० असे आहे. प्रकाशन वर्ष कोणते ते स्पष्ट होत नाही.

स्टीफन लीकाॅक (३०/१२/१८६९-२८/३/१९४४)हे कॅनेडियन सुप्रसिद्ध शिक्षक व व्याख्याते होते.

स्टीफन लीकाॅक

“एलिमेंटस् ऑफ पाॅलिटिकल सायन्स” तसेच व्यंग्यात्मक “लिटररी लॅप्सेस“, ” सनशाईन स्केचेस ऑफ ए लिटल टाऊन” आणि “आर्केडियन अॅडव्हेंचर्स आॅफ द इडल रिच“ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या काही इंग्रजी विनोदी लेखांचे सौ कमला फडके (सुप्रसिद्ध लेखक ना. सी. फडके यांच्या पत्नी) यांनी मराठीचा साज चढवून रुपांतरीत केलेले आहे. लेख मूळातून वाचनीय आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय पुढीलप्रमाणे आहे :

सौ कमला फडके

१. एक तर रुपया (My lost Dollar) – लेखकाचे स्नेही व्यंकटराव यांच्याकडून त्यांचा एक रुपया येणं असतो. वर्ष होत आलेले, अजून त्यांनी तो परत केलेला नसतो. लेखकाला भिती वाटू लागते की ते त्यांचा रुपया परत करणार नाही. त्यांची जेव्हा गाठ पडते तेव्हा रुपयाची गोष्ट त्यांच्या लक्षातच राहिलेली नसावी असे लेखकाला दिसून येते कारण ते अगदी जिव्हाळ्याने व मोकळेपणे लेखकाशी गप्पागोष्टी करत असतात. तो रुपया परत मिळेल अशी आशा लेखकाने सोडली आहे. व्यंकटरावांच्या मनातून त्या रुपयाची गोष्ट साफ गेलेली असते पण लेखकाच्या मनातून मात्र ती गोष्ट काही केल्या जात नाही. अर्थात यामुळे त्या त्यांच्या मैत्रीत उणेपणा येऊ देणार नसतात. व्यंकटरावांना ज्या योगे रुपयांचं स्मरण होईल असे विषय लेखक काढून बघतात. पण माझा रुपया गेला असंच त्यांना वाटू लागते. एक रुपयाची गोष्ट ती काय. आपण देखील कित्येक लोकांकडून एक रुपया मागून घेतला असेल आणि त्याची आठवण त्यांना राहिलेली नसेल. या लेखाद्वारे लेखक त्या लोकांना आवाहन करतो. कुणाच्या ऋणांत राहून मरण्याची त्यांची इच्छा नाही.

२. आईचा वाढदिवस (How we kept Mother’s day) – वर्षातून एकदा आईचा वाढदिवस साजरा का करु नये ? अशी कल्पना लेखकाला सुचते व ते तसा बेत आखतात. त्यांच्यासारख्या मोठ्या कुटुंबात असे काही निमित्त काढून मेजवानी झोडण्यासाठी सर्व टपून बसलेले असतात. आईचा वाढदिवस साजरा करायचा, त्या दिवशी तिला आनंदात ठेवण्याची सर्वांनी पराकाष्टा करावी असा ते ठराव करतात. त्या दिवशी बाबा रजा काढतात. दोघी बहिणी काॅलेज बुडवून घरी राहतात. दोघे भाऊ शाळेला जात नाही. आईचा वाढदिवस म्हणजे दुसरी दिवाळीच. घरभर तोरण पताका, घरात अंगणात रांगोळी. “जिच्या हाती पाळण्याची दोरी”, मातृदेवो भव “सारखी ध्येयवाक्ये भिंतीवर लावणे, उंची कपडे धारण करणे. अर्थात ही कामे हौसेने आईनेच केली. वाढदिवसाची आठवण म्हणून बाबांनी दोघा भावांना नव्या टोप्या व स्वतःसाठी पार्कर फाऊंटन पेन आणले. नाना बेत आखून आईला घेऊन गावाबाहेर जंगलात कवड्याच्या शिकारीला जाण्याचा बेत बाबा पक्का करतात. आई सैपाकघरात खपून शिरा, पोहे, समोसे, पाचसहा पदार्थ बनवते. काॅफी चहाचे थर्मास भरते. दारात मोटार येते पण पांचापेक्षा जादा सीट घ्यायला ड्रायव्हर तयार होत नाही. हो नाही करता करता शेवटी आईनेच घरी राहावे असे ठरते. सगळी मंडळी घरी परतते तेव्हा आई सगळ्यांना जेऊ घालते. चारचा चहा देते. तिच्या वाढदिवसाला तिला विश्रांती देण्याऐवजी त्या दिवशी तिच राबते असे या लेखात लेखकाने मांडले आहे.

