अशोक डुंबरे
दूरदर्शनची पासष्टी या सदरात आपण “कृषी विकासात दूरदर्शनचे योगदान” हा दूरदर्शनचे निवृत्त उप महासंचालक श्री शिवाजी फुलसुंदर यांनी लिहीलेला अभ्यासपूर्ण लेख वाचला. अनेक वाचकांनी हा लेख आवडल्याचे कळवल. आज आपण वाचू या दूरदर्शनच्या “आमची माती आमची माणसं” या कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून संबंधीत असलेले, दूरदर्शन चे निवृत्त संचालक श्री अशोक डुंबरे यांची जीवन कहानी आणि त्या सोबतच त्यांचे कृषि विभाग, आकाशवाणी आणि दुरदर्शन मधील अनुभव..
— संपादक
श्री अशोक डुंबरे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे ३० मार्च १९३९ रोजी झाला. त्यांचे वडील तुकाराम पाडुरंग डुंबरे हे शेतकरी घरात जन्मलेले होते. घरी गरीबी होती. त्यामुळे त्यांच्या वडिलांना त्या काळातीत व्हरनॅक्युलर (सातवी समकक्ष) पेक्षा जास्त शिकता आले नाही. पण त्यांनी जेव्हढे शिक्षण घेतले होते, त्याच्या आधारावर त्यांना शिक्षकाची नोकरी मिळाली. हि नोकरी करत त्यांनी फस्ट, सेंकड, थर्ड इयर पर्यंत शिक्षण घेतले. त्यामुळे ते असिस्टंट डेप्यूटी एजुकेशन इन्सपेक्टर पदापर्यंत पोहचले. तसेच ते वारकरी पंथातले असल्यामुळे त्यांनी मुलांवर चांगले संस्कार केले आणि त्यांना चांगले शिक्षण दिले.
अशोक डुंबरे यांचे प्राथमिक शिक्षण जुन्नर, मंचर, नारायणगाव येथे झाले. त्यांचे वडील १९५२ साली सेवानिवृत झाल्यावर ओतूर येथे स्थायिक झाले. त्यामुळे अशोक डुंबरे यांचे माध्यमिक शिक्षण ओतूर येथील चैतन्य विद्यालयात झाले. ओतूरचे वैशिष्ट म्हणजे संत तुकाराम महाराजांचे गुरु श्री बाबाजी चैतन्य यांची इथे समाधि आहे. तुकाराम महाराजांना स्वप्नात येऊन बाबाजी चैतन्य यांनी, “राम कृष्ण हरी” हा मंत्र दिला. हा उल्लेख तुकाराम महाराजांच्या अभंगातही आढळून येतो. अशा पुण्यनगरीत अशोक डुंबरे जुने मॅट्रिक झाले. पुढे त्यांनी पुण्यातील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला.
१९६४ साली ते कृषी पदवीधर झाले. कृषी पदवी घेतल्यानंतर श्री अशोक डुंबरे यांची नेमणूक नगर येथिल सॉईल कॉन्झरवेशन डिपाटमेंट मध्ये कृषी पर्यवेक्षक म्हणून झाली. तिथे एक वर्ष काम केल्यावर १९६५ साली त्यांची बदली पुणे येथील सेंट्रल बिल्डिंग मध्ये असलेल्या कृषी माहिती विभागात झाली. शेतकऱ्यांना आधुनिक शेती, तंत्रज्ञान, बि बियाणे, खते अशी माहिती देण्यासाठी कृषी माहिती विभाग कार्यरत होता. या विभागाचा छोटासा प्रिंटिंग प्रेस होता. त्याचे सुपरवाइजर म्हणून अशोक डुंबरे यांनी एक वर्ष काम पाहिले आणि सुदैवाने त्यांना पुणे आकाशवाणी केंद्रात प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आणि त्यांच्या जीवनाचा नवा अध्याय सुरू झाला.
