Thursday, March 27, 2025
Homeलेखदेवेंद्र भुजबळ : माध्यम जगताची शान

देवेंद्र भुजबळ : माध्यम जगताची शान

प्रथम भुजबळ सरांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा …..💐💐

जसे सुर्याचे तेजस्वी रूप सर्व सृष्टी उजळून टाकते तसेच एक प्रतिभावंत व्यक्तिमत्व अनेकांचे भविष्य घडवू शकते, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे माननीय देवेंद्रजी भुजबळ सर.

आजही निरपेक्षपणें कार्य करणाऱ्या व्यक्ती दुर्मिळच नाही का ? न कोणता मोठेपणा, न कोणता गर्व, जणू हाच त्यांचा जीवनाचा मुलमंत्र. अतिशय शिस्तबद्ध व प्रामाणिक काम हाच त्यांचा गुरुमंत्र. त्यांची सर्वांना मदत करण्याची वृत्ती हेच त्यांच्या आनंदी जीवनाचे जणू रहस्य. असे दुर्मिळ गुण लाभलेले माझे गुरू म्हणजे माननीय श्री देवेंद्रजी भुजबळ सर, त्यांना मनापासून मानाचा मुजरा.

ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे आपणही काही देणे लागतो, हा एकमेव प्रामाणिक हेतू मनात ठेवून न्युज स्टोरी टुडे या वेबपोर्टलची त्यांनी निर्मिती केली. ज्याचे बीज पेरले होते, त्यांची कन्या देवश्री ने. त्याचे आज वटवृक्षात रूपांतर होत आहे, कारण भक्कम साथ आहे, ती अर्धांगिनीची म्हणजे, सर्वगुण संपन्न अलका ताईंची.

भुजबळ सरांनी केवळ स्वतः पुरता विचार न करता सामाजिक कार्याचा वसा जपला. अनेकांना मार्गदर्शन केले. त्यांच्या जगण्याला एक दिशा दाखवली. लेखन, संपादन व प्रकाशन क्षेत्रात उंच झेप घेतली.

भुजबळ सरांनी अनेकांच्या मनात एक आशेची ज्योत निर्माण केली. अनेकांना लिहिते केले. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून ‘स्व’ ची जाणीव करून दिली. गुरूंची आंतरिक दृष्टी असती जी खऱ्या अर्थाने शिष्याची पारख करू शकते. त्यांच्या जीवनाला झळाळी देऊ शकते. म्हणूनच गुरूंचे स्थान सर्वोत्तम असते व शिष्य त्यांचा आजन्म ऋणी राहतो. असे गुरू लाभणे म्हणजे भाग्यवान असल्याचे लक्षण असते. म्हणून मी स्वतःला खूप नशीबवान समजते कारण त्यांच्या मार्गदर्शनामुळे माझे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले.

न्युज स्टोरी टुडे या आंतरराष्ट्रीय वेबपोर्टल च्या माध्यमातून त्यांनी अनेकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. अनेकांच्या कला गुणांना वाव मिळाला. लेखणीला न्याय मिळाला. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, ज्यामुळे अनेक लेखकांची समाजात नव्याने ओळख होऊ शकली.

अतिशय हुशार, प्रभावी, संवेदनशील, नम्र, समंजस व सकारात्मक विचारसरणी ही त्यांच्या स्वभावाची आभूषणे आहेत. भुजबळ सर अनेकांचे प्रेरणास्थान आहेत. स्वतःच्या अनुभवाच्या शिदोरीतून ज्ञानार्जन करत हा सामाजिक बांधिलकीचा मोलाचा वसा सातत्याने सुरू ठेवला आहे. अनेक नवोदित लेखकांना घडवायचे लाख मोलाचे काम ते करीत आहेत. पोर्टलच्या माध्यमातून त्यांनी लेखक व वाचकांना फक्त जोडलेच नाही तर अनेकांची स्वप्नपूर्ती झाली. लेखणीचे पुस्तकात रूपांतर झाले. हा एक सुखद धक्का होता. हे अविस्मरणीय क्षण अनेकांच्या मनात जणू सुवर्ण अक्षराने कोरले गेले आहे.

पोर्टलच्या माध्यमातून वाचकांना देखील जणू एक मेजवानी मिळाली. अतिशय उत्कृष्ट दर्जाचे लेखन, अनेकांचा जीवन प्रवास, त्यांचे अनुभव, विविध विषयांवर लिहिलेले लेख, कविता यामुळे जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. जणू एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. वाचाल तर वाचाल हा लाख मोलाचा वसा जपत अनेक देश विदेशातील लेखकांना व वाचकांना एकत्र करण्याचे बहुमुल्य काम भुजबळ सर अगदी निरपेक्ष मनानं करत आहे.

भुजबळ सरांचा आयुष्याचा प्रवास अतिशय खडतर होता पण हार मानतील तर ते भुजबळ सर कुठले ? प्रत्येक बिकट परिस्थितीचा सामना अतिशय धीराने, हिंमतीने, जिद्दीने व चिकाटीने पार करत त्यांनी यशस्वी वाटचाल केली. क्लास वन ऑफिसर असून देखील सामाजिक बांधिलकी जपली. अनेकांच्या मनात त्यांच्याविषयी आदराचे स्थान आहे व समाजात सन्मान आहे.

बरं, रिटायर झाल्यावर देखील निवांत न बसता सातत्याने न्युज स्टोरी टुडे या पोर्टलच्या माध्यमातून ते अनेकांशी जोडले आहेत. अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांचे मानकरी, एक उत्तम वक्ता, एक प्रसिद्ध लेखक, संपादक व प्रकाशक असे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे भुजबळ सर. पैसा, प्रसिद्धी अथवा नाव या पलीकडे म्हणजे नाती जपणे, लोकांच्या भावना समजून घेणे, सर्वांशी खेळीमेळीने राहणे, मदतीला धावून जाणे हेच ते लोकप्रिय असल्याचे कारण आहे. अजूनही माणुसकी जिवंत आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांचे निरपेक्ष काम व सर्वांशी जोडून राहण्याची कला.

अलकाताई व भुजबळ सर अतिशय उत्साहाने हाती घेतलेले काम अगदी चोख बजावत असतात. लोकांच्या हितासाठी व आनंदासाठी ही जोडी कायमच तत्पर असते. वय हा केवळ एक आकडा आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही जोडी. दोघांच्या प्रांजल स्वभावामुळे अनेकांच्या मनात त्यांनी घर केले आहे. त्यांच्या सोबतीत एक आपलेपणाची जाणीव वाटते. भुजबळ सर व अलका ताई म्हणजे आम्हा लेखकांची शान आहे, ज्याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे.

हा लेख भुजबळ सरांच्या चरणी अर्पण करते.
भुजबळ सरांना पुनःश्च एकदा आनंदी व आरोग्यदायी जीवनाच्या अनेक शुभेच्छा व त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.🙏

रश्मी हेडे

— लेखन : रश्मी हेडे.. सातारा
— संपादन : देवेंद्र भुजबळ
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments