Saturday, July 27, 2024
Homeसाहित्यदुर्मीळ पुस्तके : ३९

दुर्मीळ पुस्तके : ३९

पूर्वस्मृति

शाळेत असताना १९७०-७१ मध्ये बालभारतीमधील ‘मी श्रीमंत आहे’या एका धड्याने मनात घर केलेले होते. तो पाठ गो. रा. दोडके यांच्या पूर्वस्मृति या पुस्तकातून घेतला असल्याचा छोटा परिचय त्या पाठच्या सुरुवातीला होता. तेव्हापासून पूर्वस्मृति हे पुस्तक वाचावे अशी इच्छा होती. सर्वत्र या पुस्तकाचा शोध घेतला तेव्हा हे पुस्तक दादर येथील ग्रंथसंग्रहालयाच्या संदर्भ विभागात पहावयास मिळाले. गो रा दोडके यांच्या नावाने पुरस्कार दिले जातात पण त्यांचा परिचय मात्र कोठेही अगदी गुगलवर देखील मिळत नाही. राजा बढे यांच्या एका फोटोत त्यांचा फोटो मिळून येतो. वामन चोरघडे यांच्या जडणघडण या पुस्तकात गो. रा दोडके यांच्या काही आठवणी वाचायला मिळतात तेवढेच.

गो. रा दोडके

श्री राहुल जोश आणि श्रीमती साक्षी मोरे यांच्या अथक प्रयत्नातून पूर्वस्मृति हे गो रा दोडके यांचे विस्मृतीत चाललेले पुस्तक हाती आले. १४० पृष्ठांचे हे पुस्तक आॅक्टोबर, १९६२ मध्ये सुविचार प्रकाशन मंडळ, पुणे /नागपूर यांनी प्रकाशित केलेले आहे. यातील २० कथांचा आपण क्रमशः थोडक्यात परिचय करुन घेऊया.

१. पूर्वस्मृति -सगळी आवराआवर करुन इंदूला स्वेटर विणायला निवांत वेळ मिळाला होता. हिवाळा यायचा आत पूर्ण करण्याची तिला घाई होती. ती विणत असताना तिच्या कानावर वसुधेची हाक येते. ती आईचा निरोप इंदूला सांगायला आलेली असते. संध्याकाळी तिची आई व इंदू भांडी आणायला जाणार असतात. वसुधा शाळेला गेली नाही हे इंदूला समजते. वसुधेचा आवाज घोगरा होतो. तिच्या डोळ्यातून आसवं ओघळून येतात. ती शाळेत का गेली नाही म्हणून इंदू तिला विचारते. तिला परीक्षेची फी देता येणार नव्हती. भाऊंची नोकरी गेली होती. दादा तिला सांगतात की शाळेची, परीक्षेची फी राहू दे, पुढच्या वर्षी परीक्षा दे. हुंदके आवरत ती निघून जाते. ती निघून गेल्यावर वसुधेचे दु:ख तिच्या मनात थैमान घालायला लागते. ती उठून आतल्या खोलीत जाते. ट्रंकेच्या तळातून एक वस्तू बाहेर काढते. तो एक जुनाट चष्मा होता. तिला तिचे विद्यालयीन जीवन आठवते. शाळेत वैद्यकीय तपासणी असते. तिला अंधूक दिसत असते. पण गुरुजींना सांगायची तिला भीति वाटत असते कारण ते तिला चष्मा घेऊन देतील म्हणून. तिने तिच्या डोळ्यांचा अधूपणा लपवून ठेवलेला होता. डॉक्टरीणबाईंचा शेरा गुरुजी वाचतील याची तिला भीति वाटते.तिची घरची गरीबी होती. तिच्या माहेरचं नाव होतं सरोज जोशी. गुरुजी तिला मधल्या सुट्टीत भेटायला सांगतात. ते तिला डोळे तपासून चष्मा करायला सांगतात. पैशाची काळजी करु नको म्हणून सांगतात. पण तिला पैसे परत कसे करीन याची चिंता होती. गुरुजी तिला सांगतात की आज तुला पैसे देता येणार नाही, नको देऊस. पण कुणी आपल्यासमोर हात पसरला, एखाद्या अभाग्याचे दु:ख कानावर आलं.. अशावेळी आपल्यावर येऊन गेलेल्या प्रसंगाची जाणीव झाली व त्या प्रसंगी आपण मदत केली तर कोणी कोणाचा ऋणी नाही. तो तिच्या आयुष्यातील पहिला चष्मा होता. तो प्रसंग आठवल्यावर ती वसुधेला तिची परीक्षेची फी भरण्यास मदत करण्याचे ठरवते व तो विषय पतिजवळ काढते अशी ही जीवनमूल्य रुजवणारी हृदयस्पर्शी सुंदर कथा आहे.

