ओंकारेश्वर ते बडवाणी
आजपासून आम्ही परिक्रमा उचलली. सगळे तृप्त झाले. सर्व जामानिमा आवरून आम्ही बडवाणी च्या दिशेने निघालो. वाटेतील काही परिसर पासून नर्मदा नदीचे दर्शन घेत घेत बडवाणी ला मुक्काम करायचा होता. गाडीत प्रकाश मोळक काका त्या त्या भागातील माहिती विस्तृत देत होते त्यामुळे खूप छान वाटत होते.
पहिल्या टप्प्यात आम्ही रावेरखेडीला गेलो. रावरखेडी या ठिकाणी जाताना काकांनी श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा सगळा इतिहास डोळ्यासमोर आणला होता. त्यामुळे या स्थळाचे दर्शन घेण्यास मन आतुर झाले होते. आता आम्ही तुफान गाड्यांमध्ये बसून तिकडे जायला निघालो. रस्त्याचे काम सुरू असल्याने अरुंद रस्ता असल्याने मोठी बस बाहेरच मुख्य रस्त्याच्या बाजूला लावली आणि आम्ही या तुफान गाड्यांमधून निघालो. निघताना दुपार असल्याने छान गार लिंबू सरबत आम्हाला देण्यात आले.
येथे कधी काळी ट्रॅक्टर मध्ये बसून तर कधी चालत देखील जावे लागले असल्याचे काकांनी सांगितले. आता वाहनांचा स्तर उंचावला आहे.
जुनी लोकं म्हणायची….
जीवन हा उनसावलीचा खेळ आहे. दिवस पालटतात हे बाकी खरं…
आम्ही साधारण मुख्य रस्त्यापासून अर्धा तास प्रवास केला आणि श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या समाधी ठिकाणी पोहचलो. समाधीची असलेली ती दुरावस्था पासून मन खिन्न झाले. हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती, संभाजी महाराज यांच्यानंतर नाव घेतले जाते ते श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे. ज्यांनी आपल्या 20 वर्षाच्या काळात एक इतिहास रचला. त्यांच्या समाधी स्थानावर “नाही चिरा नाही पणती” अशी दुर्लक्षित अवस्था आहे. एक सरकारी कर्मचारी आल्या गेल्याची नोंद ठेवत बसून असतो. तोही कधी असतो कधी नसतो.
काही हौशी पर्यटक मजेने हा पिकनिक स्पॉट असल्या प्रमाणे चपला बूट घालून वावरत होते.
यांना श्रीमंत बाजीराव पेशवे काय आणि कसे कळणार ? आणि कोण समजून सांगणार
की हा अपराजित योद्धा आहे !
दिल्लीच्या तख्तावर मराठयांचा जरीपटका फडकवण्याची दुर्दम्य आस ज्याच्या मनात धगधगत होती…..नियती मात्र क्रूर….
मराठयांचं साम्राज्य उभं करू पाहणारा हा राजबिंडा शिलेदार….
अवघ्या महाराष्ट्र मंडळाच्या किती अपेक्षा होत्या त्यांच्याकडून…
ऐन चाळीशीत मृत्युने मय्या किनाऱ्यावर गाठलं…त्या किनाऱ्यावर आम्ही नर्मदेचे दर्शन घेतले. हात जोडले नर्मदे हर हर …
रावेरखेडी इथं जाऊन श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं म्हणजे परिक्रमा आपसूक एका ऐतिहासिक वळणावर पोचते.
पुढं आमी तेलीया भटीयान या गावी जाऊन सियाराम बाबा या चालत्या बोलत्या संतांचे दर्शन घेतले.
बाबा सर्वांत आहेत आणि बाबा कुणातच नाहीत.
नर्मदा मय्येचा किनारा अशा अनेक साधुसंतांनी समृद्ध केला आहे..
नर्मदा मय्या तिला जे प्रिय आहेत त्यांना काठावर बोलावून घेते. त्यातीलच एक सियाराम बाबा.
नर्मदा ही वैराग्याची अधिष्ठात्री आहे…
तिच्या किनाऱ्यावर किती एक साधू संत , महंत अनादी काळापासून तिला व स्वतःला जाणण्याचा प्रयत्न करीत आहेत.आज आम्ही सियाराम बाबा या महात्म्याच्या दर्शना साठी दक्षिण तटावर तेलिया भटीयान या गावात गेलो होतो.
गर्दी नव्हती. महात्मा सगळ्यात आहे आणि कुणातही नाही असं म्हटलं तर ते जास्त संयुक्तिक आहे.
हे हनुमंतरायाचे भक्त आहेत. त्यांचे वय नीटसे समजले नसले तरी शंभरी पार केलेली असावी असा अंदाज आहे.आलेल्या प्रत्येक भक्तास ते स्वतः प्रसाद देत होते. त्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही परत आमची बस जिथे होती तिथे आलो. चहापान करून मजल दरमजल करत अनेकविध विषयांना स्पर्श करत आम्ही बडवाणीला मुक्कामी पोचलो. त्याच काळात काकांनी सगळ्यांना हरिपाठाचे महत्व विशद केले. हरिपाठ हा आता आपल्या प्रत्येक परिक्रमेचा अविभाज्य घटक झाला आहे.
हरिपाठ ही ज्ञानदेवांची ओळख आहे.
हरिपाठ हा सुगम आहे.
हरिपाठ हा सुलभ आहे.
हरिपाठ ही वारकऱ्यांची संध्या आहे.
हरिपाठ म्हणण्यास काळवेळ लागत नाही.
हरिपाठासाठी कुणाकडूनही संथा किंवा दीक्षा घ्यावी लागत नाही. हरिपाठ येत नाही किंवा ठाऊक नाही असा वारकरी नाही.
हरिपाठ हे आपल्या परिक्रमेचं कवचकुंडल आहे.
हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा
पुण्याची गणना कोण करी…
असं ज्ञानदेवांनी जे म्हटलंय त्याचा अर्थबोध होण्यासाठी हरिपाठ म्हणण्याचा नित्य नियम मात्र असायला हवा. आता रोज संध्याकाळी बस मध्ये हरिपाठ गुरुपाठ रामरक्षा स्तोत्र तसेच गायत्री मंत्र असे होऊ लागले. हॉटेलवर आल्यावर सगळ्यांनी आापल्या रूम ताब्यात घेऊन सामान ठेवले आणि मग आरतीचे क्रम जसे लावलेत तसे आरती झाली.परिक्रमा सूरू झाल्या नंतरची पहिली आरती तालासुरात जाहली.
भोजन करून निद्राधीन जाहलो.
क्रमशः
— लेखन : मानसी चेऊलकर. अलिबाग
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
Very informative tour 👍
मानसी मॅडम,
नर्मदा परिक्रमेचे खूप छान शब्दांकन करीत आहात. अध्यात्म, इतिहास, लालित्य आणि निसर्ग वर्णन वाचून मन प्रफुल्लित होते.
सुंदर लेखनाबद्दल अभिनंदन आणि
आपल्या या परिक्रमेस खूप खूप शुभेच्छा.
( अरुण बोऱ्हाडे, पिंपरी चिंचवड, पुणे)
हर हर नर्मदे ॥
👍👌❤️🙏🏻🚩