अमरकंटक महात्म्य.
आता आम्ही अमरकंटक तीर्थक्षेत्रावर आलो आहोत.आज माझ्या आनंदाला सीमा नव्हती कारण आम्ही नर्मदा मय्या च्या उगमस्थानी होतो. आज खूप महत्वाचा दिवस होता माझ्यासाठी कारण आज याठिकाणी माझी आरती होती. परिक्रमेच्या सुरुवातीला आम्हाला एक कागद देण्यात आला होता आपल्याला आरतीसाठी कोणती तारीख हवी ते त्यावर लिहायचे होते. मी अंदाजे 25 तारीख या दिवशी माझी आरती लिहिली होती. पण माझ्या आयुष्यातील तो अतिशय भाग्याचा दिवस ठरला कारण ती आरती अमर कंटक येथे नर्मदा मय्या च्या उगम स्थानी होणार होती. या दिवशी गुरुवार होता,पुन्हा गुरूपुष्यामृत हा योग होता. तर शाकंभरी पौर्णिमा ही होती. सगळे जण म्हणत होते, अरे किती छान दिवस किती छान योग् होता माझ्या नशिबात ठरल्याप्रमाणे माझी आरती झाली. सगळी दर्शने छान झाली. डोळ्यात आनंदाश्रू होते माझ्या.
“अमरकंठ मे बिराजत..
घाट न घाट पुजावत..
कोटी रतन ज्योती..
ओम जय जगदानंदी”
असं गुणगान करत
श्री नर्मदा मय्ये च्या उगमस्थानाजवळ आम्ही बसच्या परिक्रमेत मय्या कृपेने मुक्कामी आलो.
श्री नर्मदा मैया जगदानंदी आहे. समस्त जगतास ती आनंद प्रदान करते. किती भाग्यवंत आहे अमरकंठ क्षेत्र आणि किती पुण्यवान आहे मेकल पर्वत जेथे साक्षात शिव हलाहल प्राशन केल्यानंतर दाह शमविण्यासाठी आले.
इथला शीतल वायू व छाया यांच्या सहवासात त्यांचे दाह दमन झाले व रथसप्तमी च्या सुमुहूर्तावर कंठाशी गोळा झालेली उष्णता घामाच्या द्वारे भगवान शिवाच्या शरीराबाहेर पडली .. तिचेच तर नाव “मा नर्मदा”…
समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी नर्मदा भूलोकी अवतरली.
अमरकंटक येथे ज्या ठिकाणी मैया अवतरली त्याच ठिकाणी तिला रेवा कुंडाच्या रुपात समस्त भाविक भक्तजनांच्या दर्शनासाठी अडवले आहे. नर्मदेच्या केवळ दर्शनाने देखील मोक्ष प्राप्त होतो असे म्हणतात.
नर्मदा सर्व स्थानांवर पूजनीय आहे.मोक्ष म्हणजे आसक्ती कमी होणं. मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष. जगत मिथ्या आहे आणि ईश्वर सत्य आहे याची जाणीव होणं म्हणजे मोक्षाचे धनी होणे. रेवा कुंडात जे पाणी आहे ते नर्मदा जल आहे अशी मान्यता आहे. नर्मदेच्या केवळ दर्शनाने मोक्ष प्राप्त होतो म्हणून रेवाकुंडाची निर्मिती केली आहे.
पुढे कोटीतीर्थ रामघाट पुष्कर बांध आदी स्थानावर मय्येस दर्शन स्नान तसेच भूगर्भातील पाण्याचा स्तर वाढवणे आदी कारणास्तव रोखून धरले आहे. परंतु ज्याप्रमाणे लहान बाळास भूक लागली तर आईने पाठ चाटवून बाळाचे पोट भरत नाही त्यासाठी बाळास आईने स्तनापाशीच घ्यावे लागते तद्वत रेवा कुंडात इथून तिथून नर्मदा जल आहे हे जरी खरे असले तरी आपल्या सारख्या सामान्य जनांना हात जोडण्यासाठी पूजा अर्चा करण्यासाठी नेमकी जागा हवी होती.
त्या जागेची स्थान निश्चिती करण्यासाठी आद्य गुरु शंकराचार्य अमरकंटक येथे आले.
त्यांना नर्मदेच्या अस्तित्वाची सर्वाधिक स्पंदने ज्या ठिकाणी जाणवली त्या ठिकाणी रेवा कुंडाच्या तळाशी त्यांनी एका शिवलिंगाची स्थापना केली. त्याला मुख्य उगमस्थान असं नाव दिलं.
शिवलिंगा भवती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिर उभारलं आणि मंदिरावर सव्वा किलो सोन्याचा कळस चढविला. शिवलिंगावर नर्मदा जलाचा अखंड अभिषेक होत आहे.
श्री नर्मदा मैया वैराग्याची अधिष्ठात्री आहे. किती एक साधुसंत मुनिवर ऋषी मुनी अवलीये स्वतःला आणि श्री नर्मदेला जाणण्याचा प्रयत्न अनादि अनंत काळापासून तिच्या दोन्ही तटांवर करत आहेत.
अमरकंटक हे क्षेत्र मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दोन राज्यांच्या अगदी सीमेवर मध्यप्रदेशात आहे. याची उंची समुद्रसपाटीपासून अंदाजे एक हजार ५१ मीटर किंवा तीन हजार फूट आहे.इथं आजही साल वृक्षांचं घनदाट जंगल आहे. अमरकंटक हे तीर्थक्षेत्र आहे आणि तसेच ते थंड हवेचे ठिकाणही आहे. इथे वर्षभर परिक्रमावासी आणि पर्यटक यांची गर्दी असते. अमरकंटक हे क्षेत्र उत्तर तटावर वसलेले आहे. आता ते दक्षिण तटावरही विस्तार पावत आहे. उगमापासून पुढे सलग आठ किलोमीटर बाल स्वरूपातील मय्या मेकल पर्वताच्या अर्थात भगवान शिवाच्या अंगा खांद्यावर खेळत, बागडत, नाना प्रकारच्या बाललीला करत कपिल धारेकडे झेपावली.
इथं दक्षिण तटावरील सातपुडा व उत्तर तटावरील विंध्याचल हे दोन पर्वत अर्थात मय्येचे दोन्ही बंधू तिच्या स्वागतासाठी तिला सामोरे आले आहेत.
उगमाजवळील कपिल धारे पाशी मय्येचं अगाध रूप जाणण्यासाठी व तपाचरण करण्यासाठी साक्षात मुनिवर्य कपिल आले आहेत. बाल स्वरूपातील मय्येस जाणता जाणता त्यांनी घोर साधना केली व त्यांचे चरण ठसे तिथल्या पाषाणात उमटले.
भृग कमंडल या ठिकाणी भृग ऋषी आले. इथेच टेम्बे स्वामी आले. मग मूळ स्वरूप मय्येचे नेमकं आहे तरी कसं ?
याचा शोध घेण्यासाठीच तर अनादी काळापासून नर्मदेची परिक्रमा करण्याचा प्रघात पडला आहे.
मय्या काठ ही तपोभूमी आहे. जल व बाल स्वरूपातील मय्येस जाणण्यासाठी स्वर्गीय देव व दत्त संप्रदायातील सर्व अधिकारी महात्मे मय्ये वर आले. निमित्त मात्र अमरकंटक झाले. अमर कंटक धन्य झाले. मय्येचे उगमस्थान झाले.
इथेच मय्या बालपणी माईकी बगिया येथे खेळली. तिथे तिचे चरनोदक सापडले.
इथेच माईचा विवाह ब्रम्हपुत्र शोन यांचेशी ठरला होता. पण विवाह योग मय्येच्या भाग्यात नव्हता. म्हणून तर कुमारी कन्यकांच्या मध्ये मय्येस पाहण्याची रीत प्रचलित झाली.
इथेच भृगु ऋषी आले.
दुर्वास ऋषी आले.
कपिल मुनी आले.
टेंबे स्वामी आले.
शंकराचार्य आले.
कबीर आले.
इथेच शिव आपल्या लेकीला आपल्या पुढ्यात घेऊन बसले. इथे मनमोहक कपिलधारा आहे.
दुग्ध धारा आहे.
शंभूधारा आहे.
दुर्गा धारा आहे.
नर्मदा शोन व जुहीला या नद्यांची उगमस्थाने आहेत.
माईका मंडप आहे.
या स्थानी माईस भेटायला आजवर किती साधू संत आले काही गणती आहे का ?
पण एक आहे ही सर्व अनवट जागेवरील अतिसुंदर स्थाने बघण्यासाठी वेळ द्यावा लागतो व कष्ट ही पडतात.
अमरकंटक क्षेत्रास सादर प्रणाम. कारण जगत कल्याणासाठी आपली मय्या सर्वप्रथम इथेच अवतरली. अमरकंटक धन्य जाहले.
पंढरपूर नगरीत जसे पांडुरंगाचे महत्व आहे त्यापेक्षा ज्या विटेवर देव उभा राहिला त्या विटेचे भाग्य थोर आहे.
कारण जगजेठी परमात्मा तिच्यावर पाय ठेऊन उभा राहिला आहे व त्याच्या चरणांचे दर्शन घेताना आपसूकच त्या विटेचेही भक्ती भावाने दर्शन घडते..””
किती ग पुण्य केलं..
तू तर कुंभाराच्या विटे.
विठू दयाळाची माझ्या. चरणे सापडली कुठे..””
अमरकंटक येथेच दक्षिण तटावर अनेकांनी सेवाकेंद्र उभारली आहेत. येथे पायी परिक्रमा करणाऱ्या मूर्तींना चहा नाश्ता भोजन निवास व्यवस्था दिली जाते. अशी सेवा आपल्याला ही करता यावी ही माझीही इच्छा झाली.
क्रमशः
— लेखन : मानसी चेऊलकर. अलिबाग.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
Very nice artical