२. राधामाई – चिमुकल्या राजासाठी राधामाई राबते काबाडकष्ट उपसते.ती दुसऱ्यांच्या इथे स्वयंपाकपाणी करायची आणि दोन पोटं जगायची.मुलगा राजा मिळवता झाला, त्याने पहिला पगार राधामाईच्या हातावर ठेवलेला होता.आजोबांची व वडीलांची स्मृती म्हणून आता फक्त घर आणि घरातले घड्याळ उरलेले होते. पैसे हाती आल्यावर आईने दुसर्‍यांच्या इथली कामे सोडून द्यावी असे राजाला वाटायचे. तिने आता सुखात काळ कंठावा असे त्याला वाटायच. मुलगी गंगू बाळंतपणाला घरी आलेली असते. आपण काम सोडलं तर तिचा जीव शांत राह्यचा नाही असे राधामाईला वाटते अशी ही कथा आहे.

३. परका – यादवाची खोली म्हणजे सुंदर वस्तुंचे संग्रहालय होते. पण त्यावर आता दारिद्र्याची अवकळा दिसू लागली होती. त्याला पुस्तकाचाही हव्यास होता. पोटापाण्याचा विचार त्याला कोरुन काढत होता. पैशाकरिता काय करावे हे त्याला सुचत नव्हते. त्याने लेख पाठवून पाहिले पण त्यांना वाटण्याच्या अक्षता मिळाल्या होत्या. तशा अवस्थेत त्याच्या कानावर एक बातमी येते. त्याला रस्त्यात त्याचा मित्र जगू भेटतो. त्याच्याकडून आई नागपूरला आजारी असल्याचे त्याला कळते. त्याला कोणीच काही कळवलेले नव्हते. सगळ्यांनी त्याला परका मानलेले होते. तो आईच्या दर्शनाला निघतो. शेल्फवरची शंभर रुपयांची पुस्तके विकून तो तिकीटापुरते पंचवीस रुपये उभे करतो. नागपूरला जाऊन आईची भेट घेतो. सुश्रुषा करतो. आई त्याला फडताळात एका तांब्यात पैसे असल्याचे सांगते. ते घेशील का म्हणून विचारते. तिची हृदयक्रिया बंद पडते. आईने सांगितल्याप्रमाणे तो तांब्यात बघतो तर त्यात दहा रुपयांची एक नोट असते. ती घेतानाही बहिण त्याला पाहते व टोकते. शेवटी तो आईचा फोटो घेऊन निघतो अशी ही हृदयस्पर्शी कथा आहे.