श्री डुंबरे पुणे आकाशवाणी केंद्रात पाच वर्षे फार्म रेडिओ रिपोर्टर होते. या आकाशवाणी केंद्रात १९६६ च्या जुन महिन्यात बरोबर नक्षत्राच्या मुहूर्तावर ग्रामिण विभागाने शेतकऱ्यांसाठी “माझं घर, माझं शेत” हा नवीन कार्यक्रम सुरू केला. हा कार्यक्रम आठवड्यातून तीन दिवस प्रसारीत होत असे. त्यावेळी शेतकऱ्यांसाठी “नभोवाणी आणि शेतकरी मंडळ” म्हणजेच रेडियो रुरल फोरम असा कार्यक्रम सुरू होता. प्रसिद्ध ग्रामीण लेखक व्यंकटेश माडगूळकर या विभागाचे निर्माते होते.
त्यांच्यासोबत जयराम कुलकर्णी आणि श्रीकृष्ण सपाटे हे कलाकार होते. या विभागाचे जास्तीत जास्त कार्यक्रम फील्ड बेस होते. त्यामुळे डुंबरे यांना पश्चिम महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यामध्ये फिरती करण्याचा योग आला. त्या दरम्यान युनेस्को कडून एका स्किममध्ये या विभागाला एक जीप गाडी मिळाली. त्यामुळे डुंबरे स्वत: एकटेच टेपरेकोडर घेऊन मंगळवार ते शुक्रवार असे दौरे करायचे. या दौऱ्यांमध्ये ते प्रगतीशिल शेतकरी, चांगल्या काम करणाऱ्या कार्यकारी सोसायट्या, ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेच्या कार्यावर आधारित कार्यक्रम करीत असत. हे सर्व कार्यक्रम मुलाखतींवर आधारित होते. पण प्रतिनियुक्तीचा काळ संपल्याने डुंबरे यांना कृषी खात्यात परत जावे लागले. तिथे त्यांनी वर्षभर सांख्यिकी विभागात काम केले.
सांख्यिकी विभागात काम करत असतानाच डुंबरे यांना तीन संधी चालून आल्या.
या तीन संधी म्हणजे… १) गोव्यातील झुआरी केमिकल ॲण्ड फर्टीलाइजर कंपनी. २) बॅक ऑफ महाराष्ट्र मध्ये कृषी अधिकारी आणि तिसरी संधी म्हणजे दूरदर्शन मध्ये कार्यक्रम निर्माता म्हणून. या तीन पैकी दूरदर्शनचे क्षेत्र नविन असल्याने त्यांनी दूरदर्शन साठी अर्ज केला.
त्यानुसार त्यांना मुलाखतीसाठी बोलावणे आले. या पदाच्या निवडीसाठी मुंबई दुरदर्शनचे पहिले संचालक पी.व्ही कृष्णमूर्ती, प्रसिद्ध लेखक, दूरदर्शनचे पहिले निर्माते पु.ल.देशपांडे, चित्रपट लेखक के अब्बास आणि फिल्म्स डिव्हिजनचे संचालक अशी चार जणांची निवड समिती होती. गुणवत्ता आणि रेडीओतील अनुभवामुळे डुंबरे यांची निवड झाली.
या निवडीनंतर नवी दिल्लीतील मंडी हाऊस येथे १० जुलै १९७२ पासून सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी डुंबरे यांना जावें लागले. त्यांच्या सोबत कृषी माहिती विभागातील फोटोग्राफर, ज्यांची दुरदर्शन मध्ये मुव्ही कॅमेरामॅन म्हणून निवड झाली होती ते होते. दोघांनी सहा महिने दूरदर्शन कार्यक्रम निर्मिती चे प्रशिक्षण घेतले आणि ते १ जानेवारी १९७३ रोजी मुंबई दूरदर्शन केंद्रात निर्माता म्हणून रुजू झाले.
मुंबई दूरदर्शन केंद्रातील ग्रामीण कार्यक्रमाला सुरुवातीस “गाव रहाटी” असं नाव होतं. २ ऑक्टोंबर १९७३ रोजी तेव्हाचे केंद्रीय मंत्री स्वर्गिय यशवंतराव चव्हाण यांच्याहस्ते पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या कार्यक्रमात पुण्याच्या सिंहगड प्रक्षेपण केंद्राचे उद्घाटन झाले. संचालकांच्या सांगण्यावरून अशोक डुंबरे यांना बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या कार्यक्रमास उपस्थित रहावे लागले. त्यामुळे त्याच दिवशी संध्याकाळी साडेसात वाजता मुंबई दूरदर्शन केंद्रावरून शेतकऱ्यांसाठी पहिला कार्यक्रम प्रसारित झाला तो कार्यक्रम तेव्हाचे कार्यक्रम अधिकारी श्री केशव केळकर यांनी सादर केला.
