Wednesday, June 19, 2024
Homeपर्यटननर्मदा परिक्रमा : १९

नर्मदा परिक्रमा : १९

नर्मदापुरम ते ओंकारेश्वर

काल आम्ही नर्मदापूरम् ला वेळेत पोहोचल्या कारणाने इथलं देव दर्शन कालच पुर्ण झाले होते. त्यामुळे आज आम्ही भल्या पहाटे पाच वाजता ओंकारेश्वर च्या दिशेने प्रयाण केले. वाटेत हरदा या मध्य प्रदेशातील जिल्ह्याच्या गावातील ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी स्थापन केलेले पट्टाभिराम या नावाचे रामरायाचे मंदिर पाहिले. मंदिर खरेचंच अप्रतिम असे आहे.या मंदिरात रामरायाच्या मांडीवर सीता मैया आहे. लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे रामराया वर चवऱ्या ढाळत आहेत.शेजारी पटकन लक्षात येणार नाहीत परंतु वसिष्ठ मुनी देखील आहेत. रामरायाच्या अभिषेकाचा हा सोहळा आहे असे वाटते आहे.

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी जातीने उपस्थित राहून हे मंदिर उभारले आहे. पुढे सोयीच्या ठिकाणी बालभोग घेऊन आम्ही खांडवा मार्गे ओंकारेश्वर ला पोहोचलो. अंतर मोठं. वेळही खुप लागतो. शेवटच्या टप्प्यात अंतर उरकता उरकत नाही.
संकल्पपूर्तीची पूजा व प्रायश्चित्त कर्माची पूजा या दोन्ही पूजा गुरुजींनी आजच पूर्ण करायच्या होत्या.

यशोधन च्या मुलांनी पूजेची सगळी तयारी घाटावर केली होती. आम्ही सगळे पूजेसाठी बसलो. गुरुजींनी अतिशय सुंदर पूजा केली. वातावरण अतिशय प्रसन्न होते. मय्या पात्रात आज पाणी भरपूर होतं. पूजा पूर्ण होताना ते वाढलं. स्नान करताना आपण किनारा अस्वच्छ करतो आहोत याचं भान मात्र कुणालाही नव्हतं.
प्लास्टिक, ओले कपडे, नारळाच्या शेंड्या, चपला, शाम्पू ची रिकामी पाकिटे, पणत्या….अशा कितीतरी वस्तू ईथे उघड्यावर टाकताना कुणालाही काहीही वाटत नव्हतं. यशोधन च्या टीमने ते सर्व आधी झाडून स्वच्छ केलं.

स्नान घडलं… पुजा झाली. प्रसाद आणि चहा झाला. बघता बघता संकल्प जो याच ठिकाणी सोडला होता तो पूर्ण झाला. त्यानंतर प्रायश्चित्त कर्म पुजा केली. अतिशय छान झाल्या दोन्ही पूजा. आनंद झाला. हॉटेलवर परतलो आणि सुखद धक्का मिळाला आमची परिक्रमा पूर्ण झाली त्यानिमित्ताने आमचे खूप छान स्वागत करण्यात आले. हॉटेल च्या दारात आमच्या स्वागतासाठी फुलांच्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. आम्ही येताच आमचे स्वागत हार घालून करण्यात आले. सर्वांचे छान फोटो सेशन झाले. रात्री पुरणपोळीचं प्रथेप्रमाणे भोजन झालं. ब्राम्हण जेवूनि तृप्त जाहला असा कृतकृत्य भाव मनात आला.

सर्वांनी बस प्रवासात परिक्रमा यशस्वी झाल्या बद्दल खूप खूप कौतुक केलं. आज सगळ्यांचे मन भरून आले होते. कारण उद्या दुपारनंतर जो तो आपल्या घरी निघणार होता. जवळ जवळ 20 दिवस सगळे एकत्र असल्याने शेवटी एक कुटुंब बनले होते. त्यामुळे सगळ्यांना निरोप द्यायला आता मन भरून आले होते.
मनात खूप काही होते परिक्रमा पूर्ण झाल्याचा आनंद होता उद्या परत आपण आपल्या घरी जाणार हा आनंद होता. परंतु त्याचवेळी आपण एकमेकांना दुरावणार याचेही दुःख होते.
क्रमशः

— लेखन : मानसी चेऊलकर. अलिबाग
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments