१. ध्यास
विठू, रखुमाई
विभक्त नि दूर
दोहोंच्या अंतरी
तरी एक सूर
त्याचा गोतावळा
पांगलेला जेथे
सुखाचे माहेर
तिथे तिला भेटे
डोळे, कान, नाक
द्वैताचा देखावा
एक अनुभव
येई त्यांच्या गावा
कधीतरी मन
दुभंगले वाटे
एक ध्यास- ‘ विठू ‘
घेऊन चालते
२. श्रीमंती
तुझ्या डोळियांच्या डोही
खोल डूब घेता घेता
स्वच्छ धुवून निघाली
अंतर्बाह्य गढूळता
इंद्रियांच्या देठांतून
कोंभ धुमार फुटले
पानापानांच्या शिरांत
रस प्रवाहित झाले
मन पाकळ्यांचे फूल
गंध- गेंद टपोरले
समचरणाशी तुझ्या
शुद्ध भावे अर्पियले
जीवनाच्या अध्यायात
शिगोशिगलेली भक्ती
तुझ्या समचरणाशी
अनुभवतो श्रीमंती
— रचना : प्राचार्य सूर्यकान्त द. वैद्य. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800