४. खायचा डबा – सीताराम चपरासी नोटिसांची वही घेऊन वर्गात येतो. उद्यापासून मुलांनी मधल्या सुट्टीत खाण्याकरिता डबे घरुन आणावे अशी ती नोटिस होती. यशवंत एकटाच तंद्रीत निघतो. त्याला आई डबा देत नसत. तो डबा हरवेल अशी तिला भीति वाटायची. दुसर्‍या दिवशी आई त्याला डबा देते. डब्यात काय आणले ते मुले विचारतात. पण त्याने डबा भरताना पाहिलेले नव्हते. सगळे त्याला आप्पलपोट्या असे चिडवतात. मधली सुट्टी होते. डब्यात पोळ्या, तूप, बटाट्याची भाजी, गुळांबा होता. त्याने बाकीच्यांनी डब्याला काय काय आणले ते पाहिले. त्याला डब्यातून खायचा धीर होत नाही. तो डबा बंद करतो व मुलांमधून उठून बाजूला जातो. नळावर जाऊन हात धुतो व पाणी पितो. शाळा सुटल्यावर त्याला प्रश्न पडतो की डब्याबद्दल आईला काय सांगावे? एखाद्या भिकार्‍याला डब्यातले अन्न दिले तर? तो भिकारी शोधू लागतो. पण त्याला भिकारी काही दिसत नाही. डबा तसाच परत आणल्याबद्दल आई विचारते. तो सांगतो त्याच्या बाजूला एक मुलगा जळकी मळकी पोळी खात होता. त्याला तूप नाही की भाजी. त्याच्या समोर डबा खायचा धीर झाला नाही. त्या लहानग्याचा आई मुका घेते. अशी ही सुंदर कथा आहे.

५. भरुन आलेले डोळे – निवेदकाच्या वहिनीला पहिली मुलगी प्रियंवदा झाली ती अडीच वर्षांची होऊन वारते.दुसर्‍यावेळी मुलगा अशोक होतो तोहि अडीच वर्षांचा होऊन वारतो. आणि आता शरयूला अडीच वर्षे होतात. शरयूही जाते. आनंद घरात रांगू लागतो. त्याचे पहिले चालणे पाहून वहिनी उल्हासित होते. निवेदकाला मात्र अशा वेळी वहिनीचे भरुन आलेले डोळे आठवत असतात अशी ही हृदयस्पर्शी कथा आहे.

६. “रांडल्येकानं बजीस ठेवलं.”-दु:खाची जाणीव देणारी व्यक्ति स्वतःच दु:खविषय असली आणि त्या दु:खाचे निरासाचे साधन नसेल तर अशा अवस्थेची ही कथा. दुपारी निवेदक रस्त्याने जात असता तलावाच्या काठी त्याला माणसांचा एक जमाव दिसतो. कोलाहलात त्याला एका बाईचे रडणे ऐकू येते. इतक्यात त्याचा हात धरुन ती बाई त्याला भिंतीजवळ घेऊन जाते व त्यावरील मजकूर वाचायला सांगते. भिंतीवर काहीच लिहिलेले नसते. फक्त उभ्याआडव्या रेघा ओढलेल्या असतात. तोंडाने ती “रांडल्येकानं – बजीस – ठेवली” असे ती पुटपुटते. ती वेडी असते.

७. शमन – ही धुणंभांडी करणार्‍या रखमाची कथा. सकाळी निघताना तिने कुणाच तोंड पाहिलं होतं कुणास ठाऊक. दोन घरी तर तिचा अगदी अंत पाहिला होता. पहिल्या घरी भांड्यांचा मोठा घाणा होता. दुसऱ्या घरी गव्हाचं अर्ध पोतं दळून आणायचं होतं. तिसऱ्या घरी हलकं काम होतं. दोन घरचा अनुभव ती तिथे ऐकवते. यथेच्छ निंदा करुन मन हलके करुन घेते. न्हाणीघरातील धुणं उचलून बादलीत भरुन नळाखाली ठेवून तिथे आजीबाईशी बोलत उभी राहते. पण पाणी जाते. इतक्यात तिच्या कानावर घंटेचा आवाज येतो. रामा कलाराचं घर पेटलेलं असते. त्यात एक पोरगी जळून गेलेली असते. कसं कोणाचं दैव असते म्हणून ती शहारते. तोपर्यंत बादलीत पाणी भरले जाते व ती उत्साहाने कामाला लागते. तिला वाटते की आगीच्या बंबानेच नळाला पाणी आणलं असेल !

८. ४२ चा कैदी – दयाराम व गणू यांना बेचाळीसच्या विप्लवकांडात शिक्षा होते. एका मुलींच्या शाळेच्या कोपर्‍यात ते दोघे उभे होते. त्याचवेळी तिथून एक विद्यार्थ्यांची मिरवणूक जात असते. ती मुलं बेफाम झालेली होती. रस्त्याने विदेशी पोषाख केलेली व्यक्ति पाहिली की मुलं त्याची दुर्दशा करत. गणू व दया अशा घोळक्यातून जाताना त्या मुलांबरोबर पकडले जातात. त्यांना शिक्षा होते व ते तुरुंगात जातात. तुरुंगातून सुटका होऊन ते नागपूरला जाऊन आपापल्या गावी जाणार असतात. गणूचं मन मात्र तुरुंगातल्या जीवनात गुंतलेले असते. तुरुंगात दादा व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला बरोबरीने वागवलेले असते. त्याचं आधीचं आयुष्य चोरटेपणात मारामार्‍या करण्यात गेलेलं असतं पण तुरुंगात दादांसारखा देवमाणूस भेटतो. तुरुंगातून सुटून आलेल्या गणूचा लोक सत्कार करतात. त्याचं मन मात्र त्या सत्कारानं अस्वस्थ होते.

९. भूर्दंड – निवेदक मैदानांतून जाणारी पायवाट सोडून बाजूने हिरवाळीवरुन सावरुन चालत होता. तोच त्याला मनीबॅग दिसते. तीत ७५च्या नोटा असतात. बाकी काही नसते. तो तिला खिशात ठेवून निघतो. पण ती जणू त्याला जड वाटू लागते. त्या पैशाचे काय करावे याची तो मनोराज्य पाहतो. पण ज्याची मनिबॅग आहे त्याची ती महिन्याची कमाई असेल असे त्याला वाटते. त्याची काय अवस्था झाली असेल याची तो कल्पना करतो. तो पैशासकट मनिबॅग एका वृत्तपत्राच्या संपादकाच्या हवाली करतो. त्या बॅगचा मालक सापडल्याचा संपादकाचा फोन येतो. मालक म्हणतो बॅगेत शंभर रुपये होते. कदाचित निवेदकाने खर्चायला २५ रुपये काढून घेतले असतील असे तो सांगतो. निवेदक खिशातून २५ रुपये काढून देतो. त्याला विनाकारण तो भूर्दंड पडतो.

१०. आसवांची भाऊबीज -नंदिनी दिवाळीकरिता माहेरी आलेली असते. एक आनंद वगळला तर सगळे भाऊ सरकारी नोकरीत होते. आनंदची स्थिती पाहून ती दु:खी होते. दुसरे आनंदला टोचून बोलत त्यामुळे तिचं हृदय त्याच्याबाबतीत अधिकच स्निग्ध, मृदू व कोमल होऊन जाते. भाऊबीजेला सगळ्यांचे औक्षण होऊन जाते पण आनंद आलेला नसतो. जेवणं उरकतात. गप्पा गोष्टी सुरु होतात. आनंद देशभक्ति करायला काय निघाला.. मास्तर काय झाला.. शेवटी नोकरी गेली आणि बेकार झाला असा विषय निघाला. तो का आला नसावा याची चर्चा होते. ओवळणी घालावी लागेल म्हणून त्याला लाज वाटत असेल. तिला आनंदच्या खोलीत दिवा उजळलेला दिसतो. ती उठून हळूच तिकडे जाते व त्याला जेवून घे म्हणून सांगते व नंतर ओवाळणार असल्याचे सांगते पण तो दोन्ही गोष्टींना नकार देतो व बाहेर पडतो. ती खंत करत राहते. शेवटी तो झोपला असेल अशी खात्री झाल्यावर ती त्याच्या खोलीत ओवळण्याचे तबक घेऊन जाते. तिथला दिवा लावते. नाही नाही म्हणत असताना भरल्या डोळ्यांनी ओवाळते अशी ही हृदयस्पर्शी कथा आहे.

