Friday, December 6, 2024
Homeसाहित्यदेहोपनिषद - विनवणी

देहोपनिषद – विनवणी

नमस्कार मंडळी.
नुकतंच मी ८२व्या वर्षांत पदार्पण केलं आणि आमच्या आधीच्या पिढीची आठवण झाली. त्यावेळी ६०/६५ वय झाले कि सगळेच अध्यात्मिक मार्गाला लागायचे. दासबोध, गीतारहस्य, ज्ञानेश्वरी वगैरे ग्रंथ वाचायला सुरुवात करायचे. “आता वात्या वळायचे वय झालंय हं” असेही चिडवलं जायचं. थोडक्यात काय तर संसारातून मन हळूहळू काढायचे. आणि पुढील वाटचालीसाठी मन एकाग्र करायचे. हाच त्यातला मतितार्थ.

तेव्हाचे ६०/६५ म्हणजे आत्ताचे ७५/८० वय असे म्हणतात. माझ्या मनांत विचार चक्र सुरु झालें. माझ्या आतापर्यंतच्या जीवनाची वजाबाकी मनांत करु लागले. मुलेच नाही तर नातवंडे पण आता स्वतःच्या पायावर उभी आहेत. सगळीच कर्तव्ये आता पार पडली आहेत. पुण्य केल तर माणसाचा जन्म घेता येतो व या जन्मात खुप, खुप पुण्य केले तर मोक्ष मिळतो, हा भारतीय संस्कृतीचा ठसा इतके वर्षे परदेशात राहूनही मनावर पक्का बिंबलेला आहे. इतके माझे पुण्य तर नक्कीच झाले नाही. पाप केले नाही पण केलेल्या चुकांची भरपाई आणि कृतज्ञतेची परतफेड करायला परत जन्म घ्यावाच लागेल. देवालाच आता शरण जाऊन त्यालाच “विनवणी” करायला हवी याची पक्की जाणीव झाली. या उलट सुलट विचारांच्या झंकारातून पुढील शब्दांचे बोल छेडले गेलेत.

माझेची देवा जीवन, 
पाहते मी याची डोळा
येऊनी तुज शरण,  
अति आनंदे अबला ||१||

कर्तव्य कर्म सरले, 
असे मनी समाधान
काही न आता  उरले, 
करी चित्त सावधान ।।२।।

नको देवा पुनर्जन्म, 
परी पुण्य ना पदरी
फेडायास जन-ऋण, 
परतेन मी माघारी ।।३।।

परी मानवी स्वार्थाचा, 
वाटे मनी अती खेद
देई रे जन्म वृक्षाचा, 
पुरवी मनीचा हेत ।।४।।

वृक्ष असे डौलदार,  
राही उभा तो उन्हात
छाया करी सानथोर, 
भेद-भाव ना मनात ।।५।।

वृत्ती हि परोपकारी, 
येता मम आचरणी
सुटू दे रे जन्मवारी, 
होता विलीन चरणी ।।६।।

पायघडी या देहाची, 
घालुनी मी वाट पाही
अर्पिते देवा तुजसी,  
माझी आत्म्याची ओंजळी ।।७।।

नित्य लाभो तुझा संग, 
रूप राहो मनी डोळा
उठो आनंदी तरंग, 
मनाचिया माझ्या डोहा ।।८।।

ऐसे माझेचि जीवन,
पाहिले मी याची डोळा
करी आनंदाचे डोही, 
नित जिवन सोहळा ।।९।।

— रचना : लिना फाटक.  वाॅरिंगटन, इंग्लंड.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800

RELATED ARTICLES

13 COMMENTS

  1. आश्चर्यचकित होणं, आ वासून बघतच रहाणं, अशा काही गोष्टी घडतात त्यातलीच ही एक गोष्ट. काही कल्पना नसताना मावशी च हे काव्य समोर आलं. आणि थक्क झालो.
    लीना फाटक म्हणजे माझ्या प्रभामावशीने लिहिलेलं हे काव्य मनात खोलवर जाऊन पोहोचले.
    कितीतरी वेळ मी हे काव्य वाचत होतो.

    संगीत क्षेत्रात जोगिया रागाचे जे स्थान आहे तसंच काहीसं हे काव्य वाचल्यावर वाटलं.
    काहीही न मागणं, हेच माझं मागणं आहे असं परमेश्वराला सांगत, तूच काय ते समजून घे अशा आशयाचं हे काव्य नक्कीच मनाला भिडणारे आहे.

    कोणतेही आवेश, अभिनेवेश ,किंवा अपेक्षा न ठेवता मनातून बाहेर आलेलं काव्य जेव्हा येतं तेव्हा त्याची धग नक्कीच पोहोचत असते.
    इतकं सुंदर, आणि सोप्प लिहीणं सगळ्यात अवघड असते.
    अजून लेखन वाचायला नक्कीच आवडेल.

    हेमंत पेंडसे
    9422336536

    • तुम्हाला माझे मनापासून आभार. तुम्ही दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल खुप खुप आनंद झालाय. असाच लोभ असावा. लिना फाटक

  2. कविता छानच . आपल्या उदात्त भावनेला परमात्मा साथ‌ देवो.

    • आपल्या अभिप्रायाबद्दल माझे मनःपूर्वक धन्यवाद. लिना फाटक

  3. नमस्कार संपादक देवेंद्र व अलका, आणि सर्व वाचकवर्ग, देवेंद्र व अलकाच्या मिळालेल्या खुप प्रोत्साहनामुळेच मी बर्‍याच कालावधीनंतर परत एकदा लिहायला सुरुवात करू शकले. माझ्या या शब्दरूपी विचार व भावनांना आपण सर्व वाचकांनी भरभरुन दिलेल्या प्रचंड प्रतिसादाने माझे मन आकंठ भरून वाहत आहे. तुम्हा सर्वांचेच मनापासून आभार मानायला मला शब्दच सापडत नाहीयेत. असाच तुमचा सर्वांचाच लोभ सदैव राहो हीच आशा करते. परत एकदा मनःपूर्वक धन्यवाद. लिना फाटक यु. के.

  4. देहोपनिषद या कवितेतून एक अतिशय उदात्त विचार मांडला आहे .
    आपले जीवन सर्वांच्या उपयोगी पडावे म्हणून पुढील जन्म वृक्षाचा
    मागणाऱ्या लीनाताईंना शतशः प्रणाम!

  5. रामदास स्वामींनी म्हण्टले आहे की “जनी संचिते पिंड निर्माण झाला म्हणेतेची भोगण्या जीव आला ‘शुभाशुभ होणार काही कळेना पुढे प्राप्त ब्रह्मादिकाही टळेना” मला असं वाटतं की एका विशिष्ट वळणावर माणूस आपल्या जीवनाची वजाबाकी करु लागतो स्वतः कडे साक्षी भावाने बघायला सगळ्यांनाच जमते , असं नाही , पण तुला ते जमलय , तुझ्या संवेदनशील मनात उठलेले तरंग , तुझ्या कवितेत उमटले आहेत ,, सगळे जग स्वार्थाने भरले आहे ,ही खंत , तुझ्या मनात दाटून आली आहे आणि म्हणूनच स्वतः साठी , मला काही नको ,पण पुन्हा जन्माला आलो तर वृक्षाचा जन्म दे , अशी उदात्त मागणी तु केली आहेस सामाजिक बांधिलकीची जाणीव तुला आहे त्यामुळे कोणाचंही मन दुखवल नाही ,मी तर लहानपणापासून तुला ओळखते कणखरपणे काही निर्णय तू घेत होतीस कर्तव्य दक्ष होतीलच आणि अशी परोपकारी वृत्ती असलेली उत्तुंग विचार असलेली प्रेमळ बहिण मला मिळाली हे मी माझे भाग्यच समजते या पुढील आयुष्यात अशा सुंदर कविता आम्हाला वाचायला मिळोत तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा , आणि निरामय शांततेत तुझे आयुष्य व्यतीत होवो हीच शुभेच्छा ,

  6. एवढं उत्सुफुर्त काव्य प्रतिभेच्या गर्भातून च येऊ शकत.जीवनाकडे जगतानाचा दृष्टिक्षेप व जिवनोत्तर अकांक्षेची भरारी अप्रतिम शब्दात प्रतीत झाली आहे.

    प्रभा, तुझी प्रभा अजून तेजस्वी पणे झळाळत आहे हे तुझ्या काव्य पंक्तीच्या सुंदर रचनेतून प्रतीत होतय.

    खूप छान व कौतुकास्पद.
    अनेक शुभ आशीर्वाद.
    सुधीर नागपूरकर

  7. भावनांची हळुवार उलगडण भावली

  8. लीना काजू नमस्कार,
    संत साहित्यात मोक्ष प्राप्ती ही केंद्रस्थानी मानून अभंग रचना असते.
    क्रमांक ३ मधील आपले शब्द वाचून गीतेतील कर्माचा सिद्धांत अधोरेखित होतो
    खूप सुंदर
    विकास

  9. नमस्कार लिनाताई..! अखेरचं फाटक उघडायला अजून अवकाश असताना तुम्ही एवढ्या लीन होऊन परमेश्वराकडे असं जगाच्या कल्याणासाठीचं मागणं मागताय, हे पाहून नतमस्तक झालो.
    तुम्ही धन्य आहात….!!
    वाढदिवसाच्या विलंबित शुभेच्छा आणि
    आगामी जीवनासाठी मनःपूर्वक अभीष्टचिंतनम् 🙏

    …. प्रशान्त थोरात,
    पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था .
    9921447007

  10. अतिशय चांगली भावना आहे, लिनाताई ..! अखेरचं फाटक उघडायला अजून अवकाश असताना तुम्ही एवढ्या लीन होऊन परमेश्वराकडे असं
    जगाच्या कल्याणासाठी मागणं मागू शकता; हे पाहून नतमस्तक झालो ..!!
    आपण धन्य आहात !!!
    … प्रशान्त थोरात,
    पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.
    9921447007

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर, ठाणे on अशी होती माझी आई !
राजेंद्र वाणी दहिसर मुंबई on “प्रतिभा”ला वय नसतं !
नलिनी कापरे on आरशात पाहू जरा …
सौ.मृदुलाराजे on आरशात पाहू जरा …
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : २६
सौ.मृदुलाराजे on वाचक लिहितात…
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
शारदा शेरकर on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !