Saturday, April 20, 2024
Homeपर्यटननर्मदा परिक्रमा : समारोप

नर्मदा परिक्रमा : समारोप

आज सर्व आन्हिकं उरकून आम्ही जल अर्पण करण्यासाठी ओंकारेश्वराच्या आणि ममलेश्वराच्या राउळात गेलो. तिथे जल अर्पण केलं.

बघता बघता आमची परिक्रमा मैया कृपेने पूर्ण झाली. छान झाली उत्तम झाली. परिक्रमेसाठी आलेल्या सर्व मूर्तींना आता घरी जायचे वेध लागले होते. त्यामुळे आम्ही परतीच्या प्रवासाला आता निघालो. आम्हाला ओंकारेश्वर इथून इंदोर ला जायचे होते.तिथून मग कुणी रेल्वेने, कोणी विमानाने, कुणी बसने आपापल्या स्थानाकडे प्रयाण करणार होते.

या परिक्रमेत पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, परभणी, अलिबाग, लाड कारंजा, खामगांव, बुलडाणा, सातारा अशा विविध गावाहून ४३ मूर्ती आल्या होत्या.

यशोधनची परिक्रमा उभ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध होत आहे. मैया कृपेने परिक्रमा छान उत्तमरित्या पार पडली आहे.आमची 81 वी परिक्रमा होती. सगळेजण अत्यंत आनंदात समाधानात होते.

बघता बघता यशोधन च्या बसने सलग ८१ परिक्रमा झाल्या आहेत. सलग ८१ परिक्रमा होणं हा यशोधनच्या दृष्टीने अत्यंत भाग्याचा क्षण होता. प्रकाश मोळक काका यांनी खूप मेहनत घेतली होती. त्यांच्या सोबत असणारा त्यांचा सगळा स्टाफ त्यात गाडीच्या ड्रायव्हर पासून किचन ची टीम तसेच सोबत असणारी मुले यांचे करावे तितके कौतुक कमी आहे. कारण खेडेगावातून कामासाठी आलेली दूरदूरच्या गावातून आलेली ही मुले प्रकाश काका यांच्या सोबत 7 महिने परिक्रमेत असतात. मला तर जास्तच अभिमान होता त्यांचा कारण या 13 जणांच्या मध्ये 4 जण माझ्या रायगड मधील होते. महाडच्या फौंजी आंबवडे येथील होते. तर बरेच जण भोर मधील होते. सगळयांनी खूप मेहनत घेतली होती. तरी सगळे दिवसभर हसत मुखाने काम करत. आम्हाला पहाटे 4 वाजता उठवायचे. गरम चहा कॉफी द्यायचे. म्हणजे त्यांना अडीच तीन ला उठावे लागत असणार ना. तसेच दिवसभर काम करून रात्री आम्हाला झोपायला 11 वाजत तेव्हा त्याना 12 ते साडेबारा होणार म्हणजे खरे तर किती वेळ त्यांना झोप मिळत असणार याचा विचार करता तरीही दिवसभर सगळ्यांशी हसतमुखाने सामोरे जाताना खुप कौतुक वाटत होते.
आमच्या पूजा जिथे जिथे आरत्या जिथे जिथे तिथे तिथे सगळी साग्रसंगीत तयारी ठेवायची. सगळे चांगले पार पडावे यासाठी जीवाचा आटापिटा करणारी ही मुले आपल्याच मुलांच्या वयाची होती. पण तरीही किती जबाबदारी पार पाडत होती.

जेवण बनवणारे महाराज जगदीश. ते जेवण अप्रतिम बनवायचे. सकाळ, दुपार ,संध्याकाळी वेगवेगळे चवीचे जेवण जेवून तुप्त करणारे महाराज त्यांची किचन टीम खरच किती कौतुक ! अहो आपल्या घरात चार माणसे आली तरी आपली त्रेधा तिरपीट होते. हे तर जवळजवळ 60 माणसे 20 दिवस जेवणार. बापरे ! अनेक महिलाना विचार करूनच घाबरायला होईल. मस्करी जाऊद्या पण खरंच आम्ही जाऊन आल्यावर समजले की यशोधनच्या नर्मदा परिक्रमा टूर का फेमस आहेत ते. लवकरच 100 वी परिक्रमा होईल त्यासाठीही बऱ्याच जाऊन आलेल्या लोकांनी आता पासून बुकिंग केले आहे.
आपण ही टूर करताना खरंच आपले राहात नाही आपण पूर्णपणे नर्मदा मय्या च्या आधीन होतो.

नर्मदा मय्या चा किनारा सोडताना आपल्या आईपासून दूर होत असल्याची भावना मनात येते आणि मन पुन्हा पुन्हा मय्या च्या किनाऱ्यावर येण्यासाठी धावू लागते.

मी स्पेशली नागपूरच्या मंगला घारे काकू यांचे आभार मानेन. त्यानी मला ही परिक्रमा कर असे सांगितले. जगातील सर्वात जुनी नदी ही नर्मदा आहे. परिक्रमा ही फक्त नर्मदेची होते. मार्कनडेय ऋषी यांना नर्मदेची परिक्रमा करण्यासाठी 45 वर्षे लागली होती. याचे कारण नर्मदेला मिळणाऱ्या 999 नद्या ही त्यांनी ओलांडल्या नाहीत त्यामुळे त्यांना 45 वर्षे लागली. शिवाची कन्या असणाऱ्या या नर्मदा नदी काठी कितीएक ऋषी येऊन ही भूमी पावन केली आहे त्यामुळे नर्मदा परिक्रमेचे महत्व समजते. विरक्ती देणारी नर्मदा मय्या एकदा सगळ्यांनी अनुभवावी.

घरी आल्यावर शास्त्राप्रमाणे कन्या पूजन, सवाष्ण पूजन झाले. मला 11 कन्या मिळाल्या. अगदी बाल मय्या पासून तिची सगळी रूपे असणाऱ्या कन्या आल्याने सगळे यथोचित पार पडल्याचा आनंद झाला.
समाप्त.

— लेखन : मानसी चेऊलकर. अलिबाग
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Vilas Baburao Sarode,Chh.sambhajinagar, Aurangabad on प्रेरणेचा झरा : अलका भुजबळ
विजय पवार, नासिक on प्रेरणेचा झरा : अलका भुजबळ