११. समाधान – माईंचं जीवन सुखाचं नव्हतं. नवरा व्यसनाधीन होता. त्याचे खिसे चाचपून ती काही पैसे काढून घ्यायची व घर चालवायची. त्यासाठी ती नवर्‍याच्या शिव्या व मार खायची. परिचितांना त्यांच्याविषयी अनुकंपा वाटायची. तिने मुलं मार्गाला लावली. तिचा काळ बदलला. नवरा देवाघरी जातो. एका सकाळी त्या चहा घेत असतात. पाच वर्षांचा नातू चहा मागतो. पण मुलांनी चहा घेऊ नये. दूध घ्यावे असे सांगतो. नातू चहाचा हट्ट धरुन बसतो. आईचा मार खातो. आपल्यामुळे नातवाला मार बसला असे माईंना वाटते. त्याची त्यांना खंत वाटत राहते. नंतर मात्र मायलेकरं निजलेली पाहून समाधानाने माईंना झोप लागते अशी ही कथा.

१२. संशय -आनंदीचा नवरा मरण पावतो. आनंदी वडिलांच्या घरी राहायला जाते. कालांतराने तिचा बापहि मरण पावतो. राधामाईंच्या सांगण्यावरुन बापाचं घर आनंदी भाड्याने देते व आपल्या घरी पुन्हा संसार करु लागते. एकच पाश उरला होता. सखारामचा. पाच वर्षांचा होता तो. एवढ्याशा वयात त्याला विडीचं व्यसन जडले अशी तिला शंका होती. तिला त्याच्या ओठांचा वास येतो. मी बिडी ओढली नाही अशी शपथ घ्यायला लावते. देवाजवळ तशी कबुली द्यायला लावते. तसे सखारामने केल्यावर ती त्याचा मुका घेते अशी ही कथा आहे.

१३. पिसाळलेले कुत्रे – ही एका “टिप्या” नावाच्या कुत्र्याची कथा. गजाभाऊ त्याच्यासाठी फडताळातून बिस्किटांचा डबा काढतात. चहा करुन त्याला मोठ्या तोंडाच्या बंपरमध्ये देतात. बिस्किटे आपल्या हाताने खाऊ घालतात. चहा संपल्यावर गजाभाऊ कामाला लागतात. टिप्या घरासमोर उन्हात पायर्‍यांवर बसतो. तिथून मुलांचे टोळके जाते. एका मुलाला टिप्याची खोडी कराविशी वाटते.तो टिप्याला एक दगड फेकून मारतो. तो अंगावर आला नाही हे पाहून त्याच्यावर दगडांचा वर्षाव होतो. एक मुलगा त्याला अणकुचीदार दगड मारतो. टिप्या विव्हळतो, किंचाळतो. उठतो आणि धावणार्‍या मुलांच्या मागे लागतो. एकाची पोटरी दातांमध्ये धरतो. गजाभाऊ बाहेर येतात. मुलाला चावा घेतला हे पाहून ते टिप्यावर ओरडतात. टिप्या मुलाचा पाय सोडतो. मुलगा पळून जातो. तो बड्या बापाचा बेटा असतो. टिप्याची अवस्था पाहून ते त्याला आत घेऊन जातात व सुश्रुषा करतात. पण तो पिसाळलेला आहे अशी तक्रार होते व त्यात तो मरण पावतो. गजाभाऊ दुसरं मरतुकडं कुत्रं आणतो. टिप्याने ज्या मुलाला चावा घेतला त्याचा बाप लष्करी अधिकारी गजधर गजाभाऊंच्या घराजवळून जाऊ लागला की गजाभाऊ त्या मरतुकड्या कुत्र्याला “गजधर गजधर आकु” म्हणून बोलवायचा. ते सारखे ऐकून गजधर संतापतो आणि त्या मरतुकड्या कुत्र्यावर बंदूक चालवतो. ते बिचारे नाहक मरते याचे गजाभाऊला वाईट वाटते अशी ही कथा आहे.