सुरुवातीला ग्रामीण कार्यक्रम कृष्ण धवल असा आठवड्यातून दोन दिवस म्हणजे मंगळवारी आणि शुक्रवारी सात ते साडेसात या वेळेत प्रसारित होत असे. मात्र कालांतराने तो सोमवार ते शुक्रवार असा आठवड्यातून पाच दिवस प्रसारित होऊ लागला.
पाच दिवस प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमाचं नाव “आमची माती, आमची माणसं” असं ठेवण्यात आलं. हे नाव थोर साहित्यिक, गीतकार व्यंकटेश माडगूळकर यांनी सुचवलं होतं. सुरुवातीला हा कार्यक्रम फील्ड बेस आणि फिल्म बेस असा होत असे. फील्ड बेस कार्यक्रमाला जाताना सोबत कॅमेरा मॅन, साऊंड रेकॉर्डस्, लाइटिंग असिस्टंट आणि स्वत डुंबरे सर अशी चार जणांची टीम फिरती वर जात असे. त्या वेळी फिल्म असल्यामुळे कॅमेरा ट्रायपॉईड बॉक्स, रेकॉर्डर ठेवण्याचे बॉक्स, अनेक प्रकारच्या वायरी तसेच बरेच सामान असायचे. त्यात चार मानसं त्या मुळे गाडी खचाखच भरून जायची. खेडेगावातील प्रवास, कच्चे रस्ते, त्यात मिळेल तेथे मुक्काम करायचा, मिळेल ते खायचं आणि चित्रिकरण करायचं, असं अतिशय जिकिरीचं जीवन होतं. अनेकदा वाहन नसायचे. त्यामुळे या पथकाला कधी बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रक, बस तर कधी पायी देखिल प्रवास करावा लागे. पण या पथकात एका कुटुंबा सारखे वातावरण असल्यामुळे कधीच कुणी कुरकुर करत नसे.
दर आठवड्याला वेगवेगळ्या भागात फिरती वरून आल्यानंतर मुंबईतील फिल्म लॅब मध्ये प्रॉसेसिंग झालेवर फिल्म हातात मिळायची. तसेच रेकॉड ट्रॅक सेप्रेट मॅग्नेट ट्रॅक ट्रान्सफर करून तो एडिटर च्या हातात द्यावा लागायचा. हे सगळे कार्यक्रम चंद्रकांत कामूलकर, विद्याधर पाठारे, राजन वाघदरे, श्रीकृष्ण साने, दत्ता सावंत यांनी संपादन केलेले असायचे.
कधी कॅमेरामन, साऊंड रेकॉर्डिस्ट आला नाही तर काम अडायला नको म्हणून डुंबरे सर शुटिंग करायला आणि साउंड रेकॉर्डिंग करायला ही शिकले. बाह्य चित्रिकरणात योग्य सूर्यप्रकाश हा महत्वाचा असतो. त्यामुळे कॅमेरा समोर बोलणाऱ्याचा चेहरा चांगला दिसावा म्हणून डुंबरे सर स्वत: रिप्लेक्टर पकडायचे. प्रसंगी खतांचे डोस, त्यांच्या नेमप्लेट स्वत: तयार करायचे. शेतावरच सर्व काम करण्यासाठी सर्व सेट ते बरोबर घेऊन जात. झाडांची नावे, खतांचे डोस हे ग्राफिक्स ते स्वताच बनवायचे जेणेकरून तो विषय शेतकऱ्यांना पाहताना पटकन समजावा. अशा प्रकारे गाडी चालवण्याशिवाय त्यांनी पडेल ती सर्व काम केली आहेत.
नगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी हे गाव अण्णा हजारे यांनी सैन्यातून निवृत्त झाल्यावर नावारूपाला आणलं होतं. तिथे त्यांनी सिंचनाचे अनेक प्रकल्प राबवून माळरानावर उत्तम शेती कशी करता येते याचे आदर्श उदाहरण घालून दिले होते. त्या वेळीं डुंबरे सरांचे मित्र श्री विजय परूळकर हे युनेस्को कामाला होते. ग्रामीण विकासात त्यांना विशेष रुची होती. या दोघांनी राळेगणसिद्धी येथे दोन दिवस थांबून सर्व चित्रिकरण करून नाविण्यपुर्ण कार्यक्रम केला. कार्यक्रम कृष्णधवल असला तरी उत्तम निवेदन, उत्तम संगीत, उत्तम सादरीकरण यामुळे कार्यक्रम खूपच गाजला. त्या वेळी दुरदर्शन ही एकच वाहिनी असल्यामुळे अनेकांनी तो पाहिला आणि राळेगणसिद्धी पाहण्यासाठी लोकांचा राबता वाढला. हा राबता इतका वाढला की
त्यामुळे अण्णा हजारे यांना खूप त्रास होऊ लागला. यामुळे त्यांनी हा कार्यक्रम पुन्हा दाखवू नका अशी दूरदर्शन ला विनंती केली.
पुढे पुरंदर तालुक्यातील विलासराव साळुंखे यांनी समान पाणी वाटपासाठी “पाणी पंचायत” हा उपक्रम राबविला. या उपक्रमावर आधारित तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील विजय बोराडे यांचा “पाणी आडवा, पाणी जिरवा” हे दोन्ही कार्यक्रम लोकांना खुप आवडले. प्रसिद कवि ना.धो. माहनोर हे स्वत: शेतकरी होते. त्यांच्या पळसखेडा या गावाला जावून कमी पाण्यात फळ बागाची लागवड कशी होते यावर केलेला कार्यक्रम ही खूप लोकप्रिय झाला.
कोल्हापुरचे सुपुत्र तथा पुणे कृषी महाविद्यालयाचे पहिले भारतीय प्राचार्य डॉ पी सी पाटील हे १०२ वर्ष जगले. त्यांना कोल्हापूर येथे जाऊन राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापिठाने मानद डॉक्टरेट हि पदवी दिली होती. त्यामुळे डुंबरे सरांनी कोल्हापुरला जाऊन त्यांची मुलाखत घेतली. पण अडचण अशी होती की त्यांचे वय खुप जास्त झाले होते. स्मरणशक्ती कमी झाली होती. ऐकायला कमी येत होते. तरीही डुंबरे सरांनी ही मुलाखत मोठ्या कष्टाने पूर्ण केली आणि ती मुंबई दुरदर्शनवर प्रसारित झाली. विशेष म्हणजे त्यांचे थोरले सुपुत्र, कै. लेफ्टनंट जनरल शंकरराव थोरात तसेच दुसरे सुपुत्र, रिटायर डी. आय. जी यांनी हा कार्यक्रम पाहिल्यावर प्रत्यक्ष भेटून खुप आनंद व्यक्त केला आणि डुंबरे सरांचे आभार मानले. हा कार्यक्रम ते कधीच विसरले नाही कारण इतक्या मोठ्या वयस्कर माणसाची मुलाखत घेऊन ती प्रसारीत करणे हे एक दिव्य होते.
सुरुवातीला “आमची माती, आमची माणसे” या कार्यक्रमाचे निर्माते डुंबरे सर असताना विनय धुमाळे हे त्यांचे मुंबईतील सहकारी होते. शुटिंगचे डोपशिट व्यवस्थित लिहून डुंबरे सर पाठवित असत. त्या सोबत काही सुचनाही देत असत. त्यामुळे एडिटिंग करताना अडचण येत नसे. कालांतराने कृषी पदवीधर शशिकांत भोसले यांचे सहकार्य डुंबरे सरांना लाभले. सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी नवीन होत्या. पण खुप कष्ट करून ते सर्व काम शिकले. पुढे भोसले हे निर्माते झाले.
