आज तुकाराम बीज, अर्थात तुकोबांच्या वैकुंठगमनाचा दिवस. संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्राच्या पवित्र मातीत होऊन गेलेले एक आगळे वेगळे रसायन आहे. ‘तुकाराम’ हे व्यक्तिमत्व कितीही समजून घेतले तरी एका अंगातून त्याची मांडणी करताच येत नाही. कारण तुकोबांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक आयाम आहेत. आस्तिक असो अथवा नास्तिक परंतु तुकोबांचा विचार मानत नाही असा मनुष्य किमान ह्या महाराष्ट्राच्या मातीत तरी सापडणे अशक्यच. आपल्या रोखठोक शैलीत सत्य मांडण्याची हातोटी गवसलेले तुकोबा हे सर्व संतांच्या मेळ्यात शीर्षस्थानी असण्याचेही कारण हेच आहे.
तुकोबांचे व्यक्तिमत्व अनेक आयामांनी युक्त आहे. नुसते तुकाराम नाव उच्चारले तरी डोळ्यासमोर शांत, सात्विक प्रतिकृती उभी राहते. कलियुगात वेदांचा (यज्ञ कर्मांचा) मार्ग लोप पावल्याने मनुष्याच्या उद्धारासाठी संतांनी भक्तीचा मार्ग विस्तृत बनवला. तुकोबांनी त्यांच्या अख्ख्या जीवनात सर्वाधिक पुरस्कार भक्तीमार्गाचाच केल्याचे दिसून येते.
भक्तीचा पुरस्कार करणारे तुकोबा ढोंग, दंभ, पाखंड यावर कडाडून हल्ला चढवतात. तुकोबांना देव, धर्म मान्य आहे परंतु त्याचे ढोंग अजिबात मान्य नाही. याचप्रमाणे देवाला, त्याच्या भक्तांना, संतांना व संतांच्या वचनांना न मानणाऱ्या पाखंड्यांनाही तुकोबा झोडपून काढतात. मनुष्याच्या जातीपेक्षा त्यांना त्याची भक्ती अधिक मोलाची वाटते. म्हणून एखादा अभक्त मनुष्य जातीने उच्च असला तरी तुकोबांना तो आवडत नाही, मात्र जातीने निच्च मानला गेलेला एखादा मनुष्य मनापासून ईश्वरभक्ती करत असेल तर तुकोबांना तो वंदनीय वाटतो.
तुकोबांनी केवळ उपदेश केला नाही तर स्वतः तसे वागले आहेत. व्यवसायाने वाणी (दुकानदार) असलेल्या तुकोबांनी विरक्तीमुळे आपल्याकडील सर्व संपत्ती गोरगरीबांना वाटून टाकली आणि पोटापुरतीच जवळ ठेवली. आज सर्वत्र नफेखोरीने जग हैराण झाले आहे… प्रत्येकाला अधिकाधिक पैसा हवा आहे…. त्यासाठी कोणताही मार्ग अवलंबायला लोक तयार झाले आहेत. ‘स्वतःला हवे तितकेच ठेवावे, गरजूला बाकी मिळावे’ अशी वृत्ती आज दुरापास्त झाली आहे. अश्या परिस्थितीत तुकोबाराय उद्बोधक ठरतात.
तुकोबांनी रचलेली गाथा म्हणजे त्यांच्या अध्यात्मिक, सामाजिक व व्यावहारिक अनुभवांचे चालते बोलते रूप आहे. भक्तीचे मर्म समजून न घेता केवळ कर्मठपणालाच मानणाऱ्या तत्कालीन धर्मपंडितांकडून तुकोबांची गाथा देखील इंद्रायणीत बुडवण्यात आली. मात्र तुकोबांची भक्ती खरी होती. म्हणून साक्षात पांडूरंगाला गाथेचे रक्षण करावे लागले. यानंतर तुकोबांची कीर्ती जिकडे तिकडे पसरली. तुकोबांना सुरूवातीला त्रास देणाऱ्या रामेश्वर शास्त्रींसारख्या लोकांनी ह्या प्रसंगानंतर तुकोबांचे शिष्यत्व स्वीकारले आणि स्वतःचे कल्याण करून घेतले.
फाल्गुन वद्य द्वितीया शके १५७१ (इ.स.१६४९) सोमवारच्या दिवशी तुकोबा सदेह वैकुंठाला गेले. वैकुंठगमनापुर्वी तुकोबांनी त्यांच्या टाळकरी भक्त मंडळीसोबत इंद्रायणीच्या काठावर नांदूरकी वृक्षाखाली कीर्तन केले. तुकोबांच्या वैकुंठगमन समयी तेथे तुकोबांचे सगळे शिष्यमंडळ उपस्थित होते. तुकोबांचे दोन्ही पुत्र महादेव आणि विठोबा यांनी पुढे होऊन तुकोबांना नमस्कार केला व वडीलांचे आशीर्वाद घेतले. महादजीपंत कुलकर्णी देहूकर, गंगाधर बाबा मवाळ तळेगावकर, संताजी तेली जगनाडे चाकणकर, तुकोबांचे बंधू कान्होजी, मालजी गाडे येलवाडीकर, कांडोपंत लोहकरे लोहगावकर, गवारशेठ वाणी, मल्हारपंत कुलकर्णी चिखलीकर, आबाजीपंत लोहगावकर, रामेश्वरशास्त्री भट्ट महूळकर, कोंडपाटील लोहगावकर, नावजी माळी लोहगावकर, शिवबा कासार लोहगावकर आणि सोनबा ठाकूर ह्या सर्व टाळकऱ्यांचा व कीर्तनाला उपस्थित असलेल्या श्रोत्यांचा निरोप घेऊन तुकोबा गरुड विमानाने वैकुंठाला गेले.
तुकोबांच्या वैकुंठगमनवर सध्याच्या काळात अनेक स्वयंघोषित बुद्धीवादी शंका घेतात. मात्र त्यांच्या शंकांना कसलाही आधार नाही. कारण हे स्वयंघोषित बुद्धीवादी एकतर अध्यात्मशास्त्रातील संज्ञा न जाणता विमान, वैकुंठ ह्या संज्ञांचा अर्थ व्यावहारिक भौतिक जीवनाशी जोडतात आणि दुसरे म्हणजे अशा शंका उठवून राजकीय अजेंडे, ब्राह्मणद्वेषाची पेरणी व समाजाचा बुद्धिभेद करणे हे त्यांचे मुख्य उद्देश असतात. यात सत्यशोधकता व श्रद्धा यांचा कुठेही लवलेश नसतो.
वैकुंठ हे आकाशातील असे एखादे ठिकाण मुळीच नाही की जेथे पृथ्वीवरून एखाद्या साधनाने जाता येईल. तुकोबा ज्या विमानाने वैकुंठाला गेले ते विमान म्हणजे हवेत उडणारे एखादे वाहनही मुळीच नाही. ती अध्यात्मिक परिभाषा आहे. रूपक अलंकारातून त्याची मांडणी झाली आहे. विश्वात जिथे जिथे आकाश (space) आहे तिथे तिथे काळाची सत्ता चालते. म्हणजे विश्वात कोणत्याही ठिकाणी असणारी वस्तू अथवा पदार्थ हा नाशवान आहे. काळें खादला अवघाचि आकार । ह्या तुकोबांच्या अभंगात ह्याबद्दल स्पष्टपणे बोललेले आहे. शिवाय वैकुंठ म्हणजे काय याबद्दल श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेतही सांगितले – न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः । अर्थात त्या माझ्या परमधामात सूर्य, चंद्र व अग्नी यांची किरणेदेखील पोहचत नाहीत. जर वैकुंठात सूर्य – अग्नीच्या किरणांनाही प्रवेश नसेल तर तेथे भौतिक पदार्थांची गती कशी असणार ? एवढी साधी गोष्ट आहे. म्हणून तुकोबांचे विमानाने झालेले वैकुंठगमन ही व्यावहारिक भौतिक जीवनातील घटना नसून ती अध्यात्मिक घटना आहे व तिचा उलगडा गाथेच्या सखोल अभ्यासातूनच होतो. तुकोबांनी सामान्य माणसाप्रमाणे देह सोडलेला नाही. ते आपल्या देहासहित वैकुंठात समाविष्ट झाले आहेत.
सासरला असलेली मुलगी दिवाळीच्या वेळेस जशी माहेरहून कुणीतरी तिला मूळ लावण्यासाठी येईल याची जशी वाट पाहत असते, तसे तुकोबा वैकुंठाहून केव्हा विठ्ठल त्यांना नेण्यासाठी येईल याची निरंतर वाट पाहत असत. याचे उत्कट दर्शन आपल्या गाथा वाचताना होते. “पैल कोण दिसे गरूडाचे वारिके । विठ्ठलासारिखे चतुर्भुज ।।” मला वैकुंठाला नेण्यासाठी गरूडावर बसून पलिकडून विठ्ठलासारखे चतुर्भुज दिसणारे कुणीतरी येत असल्याचे दिसत आहे, असे तुकोबा म्हणतात.
“आम्ही वैकुंठवासी । आलो याचि कारणासी । बोलिले जे ऋषी । साच भावे वर्ताया ।।” आम्ही वैकुंठवासी लोक ऋषींची वचने प्रत्यक्ष जगून दाखवण्यासाठी पृथ्वीवर आलो आहोत, असे तुकोबा म्हणतात. जे तुकोबा वैकुंठाहून पृथ्वीवर येऊ शकतात, ते पुन्हा वैकुंठाला जाऊ शकणार नाहीत का ?
वैकुंठगमनाप्रसंगी तुकोबांनी अनेक अभंग रचलेले व गायले आहेत. त्यापैकीच एक अभंग म्हणजे “सकळही माझी बोळवण करा । परतुनी घरा जावे तुम्ही ।।” हा आहे. तुम्ही सगळे लोक मला निरोप द्या आणि तुमच्या घरी निघून जा असे तुकोबा ह्या अभंगात म्हणतात. “याचसाठी केला होता अट्टहास । शेवटचा दिस गोड व्हावा ।।” माझा शेवटचा दिवस गोड व्हावा यासाठीच मी आयुष्यभर भक्तीचा एवढा अट्टहास केल्याचे तुकोबा म्हणतात. “आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी ।” ह्या अभंगातून तुकोबा स्पष्टपणे आपण वैकुंठाला जात असल्याचे म्हणतात.
तुकोबांच्या निर्याणसमयाचे अनेक अभंग गाथेत आजही उपलब्ध आहेत. ह्या देशाच्या मातीत आजपर्यंत अनेक आत्मज्ञानी व ग्रंथांचे रचनाकार कवी होऊन गेले. अनेक सिद्ध पुरूष, योगी, महायोगी, भक्त, ज्ञानी व कर्मयोग्यांना ह्या देशाने पाहिले; परंतु स्वतःचे शरीर ब्रह्मलोकात नेणारा तुकाराम एकटाच ह्या धरतीने बघितला. म्हणून तुकोबांबद्दल एवढेच बोलावेसे वाटते – “धन्य म्हणवीन इहलोकी लोका । भाग्य आम्ही तुका देखियेला ।
— लेखन : गजानन जगदाळे
(संत तुकाराम महाराजांच्या साहित्याचे अभ्यासक)- विश्व संवाद केंद्र, देवगिरी.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800