खातेगाव ते जबलपूर
खातेगाव ते जबलपूर हे अंतर जवळपास ४०० किलोमिटर आहे. त्यामुळे लवकरच निघावे लागते हे आपणा सर्वांना ठाऊक आहेच.
आज आम्ही सकाळी पाच वाजता निघालो. गाडीत बसल्यावर प्रकाश काका नेहमीप्रमाणे प्रिय कोण ? या विषयाअंतर्गत संत ज्ञानेश्वर महाराज या विषयावर बोलले. २ अडीच तास सहज गेले. बघता बघता बालभोगाचं स्थान आलं.
संत ज्ञानेश्वर महाराजांनी भागवत संप्रदायाचा पाया घातला. ज्ञानाचं भांडार समस्त जगतासाठी खुलं केलं. गुह्य प्रकट केलं.
अज्ञान रुपी अंध:कारात चाचपडणाऱ्या सामान्य जनांना ज्ञानरुपी दीप दाखविला. त्यासाठी नाथ संप्रदाय थांबविला.
आणि सर्वांना समानतेच्या पातळीवर आणणारा जगत कल्याणाचा भागवत सांप्रदाय अर्थात वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली. जगत कल्याणासाठी देह झिजविला.
“ज्ञानदेवे रचिला पाया
उभारिले देवालया
नामा तयाचा किंकर
जेणे केला हा विस्तार
जनार्दन एकनाथ
खांब दिले भागवत
तुका झालासे कळस
भजन करा सावकाश….”
अशा अर्थी ज्ञानदेव हे क्रांतिकारी संत आहेत.
ज्ञानदेवांनी हे विश्व म्हणजे माझे घर असा विश्वव्यापक विचार मांडला. समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी त्यांनी ज्ञानाचे भांडार खुले केले.
भगवद्गीतेत एकूण १८ अध्याय आहेत. एकूण ७०० संस्कृत श्लोक आहेत. भगवद्गीता ही सोन्याची लगड आहे तर ज्ञानेश्वरी हा त्या लगडी पासून घडविलेला उत्तम अलंकार आहे.
परमार्थ रुपी गंगा आहे. ज्ञानदेव हे या वेदांत गंगेचे भगीरथ झाले. ज्ञानेश्वरी मध्ये ९०३३ ओव्या आहेत.
ज्ञानेश्वरी म्हणजे जसा खडी साखरेचा रवा
जसं मधानं भरलेलं पोळं.
जसं फुललेलं कमळ.
जसं पुनवेचं चांदणं.
जसा मलय गिरिवरचा चंदन.
जसा आईचा मायेनं माखलेला हात.
जसं ईश्वरी वरदान.
एवढी वर्षे झाली. पण ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ अजून जन्माला यायचाय. आणि ९०३३ ओव्यांचं सार सर्वस्व ज्याच्यात आहे त्याचं नाव पसायदान. पसायदान म्हणजे प्रसाद.
विश्वात्मक देवाकडे ज्ञानदेवांनी प्रसाद मागितला.
सज्जनांच्या विषयी प्रथम काहीच मागितलं नाही.
प्रथम मागितले ते दुर्जनांच्या विषयी.
खल वृत्तीच्या लोकांमध्ये असणारा खलपणा जाऊ दे. तो गेला म्हणजे ती माणसं चांगलीच आहेत. श्रीकृष्णाने सांगितलं, सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचे निर्दालन हे माझे कार्य आहे.
कृष्ण भगवंताने सुद्धा सज्जनांना प्राधान्य दिले.
ज्ञानदेवांनी मात्र दुर्जनांतील दुष्टावा जावा याला महत्व दिलं..
जो मुलगा वाईट आहे त्याच्याबद्दलच आईला विशेष प्रेम असतं.
त्या प्रमाणे जे सज्जन आहेत ते तरतीलच.
परंतु दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना कोण तारनार ?
ज्ञानदेव इतके कृपाळू आहेत. माऊली आहेत.
विश्वात्मक देवाकडे जे खळांची व्यंकटी सांडो असं मागणे मागितले.
संपूर्ण ज्ञानेश्वरी वाचन जर शक्य झाले नाही तर ज्ञानदेवांचे पसायदान हे फक्त नऊ ओव्यांचे ते वाचावं, म्हणावं. ९००० ओव्यांचं सार म्हणजे पसायदान.
संत ज्ञानेश्वर महाराज हा आपल्या अत्यंत आवडीचा असा विषय आहे. सर्वांनाच ते विवेचन मनःपूर्वक आवडलं.
उत्तम प्रतीची मिसळ आणि ब्रेड असा आजचा बालभोग होता. तो सर्वांनाच आवडला.. कधीकाळी हा रस्ता अत्यंत खराब होता. ड्रायव्हर ची कसोटी असायची. रस्ता उरकतच नव्हता.
पण आता चित्रं बदलत आहे. खुप चांगला रस्ता तयार झाला आहे.
बरीच कामे झाली आहेत. आता हा प्रवास खूपच सुसह्य झाला आहे. गर्दी फार नाही.
बांद्राभान घाटावर स्नान आरती करून आम्ही आज सायंकाळी साडे सहाच्या बेतावर ग्वारी घाटावर पोहचलो. येथील संध्याकाळी होणारी आरती बघण्यासाठी. त्यापूर्वी आम्ही घाटावर जाऊन दिवे लावले. इथला घाट बघत बसावा इतका सुंदर आहे. रोषणाईने उजळलेला हा घाट पाहताना खूप भावतो.
इथे बोटिंग असते. सगळ्या बोटी ही आकर्षक सजविलेल्या असतात. इथल्या शांत वातावरणात नर्मदेचे रूप खूप छान दिसते. घाटावर आरतीची तयारी खूप छान केलेली असते.
येथील सुश्राव्य मय्या आरती हा एक सुखद अनुभव आहे.
प्रवासाचा शीण जातो. जवळजवळ पाऊण तास मंत्रोचारात सुरू असलेली पूजा आरती पाहुन धन्य व्हायला होते. इथून जाऊच नये असेच वाटते. असं सगळं मय्या कृपेने छान चाललं आहे.
आज आमचा मुक्काम जबलपूरला होता. आमचे हॉटेल नर्मदेच्या काठावरच होते. रात्री जेवण आणि आराम नेहमीप्रमाणे.
क्रमशः
— लेखन : मानसी चेऊलकर. अलिबाग.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800