त्यावेळी कार्यक्रमाचे निवेदन करण्यासाठी प्रदिप भिडे, विनय आपटे, अजित देशपांडे, सुहासनी मुळगावकर, स्मिता पाटील, पौर्णिमा पाटील, डॉ विश्वास मेहंदळे यांची खुप मदत झाली. पुढे डुंबरे सर महिन्यातून एकदा कृषीविषयक बातम्यांचा आढावा घेणारा कार्यक्रम करीत असत. त्याचे निवेदन महाभारत मालिकेत कृष्णाची भूमिका करणारा डॉ नितिश भारद्वाज तसेच मानसिंग पवार हे करत असत.
पश्चिम महाराष्ट्रातील यात्रा कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानीमाता, वणीची देवी, माहूरची रेणुका माता यांचे चित्रीकरण करून नवरात्रात घरबसल्या देवीचे दर्शन प्रेक्षकांना घडविले होते. शिखर शिंगणापूर, ज्योतिबा, भीमाशंकर यात्रा, पंढरपूरची आषाढी एकादशी १५ ते २० वर्षे एकदाही चुकली नाही.
१९७४ साली बत्तीस शिराळ्याची नागपंचमी डुंबरे सर आणि यशवंत कडोलकर यांनी चित्रित करून तो कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित केला होता. विशेष म्हणजे नाग पकडण्यापासून ते नागपंचमीला त्यांची मिरवणूक कशी काढतात हे सर्व त्यात दाखवले होते. तो कार्यक्रम लोकांना खूप भावला. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील एका मोठ्या वृत्तपत्राने आपल्या अग्रलेखात त्याचा आवर्जून उल्लेख केला होता.
१९७३ पासून पुण्यातील गणेशोत्सव जवळजवळ १९९९ सालापर्यंत डुंबरे सर कव्हर करीत असत. निवडक गणपती, त्यांची आरास, विद्युत रोषणाई, मिरवणूक असा ३० मिनिटांचा कार्यक्रम संकलित करून ते दाखवत आले.
लोकसंगीत हा कार्यक्रम तीन-चार वर्ष डुंबरे सरांकडे होता. दर सोमवारी साडेसहा ते सात या वेळेत हा लोकसंगीत कार्यक्रम थेट (लाईव्ह) प्रसारित होत असे. आकाशवाणी मध्ये ऑडिशन घेतलेली पार्टी दूरदर्शनने दाखवावी असं सांगितलं जायचं. परंतु कैलासवासी वा रा सराफ साहेब आणि डुंबरे सरांनी खेडेगावात जाऊन ऑडिशन घेऊन नवीन कलाकारांना दूरदर्शन वर येण्याची संधी दिली.
सुप्रसिद्ध कवी, महाराष्ट्राचे वाल्मिकी ग दि माडगूळकर यांच्या गीत रामायणाला पंचवीस वर्षे पूर्ण झाली म्हणून पुण्यामध्ये कैलासवासी सुधीर फडके यांनी एक दिवसाचा कार्यक्रम ठेवला होता. निवडक गीते सादर केली होती. त्याचा टीव्ही रिपोर्ट बनवण्यासाठी डुंबरे सर दोन दिवस तिथे हजर होते. त्याची झलक दाखवली ती बाबूजींना पसंत पडली नाही. ते बेसूर होते, म्हणून बाबूजी म्हणाले, या रविवारी मी प्रत्यक्ष गीत रामायण लाईव्ह सादर करतो परंतु तो कार्यक्रम दाखवू नका. त्याप्रमाणे त्या रविवारी सुधीर फडके स्वतः स्टुडिओत आले आणि दोन तासाचा गीत रामायण कार्यक्रम सादर केला. रविवार असल्यामुळे प्रेक्षकांना तो पाहता आला. त्याची खूप हवा झाली. तो कार्यक्रम डुंबरे सर कधीच विसरले नाही.
