Wednesday, September 11, 2024
Homeपर्यटननर्मदा परिक्रमा : 5

नर्मदा परिक्रमा : 5

बडवाणी ते शहादा

आज सकाळी नेहमीप्रमाणे पहाटे उठून आवरून बालभोग घेतला. आज बालभोग साठी मेनू होता कन्हेरी आणि उपमा खाऊन आम्ही राजघाट या परिसरात निघालो.

राजघाटावर येताना प्रकाश काकांनी इथली नर्मदा नदीची परिस्थिती सांगितली. गुजरात मध्ये झालेल्या सरदार सरोवरामुळे नदीचे पाणी या बाजूला रस्त्यावर येऊन इथला घाट पाण्याखाली गेला असून शूलपाणी कडे जाणाऱ्या रस्त्यावर आता पाणीच पाणी आले आहे याठिकाणी बडवानीच्या राजघाटावर वरील दत्त मुर्ती असणारे दत्त मंदिर आहे. मूर्ती एक मुखी आहे. येथे टेंब्ये स्वामींनी चातुर्मास केला होता.
आज हे स्थान सरदार सरोवर धरणातील पाणी साठ्यामुळे बुडीत क्षेत्रात आले आहे. उन्हाळ्यात पाणी कमी झालं म्हणजे मंदिरात जाता येते.
आम्ही त्या तटावरील परिसरात जाऊन नदीमध्ये स्नान केले आणि मग तिथे नर्मदेच्या तीरावर आरती झाली. काठावर कणकेचे दिवे लावले आणि परिक्रमेला सुरुवात झाली.

तिथून आम्ही परत हॉटेल वर आलो आणि आमचे सामान घेऊन दुपारचे प्रासादिक भोजन घेऊन निघलो.
आम्ही आज शहादा येथे मुक्कामी जाणार होतो. हा परिसर नंदुरबार मध्ये येतो. म्हणजे आमची परिक्रमा मध्यप्रदेश मधून आता महाराष्ट्रात आली. नर्मदा नदी ही 85 टक्के मध्यप्रदेशात आहे. 2 टक्के महाराष्ट्रात आहे तर 13 टक्के गुजराथ मध्ये आहे. त्यामुळे आमच्या परिक्रमेत आमचे 12 मुक्काम मध्यप्रदेश मध्ये, 1 मुक्काम महाराष्ट्र मध्ये आणि 4 मुक्काम गुजराथ मध्ये आहेत.

शहादा हे सगळं आदिवासी बहुल क्षेत्र आहे.सीमावर्ती भाग असल्याने मराठीवर हिंदी व हिंदीवर मराठीची छाप दिसते.
गुजराती लहेजा देखील जाणवतो. या सर्वांच्या मधून जी नवी भाषा तयार झाली आहे तिला अहिराणी असं म्हणतात.
लोकांचं राहणीमान वागणं बोलणं या सर्वांवर संस्कृती आक्रमण झाल्याचं जाणवतं. अर्थात हे स्वाभाविक आहे. या सर्व भागात आजही आठवडे बाजार भरतो. वाटेत निवाली गावाचे बाहेर चेक पोस्टवर मध्य प्रदेशचा टॅक्स भरला.

मध्य प्रदेशातील वन विभागाच्या मालकीच्या रस्त्याने आपला प्रवास होत असतो.
निर्मनुष्य गुळगुळीत आणि काळ्या कुळकुळीत छान अशा रस्त्याने बऱ्यापैकी जंगलातुन आजचा प्रवास झाला. पळसूद, पानसेमल, खेतीया अशी गावं लागतात. गहू, हरभरा व केळीच्या बागा बऱ्याच ठिकाणी दिसतात. बसच्या प्रवासात काकांनी सर्वांना खानदेश कन्या बहिणाबाई चौधरी व संयुक्त महाराष्ट्र याबद्दल विस्तृत माहिती दिली.
त्यानिमित्ताने बहिणाबाई चौधरी या महान कवियत्रीचे व संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्व योगदान कर्त्यांचे स्मरण झाले.त्यांचं स्मरण ही देखील परिक्रमाच आहे. प्र के अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, श्रीपाद अमृत डांगे, ना ग गोरे, एसेम जोशी, डॉ बाबासाहेब आंबेडकर सेनापती बापट आदींचं संयुक्त महाराष्ट्राच्या साठीचं योगदान शब्दातीत आहे.

याच काळात राष्ट्र सेवा दलाचा जन्म झाला. या सांस्कृतिक दलाने महाराष्ट्राला निळू फुले, दादा कोंडके, वसंत बापट, वसंत सबनीस, शाहीर साबळे, शाहीर अमर शेख, शाहीर लीलाधर डाके असे एकापेक्षा एक असे नामवंत हिरे दिले.
कुणी लेखक तर कुणी शाहीर तर कुणी कवी तर कुणी फरडे वक्ते तर कुणी हाडाचे कलाकार..
ते सर्व जण झटले म्हणून संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला.

खानदेश कन्या बहिणाबाई चौधरी यांचं मराठी सारस्वतामधील योगदान अतुलनीय असं आहे.
जन्म – ११/०८/१८८०
मृत्यू – ०३/१२/१९५१
आईचे नाव भिमाबाई वडिलांचे नाव उखाजी महाजन. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी नथुजी चौधरी यांच्याबरोबर बहिणाबाईचं लग्न झालं ३० व्या वर्षी वैधव्य आलं.बहिणाबाईंची गाणी किंवा कविता म्हणजे खानदेशी मातीतील महाकाव्यच…
स्वतः निरक्षर असूनही भल्याभल्यांना विचार करायला लावणारी बहिणाबाईंची कविता सरस आहे आणि देखणी देखील आहे.
किंबहुना सरस आहे म्हणूनच देखणी आहे. मनस्वी आयुष्य त्या जगल्या. बर्‍यावाईट प्रसंगांना धीटपणाने सामोरे गेल्या.तक्रार केली नाही. मृदू क्षमाशील राहून सुखातलं सुख वाढवलं आणि आपल्याला लाभलेल्या असामान्य प्रतिभेच्या बळावर आपल्या अनुभवांच्या सार सर्वस्वाला त्यांनी शब्द रूप दिलं…
मतलबाचेसाठी मान माणूस डोलवी…..
इमानाचे साठी कुत्रा
शेपूट हालवी..
माझी माय सरसोती
मला शिकविते बोली
लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली……

खान्देश कन्या बहिणाबाई यांचं समयोचित स्मरण ही देखील परीक्रमाच आहे….तद्नंतर पुष्पदंतेश्वर केदारेश्वर
काशी विश्वनाथ
अशी मंदिरे पाहिली….
असं सर्व पाहून आम्ही शहादा मुक्कामी आलो.
रस्त्यात बावनगजा येथे आलो. बडवाणी पासून बारा पंधरा किलो मीटर अंतरावर असणाऱ्या बावनगजा या जैन तीर्थक्षेत्रावर.

जैन धर्मात एकूण २४ तीर्थंकर झाले आहेत.
पैकी प्रथम तीर्थंकर वृषभदेव किंवा आदिनाथ भगवान यांची ८४ फूट उंचीची सातपुड्याच्या पहाडात कोरलेली अतिशय सुंदर अशी उभी दिगंबर अवस्थेतील मूर्ती येथे आहे.काही पायऱ्या चढून जावे लागते.
मूर्तीच्या पायाशी/ पंजा जवळ किमान १०० नारळ बसतील एवढे ते मोठे आहेत. आजूबाजूचा परिसर ही खूप छान आहे. कोण्या मुर्तीकाराने ही मूर्ती कोरली ते समजलेले नाही पण मूर्तीची पूजा करण्यासाठी जैन धर्मीय तसेच हिंदू धर्मीय ही खूप येत असतात.

त्यानंतर परत प्रवास सुरू झाला.आम्ही शहादा कडे जाताना प्रकाशा या गावी आलो.
प्रकाशा येथील पुष्पदंतेश्र्वर मंदिरातील जानवे असणारे शिवलिंग आहे. हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे.येथेच शिव महिमन स्फुरले व ममलेश्र्वर मंदिरातील भिंतींवर ते लिहिले आहे. आम्ही या मंदिरात पूजा अभिषेक करून सामूहिक शिव
महिमन स्त्रोत्राचे पठण केले.तिथे चहा घेऊन आम्ही दुसऱ्या मंदिरात गेलो.

प्रकाशा येथेच काशी नगरीची उभारणी करण्याचे स्वर्गलोकात ठरले होते.त्यानुसार सहा महिन्यांचे रात्रीत हे निर्माण कार्य पूर्ण करण्यासाठी स्वर्गातून यक्ष, किन्नर, गंधर्व, अप्सरा आदी कलावंत आले होते. पैकी एक गंधर्व रोज पुष्प अर्पण करून शिवपूजा करून मग निर्माण कार्य करत असे. एके दिवशी पूजेत एक फुल कमी पडले म्हणून त्या गंधर्वांने पुष्प समजून दंत अर्पण केला. शिव प्रसन्न झाले व त्यास शिव महीमन लिहिण्याचा आशीर्वाद दिला. निर्माण कार्य चालू असतानाच रात्र सरली व दिवस उजाडला…प्रकाश पडला म्हणून या गावास प्रकाशा हे नाव पडले….
हे प्राचीन शिवालय आहे.

पुष्पदंतेश्वर मंदिर परिसरात प्रकाशा नावाचे धरण पाहायला मिळते.तापी पुलिंदा आणि गोमई या तीन नद्यांच्या संगमावर हे धरण बांधले आहे.
तापी नदी मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात मुलताई नावाच्या गावात उगम पावली आहे.नर्मदे प्रमाणेच तापी नदी पश्चिम वाहिनी आहे.
ती गुजरात राज्यातील सुरत शहराच्या बाहेर अरब समुद्रात विलीन झाली आहे.

अशाप्रकारे वेगवेगळी देवदर्शन घेऊन आम्ही गाडीत बसलो. मग रोज प्रमाणे सामूहिक हरीपाठ गुरीपाठ वाचले. रामरक्षा झाली. भीमरूपी झाले.तोपर्यंत हॉटेल आले. आम्ही निवासी मुक्कामी आलो.रात्री जेवणा पूर्वी ठरल्या प्रमाणे नर्मदे ची आरती झाली. नर्मदा अष्टक झाले.मग भोजन करून सगळेजण झोपायला गेलो.
क्रमशः

— लेखन : मानसी चेऊलकर. अलिबाग.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments