Saturday, July 27, 2024
Homeपर्यटननर्मदा परिक्रमा : १५

नर्मदा परिक्रमा : १५

अमरकंटक

नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून निघायचे होते. आज आम्ही मोठा प्रवास करणार होतो. आम्ही अमरकंटक याठिकाणी जायला निघालो.आरती आणि बालभोग झाला आणि आमचा प्रवास सुरु झाला. जाताना आम्ही घुघवा या स्थानी गेलो, म्हणजे परिक्रमा एका वैज्ञानिक वळणावर जाते.

नर्मदेचा उगम आजपासून किमान साडेसहा कोटी वर्षांपूर्वी झाला आहे. इथल्या जीवाश्म उद्यानात याचे दाखले आहेत.
जगाच्या पाठीवरची सर्वात वेगवान व प्राचीन नदी म्हणजे नर्मदा.
अविनाशी पित्याची अविनाशी कन्या म्हणजे नर्मदा. तिच्या सहवासात आजही कितीएक साधू संत स्वत:ला आणि तिला जाणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आम्ही राजयोगात बसने तिची परिक्रमा करत आहोत. सगळी सुखं हातात घेऊन. यालाच भाग्य म्हणतात !

पुढे जोगी टिकरिया या ठिकाणी आम्ही स्नान करून भोजन घेतलं.
अगदी तिच्या काठावर. छान मय्या किनारा आहे. पाण्याला वेग आहे.
या किनाऱ्याचं सुख इथं आल्याशिवाय कळत नाही. खरं सांगायचं तर मय्या किनाऱ्यावर जायला तिची आपल्यावर कृपा व्हावी लागते. जो किनाऱ्यावर जातो तो भाग्यवंत.
मर्त्य मानवाचं अवघं जीवन बदलण्याचं सामर्थ्य किनाऱ्यात आहे.

दक्षिण आणि उत्तर असे मय्येस दोन तट आहेत.
एक प्रपंचाचा तर दुसरा परमार्थाचा. परिक्रमेत ते ओलांडायचे नाहीत.
कारण सरळ आहे.
प्रपंचाची आसक्ती कमी करून मय्या किनाऱ्यावर परमार्थ करायला जावं.
पुन्हा प्रपंच करायला मागे यायचं नाही. मय्या किनारा म्हणजे अक्षरशः खजिना आहे खजिना.
खजिन्यात जसं अपार धन असतं, सोनं चांदी जडजवाहीर हिरे माणिक पोवळे मोती पैका अडका…. सारं काही बघूनच जीव दडपून जावा. मय्या किनाऱ्यावर देखील अपार धन आहे, शाश्वत सुखाचं. जे आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. सात्विक सुख समाधान.
डोळे निवतील इतकं सुंदर छान मय्यापत्र.
मय्या स्नानाचा स्वर्गीय आनंद.

काठावरची शेकडो वर्षे जुनी देवळं रावळं.
शिवाची वसतिस्थानं.
शिवास देखील आपल्या या लाडक्या लेकीची देखणी रूपं डोळे भरून पाहण्याचा मोह आवरता आला नाही म्हणून तर मय्या काठावर सर्व दूर शिवालये दिसतात.
स्थितप्रज्ञ होऊन मय्या पात्रात स्वतःला निरखीत असणारी झाडं झुडपं.
जणू तपस्वी साधुच.
मय्या पात्राजवळील वाडी वस्तीतून किनाऱ्यावर पाणी पिण्यासाठी आलेली जनावरं आणि पाणी भरण्यासाठी आलेल्या ललना. रुखातळी काही बाही वाचीत बसलेला एखादा पांथस्थ.
मय्या युगायुगांचा जीवनाधार आहे.
मय्यापात्र म्हटलं तर धीरगंभीर, गूढरम्य खळाळत वाहणारं.
कुठं बालरूपात, कुठं निज शैशवात, कुठं अवखळ अल्लड, कुठं तारुण्यातील बेफामपणा, तर कुठं वयपरत्वे आलेला पोक्तपणा !
कुठं सपशेल शरणागती तर कुठं फक्त समर्पण.
मय्यापात्र किनाऱ्याला लाटांच्या रूपानं मिठी मारणारं.
मय्यापात्रात शिरलेल्या समस्तांच्या शरीरावर आणि मनावर अक्षय आनंदाचं शिंपण करणार मय्यापात्र.
सौन्दर्यवती नर्मदेची अनेकविध मनोहारी रूपं निरखायची असतील तर किनाऱ्यावर जाण्याशिवाय गत्यंतर नाही.
परिक्रमावासी मय्येवर पूर्ण विसंबून असणारे.

मय्या प्रेमाचा झेंडा फिरवीत २८००ते ३००० किलोमीटर ची मय्या परिक्रमा लीलया करणारे.
“असो नसो भाव आलो तुझिया ठाया
कृपादृष्टी पाहे मजकडे पंढरीराया”
असे भावविभोर झालेले.
त्यांच्या सर्व प्रश्नाचं एकच उत्तर…
“नर्मदे हर
*नर्मदे हर……”
हा बीजमंत्र आहे आणि मय्या किनारा हे या मंत्राच्या उत्पत्तीचं स्थान आहे. मय्या सुखदायिनी आहे.
शाश्वत सुख म्हणजे नेमकं काय असतं हे अनुभवायचं असेल तर मय्या किनाऱ्यावर जायला हवं.
मय्या जीवनदायिनी आहे. तिनं अवघ्या जणांचं जीवन सुफलीत केलं आहे.मय्या किनाऱ्यावर ईप्सित कामना पुर्ण होतात.
मय्येस मागायचं काहीच नाही. तिला सर्व काही कळतं.ती जगदानंदी आहे. ती नदी नसून जगन्माता आहे.
शाश्वत सुख सदोदित वाटणारा मय्या किनारा अवर्णनीय आहे. आज सकाळी सकाळी असं नर्मदा चिंतन घडलं. तिच्याच कृपेने.

एकूणच जबलपुर पासून पुढे अमरकंटकला जाताना रस्त्याच्या दुतर्फा विपुल झाडी आहे. लोकवस्ती विरळ होत जाते. वाहतूक कमी. रस्ते अत्यंत सुंदर. आणि अशा निसर्ग संपन्न रस्त्याने प्रदूषण मुक्त वातावरणात होणारा आमचा प्रवास.
सगळंच विस्मयकारी.
पुढे एकुणात आम्ही खूप खूप आनंदात हरिपाठ घेत अमरकंटकला मुक्कामी पोचलो.
क्रमशः

— लेखन : मानसी चेऊलकर. अलिबाग.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८