१४. पोराचे मन -लीला अशोकची आई.ती नाटकात काम करत असते. सगळे अशोकला वाटेल तसे बोलत असतात. लोकांसमोर जायला यायला तो भितो. त्याला जंगली म्हणतात. पोराचं मन त्यामुळे दुखतं. तुझ्या आईचे तुझ्यावर प्रेम नाही, ते शरद व मीरावर आहे असे बोलत असतात. नाटकांत काम करायला जाण्याच्या आधी लीला मुलांना प्रभाकरच्या स्वाधीन करीत. प्रभाकरही नाटकात भूमिका करत. विसूदादा अशोकला काळा, अस्वल असे म्हणतो. त्यामुळे अशोक रडवेला होतो. खरच का ग तुझं प्रेम नाही माझ्यावर असे अशोक आईला विचारतो. तिचे हृदय दाटून येते. ती त्याला जवळ घेऊन निजते अशी मायलेकांची ही कथा आहे.

१५. “टांगेवाला मेरा बाप है” – कोर्टातील कामे संपवून निवेदक बाहेर पडतो. अनेक टांगेवाले त्याच्या भोवती गोळा होतात. टांग्यातून जायचे नाही असे त्याने आधीच ठरवलेले होते. तो एकटा गिर्‍हाईक व अनेक टांगेवाले. पैसे कमी द्यावे लागतील म्हणून तो सहज एकाला धंतोलीचे काय घेशील म्हणून विचारतो. ते सव्वा रुपया द्या म्हणून सांगतात. टांगाच नको म्हणून तो जाऊ लागतो इतक्यात एक टांगेवाला त्यांना टांग्यात बसण्याचा आग्रह करतो. जे द्याल ते खुषीने घेईन म्हणून सांगतो. निवेदक त्याला सहा आणे देईन सांगतो. तो तयार होतो याचे निवेदकाला नवल वाटते. त्यांच्यात संवाद सुरु होतो. जिथे पैसे मिळवायचे तिथे खूप मिळवून घेतो पण प्रत्येक वेळेस माणसाला अडवावसं वाटत नाही असे टांगेवाला सांगतो. त्याच्या मुलाचं लग्न होऊन चार वर्षे झालेली असतात. तो वकील झाला होता पण गन कॅरेज फॅक्टरीत काम करत असतो. पोरगा कसा भला आहे ते तो सांगतो. तो अब्बाजानला टांगा ठेवून द्यायला व आराम करायला सांगतो. पण टांगेवाला ऐकत नाही. त्याचा टांगा रस्त्याने जात असला व मुलगा समोरुन येत असेल तर तो दोस्तांना सांगतो “ये टांगेवाला मेरा बाप है”. हे सांगताना त्याचा उर अभिमानाने भरुन येतो.” मै हू तो गरीब, मगर दौलतमंदोंसे भी दौलतमंद हूं” असे तो निवेदकाला सांगतो.

१६. मिरवणूक – निवेदकाच्या दारावरुन स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांची मिरवणूक जात असते. नकळत निवेदक त्यात सामील होतो.पोलीस ती मिरवणूक अडवतात. ज्यांना मिरवणूक सोडून जायचे असेल त्यांनी जावे असे आवाहन करण्यात आले पण निवेदक मिरवणूक सोडून जात नाही. मिरवणूकीवर लाठीहल्ला होतो. गोळीबार होतो. त्यातील एक गोळी निवेदकाला लागते. आपल्यामुळे एकजण वाचला असे म्हणत तो प्राण सोडतो अशी ही कथा आहे.

१७. टोपी – रघुची टोपी फाटली होती. तिची शिवण उसवली होती. ती काळवंडली होती. वर्गात गुरुजी त्याला दुसरी टोपी घालून आला नाही तर वर्गात घेणार नाही असे सांगतात. वर्गातील मुलं त्याची शेंडी ओढतात. त्यांना करमणुकीसाठी विषय मिळते. आता नवीन टोपीअभावी शाळेत जाता येणार नाही या विचारात तो घरी परततो. चंद्रा सुखात्मे ही वर्गातील मुलगी त्याच्या पाठोपाठ येऊन त्याला नवीन टोपी देऊन शाळेत यायला सांगते. दुसर्‍या दिवशी सकाळी गुरुजी त्याच्या घरी येतात त्याला नवीन टोपी देऊन शाळेत यायला सांगतात. रघुला प्रश्न पडतो की दोन टोप्यांपैकी कोणती टोपी घालून शाळेत जाऊ?

१८. सांगाडा – रती श्रीमंत बापाचा मुलगा होता. अध्यापक त्या दिवशी मानवी देहाची रचना शिकवणार होते. त्यामुळे वर्ग भरुन गेलेला होता. फळ्यालगत सांगाडा टांगून ठेवलेला होता. अध्यापक येईपर्यंत मुलं त्यावर चर्चा करत होती. शाळा सुटल्यावर रती घरी येतो. रात्री त्याला झोपेत स्वप्न पडते. तो सांगाडा जणू त्याचाच असतो. दुसर्‍या दिवशी तो गुरुजींकडून तो सांगाडा विकत घेतो व पुरुन टाकतो.

१९. बाबूजी – व्याख्यान देत असताना निवेदकाला अटक होते. त्याला शिक्षा होते व त्याची तुरुंगात रवानगी होते. तुरुंगात मनासारखं वागता येणार नाही या जाणीवेने त्याला दु:ख होते. तुरुंगातील दुष्टपणा त्याने ऐकलेला असतो. एक दोन दिवस तो तुरुंगात काढतो. त्याची वाॅर्डरशी ओळख होते. नंतर त्याला तुरुंगात घरच्यासारखे वाटू लागते. वार्डर बाबूजी त्याला तेव्हा निष्ठुर वाटले पण नंतर तेच निवेदकाजवळ मन मोकळे करु लागले. त्यांची गट्टी जमते. एके दिवशी निवेदक तापाने फणफणला होता तेव्हा बाबूजी त्याची काळजी घेतात. त्याच्यासाठी संत्र्याच्या फोडी, बिस्किटे, आमरस घेऊन येतात. बाबूजींनी बरीच शिक्षा भोगली होती. चांगल्या वागणुकीची बिदागी म्हणून त्यांना वार्डर करण्यात आले होते व शिक्षेतही सूट मिळाली होती. एकदा बाबूजींना गावाची आठवण होते. गावातील सावकाराच्या खूनाच्या आरोपाखाली बाबूजी अटक होऊन त्यांच्या विरुद्ध खटला होऊन ते या तुरुंगात आलेला असतात, अशी ही कथा आहे.

२०. पानवाली -नारायण त्याची बायको जानकीचा विचार घेऊन एक पानविड्याचे दुकान काढतो. काही दिवस जातात पण त्याच्या धंद्याला बरकत मात्र नव्हती. इतर दुकानांतून चांगली विक्री होते आणि आपलीच का होत नाही याचा तो विचार करतो. तर त्याच्या असे लक्षात येते की इतर दुकानात स्त्रिया विक्रीचा व्यापार करतात. म्हणून तो जानकीला दुकान चालवायला सांगतो. तिला ती कल्पना पटत नाही पण नवर्‍याने मार देण्याची धमकी दिल्याने ती दुकानावर जाऊ लागली. त्यामुळे विक्री वाढली. नारायणला समाधान वाटू लागले पण जानकीची दुकानावर जाऊन जाऊन भीड चेपली जाते. तिच्या वेषभूषेत फरक पडतो. एक गिर्‍हाईक राजाराम तिचे मन आपल्याकडे ओढून घेतो. एके काळी सोज्वळ असलेली जानकी शीलभ्रष्ट झाली. नारायणच्या कानावर ती कुणकुण जाते. तो संतापतो अशी ही कथा आहे.हे अतिशय दुर्मीळ पुस्तक आहे.

विलास कुडके.

— परीक्षण : विलास कुडके.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. अतिशय दुर्मिळ कथासंग्रह, त्यातील प्रत्येक कथेचा उत्तम सार लिहून नवीन पुस्तकाची ओळख करून दिलीस कुडके सर .. मनापासून धन्यवाद , अतिशय सुंदर व मूल्याधिष्ठित कथा.
    लिहीत रहा आणि share करत रहा असेच कायम. धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८