कोविड काळात बंद पडलेली हैद्राबाद येथील मराठी ग्रंथ संग्रहालय नल्लाकुंटा शाखेचा विवेक वर्धिनीच्या सहकार्याने पुनर्ज्जीवितीकरण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यामुळे त्या भागात रहाणाऱ्या वाचक वर्गाला या गोष्टीचा फार आनंद झाला. ग्रंथालयाच्या पुनर्जीवनाला अर्थ लाभला.
या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ लेखिका सौ मीनाताई खोंड यांच्या शुभहस्ते शाखेचे उद्घाटन झाले.
प्रथम सौ मीनाताई खोंड यांच्याहस्ते सरस्वती पूजन झाले. डॉ.शैलजा जोशी शांडिल्य यांनी मान्यवरांना व्यासपिठावर आमंत्रित करून स्वागत केले. अंजली पळणीटकर यांनी मीनाताई खोंड यांचा परिचय करून दिला. ग्रंथालयाच्या उपाध्यक्षा सौ मंगलाताई पळणीटकर यांनी मीनाताई खोंड यांचा स्मृती चिन्ह देऊन सत्कार केला.

यानंतर, नल्लकुंटा शाखेचा सन २००३ पासूनचा इतिहास ग्रंथालयाचे सचिव श्री सतीश देशपांडे यांनी उपस्थितांना थोडक्यात सांगितला.
सौ मीनाताई खोंड यांच्या भाषणात त्यांनी पुस्तक वाचनाची सवय अंगीभूत करण्यावर विशेष भर दिला. पुस्तक वाचनामुळे बऱ्याच लोकांचे जीवन कसे बदलून गेले याविषयी उदाहरणे देऊन त्या बोलत होत्या. गांधीजी, अण्णा हजारे, अब्राहम लिंकन, बराक ओबामा, क्रांतीकारी कल्पना दत्त, बिना दास, प्रीती वड्डेदार, बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक पुढाऱ्यांचा पुस्तकं वाचनानंतर आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा बदलला याविषयी त्या बोलल्या. वाचनामुळे आत्मविश्र्वास कसा बळावतो याबद्दल खुलासा केला. त्यांनी आवर्जून सांगितले की ग्रंथालयात बाल वाचकांकरिता बाल -विभाग हवा. बाल
साहित्याची पुस्तकं हवीत. बालकांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन त्यांना वाचनाची सवय लागेल. आजचे बाल-वाचक उद्याचे वाचक आहे. भावी वाचक आहे.
एका नैराश्यग्रस्त माणसाचे मृत्युंजय या कादंबरी वाचनानंतर गत आयुष्याकडे पाठ फिरवून उर्वरीत जीवनात कसा यशस्वी झाला याची गोष्ट सांगितली. शेवटी पुस्तकाचे मनोगत ही उत्तम कविता त्यांनी वाचून दाखविली आणि आभार मानले.
आज पुस्तकं आनंदात आहेत.
आता पुन्हा वाचक येतील..
त्याचा प्रेमळ हातांचा स्पर्श
प्रत्येक पाना पानाला होईल..
शब्द शब्द डोळ्यात साठतील
अर्थ सुंदर मनाला कळतील..
भावुक आशय हृदयात उतरेल
ज्ञानाने समृद्ध होऊन त्यांचे
व्यक्तीमत्व संपन्न होईल.
आम्हाला वाचक मित्र मिळतील ..
एक वाचकप्रेमी या नात्याने डॉ. नयना जोशी यांनी ग्रंथालयाला विनंती केली की लहान मुलांसाठी असे काहीतरी उपक्रम करावेत की ते ग्रंथालयात येण्यासाठी उत्सुक झाले पाहिजेत. नेहमीच मोठ्यांसाठी व्याख्याने आयोजित करण्यात येतात. परदेशी, मुले लायब्ररीत जाण्यासाठी आनंदाने तयार असतात. पुस्तके हेच जीवन असते. वाचनालयासाठी चांदोबा मासिकांची भेट देण्याचे त्यांनी कबूल केले.

कार्याध्यक्ष श्री विवेक देशपांडे यांनी ते नोकरीत असताना त्यांना दरमहा एक पुस्तक वाचलेच पाहिजे अशी सवय लावून घेतली होती. त्याचा फायदा नंतरच्या कार्यालयीन कारकिर्दीत रिपोर्ट लिहिण्यासाठी कशी उपयोगी पडली याविषयी मनोरंजक गोष्ट सांगितली. बालकांसाठी इंग्लिश पुस्तकेही वाचनालयात ठेवावीत असे मत व्यक्त केले.
डॉ. शैलजा जोशी शांडिल्य यांनी सगळ्यांचे आभार मानून झाल्यावर कार्यक्रमाची सांगता झाली.
— लेखन : गिरीश मोंडकर. सहकार्यवाह, हैद्राबाद
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800