३. टाटा, बिर्ला आणि मी (My financial career) – बँकेची इमारत पाहिली की लेखकाची धिटाई नाहीशी होत असते. तेथील पिंजरे, गजाआड बसलेले कारकून, पैशांची देवाण – घेवाण हे सर्व पाहताना लेखकाला धडकी भरते. बोबडी वळते आणि लेखक भ्रमिष्टासारखा वागू लागतो. पण लेखकाला जादा मिळालेली पगारवाढ बँकेत ठेवण्यासाठी बँकेत जाणे भाग पडते. खातं उघडायचे तर सरळ मॅनेजरची गाठ घ्यावी असे त्यांना वाटते. अकाउंटंट ला ते म्हणतात की त्यांना मॅनेजरची खाजगी भेट घ्यायची आहे. तो मॅनेजरला बोलावून आणतो. एकीकडे भेटायचे आहे असे लेखक बोलून जातो. मॅनेजर त्यांना खाजगी खोलीत घेऊन जातात. त्यांना वाटते की लेखक सीआयडी कडून आले.लेखक नाही म्हणतो. मग पोलीस खात्यातून आले असावे असा तर्क मॅनेजर करतात. मग लेखक खुलासा करतो की दोन्ही खात्यांशी त्यांचा संबंध नाही तर ते खाते उघडण्यासाठी आले आहे. सर्व रक्कम बँकेत ठेवायची आहे. त्यावरुन लेखक टाटा बिर्लासारखा लक्ष्मीपती असेल असे मॅनेजरला वाटते. प्रथम ५० व नंतर दरमहा ५ रुपये ठेवणार म्हटल्यावर मॅनेजर एकाला बोलावतो व लेखकाला घेऊन जायला सांगतात. लेखक पैसे भरतात. पाच एक रुपये खर्चाला काढावे म्हणून चेक मागतात. चुकून त्यावर ५ ऐवजी ५० चा आकडा टाकतात. सगळे पैसे काढणार का विचारल्यावर ते हो म्हणतात आणि पैसे काढून बँके बाहेर पडतात असा उपहासात्मक विनोदी लेख आहे.

४. श्रीयुत गोंदूबुवा चिकटे (The Hallucination of Mr. Butt) – परोपकारासाठी आपला जन्म आहे असे चिकटे यांना वाटते .त्यामुळे दुसर्‍याची इच्छा असो नसो मदतीचा हात पुढे केल्याशिवाय ते राहत नसत. परोपकाराचे त्यांना व्यसन जडलेले असते. गावात जेवढ्या सहायक समित्या निघाल्या त्यांच्या कार्यकारी मंडळात हे क्रीयाशील सदस्य होते. परोपकाराच्या उपदव्यापात ते सदा गढलेले असत. एक नवविवाहित जोडपे असते. त्यांचे घर शोधत ते जातात. रात्री उशीरापर्यंत त्यांच्याशी गप्पा मारत बसतात. दुसर्‍या दिवशी नाही नाही म्हटले तरी त्यांच्या खोलीतील सामान ते लावून देतात. त्यांच्या संसारात चिकटे इतके लक्ष घालतात की इंजिनियर शहांच्या डोक्यावर परिणाम होतो. ते बरे व्हावे म्हणून त्यांची पत्नी चिकटेंना टिकीट काढून देते व सांगते यात्रा करुन या. मित्रासाठी ते यात्रेला जातात. ते परत येतात. इकडे शहा बरे होतात पण चिकटे आले असे समजल्यावर धुम ठोकतात.

५. मुलाखा वेगळा भाडेकरु (My affair with landlord) – निवेदक त्याच्या घरमालकाचा दिवसाढवळ्या खून करतो. या खुनाबद्दल खुलासा करण्यासाठी तो पाच वर्षांपूर्वीचा इतिहास सांगतो. पाच वर्षांपूर्वी त्याला भाड्याने रहायला घर मिळते तो भाग्याचा क्षण असतो. त्या घर मिळण्याच्या आनंदात घरातला अंधार, घुशीने उकरलेल्या जमिनी, छपरातून गळणारे पाणी, पाणी भरायला सार्वजनिक नळावर जावे लागणे या अडचणी त्याला काहीच वाटत नाही. घरमालक त्याला नळ घेऊन देतात पण भाडे मात्र वाढवत नाही. दिवाळीत घरमालक भाडेकरुंच्या खोल्यांचे रंगकाम काढतो. पण भाडे वाढविण्यास नकार देतो. सरकारने भाडे वाढवायची परवानगी दिली. निवेदकाने भाडे वाढविण्याची विनंती केली. त्याची विनंती घरमालकाने धुडकावून लावली. भाडं वाढवणं त्यांचं कर्तव्य आहे असेही निवेदकाने सांगून पाहिले. पण घरमालकाने निवेदकाला उडवून लावले. निवेदकाची पक्की खात्री होते की या जमान्यात अशा माणसाला जिवंत राहू देता कामा नये. घरभाडं न वाढविणारा घरमालक निवेदकाला मेंदु बिघडलेला विचित्र माणूस वाटू लागतो. भाडं वाढविणार की नाही असे निवेदक घरमालकाच्या छातीवर पिस्तुल रोखून विचारतो. नाही वाढवणार म्हटल्यावर निवेदक घरमालकावर गोळ्या झाडतो.

६. खोटी सुभाषिते ! (Simple stories of success or how to succeed in life) – लाकुडफोड्या लक्षाधीश कसा झाला या धर्तीवर सामान्य स्थितीतून शिखरावर जाऊन बसलेल्या असामान्य व्यक्तींचा परिचय करुन देणारे लेख छापण्याची क्ष मासिकाला फार हौस असते. निवेदक असले लेख लक्षपूर्वक वाचत असतो. निवेदकाचा सुभाषितांवर बिलकुल विश्वास नसतो.लहानपणची कविता “एका कोळीयाने एकदा आपुले, जाळे बांधियले उंच जागी – “. व तिचे तात्पर्य “फिरुन यत्न करुन पहा”त्याला आठवते. मोठेपणी अपयशाचे दु:ख विसरण्यासाठी फिरुन यत्न करुन पहा ची गोळी आपण गिळतो. एकदा माणसाला अपयश आलं तर त्याने फिरुन यत्न करु नये असे निवेदकाचे मत आहे. उदाहरणादाखल निवेदकाने काही किस्से सांगितले आहेत. यशाच्या शिखरावर बसलेल्या पराक्रमी लोकांच्या नशिबी सुख अजिबात नसते. भरभराटीचं जिणं पत्करण्याऐवजी निवेदक सरळ दिवाळखोरी पत्करेन असे सांगतो.

७. संभावित उचलेगिरी (The Give and Take of Travels) – निवेदक विमा एजंटच्या नात्याने आगगाडीने गावोगावी भटकणारा प्रवासी आहे. पुष्कळदा प्रवासात त्यांच्या वस्तू गमावतात. बहुतेकदा दुसर्‍याच्या वस्तू त्यांच्या सामानात सामील होतात. ही अदलाबदल अगदी सहजासहजी घडते. एकदा निवेदकाने किर्लोस्करचा अंक गमावला होता व त्यांच्या खिशात एक चांदीची सिगारेट केस जमा झाली होती. उचलेगिरीच्या अनेक सवयी निवेदकाला जडल्या आहेत. हाॅटेलात मांडीवरचा नॅपकिन खिशात टाकणे, बसमधून उतरताना शेजारच्या उतारुची काठी किंवा फेल्ट हॅट घेऊन उतरणे इ. याला काय चोरी वा उचलेगिरी म्हणणार का असे निवेदक विचारतो. प्रवासातील ही निष्पाप उचलेगिरी कधी फायदेशीर ठरते तर कधी भोवते. निवेदक बॅग भरु लागला किंवा टेबलाचा ड्रावर, कपाटाचा खण आवरु लागला की त्याला त्याच्या नसलेल्या अनेक वस्तू त्यात आढळून येत. निवेदक त्याची कोणतीही वस्तू प्रवासात हरवली की रेल्वेच्या” लाॅस्ट अँड फाऊंड “कचेरीत अर्ज करतो. एकदा प्रवासात त्याचा निळा स्कार्फ हरवतो. अर्ज केल्यावर निवेदकाला चार स्कार्फ परत मिळतात. हाॅटेलवालेही ग्राहकांच्या राहिलेल्या वस्तू परत करु लागले आहे. प्रवासातील उचलेगिरीचे बरेवाईट अनुभव घेण्यासाठी प्रत्येकाने प्रवास केला पाहिजे असे निवेदक सांगतो.

८. परटिणी, येशिल का परतुन ? (The laundry Problem) – यांत्रिक युगाला सुरुवात झाल्यापासून मानवी जीवितातील जिव्हाळा आटला आहे. सौंदर्य नाहीसं झाले आहे. ज्या ज्या ठिकाणी माणसाचं मन रमावं अशा काव्यमय जागा होत्या त्यावर यांत्रिक युगाने आक्रमण केले आहे. स्वयंपाकघर, गृहिणी यांचं सौंदर्य यांत्रिकीकरणाने नाहीसे झाले आहे.निवेदकाला परटीण आठवते. धुण्याचे गाठोडे डोक्यावर घेऊन नदीवर जाणारी व संध्याकाळी सुकलेल्या कपड्याचे गाठोडे आणून देणारी. पण लाँड्री निघाल्यापासून परटीण ही व्यक्ती नाहीशी झाली आहे.

९. एक होता लांडगा – निवेदक कधी सिनेमाला जात नाही. त्याला सिनेमा पाहण्याची आवड नाही पण घरी पाहुणा आला की त्याला सिनेमाला धाडून देतात. तेवढीच पाहुण्याची ब्याद दोन तास टळते. घरी पाहुण्यांचे मनोरंजन करण्यापेक्षा त्याच्याबरोबर सिनेमाला जाऊन तिथे त्याला गुंतवायचे व शेजारी झोप काढायची असे निवेदकाला करणे परवडते. एकदा निवेदक पाहुण्याबरोबर सिनेमाला जातो. त्यात नायकाचं लांडग्यांत रुपांतर होते असे दृश्य असते. पाहुणा निवेदकाला अशाच एका माणसाची गोष्ट सांगतो जो सूर्यास्तानंतर लांडगा होत असतो. सत्य कल्पनेपेक्षा अद्भुत असते काय असा निवेदकाला प्रश्न पडतो.

१०. पोपटावरुन भांडण – सोडमिशे आणि निवेदक यांच्यात सख्य नसते. त्यांच्यात फारसं सूतही नव्हते. पण त्यांच्यात वितुष्ट निर्माण होते. सोडमिशांचा पोपट अचानक निवेदकाच्या घरी उडून येतो. तो परत नेऊन देणे काही अवघड नव्हते. पण सोडमिशांना पोपटाचे किती अगत्य आहे हे पाहण्यासाठी निवेदक दोन दिवस वाट पाहतो. पण त्यांनी तेवढी माणुसकी दाखवली नाही. दोन दिवस पोपटाने उच्छाद मांडला. निवेदक सोडमिशांना खरमरीत पत्र लिहीतात. दोघात पोपटावरुन पत्रापत्री होते व शेवटी निवेदक सोडमिशांना डाळिंबाचे तीन रुपये बारा आणे द्या म्हणून पत्र व पोपट नोकराकरवी सोडमिशांकडे पाठवतो.

आज हे पुस्तक अतिशय दुर्मीळ आहे..

विलास कुडके.

— परीक्षण : विलास कुडके.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments