चार्ली चॅप्लिन यांनी हिटलरच्या हुकूमशाहीचं विनोदी स्वरूपात केलेलं वर्णन ‘द ग्रेट डिटेक्टर’ या सिनेमात दिसतं. त्या धर्तीवर ‘द ग्रेट डेमोक्रॅट (श्रेष्ठ लोकशहा)’ असा ज्यांचा गौरव केला पाहिजे, असे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाने भारतीय समाजातील उपेक्षित, वंचित आणि सर्वहारा माणसाला त्याच्यातील माणूसपणाची ओळख करुन दिली, त्याच्यात आत्मविश्वासाचं स्फूर्लिंग जागवलं. लोकशाहीचा कणा असलेला हा सर्वसामान्य माणूस ताठ उभा राहिला बाबासाहेबांमुळं,या देशाला त्यांनी संविधान दिलं; जे माणूसकेंद्रित आहे. देशाला हे संविधान देताना ‘आपण उत्तम संविधान निर्माण केलंय ; मात्र त्याची अंमलबजावणी करणारे नालायक असतील तर मंदिरात सैतान थैमान घालतील’ असा इशाराही दिला होता. हे संविधान आणि देशाला मिळालेल्या लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी लोकशिक्षणाची गरज असल्याचा सल्लाही दिला होता. याच भूमिकेतून सर्वसामान्यांना ‘शिका, संघटित व्हा आणि आंतर्गत तसेच बाह्य शक्तींशी संघर्ष करा’ असा संदेश दिला होता.

बाबासाहेबांच्या जीवनात दोन ठिकाणी त्यांनी आपली कार्यपद्धती बदलल्याचे दिसून येते. अर्थात हे करताना, आपल्या मूळ उद्दिष्टापासून ते दूर झालेले नाहीत. सुरवातीच्या काळात अस्पृश्य हेही हिंदू आहेत. इतर हिंदूप्रमाणे सर्व बाबतीतले अधिकार त्यांना हवेत अशा आग्रही भूमिकेतून नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेश आणि महाड येथील तळ्यावर पाण्यासाठी त्यांनी सत्याग्रह केला. ह्या दोन्ही घटनांना तत्कालीन सनातन्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाहीच, उलट शांततेने सत्याग्रह करणाऱ्या अस्पृश्यांना मारहाण केली.

या घटनांनंतर हिंदू आम्हाला माणूस म्हणून वागवत नसतील तर, खडकावर डोके आपटून घेण्याऐवजी बाबासाहेबांनी आपली कार्यपद्धती बदलून अस्पृश्यांना कायदेशीर सवलती मिळवून देण्यासाठी चळवळी केल्या आणि स्वाभाविकपणे अमानुषतेची वागणूक देणारा हिंदू धर्म सोडून देण्याची घोषणा केली. आयुष्याच्या उत्तरार्धात ती पूर्ण करून भारतीय एकात्मता, सार्वभौमत्व यांना बाधक ठरणार नाही अशा, भारतीय भूमीत निर्माण झालेला, समाजधारणेसाठी आवश्यक असा मानवतेवर आधारित बौध्द धर्म स्वीकारला.
यावेळीही पारंपरिक बौध्द धर्माहून स्वतंत्र असा व्यक्तिस्वातंत्र्याला आणि नैतिकतेला पोषक आणि कर्मकांडाला अव्हेरणारा धम्म त्यांना अपेक्षित होता. यानंतर त्यांना फार आयुष्य लाभले नाही म्हणून त्यांच्या स्वप्नातील या नवयान पंथावर त्यांना कार्य करणे शक्य झाले नाही.

असाच दुसरा मुद्दा बाबासाहेबांच्या राजकीय भूमिकेविषयी…
आयुष्यभर काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षातील गांधी आणि नेहरू यांच्या कट्टर विरोधात विचार मांडणाऱ्या बाबासाहेबांनी नेहरूंच्या मंत्रिमंडळात कामही केले. अर्थात ही त्यांची भूमिका सत्तेसाठी सोईस्कर दलबदलूपणाची नव्हती तर, आपल्या स्वप्नातील अस्पृश्य आणि एकूणच वंचित समाजघटकांसाठी कार्य करण्याची संधी म्हणून त्यांनी याकडे पाहिले आणि अर्थातच समाजातील एक शोषित, स्री वर्गाच्या हितासाठी आपल्या मंत्रीपदाचा त्यागही केला होता. हा इतिहास आहे.

“मला मातृभूमी नाही” अशी उद्वेगजनक भूमिका घेणा-या बाबासाहेबांनी याच देशासाठी स्वातंत्र्यानंतर एक चिरेबंदी संविधान निर्माण केले होते आणि ‘मी प्रथम भारतीय आहे आणि नंतरही भारतीय आहे’ अशी प्रखर राष्ट्रीय भूमिकाही घेतली. समाजातील अस्पृश्य आणि एकूणच सर्वहारा घटकांवर अन्याय करणाऱ्या सनातनी वृत्तीवर ते घणाघाती हल्ले करतानाच, आपल्या सामाजिक चळवळीतून जात म्हणून ब्राह्मणांचा द्वेष करत नव्हते. महाडच्या चळवळीत ब्राह्मणांना दूर ठेवण्याचा सल्ला धुडकावून देत समतेच्या प्रतिष्ठापनेच्या कार्यात, ‘केवळ हा ब्राह्मण आहे म्हणून मी त्याला दूर लोटणार नाही; या उलट ब्राह्मणातील सुधारणावाद्यांना मी सोबत घेईन तर बहुजन समाजातील प्रतिगाम्यांना खडयासारखे बाजूला ठेवीन’ अशी त्यांची भूमिका होती.

सर्वसामान्य माणूस हा तत्कालीन इतिहासाचे अपत्य असतो. महामानवांचं वैशिष्ट्य हे की ते जसे इतिहासातून निर्माण होतात तसेच ते इतिहास घडवतात.बाबासाहेब आंबेडकर असेच एक महामानव. या संदर्भात काही दिवसांपूर्वी मला एक संधी मिळाली. इंग्लंड मुक्कामात २ एप्रिल २०१५ रोजी लंडन इथं बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य असलेल्या ठिकाणी जाण्याची ती संधी होती.
बाबासाहेब १९२१-२२ मध्ये इंग्लंडमधील ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये’ शिकत असताना, लंडनमधील १० किंग हेन्री रोडवर रहात होते. ती इमारत महाराष्ट्र सरकारने विकत घेऊन त्या ठिकाणी एक सुंदर स्मारक निर्माण केलं आहे. सन २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आलं. ‘Dr. Bhimrao Ramji Ambekar: Indian Crusader of Social Justice lived here 1921-22’ या आशयाचा फलक या इमारतीवर दिसून येतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाकार्यातील महत्वाच्या घटनांचे फोटो, प्रतिमा, काही बातम्या, वस्तू इत्यादींचा या संग्रहालयात समावेश आहे.
इंग्लंडच्या राजधानीत भारतीय समाजातील समतेच्या लढ्यातील एका महामानवाचे असे भव्य व सुंदर स्मारक पाहून आनंद होतो. अभिमान वाटतो.

— लेखन : प्रा. डाॅ.सतीश शिरसाठ. पुणे. ह. मु. इंग्लंड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️9869484800
द ग्रेट डेमोक्रॅट या लेखात सतीश शिरसाठ यांनी बाबासाहेबांच्या कार्यावर फार चांगले विवेचन केले आहे.
अशाप्रकारे महापुरुषांना समजून घेणारे लेख प्रकाशित व्हायला हवेत. बाबासाहेबांनी काय केंव्हा व कशासाठी
केले याला काही कारण आहेत. हल्लीच्या नेत्यांप्रमाणे केवळ राजकारण म्हणून त्यांनी कधीच काही केले नव्हते.