Saturday, July 27, 2024
Homeपर्यटननर्मदा परिक्रमा : ११

नर्मदा परिक्रमा : ११

महेश्वर दर्शन
उत्तर तट परिक्रमा

नर्मदा माईच्या कृपेने आम्ही काल रात्री गरुडेश्वरहून महेश्वरी मुक्कामी आलो होतो. पहाटे लवकरच आम्ही महेश्वर घाटावर निघालो. आम्हाला नर्मदा स्नान करायचे होते.

हा घाट अतिशय सुंदर आहे. याठिकाणी स्नान करायला खूप छान मिळते. स्नान झाल्यावर आज या घाटावर आमची आरती होणार होती.आणि त्यानंतर आम्ही पुढील दर्शने घेणार होतो.आरती झाली.दिवे लावून झाले. आमचा ग्रुप फोटो या घाटावर काढण्यात आला आणि मग आम्ही निघालो महेश्वर म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची नवी राजधानी पाहायला.

मूळची राजधानी इंदोरला आहे. नवरा, सासूबाई, सासरे ,मुलगा आणि सूना अशी सगळी जीवाची माणसं इंदोर स्थित राजवाड्यात डोळ्या देखत देवाघरी गेल्या कारणाने तो राजवाडा आता खायला उठला होता.
आणि म्हणून मग नव्या जागेचा शोध घेतला गेला.त्यात महेश्वर नगरी बाईंना आवडली.
ज्यांचं नाव घेतलं म्हणजे पुण्य प्राप्त होतं,
ज्यांचं नाव हाच एक श्लोक आहे,
ज्या देवी स्वरूप आहेत,
डोक्यावर पदर,
हातात सदैव शिवलिंग,
शालीन आणि कुलीन
भारतीय सभ्यतेच्या आदर्श आहेत अशा
महान विदुषी म्हणजे
महाराष्ट्राची थोर सुकन्या
पुण्यश्लोक अहिल्यादेवी.

सध्याच्या मध्य प्रदेशातील नर्मदेच्या काठावरील इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारे एक छोटंच पण ऐतिहासिक शहर. तालुका महेश्वर जिल्हा खरगोन.मराठी दौलतीचा सरंजाम अंगोपांगी ल्यायलेली अहिल्याबाई होळकरांची आवडती नगरी.
दुथडी भरून वाहणारी नर्मदा आणि तिच्याकाठी बांधलेले अप्रतिम सरस आणि देखणे घाट म्हणजे महेश्वर.
इथल्या एवढे रुबाबदार घाट मय्या किनाऱ्यावर अन्यत्र कुठंही पहायला मिळत नाहीत.
घाटाला लागूनच असलेली होळकर साम्राज्याची भरभक्कम गढी.दुथडी भरून वाहणाऱ्या इथल्या मय्येचं रुबाबदार रूप काही औरच.इथल्या स्नानाचा आनंद काही निराळाच.स्वच्छ निवळशंख पाणी.
सुरक्षित घाट.विस्तीर्ण पात्र.

इथे घाटांमुळे नर्मदा व नर्मदेमुळे घाट सौन्दर्यशाली झाले आहेत.हे एक अद्वैत आहे.याच घाटावर अहिल्यादेवी दररोज भल्या पहाटे स्नान करत असत.याच घाटावर कधीकाळी सव्वा लाख शिवलिंगे दररोज तयार केली जात होती.
एका शिवलिंगाची त्या पूजा करत .रयत सुखी राहावी म्हणून मय्येस आर्जव करत .

अहिल्येश्वर राजराजेश्वर काशी विश्वनाथ आदी मंदिरे तथा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा अत्यंत साधा पण सात्विक राजवाडा, राजगादी राहतं घर देवघर कल्पवृक्ष
कोटी लिंगार्चन विधी
अहिल्याबाई होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा…
ही सर्व महेश्वर ची अभिमानाने मिरवावीत अशी आभूषणे आहेत.
ती सर्व आपण पाहतो.

अहिल्येश्वराच्या देवळात बाईंना साक्षात शिवाने दर्शन दिले आहे.
मंदिरासमोर दोन दीपमाळा आहेत.
बाजूला आल्या गेलेल्यांसाठी ओवऱ्या आहेत.मंदिरा सभोवती अप्रतिम शिल्पकला पहावयास मिळते.
त्याचेच प्रतिबिंब महेश्वरी साड्यांच्या कलाकुसरीत उमटले आहे.मंदीर आजही भरभक्कम आहे.इथेच नि:शस्त्र राम राया आहेत.

राज राजेश्वराच्या देवळात शिवलिंगाच्या मागे परंतु वरच्या बाजूला सात आणि चार अखंड नंदा दीपक तेवत आहेत.इथेच कार्तवीर्याची प्रतिमा आहे.आवार प्रशस्त आहे.नर्मदेच्या अगदी काठावर अतिशय देखणे काशी विश्वनाथ मंदिर आहे.ईथे शिवलिंगास स्पर्श करून दर्शन घेता येते.

अहिल्यादेवींच्या देवघरात सोन्याचा पाळणा आणि सोन्याचा कृष्ण आहे.अनेकविध शिवलिंगे आहेत.
मल्हारी मार्तंडाचा चांदीचा ठसठशीत टाक आहे.राम शिव विष्णू पंचायतन आहे.
पाऱ्याचे शिवलिंग आहे.
पारंब्या नसणारे वडाचे झाड आहे.रयत सुखी रहावी म्हणून ईथे आजही दररोज १५००० शिवलिंगे बनविली जातात.त्यांची यथोचित पूजा केली जाते व मग त्यांचे विसर्जन केले जाते.त्याला कोटी लिंगार्चन विधी असं म्हणतात.

बाईंनी रयतेस पुत्रवत सांभाळले.आपले राजेपण त्यांनी कुठेही मिरविले नाही.
रयतेचा उत्कर्ष व्हावा अशी त्यांची धारणा होती.त्यांची न्यायदान प्रक्रिया प्रशंसनीय होती.रस्ते बांधून त्याच्या बाजूला उत्तम देशी झाडे लावणे,मठ मंदिरांची निर्मिती तथा डागडुजी करणे,पाणपोया धर्मशाळा यांची उभारणी करणे असे विपुल जनहितार्थ कार्य बाईंनी आजीवन केले.
हे राज्य पेशव्यांचे असून आपण निमित्त आहोत अशी त्यांची धारणा होती.त्यामुळेच दोन वेळचे अन्न तथा दोन साड्या एवढ्याच अत्यावश्यक गोष्टी त्यांनी राज कोषातून केल्या.
कोणत्याही गोष्टीचे श्रेय त्यांनी घेतले नाही.
एवढ्या मोठ्या साम्राज्याची महाराणी एका अत्यंत लहान खोलीत रहात होती…
तिथे एकाच व्यक्तीचा वावर होऊ शकत होता.
खोलीत वाकून जावे लागत होते..
अंगी नम्रता सदा असावी असा याचा अर्थ होतो.

बाईंचे चरित्र विमल होते.
जाड भिंगातून अनेक इतिहास कारांनी बाईंचे चरित्र अभ्यासले.
परंतु बाईंच्या नावावर कोणतीही आगळीक आढळली नाही.
त्या संतपदाला पोहोचल्या होत्या असा निर्वाळा तत्कालीन अभ्यासकांनी दिला आहे.

दानधर्माची अगाध सरिता प्रवाहित करणारी पुण्य सलीला म्हणजे अहिल्यादेवी. वयाच्या ४२ व्या वर्षी अहिल्यादेवींनी तुकोजीराव होळकर यांना दत्तक घेऊन राज्य शकट स्वहाती घेतला.निरपेक्ष भावनेनं सदैव प्रजाहित दक्ष असणाऱ्या अहिल्याबाई या देवी स्वरूप आहेत.
नर्मदेचं दुसरं रूप आहेत. व्रतस्थ जीवन जगणाऱ्या शापादपी शरादपि असणाऱ्या या साध्वीने मराठयांचा गौरवशाली इतिहास महेश्वर पर्यंत नेण्याचं मोठं कार्य केलं आहे.

अहिल्यादेवींनी जवळपास २८ वर्षे मध्य भारतात होळकर साम्राज्याचा दबदबा कायम ठेवला.
हातात शिवलिंग घेऊन रयतेस न्याय मिळवून दिला.तसेच वयाच्या ५८ व्या वर्षी घोड्यावर बसून हाती शस्त्र घेऊन सौभागसिंग व चंद्रावंत या राजपुतांचा बंदोबस्त देखील केला.

निमाड प्रांतात उत्तम प्रतीचा कापूस पिकतो.
या कापसापासून उत्तम दर्जाच्या व वजनास अत्यंत हलक्या सुती साड्या बनविण्याचे कारखाने अहिल्यादेवींनी महेश्वरात काढले.
महाराष्ट्र व निमाड प्रांतातील अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला. पती निधनानंतर बाईंनी रंगीत वेल बुटीदार वस्त्र अंगावर घातले नाही.
त्या नेहमी पांढरी साडी नेसत,असे गौरवोद्गार
सर मालकम या एका इंग्रज इतिहास काराने अहिल्याबाईंच्या बद्दल काढले आहेत.

भारतातील स्वच्छतम शहर इंदोरच्या निर्मितीचा व विस्ताराचा पाया दूरदृष्टीने अहिल्यादेवींनी घातला.
वैभवशाली महेश्वर पाहून आपण मंडलेश्वरला जातो.दत्तमंदिर आहे,
टेम्बे स्वामींची गुंफा आहे.गुप्तेश्वर महादेव आहे.महेश्वरच्या आधीपासून मंडलेश्वर
पुराणकाळी प्रसिद्ध आहे. इथं आद्यगुरू शंकराचार्य व मंडनमिश्र यांच्यात शास्त्रार्थ घडला.
अंतिम टप्प्यात आपण सहस्त्रधारा हे स्थान पाहतो. इथं सहस्त्रार्जुनाने आपल्या हजार बाहुत नर्मदेस पकडण्याचा प्रयत्न केला.इथं नर्मदेच्या सहस्त्र धारा पाहायला मिळतात.जलकोटीचं भव्य दिव्य दत्तमंदिर पाहतो.अशा प्रकारे महेश्वर दर्शन पूर्ण होते..

खरं सांगायचं तर एका दिवसात सम्पूर्ण महेश्वर दर्शन कठीण आहे.
इथं दोन तीन मुक्काम हवेतच.
क्रमशः

— लेखन : मानसी चेऊलकर. अलिबाग
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. अतिशय सुंदर लेखन मानसी मॅडम … 👌🏻👌🏻👌🏻जणू वाचकाचे मन पूर्ण नर्मदा परिक्रमा करून आल्यासारखे समाधान प्राप्त करेल. धन्यवाद या अप्रतिम लेखासाठी 🙏🏻🙏🏻🙏🏻😊

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८