डुंबरे सरांनी “आमची माती, आमची माणसं” या कार्यक्रमाशिवाय मुंबई दूरदर्शन केंद्राच्या वृत्त विभागाला बातम्यांचे चित्रीकरण करून पाठवल्या आहेत. शिवाय व्हीआयपी कव्हरेज म्हणजे पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी राष्ट्रपतीचे दौरे, इंग्लंडच्या राणीच्या दौरा, विशेष म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी ला भेट, हे दौरे त्यांनी कव्हर करून न्यूज मध्ये दाखवले होते.
पुण्यामध्ये संरक्षण विभागाच्या अनेक संस्था आहेत. उदाहरणार्थ खडकवासल्याची नॅशनल डिफेन्स अकॅडमी, ए एफ एम सी, सीएमई, पॅराबोलिक सेंटर, देहूरोड येथील क्वालिटी कंट्रोल युनिट यांच्यावर कार्यक्रम करून ते दिल्लीवरून प्रसारित झाले हा आपला मोठा बहुमान आहे, असे ते म्हणतात.
डुंबरे सरांना संचालक म्हणून १९९१ मध्ये बढती मिळाली आणि त्यांची नेमणूक अरुणाचल प्रदेशातील इटानगर या केंद्राचे संचालक म्हणून झाली. तिथे दोन वर्षे म्हणून काम केल्यानंतर मुंबईला त्यांची बदली झाली. शेवटचे दिवस मुंबईत काढायला मिळाले.
देवाची आळंदी येथे १९९६ साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले .त्या कार्यक्रमास दोन दिग्गज अतिथी लाभले होते. एक म्हणजे लता मंगेशकर ह्या प्रमुख पाहुण्या होत्या. तर कवियत्री शांता शेळके अध्यक्ष होत्या. हा कार्यक्रम मी आणि नीना राऊत यांनी डिफर टेलिकास्ट म्हणून प्रसारित केला होता. तो लोकांना खूप भावला हे पण मी कधी विसरणार नाही. डुंबरे सर १९९७ च्या मार्चमध्ये निवृत्त होणार होते. परंतु त्यांच्या कार्यक्षमतेमुळे त्यांना सहा महिन्याचं एक्सटेन्शन मिळालं आणि ते सप्टेंबर १९९७ मध्ये मुंबई केंद्रातून निवृत्त झाले.
आपल्याला आकाशवाणी, दूरदर्शनच्या माध्यमातून देशाच्या विकासासाठी अमूल्य योगदान देता आले आणि आपले जीवन कृतार्थ झाले, अशी कृतज्ञेची भावना मनात बाळगत डुंबरे सर आपले निवृत्ती नंतरचे आयुष्य जगत आहेत. या काळात अनेक व्यक्तिगत संकटे त्यांच्या वर कोसळली पण त्या संकटांनी विचलित न होता ते धीरोदात्तपणे जीवनाला सामोरे जात आहेत, हा एक त्यांचा आदर्शच होय.
— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800
दूरदर्शन वरील “आमची माती, आमची माणसं” सारख्या नावाजलेल्या कार्यक्रमाचे निर्मिती प्रमुख श्री.डुंबरे सर ह्यांच्या विषयी इतकी महत्त्वपूर्ण माहिती देणारा विस्तृत लेख लिहून समाजमाध्यमांच्या पाठीमागचे आधारस्तंभ कोण आणि किती कर्तृत्ववान असतात, ह्याचा आढावा घेतला आहेत. ह्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद भुजबळ सर. लेखन आणि छायाचित्रे ह्यांमधून अतिशय उत्तम व सविस्तर माहिती मिळाली.ष🙏💐
खूप छान माहिती लिहिली आहेत तुम्ही सर..डुंबरे सरांचा प्रवास वाचताना सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर घडत आहेत असंच वाटलं..आजही ते तेव्हढ्याच ताकदीने लिहीत असतात..आपल्या दूरदर्शन मधील अश्या ग्रेट व्यक्तिमत्त्वांची आपल्या मार्फत समाजाला ओळख होतेय..त्यांच कार्य समजतंय त्याबद्दल तुमच्या उभयतांचे आभार 🙏डुंबरे सरांना उदंड आयुष्याच्या खूप शुभेच्छा 👏
Well written and majhe mitra ani shyogie dumbresaheb baddal je kahi lihla gela ahe te atishay chhaan ani correct ahe
bpsingh