सर्वात पवित्र समजल्या गेलेल्या गंगा नदीची सुध्दा परिक्रमा होत नाही पण नर्मदा नदीची मात्र परिक्रमा होत असते. इतकी नर्मदा परिक्रमा अनन्यसाधारण महत्त्व असलेली आहे.
कोकणातील पहिल्या महिला टिव्ही पत्रकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अलिबाग येथील धाडसी मानसी चेऊलकर या आजपासून नर्मदा परिक्रमा सुरु करीत आहेत. त्याचा दररोज चा वृत्तांत त्या आपल्या पोर्टलसाठी लिहिणार आहेत. या बद्दल त्यांचे मनःपुर्वक आभार आणि परिक्रमा यशस्वी व्हावी यासाठी हार्दिक शुभेच्छा.
– संपादक
नर्मदा परिक्रमा करायचे खूप दिवस मनात होते. परंतु तब्बेतीच्या काही बारीक सारीक तक्रारी मुळे परिक्रमा करता येईल का ? अशी शंका मनात होती.
एकदा अंदमान टूर मध्ये असताना नागपूर येथील एक काकू म्हणाल्या की त्यांनी पुण्यातील यशोधन ट्रॅव्हल सोबत बसने 20 दिवसाची नर्मदा परिक्रमा केली ती खूप छान झाली. सगळे सिनियर सिटिझन होते. पण तरीही परिक्रमा खूप छान झाली. ते ऐकून मीही यशोधन च्या ऑफिस चा नंबर घेतला आणि त्यांना फोन करुन या परिक्रमेची माहिती घेतली आणि 11 जानेवारी 2024 या तारखेची टूर बुक झाली.
ही टूर करताना 2 पर्याय होते. एक तर विमानाने इंदूर पर्यंत जाणे किवा पुण्यातून/मुंबईतून ट्रेन ने इंदौर पर्यंत जाणे. यावेळी मी ठरवले दरवेळी विमानाने जात असल्याने यावेळी ट्रेन ने जाऊ. सोबत सगळा ग्रुप ही होताच. मग तसेच ठरले आणि मी अलिबाग हून पुण्यात आले.
खूप धक धक होती. ट्रेन मिळेपर्यंत जीव भांड्यात होता खरा. पुणे स्टेशन वरती सगळा ग्रुप एकत्र आला. ट्रेन ची तिकिटे मिळाली आणि वाट पहात पहात ट्रेन आली. एकदाचा बोगी मध्ये प्रवेश मिळाला आणि सीट मिळून सामान सेट झाले. हाश हुश करत सीट वरती स्थिरावले. ट्रेन मध्ये बसून ट्रेन सुरु झाली. काही फोन झाले, सुखरूप ट्रेन मिळाली बसले असे सांगितले आणि प्रवास सुरू झाला नर्मदा परिक्रमेचा.
आता रात्रभर प्रवास होता. सकाळी साडे आठ वाजता आम्ही इंदौर ला सुखरूप पोहचलो. हे नर्मदा परिक्रमा पूर्वीचे मनोगत आहे. उद्यापासून सुरू होणारा प्रत्येक दिवस मी लिहिणार आहे. सर्वांनी तो वाचून आपल्या आयुष्यात एकदा तरी नर्मदा परिक्रमा करावी, अशी एक माझी विनंती आहे.
— लेखन : मानसी चेऊलकर. अलिबाग.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800